अनुभव – पूनम साबळे

अनुभव आमच्या गावातील एका आजीने सांगितला होतं गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. जवळपास ६०-७० वर्षांपूर्वीची. तिने तिचे नाव कमलाबाई सांगितले. साताऱ्या जवळ एका गावापासून काही अंतरावर एक वाडा आहे. तिथलीच ही गोष्ट. तेव्हा तो भाग अतिशय गर्द झाडी झुडुपांचा होता. त्यात वाडा मुख्य वस्तीपासून जरा लांब च होता. त्या वाड्यात मी, माझा नवरा दिनकर, दोन मुलं, एक दिर रमाकांत भाऊ आणि त्याची आई म्हणजे माझी सासू राहायची. रमाकांत भाऊ च लग्न जवळच्या एका गावातल्या यमुना नावाच्या मुलीसोबत ठरल होतं. बोलणी वैगरे झाली आणि लग्नाची तारीख पक्की झाली. सगळ अगदी सुरळीत चाललं होत. काही दिवसांत त्यांचा लग्न समारंभ पार पडला. यमुना वाड्यात राहायला आली. लग्न म्हटले की पाहुणे मंडळी असणारच. त्यामुळे पाहुण्यांनी वाडा भरला होता. लग्न होऊन दोन दिवस झाले. अजून काही पाहुणे आपल्या घरी गेले नव्हते. 

आमच्या इथे लग्न झाल्यानंतर गावच्या मंदिरात नवी नवरीची ओटी भरा यची असते. नंतर च घरा बाहेर पडायचे अशी रीत आहे. यासाठी मी रात्री जेवणानंतर सगळी कामे आटोपून यमुना ला उद्याचा विधी समजवायला गेली. पण ती घरात दिसली नाही. मी रमाकांत भाऊंना विचारले पण त्यांना ही माहीत नव्हते की ती कुठे गेली. आम्ही दोघेही तिला शोधायला बाहेर पडलो. एव्हाना खूप रात्र झाली होती. त्या काळी गावात वीजही नव्हती. कंदील घेऊन आम्ही तिला घराच्या आसपास शोधू लागलो. वाड्याच्या मागे कुंपण होते. त्याच भागात शोधत असताना ते कुंपण तुटलेले दिसले आणि तिथून च गर्द झाडीतून गेलेली एक वाट नजरेस पडली. वाढलेल्या गवतामधून जाणारी पायवाट. रमाकांत भाऊंनी तिला हाक दिली. पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. राहून राहून एकच वाटत होते की ती नक्की इथूनच गेली असेल. आम्ही त्या तुटलेल्या कुंपणा तून बाहेर निघालो आणि गर्द झाडीच्या वाटेतून चालत पुढे जाऊ लागलो. 

वाड्याच्या मागे काही अंतरावर एक पडकी विहीर होती. तिथे त्यांना कोणी तरी उभे असल्याचे जाणवले म्हणून ते त्या विहिरीच्या दिशेने गेले. तिथे यमुना त्या विहिरीत डोकावून एक टक पाहत होती. तिला पाहून ते दचकलेच. कारण आजूबाजूला गर्द झाडी होती आणि मिट्ट अंधार पसरला होता. त्यात रात्र ही खूप झाली होती. ते पुढे गेले आणि रमाकांत भाऊंनी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला हाक दिली. पण ती मात्र काहीच न बोलता तावातावात तिथून निघून गेली. ते दोघेही जरा घाबरलेच. त्या विहिरीजवळ कोणीही जात नव्हते. आम्ही घरी येऊन झोपून गेलो. ५ ते ६ दिवस उलटले. सगळे पाहुणे आप आपल्या घरी निघून गेले. तेवढ्यात बातमी आली की यांच्या आत्त्याची तब्येत अचानक बिघडली आहे. घरातले सगळे जण तिला पाहायला तिच्या गावी निघून गेले. तेव्हा मी आणि यमुना घरी दोघीच होतो.. दिवसभर सर्व कामे उरकून गप्पा मारत बसले होतो. तितक्यात दारावर थाप ऐकु आली. दार उघडले तर शेजारचे श्याम भाऊ मटण द्यायला आले होते. 

