अनुभव – नितीन हातागळे
हा अनुभव मागच्या वर्षीचा आहे. मी औरंगाबाद ला एका हॉटेल मध्ये शेफ आहे. माझा भाऊ ही माझ्या सारखाच हॉटेल इंडस्ट्री मध्ये शेफ आहे. त्या दिवशी ड्युटी वर असताना त्याचा फोन आला. तो म्हणाला की औरंगाबाद वरून जवळपास 40 किलोमीटर वर एक मोठ्या कंपनी चे ओपनिंग आहे. त्यामध्ये मला कंपनीच्या कॅन्टीन ची ऑफर आली आहे. मला फॅमिली मुळे जमणार नाही पण तुला जमत असेल तर बघ. पोस्ट आणि पगार मस्त देत आहेत. ट्राय करून बघ. त्याचे बोलणे ऐकून मी त्याला म्हणालो की ठीक आहे विचार करून नक्की काय ते सांगतो. दुसऱ्या दिवशी मी त्या कंपनी मध्ये जायचे फायनल केले आणि भावाला कळवले. पुढच्या आठवड्यात त्या कंपनीत गेलो, माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्ट ही झालो. त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगितले होते. पण इतक्या लवकर राहण्याची सोय झाली नाही त्यामुळे मी जॉईन तर झालो पण रोज ४० किलोमिटर जाऊन येऊन प्रवास व्हायचा.
जॉब ला जॉईन होऊन जवळपास १५ दिवस झाले आणि त्या दिवशी रात्री मला आमच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला. ते म्हणाले की आपल्याकडे उद्या हॉटेल चे मालक आणि विदेशातून पार्टी येणार आहेत. त्याचे डिनर आपल्या कंपनी मध्येच होईल आणि मला या बाबत कसलीही तक्रार नकोय. मी ओके म्हणत फोन ठेवला. माझ्या सोबत असणाऱ्या कॅन्टीन च्याच स्टाफ ला फोन करून कळवले. त्यांना उद्या सकाळीच सगळी तयारी करायच्या सूचना दिल्या. मी सुद्धा सगळ्या सामानाची लिस्ट केली. मला संपूर्ण दिवस तयारी करायला मिळाला त्यामुळे वेळेत सगळे नीट झाले. कसलीही घाई गडबड झाली नाही. रात्री नऊच्या दरम्यान डिनर पार्टी ला सुरुवात झाली. पार्टीमध्ये विदेशातून आलेले पाहुणे मंडळी, कंपनी चे सगळे मोठे साहेब आणि अधिकारी आले होते. सगळ्यांना जेवण आवडले, माझे मन भरून कौतुक ही केले. जवळपास ११.३० पर्यंत सगळे आटोपले.
आता फक्त आम्ही राहिलो होतो म्हणजे कॅन्टीन चा स्टाफ. माझ्या स्टाफ ने माझी मुद्दामून खेचायला सुरुवात केली आणि सांगू लागले की नित्या तुझ्या हातामध्ये एखाद्या सुगरण बाई ला ही लाजवेल अशी चव आहे. मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपले.काम करत होतो. आमचे सगळे अवरल्यावर त्यांनी ड्रिंक्स चा आग्रह करायला सुरुवात केली. मी नाही म्हणत होतो पण त्यांनी माझे ऐकले नाही.. मग काय ड्रिंक्स करता करता इतका वेळ झाला की रात्रीचा एक वाजून गेला. त्या नंतर सगळे जेवायला बसले. पण मला जेवायची अजिबात इच्छा नव्हती. मी त्यांना म्हणालो “चला यार.. निघतो मी आता.. मला अजून दीड पावणे दोन तास प्रवास करून घरी जायचे आहे. त्यावर ते म्हणाले की इतक्या रात्री कुठे जातोय आता, आजची रात्र इथेच थांब. कंपनी मोठी असल्यामुळे तशी सगळी झोपायची वैगरे सोय होती पण मला दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाचे काम होते म्हणून मी त्यांना नाही म्हणालो आणि त्यांचा निरोप घेऊन निघू लागलो.
