कथा बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनिकेत कॉलेज सोबतच एका स्टोअर मध्ये पार्ट टाईम जॉब करायचा. कुस्तीची खूप आवड. त्यामुळे सकाळी वेळात वेळ काढून तालमीला जायचा. व्यायाम करायचा. तसे कुस्ती खेळण्यात तो तरबेज झाला होता. त्यात २-३ स्पर्धा जिंकल्यामुळे त्याच्या घरचे व त्याचे गुरू उस्ताद भीमरावजी त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. बघता बघता त्याची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली. पण स्पर्धा जवळ आल्या तसे कॉलेज परीक्षांचे सुद्धा वेळापत्रक आले. पण एक गोष्ट चांगली होती. स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी कॉलेज ची परीक्षा संपणार होती. आता तालीम आणि परीक्षेचा अभ्यास दोन्ही साठीची तयारी त्याला सोबत च करायची होती. पण जस जसे दिवस पुढे सरकत होते तसे तो दोन्ही गोष्टींचे नियोजन चोखपणे करत होता. परीक्षा संपल्या आणि त्याच दिवशी त्याने निघायचे ठरवले. राज्यस्तरीय स्पर्धे साठी त्याला दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. त्याचे उस्ताद भीमराव जी आणि अनिकेत चे बाबा त्याच्या सोबत येणार होते. त्याला कॉलेज बाहेरच भेटले आणि ते थेट स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघाले. संध्याकाळी ५ च्या सुमारास ते तिथे पोहोचले. 

वेळेवर पोहोचल्यामुळे त्याला एकही रूम मिळत नव्हती. पण खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना राहायला तालमी जवळ ची एक लहानशी रूम दिली. अगदी छोटीशी रूम होती. त्यालाच लागून तालीमीची जागा असल्याने त्याला बरेच झाले. लगेच समान ठेऊन तयारी करण्यासाठी बाहेर आला. Pसंध्याकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत त्याचे उस्ताद भीम रावांनी त्याची चांगलीच प्रॅक्टिस करून घेतली. नंतर तो विश्रांती घ्यायला गेला. त्याचे वडील आणि उस्ताद दोघेही झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी स्पर्धा असल्याने अनिकेत ला झोप लागत नव्हती. दडपण येणं साहजिक होत. बऱ्याच वेळा नंतर त्याचा डोळा लागला तितक्यात त्याला खोली बाहेरून आवाज ऐकू येऊ लागला. कोणी तरी आर्त हाक देत होते.. मदतीसाठी.. वाचवण्यासाठी.. तो दचकून च जागा झाला. त्याला क्षणभर काही सुचेना काय करावं.. त्याने पुन्हा कानोसा देऊन ऐकले आणि जाणवले की आवाज एका मुलीचा आहे.. कोण असेल.. काय झालं असेल.. कोणत्या अडचणीत तर नसेल. बाबा ना उठवू की उस्ता दाना. पण ते ही थकून झोपलेत त्यांना त्रास नको द्यायला. मनात विचार आला “ती मुलगी अडचणीत असली आणि आपण तिला वाचवले नाही तर पेहेलवान असल्याचा काय फायदा.. ती ही कोणाची तरी बहीण असेल.. आपण तिला वाचवले च पाहिजे. 

तो अंथरुणातून उठला आणि खोलीचे दार हळूच उघडुन बाहेर आला. आवाज आखाड्या च्या दिशेने येत होता. त्याने पटकन तिथे धाव घेतली. तिथला दरवाजा लोटून तो आत आला. एव्हाना २ वाजून गेले होते. तिथले लाईट बंद असल्याने बराच अंधार होता. त्याने त्या आवाजाचा माग काढायला सुरुवात केली. तितक्यात एका कोपऱ्यात एक मुलगी पाठमोरी बसलेली दिसली. तो दबकत तिच्या जवळ गेला आणि तिला विचारले “ताई.. काय झालंय.. राडताय का तुम्ही..” त्या मुलीने काहीच उत्तर दिले नाही. काही वेळ तिच्या उत्तराची वाट बघून त्याने पुन्हा विचारले “ताई रडू नका.. काय झालंय मी काही मदत करू शकतो का तुम्हाला..?”. त्यानंतर मात्र तिने झटकन मागे वळून पाहिलं आणि तिचे रूप पाहून त्याच्या अंगावर काटाच आला. तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा होत्या, तिने त्याला जोरात ढकलून दिले. पेहेलवान असून सुद्धा तो जोरात मागे आपटला. त्या आघातामुळे तो जागीच बेशुध्द पडला. सकाळ झाली. अनिकेत कुठे दिसेना म्हणून त्याच्या बाबांनी आणि गुरूंनी त्याला शोधायला सुरुवात केली. तसे आखाड्यात तो बेशुध्द अवस्थेत सापडला. त्याला उचलून जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळात तो शुद्धीवर आला पण त्याचे अंग तापाने भाजत होते. आता अश्या अवस्थेत त्याला कुस्ती खेळता येणार नव्हती. 