रमाकांत भाऊंनी जाताना त्यांना सांगितले होते की मटण घेऊन घरी देऊन या. त्यांना सांगितले की घरी कोणी नाहीये फक्त मी आणि यमुना आहे आणि यमुना मटण खात नाही. तरी ते म्हणाले की रमाकांत ने सांगितले म्हणून मी आणून दिले, घ्या तुम्ही. त्यांनी मटणाची पिशवी हातात दिली आणि ते निघून गेले. ती मटणाची पिशवी मी तशीच स्वयंपाक घरात नेऊन ठेवली आणि बाहेर येऊन बसले. संध्याकाळ झाली. साधारण सात साडेसातला मी जेवण करायला सुरुवात केली पण मटणाची पिशवी स्वयंपाक घरात नव्हती. मला चांगले आठवत होते की त्यांनी पिशवी ओट्यावर ठेवली होती पण ती मला आता सापडत नव्हती. मला वाटले की मांजरी ने वैगरे नेली असेल. शेवटी आम्ही साधेच जेवण केले. त्या दिवशी घरातले कोणी नसल्यामुळे आमची जेवण लवकर आटोपली, सगळे आवरायला ही जास्त वेळ लागला नाही. म्हणून आम्ही दोघीही लवकर झोपून गेलो.

मध्यरात्र उलटून गेली असेल. मला अचानक जाग आली आणि पाहिले तर बाजूला यमुना नव्हती. वाटले की पाणी प्यायला गेली असेल पण बाजूला ठेवलेला पाण्याचा तांब्या भरलेला होता. मग ही गेली कुठे..? पुन्हा त्या विहिरी जवळ तर गेली नसेल.. नुसत्या विचाराने काळजात धस्स झालं. आज घरात दुसरे कोणीही नाही, जर यमुना पुन्हा तिथे गेली असेल तर मग काय करायचे, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण असे घाबरून चालणार नव्हते. मी कंदील घेतला आणि घराच्या बाहेर पडले. दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता आणि काळजात अजुन धडकी भरवत होता. घराजवळ चा आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळला पण यमुना कुठे ही दिसली नाही. मी वाड्याच्या मागच्या बाजूला गेले. पुन्हा ते कुंपण तुटले ले दिसले आणि या वेळी जरा जास्तच.. अंगावर भीतीने काटा येऊन गेला. म्हणजे यमुना पुन्हा त्या विहिरी कडे गेली आहे. 

मागे वळून चालणार नव्हते. काहीही करून यमुना ला तिथून आणायला लागणार होत. मी दबकत त्या वाटेवरून निघाले. वातावरणात गारवा असला तरी भीतीने कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले होते. मी पुढे जाऊन एका झुडुपा मागे लपून पाहीले. यमुना विहिरीच्या कठड्यावर बसून काही तरी खात होती. मी कंदील तिथेच ठेवला आणि तिच्या जवळ चालत जाऊ लागले. जवळ आल्यावर मी जे पाहिले ते पाहून माझे काळीज धड धडू लागले. हातपाय भीतीने कापू लागले. ती पिशवीत ले कच्च मटण घेऊन एखाद्या जनावरा सारखी ओरबाडून खात होती. तिच्या तोंडातून लाळ गाळत होती. ते भयाण दृश्य मला पाहवत ही नव्हते. पण तिला बहुतेक याचे भान नव्हते.. बघता बघता तिने पिशवीत ले सगळे मटण संपवून टाकले. मी हळु हळू मागे सरकू लागले कारण मी जे काही पहिलं होत त्यावरून यमुना ला सांभाळणे आता माझ्या आवाक्यात नव्हते. उलट पावलं टाकत मी तिथून लांब आले आणि घराकडे धाव घेतली. माझी चाहूल तिला अजिबात लागू दिली नाही. घरी येऊन मी अंथरुणात पडले. संपूर्ण शरीर भीती ने थरथरत होत. काय करावं काय नाही काहीच सुचत नव्हत. 

थोड्याच वेळात दार उघडण्याचा आवाज आला. यमुना घरात आली तसा एक कुबट वास येऊ लागला. मी मात्र तोंडावर हात दाबून आपले हुंदके आवरण्याचा, ते दाबण्याचा प्रयत्न करत होते. ती आली आणि माझ्या बाजूला येऊन झोपली. पण मला काही रात्र भर झोप लागली नाही. कारण माझ्या बाजूला झोपलेली यमुना नव्हतीच मुळी. सकाळ झाली. गावावरून सगळे घरी परतले. मी सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. रमाकांत भाऊ तिला उठवायला गेले तर ती तापाने फणफणत होती. वैद्यांना बोलवण्यात आले. औषध पाणी झाले. तिचा ताप तर उतरला पण अजून सगळे संपले नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी सासूबाईंनी एका मांत्रिकाला बोलावले. त्याला सर्व हकीकत सांगितली. जे व्हायला नको होते तेच झाले होते. यमुना ला एका वाईट शक्तीने झपाटले होते. रात्र झाली की ती शक्ती तिच्यावर वरचढ व्हायची. सासूबाईंनी यावर उपाय विचारला तसे मांत्रिक म्हणाला की उपाय खूप अवघड आहे. जराही चूक झाली तर जीवावर बेतेल. त्याचे असे बोलणे ऐकून सगळे जण एकदम शांत झाले. पण नंतर सगळे एका सुरात च म्हणाले की काहीही झाले तरी चालेल पण यमुना यातून बाहेर निघाली पाहिजे. 

