मागच्या आठवड्यात 3 दिवस सलग सुट्टी आल्यामुळे सगळी भावंड मिळून वाड्याला ताई च्या जुन्या घरी राहायला गेलो होतो. कमी वस्ती असलेलं गाव त्यामुळे शांत वातावरण. तसे आम्ही नेहमी वेळ काढून इथे यायचो तेवढाच नेहमीच्या धावपळीच्या दिनक्रमातून आराम.

आम्ही संध्याकाळी पोहोचलो. सगळे उत्साहित होते पण माझा भाऊ रोहित मात्र आल्यापासून अस्वस्थ होता. आम्ही सगळ्यांनी त्यांला विचारण्याचा प्रयत्न केला पण काही नाही असे बोलून त्याने विषय टाळला. त्याचे असे वागणे सगळ्यांनाच खटकले कारण नेहमी उत्साही असलेला माझा भाऊ आज मात्र अगदी शांत होता. त्याला ऑफिस च्या गेट वरून पिक अप करताना ही हा बदल मला जाणवला होता पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

फ्रेश झाल्यावर आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पण माझा भाऊ मात्र अजून त्याच मनस्थितीत होता. कोण जाणे काय बिनसले होते त्याचे. मी पुन्हा एकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण या वेळी फक्त मान हलवून कसलीच इच्छा नसल्याचा इशारा त्याने केला. 

रात्र होत आली होती. कमी वस्ती असल्यामुळे वाहनांची वर्दळ अजिबात नव्हती. ताई जेवण करत होती. आम्ही बाहेर वऱ्यांड्यात गप्पा मारत बसलो होतो. काही वेळा नंतर ताई ने आत बोलावले. आमची जेवणे उरकली. माझा भाऊ आमच्यात असून नसल्यासारखा वागत होता. जेवत असताना काही मागण्या व्यतिरिक्त तो कोणाशी काहीच बोलला नाही. रात्री फेरफटका मारायला म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो. भावाची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तो तिथेच घरासमोर झाडा खाली असलेल्या पाळण्यावर बसून राहिला. आम्ही बाहेर फिरत असताना विषय निघाला की याला नक्की काय झालंय. साहजिकच प्रश्न मला विचारला गेला होता पण कारण मला ही माहीत नव्हतं त्यामुळे मला काही च सांगता आले नाही. साधारण अर्ध्या तासा नंतर आम्ही पुन्हा घराकडे वळलो. भाऊ तसाच बसून होता कसला तरी विचार करत. आता मात्र काळजी वाटणे साहजिक होते. मी जाऊन विचारले “काय झालंय?.. कोणी काही बोलले का?..” त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. मी पुढे म्हंटले “चल.. आता कसलाही विचार करू नकोस, खूप रात्र झाली आहे झोपायला चल.. आपण उद्या तुझा मूड चांगला झाल्यावर बोलू”.. 

“तू जा झोपायला मी येतो नंतर” भाऊ म्हणाला. आता मात्र वैतागून मी काहीही न बोलता झोपायला गेलो. साधारण पहाटे पाउणे चार ला ताई ला कसल्या तरी आवाजाने जाग आली म्हणून तिने सहज उठून खिडकी बाहेर डोकावले.. आणि ती दचकली.. भाऊ पाळण्यावर अगदी तसाच बसून होता. पूर्ण रात्रभर.. तिने सर्वाना उठवले. आम्ही त्याच्या जवळ जाऊन पुन्हा विचारपूस केली. पण तो अजूनही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.. आम्ही त्याला कसे बसे घरात नेले. 

मी ठरवले होते की उजाडायला लागले की याला घेऊन घर गाठायचे. घरी गेल्यावर कदाचित तो काय झाले ते सांगेल. कार घेऊन मी निघालो. घाई गडबडीत पाण्याची बाटली घ्यायला विसरलो होतो. म्हणून काही अंतरावर असलेल्या एका धाब्याजवळ गाडी थांबवली आणि पाणी घ्यायला उतरलो. 

अवघ्या 5 मिनिटांनी मी पुन्हा गाडी जवळ आलो आणि बघतो तर काय.. भाऊ गाडीत नव्हता.. पटकन फोन लावून पहिला पण तो ही not reachable येत होता. आजूबाजूला विचारपूस केली पण मी वर्णन केलेल्या व्यक्तीला कोणीच पाहिले नव्हते. मग भाऊ नक्की गेला कुठे?. ताई ला फोन ट्राय केला पण तो ही लागत नव्हता. तब्बल 4 तास मी वेड्यासारखा त्याला शोधत होतो. तो परिसर मी पूर्ण पिंजून काढला..