त्याला तपासल्यावर ते पुन्हा खोलीवर आले. आत झोपवले आणि ते दोघेही बाहेर येऊन चर्चा करू लागले. वडिलांना काळजी वाटत होती की काल रात्री पर्यंत सगळे काही नीट होते पण आज सकाळी याला काय झाले. तापाने फणफणत असल्याने स्पर्धेत खेळणे योग्य नव्हते म्हणून त्यांनी पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. २-३ दिवस उलटले. हळु हळु त्याचा ताप उतरू लागला. पण त्याचे वागणे पूर्णपणे बदलले होते. कधी रात्री अचानक अंथरुणात उठून बसायचा. एकटक रिकाम्या भिंतीकडे तर कधी छोट्या दिव्याकडे पाहत रहायचा. नंतर तर त्याच्या जवळ जरी गेले तरी तो लांब राहायला सांगायचा. घरच्यांना काही कळायचा मार्ग सापडत नव्हता. पण त्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली. घरचे अगदी गाढ झोपेत होते. तितक्यात अनिकेत उठला आणि जोर जोरात ओरडू लागला. मला वाचवा.. तालमीची माती उकरा.. त्याचा आरडाओरडा ऐकून सगळे दचकून उठले आणि त्याचे असे अभद्र बोलणे ऐकून घाबरून गेले. त्याला जेमतेम शुद्धीवर आणले. विचारू लागले की काय झाले, तुला वाईट स्वप्न पडले का.. पण तो काहीच बोलत नव्हता. शांत झाला तो झालाच.. त्याच्या आई वडिलांना मात्र आता त्याची खूपच काळजी वाटू लागली. दुसऱ्याच दिवशी ते त्याला तालुक्याच्या मोठ्या इस्पितळात घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रिपोर्ट्स काढले. पुढील काही दिवसात औषधोपचार झाले पण त्याच्या प्रकृतीत तसूभर ही सुधारणा दिसत नव्हती. 

त्या दिवशी अनिकेत च्या बाबांचे मित्र त्याला बघायला आले होते. त्याची अवस्था आणि विचित्र वागणे पाहून म्हणाले “याचे हे वागणे मला जरा वेगळेच वाटतेय.. याला एखाद्या पुजाऱ्याकडे घेऊन जायला हवे..” आपल्या पोरासाठी हा ही उपाय करून बघू असे ठरवले. लागलीच संध्याकाळी ते, त्यांचे मित्र आणि उस्ताद भीमराव जी एका बाहेर चे बघणाऱ्या पुजाऱ्या कडे गेले. वडिलांनी सगळा प्रकार त्यांना कथित केला, स्पर्धेच्या आदल्या दिवशी पासून त्याला हा त्रास होऊ लागला हे ही सांगितले. तसे त्यांनी अनिकेत ला एका रिंगणात बसवले. त्याच्या वडिलांना आणि मित्राला तिथून लांब बसायला सांगितले. वेळ न दवडता मंत्रोच्चार सुरू केला आणि जवळच्या पात्रातले पवित्र जल त्याच्या अंगावर शिपडू लागला. हळु हळु त्या साध्या पाण्याने ही अनिकेत ला वेदना होऊ लागला. तो ओरडू लागला, तडफड करू लागला. खर तर तो नाही त्याच्या अंगात शिरलेली त्याला बाधित करणारी ती मुलगी विव्हळत होती. तो पुन्हा तेच सांगू लागला “त्या तालमीच्या जागेतील माती उकरा.. तुम्हाला समजेल.. सगळे समजेल..” अनिकेत ला होणाऱ्या वेदना पाहून त्याच्या वडिलांनी हे सगळे थांबवायला सांगितले. तसे तो जागीच त्या रिंगणात बेशुध्द पडला. 

