हा अनुभव आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत ४० ते ४५ वर्षापूर्वी घडलेला होता. मी त्यांना दादा असे म्हणायचो. तेव्हा ते जवळपास १५ ते २० वर्षा चे होते. गावाकडे त्यांची शेती होती त्यामुळे शेताला पाणी द्यायला रोज तिथे फेरे व्हायचे. ते किंवा त्यांचे बाबा शेताला पाणी द्यायला जायचे. त्या रात्री त्यांचे बाबा गेले होते आणि दादांना त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचे होते. हे आता दादांसाठी काही नवीन नव्हते. शेत गावाच्या वेशी बाहेर असल्यामुळे चालत जायला जवळपास अर्धा तास लागायचा. गावाची वेस ओलांडली की एक छोटा ओढा लागायचा जो पुढे जाऊन नदीला मिळायचा. नदीकडे जाण्याची वाट देखील त्या ओढ्याला लागूनच होती. त्या रात्री दादांनी जेवण आटोपले आणि डबा घेऊन घरा बाहेर पडले. नेहमी प्रमाणे गाणी गुणगुणत ते गावाच्या वेशी पर्यंत आले. ओढया पासून साधारण ५० फूट लांब असताना त्यांना समोर एक बाई उभी असलेली दिसली. अंधार असल्यामुळे नक्की कोण आहे ते मात्र दिसत नव्हत. ते तसेच चालत त्या दिशेने जाऊ लागले. हळु हळु मनात भीती ने घर करायला सुरुवात केली होती. कारण ती जी कोणी बाई होती ती एकटक कसलीही हालचाल न करता ओढ्याच्या पाण्याकडे वाकून बघत होती. इतक्या रात्री तिचे असे ओढ्याकडे बघत बसणे कोणाच्याही मनात धडकी भरवण्यासाठी पुरेसे होते.
साधारण २० फूट जवळ आल्यावर त्यांना जाणवले हा प्रकार काही तरी भलताच आहे. त्यांनी हातातला जेवणाचा डबा तिथेच टाकला आणि घराकडे पळ काढला. या भयाण प्रसंगांनंतर त्यांना अचानक त्रास सुरू झाला. रात्री चित्र विचित्र स्वप्न पडणे, सतत भास होणे. हे सगळे जवळ जवळ महिनाभर सुरू होते. नीट झोप मिळत नव्हती, चित्त थाऱ्यावर नव्हते त्यामुळे दादांची परिस्थिती अतंत्य भयावह झाली होती. काही वाईट घडायला नको म्हणून त्यांचे आई वडील त्यांच्या सोबत च झोपायचे. जवळचे नातेवाईक त्यांना भेटून जायचे. त्यांचा मामा जवळच्याच एका गावात राहायचा. काही दिवसांपूर्वी तो ही येऊन भेटून गेला होता. दिवसा मागून दिवस पुढे सरकत होते पण घरच्यांना काहीच उपाय सापडत नव्हता. ती अमावास्येची रात्र होती. जवळच्या गावात राहत असलेले दादांचे मामा रात्री त्यांच्या घरी आले आणि दादांना उठवू लागले. मामा म्हणाले ” चल जरा गावाला जाऊन येऊया, काम आहे एक”. दादांना उठवून मागच्या दाराने घरा बाहेर घेऊन गेले. याची हलकीशी चाहूल सुद्धा दादांच्या आई बाबांना लागली नाही. त्या काळात ये जा करण्यासाठी वाहन नसायची. त्यात रात्री ची वेळ असल्यामुळे ते दोघे पायीच निघाले. जाताना दादा अधून मधून विचारत होते की काय काम आहे, कशासाठी चाललोय आपण. पण त्यांचे मामा काही बोलत नव्हते. ते फक्त पुढे चालत होते आणि दादा त्यांच्या मागे..
ते गावाच्या बाहेर आले आणि ओढा पार करून ते सरळ जाण्या ऐवजी अचानक नदीच्या वाटेकडे वळले. आपण गावाला जायचे सोडून नदी कडे का जात आहोत ही शंका मनात आल्यानंतर दादा मामाना विचारू लागले.
पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तसे दादांनी पुन्हा विचारले ” मामा, आपण गावच्या रस्त्याने जायचे सोडून नदीकडे कुठे जात आहोत?” तेव्हा लगेच त्यांनी दादांचा हात पकडला. ती पकड साधी नव्हती, थंडगार हात जो एखाद्या माणसाचा असणे शक्य नव्हते. दादांना समजायला वेळ लागला नाही की मामांच्या रूपात हे दुसरेच कोणी तरी आले आहे.. तेव्हा त्यांनी आपला हात सोडून घेण्याची झटापट चालू केली. पण प्रत्येक क्षणाला ती पकड अजूनच घट्ट होत होती. एव्हाना १२ वाजत आले होते. ते अक्षरशः खाली बसून त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले, आपल्या टाचा जमिनीवर घासून थांबवायचा प्रयत्न करू लागले. पण हाताची पकड काही सैल होत नव्हती. त्यांची झटापट पाहून ते जे काही होत ते एखाद्या हिंस्त्र जनावरासारखे गुरगुरू लागले. दादांनी आरडा ओरडा सुरू केला, ते रडू लागले. पण तरीही ते दादांना जोरात ओढत, फरफटत नदीकडे घेऊन जात होते. यातून सुटका होईल की नाही हे ही त्यांना माहीत नव्हते. पण तितक्यात गावातल्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपल्यामुळे काही मंडळी आपल्या घराकडे जात होती. रात्रीच्या त्या शांत वातावरणात कोणीतरी मदतीच्या आशेने ओरडत असल्याचे त्यांना जाणवले.
आवाज नदिकडच्या वाटेने येत असल्याचे त्यांना समजले तसे ते धावतच तिथे आले. तिथे जाऊन पाहतात तर काय, एक मुलगा एकटाच नदीच्या वाटेवर बसून ओरडतोय. सगळे त्याच्या जवळ गेले आणि त्याला शांत केले. पण दादांना पायाला खूपच खरचटले होते म्हणून चालता ही येत नव्हते. मग सर्वांनी त्यांना उचलून घरी आणले. ह्या घटने नंतर त्यांनी नदीकडे जायचे बंद केले. तो त्रास त्यांचे लग्न होई पर्यंत होत राहायला आणि नंतर आपोआप बंद झाला. आता दादांनी साठी ओलांडली आहे. त्यांना आजही त्या गोष्टी आठवतात आणि मला सांगत असतात.