अनुभव – सूयोग गोरे
त्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास मी आणि माझा मित्र सागर एक पार्क मध्ये बसलो होतो.तो त्याच्या मैत्रिणी सोबत कॉल वर बोलत होता आणि मी मात्र तिथे बसून बसून कंटाळलो होतो. म्हणून सहज विचार केला की सागर वर प्रँक करू. म्हणून मी त्याला विचारलं ” काय रे सागर मी तुला म्हटलं की मी भूत आहे तर तू काय करशील”..
तो फोन वर बोलण्यात इतका मग्न झाला होता की त्याने मला ऐकुन न ऐकल्या सारखे केले. म्हणून मी जरा जास्तच मस्ती करायचे ठरवले. मी गपचुप तिथून निसटलो आणि थेट माझ्या घरी आलो. घरी गेल्या गेल्या मी आमच्या एका मित्राला म्हणजे निशांत ला या प्रँक बद्दल समजावून सांगितले. तो ही लगेच हो म्हणाला आणि मग आमच्या पुढच्या प्लॅनिंग ची सुरुवात झाली. निशांत ने सागर ला फोन केला आणि मुद्दामून त्याच्या घरी बोलावून घेतले.
काही वेळा नंतर ते दोघे पुन्हा बाहेर पडले. निशांत त्याला पुन्हा त्याच पार्क मध्ये घेऊन आला आणि माझ्या बद्दल विचारू लागला. तसे सागर ने मला फोन केला आणि विचारू लागला की कुठे गायब झालास न सांगता.. आम्ही वाट पाहतोय इथे. मी लगेच प्लॅन प्रमाणे बोलणे सुरू केले. मी त्याला म्हणालो “कुठे वाट पाहताय?.. आणि मी कुठून गायब झालो. काय बोलतोय तू?.. मी सकाळपासून घरा बाहेर ही पडलो नाहीये”.
तसे तो थोडा वेळ विचारात पडला आणि म्हणाला “अरे आत्ता अर्ध्या तासापूर्वी पार्क मध्ये माझ्या सोबत बसला होतास ना”.. तसे मी पुन्हा त्याला म्हणालो “अरे काय बोलतोय मित्रा. थांब मी येतो तिथे”.. मी मुद्दामून कपडे बदलले आणि 10 मिनटात पार्क मध्ये येऊन पोहचलो.” सागर आणि निशांत तिथेच बसले होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि तसे सागर मला म्हणाला “अरे.. तू मगाशी ब्लॅक कलर चा टी शर्ट घातला होता स ना मग आता हे लाल कलर चे टी शर्ट?”..
तसे मी म्हणालो “अरे मी सकाळ पासून हेच घालून फिरतोय. बरं मी इथे होतो तर काय गप्पा मारल्या जरा सांगशील का?”
आता मात्र तो जरा घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आम्ही दोघं गालातच हसत होतो. तितक्यात तो म्हणाला “अरे तू विसरलास? मी फोन वर बोलत होतो तेव्हा तू मला विचारलं नाहीस का की मी भूत आहे असा म्हटलं तर तू…..” एवढं वाक्य पूर्ण करण्याच्या आता सागर च्या लक्ष्यात आला की मगाशी मी नाही तर खरंच कोणी तरी भूत होत. बघता बघता त्याचा चेहरा पिवळा पडला.हात पाय थरथरू लागले. पुढच्या काही मिनिटात त्याला ताप भरला. आम्ही पटकन त्याला त्याच्या घरी नेऊन सोडलं.
घरी गेल्यावर तो जास्त काही बोलला नाही आणि तसाच झोपून गेला. तिथून निघायला मात्र आम्हाला बराच उशीर झाला. त्याचे घर बरेच लांब होते म्हणून आम्हाला आमच्या घरी जायला वेळ लागणार होता. रात्री चे १२ वाजायला आले होते. मी आणि निशांत चालत एका कार पार्किंग च्या शेड जवळ आलो. ती जागा जरा निर्मनुष्यच होती. त्या कार पार्किंग ला एक लोखंडी गेट होता. आम्ही जसे त्या ठिकाणापासून पुढे चालत जाऊ लागलो तसे तो अचानकच जोरात हादरू लागला.
मला आधी वाटलं एखादा कुत्रा किंवा मांजर असेल. पण तसे काहीच दिसत नव्हते. निशांत ला काही वेगळाच सौशय आला म्हणून त्याने मला रेकॉर्ड करायला सांगितले. मी फोन चा कॅमेरा सुरू केला आणि तो गेट अतिशय जोरात हादरून लागला. आता मात्र आम्ही दोघं समजलो की इथे थांबलो तर आपले काही खरे नाही. आम्ही दोघे ही झपाझप पावले टाकत तिथून लांब गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही चौकशी केली तेव्हा कळले की त्या ठिकाणी सागर च्या खास वर्ग मैत्रिणी ने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती.. सागर वरचा तो प्रँक आम्हाला चांगलाच महागात पडला होता.