ते पुजारी म्हणाले “हा जे बोलतोय त्या बद्दल तुम्हाला काही माहीत आहे का..? तुम्ही स्पर्धेसाठी कुठे गेला होतात.. तिथे जाऊन तुम्हाला पहावे लागेल..” अनिकेत ला घरी ठेवून त्याचे वडील आणि उस्ताद त्या शहरात जायला निघाले. त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत होता. अनिकेत त्या तालमी तली माती उकरून काढा असे का म्हणाला असेल.. तो सकाळी बेशुध्द पडला होता म्हणजे रात्री तर काही झाले नसेल. असंख्य विचारांनी डोक्यात काहूर माजवले होते. तिथे जाऊन त्यांनी बरीच विनंती केली आणि २-३ जणांना हाताशी घेऊन त्या तालमीच्या जागी खड्डा खणायला सुरुवात केली. जवळपास ६-७ फूट माती उकरून बाहेर काढली. तेव्हा त्यांना एक मानवी सांगाडा सापडला. सगळे जण घाबरून गेले आणि लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आले, चौकशी सुरू झाली. इथे घरी अनिकेत ची अवस्था अजुन बिकट झाली होती. जसा तो मानवी सांगाडा बाहेर काढला तसे अनिकेत ला पुन्हा त्रास होऊ लागला. तो पुन्हा विचित्र आवाजात ओरडू लागला. लगेच पुजाऱ्यांना बोलावण्यात आले. घरात रिंगण आखले गेले आणि त्याला त्यात बसवले. त्याच्या आईला त्याची ती अवस्था बघवत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर पुजाऱ्याने त्याला म्हणजे त्याच्यातील त्या मुलीला बोलते केले. 

तसे ती सांगू लागली. त्या दिवशी दुपारी मी काम आटपून माझ्या घरी जात होते. तेव्हा तालमी बाहेर उभ्या असलेल्या मुलांनी मला एकटीला पाहून जबरदस्ती करत आत नेले. माझ्यावर अत्याचार केले. मी जिवाच्या आकांताने ओरडत होते पण त्यातल्या एकानेही ऐकले नाही. मी त्यांना रडतच सांगू लागले की मी पोलीस स्टेशन मध्ये जाईन, तुम्हाला सोडणार नाही. हे ऐकल्यावर मात्र त्यांनी माझा जीव घेतला आणि तिथल्याच मातीत मला पुरून टाकले. माझे वडील नाहीत.. घरी कमावणारे कोणी नाही.. लोकांच्या घरची धुणीभांडी करून मी आई ला सांभाळत होते. माझी आई अजुन माझी वाट बघतेय.. तिला वाटतेय की मी परत येईन.. त्या रात्री अनिकेत माझी विचारपूस करत आला आणि मला माझा मार्ग सापडला. मला त्याला झपाटायचे नव्हते पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तोच एक शेवटचा मार्ग दिसत होता. मला न्याय मिळेल तेव्हाच मी याचे शरीर सोडेन. त्याची आई हे सगळे ऐकून खूप रडू लागली. हळु हळु अनिकेत ची शुद्ध हरपू लागली आणि तो निपचित पडला. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यानी सगळी गोष्ट त्याच्या वडिलांच्या कानावर घातली. त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. या गोष्टी चा सोक्षमोक्ष लावायचा कसा. 

सगळ्यात आधी ते पोलिसांकडे गेले. त्यांना काही विश्वास बसत नव्हता. बऱ्याच विनवण्या केल्या नंतर ते म्हणाले की आपण एकदा चौकशी करून बघू. सूत्र हलवण्यात आली. तेव्हा काही विचित्र गोष्टी समोर आल्या. त्या मुलांमध्ये २ जण आकस्मित रित्या मरण पावले होते. एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर दुसरा रोड अपघातात मरण पावला होता. फक्त एक जण अजूनही मोकाट फिरत होता. बऱ्याच दिवसांनी त्याला पकडण्यात आले. रिमांड मध्ये घेतल्यावर त्याने सगळा गुन्हा कबूल केला. दिवस पुढे सरकत होते. अनिकेत जवळपास ३ महिने तसाच होता पण नंतर हळु हळु बरा होऊ लागला. यावरून एक गोष्ट कळली “गुन्हा किती ही लपवा तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येतोच..”

Leave a Reply