अनुभव क्रमांक १ – गौतम

ही गोष्ट २०१८ साली माझ्या सोबत आणि माझ्या मामा सोबत घडली होती. मी शहरात राहायला आहे आणि नेहमी गावी जात असतो. त्या वर्षी ही मी गावाला गेलो होतो. श्रावण महिना लागणार होता आणि त्या आधी गटारी हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे या वर्षीही मटण वैगरे करायचा सगळा बेत ठरला होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मटण आणायला बाहेर पडलो पण गटारी असल्या कारणाने ते कुठेही मिळत नव्हते. जवळपास च्या सगळ्या हॉटेल मध्ये चौकशी करून झाली पण व्यर्थ. 

शेवटी मामा म्हणाला की बायपास कडे २-३ हॉटेल आहेत तिथे नक्की मिळेल. तिथे मटण संपणे शक्य नाही. तसे आम्ही बाईक काढून तिथे जायला निघालो. मी बाईक चालवत होतो. रस्ता अतिशय खराब होता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त त्यामुळे बाईक हळू चालवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. साधारण अर्ध्या तासाने आम्ही त्या हॉटेल जवळ येऊन पोहोचलो. आमचे नशीब चांगले म्हणून तिथल्या पहिल्याच हॉटेल मध्ये आम्हाला मटण मिळाले. ते घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 

तिथून निघाल्यावर पुन्हा आम्ही त्या खराब रस्त्याला लागलो. तसा एक घाण कुबट वास येऊ लागला. तितक्यात मामा म्हणाला की रस्त्यात काहीही जाणवले किवा कोणी दिसले तर चुकूनही गाडी थांबवू नकोस. मामा सतत सांगत होता की घाई कर जोरात घे बाईक पण रस्त्यात इतके खड्डे होते की मी गाडी हळूच चालवत होतो. काही वेळानंतर तो वास एका क्षणी बंद झाला आणि अचानक खूप सुंदर असा सुगंध येऊ लागला जसे कोणी परफ्यूम मारले आहे. मामा ला काही सांगणार इतक्यात तो म्हणाला की बघ समोर एक माणूस हात दाखवून गाडी थांबवायला सांगतोय पण मला रस्त्याकडे ला कोणीही दिसत नव्हते. मी त्याला म्हणालो की अरे मामा काय बोलतोय समोर कोणी नाहीये. मला वाटले की मामा मस्करी करतोय म्हणून मी गाडी अगदी आरामात चालवत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. 

तसे तो चिडून च म्हणाला “तू काय आंधळा झाला आहेस का ? समोर पांढरा सदरा घातलेला तो माणूस दिसत नाहीये का तुला ?”. तसे मला जाणवले की मामा मस्करीच्या मूड मध्ये दिसत नाहीये तसे मी पुन्हा म्हणालो मामा खरच कोणी नाहीये रे समोर. काही वेळा नंतर तो म्हणाला “बाईक जोरात घे तो मागे येतोय आपल्या”. माझी आता चांगलीच तांतरली होती. म्हणून मी जास्त काही न बोलता जमेल तितक्या वेगात बाईक पळवू लागलो. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आम्हा दोघांना थंडी लागत होती. शेवटी गावात येऊन पोहोचलो तेव्हा कुठे हायसे वाटले. घरी आल्यावर मामा सांगू लागला की ते जे काही होते ते आपल्या मागे येत होते आणि माझ्याकडे मटण मागत होते म्हणून मी तुला सतत सांगत होतो की बाईक चा वेग वाढव. 

त्या रात्री मला काहीच दिसले नाही पण जे काही मी अनुभवले ते खूप भयंकर होते. 

अनुभव क्रमांक – २ – सुमेध रामोशी

ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. नुकतीच परीक्षा संपवून मी काका काकूंकडे गावाला आलो होतो. अगदी खेडेगाव आहे त्यामुळे वस्तीही तुरळक. मला येऊन ५ दिवस झाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी गच्चीवर माझ्या भावंडांबरोबर झोपायचो. त्या रात्री ही आम्ही जेवण वैगरे आटोपले आणि माझे अंथरूण घेऊन वर आलो. अंथरूण करत असताना माझे लक्ष आमच्या घराच्या अंगणात असलेल्या एका झाडाकडे गेले. लक्ष जाण्याचे कारणही तसेच होते. तिथे झाडा खाली एक वेगळीच हालचाल जाणवत होती. 

पण नंतर मी त्याकडे दुर्लक्ष करून माझ्या भावंडांची वाट पाहत तिथेच कठड्या जवळ उभा राहिलो. पण नकळतपणे पुन्हा त्या झाडाकडे लक्ष गेलं. मी अंथरूण तसेच टाकून थोडे पुढे जाऊन कठड्याजवळ उभा राहिलो आणि समोरच्या झाडाकडे निरखून पाहू लागलो. तितक्यात मला २ लहान मूल झाडाखाली दिसली. मला वाटले गावातली च मुलं असतील. पण त्यांच्या अंगाला पांढऱ्या रंगाचे काही तरी लावले होते. काही मिनिट ती दोन्ही मुलं तशीच झाडाच्या दिशेने वर पाहत होती. आणि मीही ते नक्की काय करत आहेत ते पाहत होतो. काही वेळानंतर ती मुल झाडावर चढू लागली. एका फांदीवर बसली आणि तिथे असलेल्या एका पक्ष्याला धरून सरळ तोंडा त घातले आणि दाताने ओढून त्याचे तुकडे करत खाऊ लागले. 