तेवढ्यात एक मित्र म्हणाला ” अरे तू आधीच खूप प्यायला आहेस आणि जेवला ही नाहीस. मी तुला पार्सल देतो ते घेऊन जा आणि घरी जाऊन निवांत जेवण कार..” तसे मी त्याला नाही म्हणालो पण तरीही त्याने पार्सल जबरदस्ती दिलेच. इतकेच नाही तर माझ्या बुलेट ची चावी घेतली आणि ते पार्सल डिकी मध्ये ठेऊन दिले. जवळपास सव्वा ला मी तिथून घरी यायला निघालो. रोज प्रवास करायचो त्यामुळे रस्ता तसा ओळखीचा झाला होता. पण इतक्या रात्री निघण्याचा योग पहिल्यांदा च आला होता. अश्या वेळी सोबत असली की प्रवास जाणवत नाही. पण एकटाच असल्यामुळे वेगळेच जाणवत होते. एव्हाना वाहनाची वर्दळ अगदी कमी झाली होती. अधून मधून एखादा मालवाहू ट्रक बाजूने आवाज करत पास व्हायचा आणि मग पुन्हा रस्ता एकदम सामसूम होऊन जायचा. निघून साधारण १५ किलोमिटर अंतर पार केले असेल तेव्हड्यात मला रस्त्याकडे ला एक फॅमिली दिसली. नवरा, बायको आणि एक लहान मुलगा. ते माझ्या गाडी ला हात करत होते. मला आश्चर्य च वाटले.
इतक्या रात्री हे लोक इथे काय करत असतील. कदाचित एकही वाहन मिळाले नसेल यांना..? असेल बहुतेक. पण हे तिघे आहेत, यांना कसे घेऊन जाऊ माझ्या बुलेट वर. जाऊदे थांबून काही उपयोग नाही असा विचार करत मी पुढे निघून गेलो. पुन्हा विचार आला की काही वेळात कोणते तरी वाहन नक्की मिळेल त्यांना. पुढचे पाच किलोमीटर चे अंतर कापले असेल आणि बघतो तर काय. पुन्हा तीच फॅमिली रस्त्याकडे ला उभी राहून माझ्या गाडी ला हातवारे करत होती. माझी सगळी एका झटक्यात उतरून गेली. माझ्या लक्षात आले की हा प्रकार काही तरी वेगळाच आहे. मी गाडीचा वेग वाढवला. साईड मिरर मधून मागे पहिले तर ते तसेच उभे राहून माझ्या गाडी ला पाहत होते. फरक इतकाच होता की त्यांचे चेहरे त्या मिरर मधून अतिशय विद्रूप दिसत होते. रक्ते ठिकठिकाणी फटल्या सारखे दिसत होते. असे वाटत होते की ते एखाद्या अवजड वाहनाखाली येऊन चिरडले गेले आहेत.
भीती ने माझ्या हाता पायाला कंप सुटू लागला. मी गाडी अतिशय वेगात घेतली. ८०,९० करत मी गाडी चा वेग वाढवत च चाललो होतो. तितक्यात माझी गाडी अचानक जड वाटू लागली. मी पुन्हा साईड मिरर मध्ये पाहिले तर तो माणूस माझ्या गाडीवर बसला होता. मी विजेचा झटका लागल्यासारखा एका सुन्न अवस्थेत होतो. तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसले की तो माझ्या बुलेट ची डिकी काढायचा ती फोडायचा प्रयत्न करतोय. जोर जोरात हाताने त्यावर प्रहार करू लागला. पण डिकी काही उघडत नव्हती. तसे त्यांना माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आणि उलट फिरला. त्याच्या पायाने तो डिकी ला लाथा मारून ती फोडायचा प्रयत्न करू लागला. आता मात्र गाडी वर नियंत्रण ठेवणे मला अशक्य होऊ लागले. माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी स्लीप होऊन मी जोरात रस्त्यावर आदळ लो. वेगात असल्यामुळे मी गाडी पासून २५-३० फूट दूर फेकला गेलो. मी नक्की कश्यावर पडलो हे कळले नाही. पण एका मोठ्या दगडावर होतो बहुतेक.