सगळे तयार झाल्याचे पाहून मांत्रिक उपाय सांगू लागला. येत्या अमावस्येला यमुना ऐवजी एकीने मध्य रात्री त्या विहिरीवर जायचे. हिरवी साडी नेसायची, हातात हिरवा चुडा घालायचा. तिथे गेल्यावर ती शक्ती तिथे ओढली जाईल. त्या शक्तीच्या पायाखालची माती घेऊन यायची आणि घरी येऊन थेट देवघरात बसायचे. आम्ही सगळे त्याचे बोलणे नीट ऐकून घेतले. घरात सवा श्ण मीच होते. यमुना माझ्या लहान बहिणी सारखी. अवघ्या काही दिवसात आम्ही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी च झालो होतो. जास्त काही विचार न करता मी तयार झाले. घरातल्या सगळ्यांना माझा धाडसी निर्णय बघून आश्चर्य च वाटले. बघता बघता अमावस्ये ची ती रात्र आली. त्या मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे मध्य रात्र उलटल्यावर मी त्या विहिरीच्या वाटेला लागले. वातावरणात वेगळाच थंडावा पसरला होता. मनात भीती तर होतीच. मन घट्ट करून मी चालत काही मिनिटात त्या विहिरीजवळ पोहोचले. 

काही वेळ उलटला पण मला तिथे कोणीही दिसत नव्हते. पण तितक्यात थंडीचा जोर अचानक वाढला. मला अगदी असह्य वाटू लागले. बघता बघता विहिरी समोर एक धुरकट आकृती तयार होऊ लागली आणि पुढच्या काही क्षणात माझ्या समोर येऊन बसली. एक वेगळाच आवाज येत होता मला. हळु हळु त्या आकृती ने मानवी रूप धारण करायला सुरुवात केली आणि मी पाहतच राहिले. हा सगळा प्रकार मी धड धडत्या काळजाने पाहत होते. मी त्या आकृतीच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण मला चक्कर येऊ लगली तितक्यात मी स्वतःला सावरले आणि झटकन तिच्या पायाखालची माती घेऊन घराच्या दिशेने धावत सुटले. मागून कर्णकर्कश किंचाळ्या ऐकू येत होत्या. पण मी धावत घरात आले आणि देवघरात गेले. तिथे यमुना ला आणून बसवले होते. मी ती माती घेऊन यमुना ला लावली. मी इतके दमले होते की आत जाऊन सरळ झोपून गेले. 

सकाळी यांच्या आवाजाने जाग आली. ते मांत्रिकाशी बोलत होते. तो मांत्रिक त्यांना सांगत होता की तो आता त्रास नाही देणार तिला. मी डोळे उघडले आणि अंथरुणात उठून बसले. हे लगेच माझ्या जवळ येऊन माझी विचारपूस करू लागले. पण मला जाणून घायचे होते की तो मांत्रिक नक्की कोणता बद्दल बोलत होता. यांनी मला सांगितले की बऱ्याच वर्षांपूर्वी गावात एक शिवा नावाचा मुलगा रहायचा. सगळ्यांना त्रास द्यायचा, हाणामाऱ्या करायचा. अतिशय विकृत स्वभावाचा होता. आणि त्याच्या अश्या या घाणेरड्या स्वभावामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते. पण कुठल्या तरी एका गावातल्या मुली बरोबर त्याचे लग्न ठरले. लग्नाच्या काही दिवस आधी तो आपल्या मित्रांना घेऊन या विहिरीत पोहायला आला. पोहताना दगडामध्ये पाय अडकून तो बुडाला आणि त्याचा जीव गेला. यमुना नवी नवरी होती. ती त्या रात्री विहिरीजवळ आली आणि नेमके शिवाच्या तावडीत सापडली. पण आता यमुना ला तो त्रास नाही देणार.

या प्रकारानंतर काही दिवसांनी विहिरी जवळ पूजा घातली गेली आणि ती विहीर कायमची बंद करून टाकली. 

Leave a Reply