शेवटी हताश होऊन मी घरी जायचे ठरवले. घरी फोन करून कळवू असे वाटले पण आई वडिल घाबरतील म्हणून मी घरी जाऊनच काय ते सांगायचे ठरवले. काही तासांच्या प्रवासा नंतर मी घरी आलो. घरी कोणीच नव्हते.. आई बहुतेक बाहेर गेली असावी म्हणून मी फोन लावून पहिला पण 7-8 वेळा फोन करून सुद्धा तिने काही उचलला नाही.

मी चिडून आत खोलीत आलो आणि बिछान्यावर पाठ टेकवली. काही क्षणासाठी डोळे मिटले आणि झालेल्या धावपळीमुळे झोप कधी लागली कळलेच नाही. जाग आली तेव्हा दुपारचे 2 वाजत आले होते. आई भावाशी काही तरी बोलत होती. मी तडक उठलो आणि भावाला जाब विचारायला बाहेर आलो. काही बोलण्याआधी भाऊच म्हणाला “काय.. कशी झाली ट्रिप.. या वेळेस किती मजा केली..?”. 

आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी चिडून म्हणालो “तुला काही कळतेय तू कसा वागलास काल?.. एकतर पूर्ण दिवस भर कोणाशी बोलला नाहीस.. रात्रभर तिथे बाहेर बसून राहिलास आणि आता तुला ही मस्करी सुचतेय.. मला किती त्रास दिलास.. आजही सकाळी येताना तू अर्ध्या रस्त्यात गाडीतून उतरून निघून आलास.. तुला काहीच कसे वाटत नाही भाऊ..??”

भाऊ थोडा विचारात पडला आणि म्हणाला “कशा बद्दल बोलतोय तू..? मी कालच म्हणालो होतो की ऑफिस च्या कामामुळे यावेळी मला वाड्याला यायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही जा.. आणि आता तू हे काय निरर्थक बडबडतोय?.. 

मी म्हणालो “भाऊ आता हे अति होतय.. मला आधीच खूप त्रास दिलाय तू आणि तुझ्यामुळे बाकी सगळ्यांना खूप मनस्ताप झालाय”.. भाऊ माझे बोलणे तोडत म्हणाला “अरे काय फालतू च नाटक लावलंय मी काल ऑफिस च्या कामा निमित्त एका साईट व्हीसीट साठी गेलो होतो मी वाड्याला तिथे कसा येईन… आईला विचार हवे तर..

मी आई कडे पाहिले आणि ती म्हणाली “बघतोस काय खरं बोलतोय तो.. तुला काय झालंय आणि कधी आलास सकाळी.. झोप नीट झाली नाहीये का?..” 

आता मात्र माझा राग गेला होता आणि मी पूर्ण कोड्यात पडलो होतो. कालचा दिवस, भावाचे वागणे, आज येताना जे झाले ते.. हे सगळे काय चालू आहे.. हे स्वप्न तर नव्हते.. आणि मी या गोष्टीचा एकटा साक्षीदार नव्हतो.. त्याच वेळी ताई चा फोन आला कदाचित तुम्ही पोहोचलात का हे विचारायला.. मी फोन सरळ भावाच्या हातात दिला.. भावाने बोलायला सुरुवात केली आणि त्याची वाचाच बंद झाली..

काल भाऊ इथे घरीच होता आणि वाड्याला आलाच नव्हता.. मग आमच्या बरोबर असणारी ती व्यक्ती कोण होती.. अगदी हुबेहूब माझ्या सख्या भावसारखी दिसणारी.. तो माझा भाऊ नव्हता हे मात्र मला कळून चुकले कारण अर्ध्या रस्त्यातून अचानक निघून जाणे असे माझा भाऊ करणार नाही.. ताई आणि बाकीची भावंडे दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली होती.. घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वेळ चर्चा झाली पण निष्कर्ष काहीच निघाला नाही.. सहज म्हणून मी आज इंटरनेटवर सर्च करून पाहिले आणि मला doppelganger (डॉपलगँगर) या प्रकारा बद्दल कळले. डॉपलगँगर म्हणजे आपल्यासारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती जो आता जिवंत नाही. हे ऐकून थोडे विचत्र वाटले पण याबद्दल अजून माहिती घेतल्यावर आणि व्हिडीओ पाहिल्यावर हा प्रकार अस्तित्वात आहे हे पटले.. त्यातले एक उदाहरण द्यायचे झाले तर Emilie Sagge. तुम्ही Emilie Sagge doppelganger म्हणून सर्च करू शकता.. कदाचित माझ्या भावा बद्दल ही हेच आणि असेच घडले असावे..

Leave a Reply