हा सगळा प्रकार बघून इतके विचित्र वाटू लागले की मी भीतीने थरथरू लागलो. त्यांचे हात आणि तोंड रक्ताने पूर्ण माखले होते. मी भावाला हाक माराय चा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. मला भीतीमुळे खूप घाम सुटला होता. तितक्यात बहुतेक त्या मुलांना मी त्यांच्याकडे पाहत असल्याची चाहूल लागली आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांची ती भेदक नजर पाहून मी जोरात ओरडलो आणि जागेवरच बेशुध्द होऊन पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी घरात बिछान्यावर होतो. काका, काकू, सगळी भावंडं माझ्याकडे पाहत होती. त्यांना पाहून मला रडू कोसळले. 

मी रडतच काका ला मिठी मारली आणि जे पाहिले ते सगळे सांगितले. तेव्हा काका म्हणाले की गावातल्या एका कुटुंबातली २ मुल संशयी रित्या मरण पावली होती. त्या नंतर त्यांचे आईवडील ही असेच मृत्यू पावले. त्या दिवसा नंतर कधी ती २ मुल तर कधी त्यांचे आई वडील रात्री अप रात्री लोकांना दिसतात. मी तिथे जायचे कायमचे बंद केले आणि काका काकूंना सुद्धा आमच्याकडे राहायला बोलावले. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. 

अनुभव क्रमांक – ३ – सुदर्शन त्रिमुखे

मी एके काळी डिलिवरी बॉय चे काम करायचो. त्या दिवशी शुक्रवार होता. आणि शुक्रवार म्हंटला की पिझ्झा वैगरे वर भरपूर ऑफर्स असतात त्यामुळे जास्त ऑर्डर्स असायच्या आणि मग एरव्ही पेक्षा जास्त डिलिवरी करायला जाय ला लागायचे. त्या रात्री ही नेहमी पेक्षा जास्त डिलिवरी करून सुमारे ११ ला मी घरी जायला निघालो. तितक्यात माझ्या सरांनी मला हाक मारून बोलावून घेतले. ते म्हणाले की ही शेवटची डिलिवरी करून मग घरी जा. मी सरांना विनंती केली की आधीच खूप उशीर झालाय पण ते म्हणाले की बाकीचे सगळे आधीच डिलिवरी साठी बाहेर गेलेत त्यामुळे तुलाच ही डिलिवरी पूर्ण करावी लागेल, ही एक शेवटची डिलिवरी करून ये मी माझ्याकडून तुला एक पिझा देतो तुझ्यासाठी. 

इतक्या रात्री पुन्हा डिलिवरी करायला जायची ईच्छा नव्हती पण नाईलाजाने सर सांगत आहेत म्हणून ती ऑर्डर स्वीकारावी लागली. तिथून निघालो तेव्हा ११.३० वाजत आले होते. मी साधारण २० मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचलो. दारावरची बेल वाजवली आणि त्यांना पार्सल दिले. त्यांनी सुद्धा इतक्या उशीरा यावे लागले म्हणून मला ५० रुपये टीप दिली पण मी ती न स्वीकारता काही हरकत नाही हे माझे काम आहे असे म्हणून तिथून निघालो. जाताना मी हाय वे च्या ब्रीज खालून जाऊ लागलो तितक्यात मला माझ्या नावाने म्हणजेच सुदर्शन अशी जोरात हाक ऐकू आली. तशी मी एकाएकी गाडी थांबवली आणि चौ फेर नजर फिरवली. भास झाला असेल असे समजून मी गाडी सुरू केली आणि काही सेकंदात मला पुन्हा माझ्या नावाने हाक ऐकू आली. 

आता मात्र मला शंका येऊ लागली. त्या निर्जन काळोखी रस्त्यावर कोणीही दृष्टीस पडत नव्हते पण माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या. मी तिथून लगेच निघालो आणि माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. सरांनी माझ्यासाठी पिझा काढून ठेवला होता तो मी घेतला आणि सरळ घरी गेलो. घरी पोहोचल्यावर मी सगळे आई ला सांगितले त्यावर ती म्हणाली की जास्त विचार करू नकोस तुला भास झाला असेल, जेवण आटोपून घे आणि लवकर झोपून जा. पण नंतर ही कितीतरी वेळ माझ्या मनात तोच विचार घोळत होता. मला सतत वाटतं होते की तो माझा भास नक्की च नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मित्राला घेऊन त्या रस्त्यावर गेलो आणि काही विपरीत घडले आहे का याची विचारपूस करू लागलो. 

तेव्हा तिथल्या लोकांकडून कळले की दोन दिवसांपूर्वी त्याच रस्त्यावर ब्रीज च्यामा खाली एका बाईक चा भीषण अपघात झाला होता आणि त्यात एक व्यक्ती जागीच मरण पावला होता. मी घरी आल्यावर मात्र मला अचानक ताप भरला. आजारी पडायला विशेष काही कारण दिसत नव्हते. होते ते एकच कालचा अनुभव आणि तो अपघात. माझ्या मित्राने फोन करून मला सांगितले की मी माझ्या आजीला विचारले आहे तुझ्या सोबत हे सगळे घडले त्या बद्दल. ती हे सगळे ओळखते. तिने तुला त्या ठिकाणी नारळ फोडून यायला सांगितले आहे. आधी मी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही पण नंतर त्याच्या आजीने सांगितल्या प्रमाणे केले आणि दुसऱ्या दिवशी माझा ताप अचानक उतरला. आता हा योगायोग म्हणता येईल की अजुन काही हे मला माहित नाही पण माझा ताप उतरला होता हे मात्र नक्की. त्या नंतर मी त्या ब्रीज खालच्या रस्त्यावरून खूप वेळा गेलो पण मला असला अनुभव पुन्हा कधीच आला नाही. 

कथा ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा :

https://youtu.be/KVgnzbhzd9w

Leave a Reply