इतक्या जोरात आ पटल्यामुळे मला जबर मार लागला होता. मी जेमतेम उठून मागे गाडी कडे पाहिले आणि दिसले की तो माणूस अजूनही डिकी फोडायचा, किंबहुना ती उघडायचा प्रयत्न करत होता. हळु हळु ते दृश्य धूसर होऊ लागले आणि मी जागीच बेशुध्द झालो. डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो. शेजारी भाऊ, वहिनी आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होता. मला शुद्ध येतच वहिनी काळजी पोटी सांगू लागल्या “भाऊजी तुम्हाला किती वेळा सांगितले की रात्रीच्या वेळी असे पिऊन प्रवास करू नका.. बरे झाले की या काकांनी तुम्हाला पाहिले आणि कसाबसा आम्हाला संपर्क केला. मी तेव्हा काहीच बोललो नाही. कारण मला वाटले की मी नशेत असल्यामुळे हा अपघात झाला. पण न राहवून मी त्यांना सगळा प्रकार सांगितला तसे त्यांच्या सोबत उभा असलेला अनोळखी व्यक्ती बोलू लागला “भाऊ मी तिथेच असतो, माझे शेत आहे, तिथे रोज सकाळी दूध घेऊन जातो मी. आज पहाटे तुम्ही दिसलात मला.. तुम्ही खूप चांगले नशीब घेऊन आला आहात कारण त्या रस्त्यावरील अपघातात कोणी वाचत नाही..”
मी त्यांचे आभार मानत म्हणालो “थांक यु काका तुम्ही मला वाचवलेत, पण मला जे दिसले तो काय प्रकार आहे..” तसे ते म्हणाले “काही महिन्यांपूर्वी ची गोष्ट आहे. एक परप्रांतीय कुटुंब लॉक डाऊन मध्ये काम धंदा नसल्यामुळे त्यांच्या गावी जायला निघाले होते. पण त्यांना कुठे ही जेवण वैगरे न मिळाल्यामुळे त्यांच्या लहान मुलाने जीव सोडला. नंतर त्या दोघांनी एका धावत्या ट्रक खाली उडी मारून जीव दिला. तेव्हा पासून त्या रस्त्यावर असे अनुभव बऱ्याच लोकांना येत आहेत..” त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना प्रश्न केला “पण काका मी कसा काय वाचलो यातून..?” तसे ते म्हणाले की तुम्ही ज्या जागेवर पडला होतात ते एक छोटे हनुमानाचे मंदिर होते. त्याच्या पायरीवर जाऊन तुम्ही आदळला त. हे बोलून ऐकून भाऊ आणि वहिनी तर सुन्न च झाले. मी भावाला गाडी बदल विचारले तर कळले की त्याने गाडी आपल्या मित्राच्या गॅरेज वर दुरुस्ती साठी दिली आहे. मी त्याला म्हणालो की त्याला फोन लाऊन दे, मला बोलायचे आहे.
त्याने मला फोन लाऊन दिला. मी त्या मित्राला विचारले की गाडीच्या डिकी मध्ये काही आहे का बघून सांग जरा. तसे त्याने गाडी तपासून पहिली आणि म्हणाला की डिकी चा पूर्ण चेंदामेंदा झालाय आणि त्यात काहीच नाहीये. म्हणजे घडलेला प्रकार भास नव्हता. तो माणूस डिकी फोडायचा प्रयत्न करत होता कारण त्यात जेवण होत. ते ही मांसाहारी. माझा भाऊ म्हणाला की काळजी नको करुस. त्याने आणि वहिनी ने जाऊन एका महाराजा ला बोलवून मंदिरात पूजा वैगरे केली. मला एक दोरा म्हणजे गोंडा आणून दिला आणि गळ्यात बांधायला सांगितला. त्या नंतर मात्र मला असा भयानक अनुभव कधी आला नाही. शक्यतो मी रात्री चा प्रवास करणे टाळतो आणि कधी वाटले तर आहे तिथेच रात्र भर थांबतो.