हा अनुभव आपल्या चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. 

मी आत्मा आणि स्पिरिच्युअलीटी या सगळ्या गोष्टी मानतो. काही वर्षांपूर्वी गावी माझ्या आजी कडे राहायला गेलो होतो तेव्हा चे हे अनुभव आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. माझ्या आजी चे गाव. तिथे मी राहायला असं पहिल्यांदाच गेलो होतो. ते घर आधी खूप वर्ष बंद होते,

जुने बांधकाम, आजीच्या आजोबानी बांधलेले ते घर , मोठे अंगण घराच्या आजूबाजूला झाडी. मी तिथे येण्याच्या 3 महिने आधीच तिथे आजी-आजोबा राहायला आले होते. ते आधी शहरात राहत. मी 4 वाजता पाहाटे पोचलो. एका ओळखीच्या रिक्षावाल्याने मला घरा समोर सोडले. अंगणात आल्या आल्या मला वेगळीच चाहूल जाणवली. कुणी आपल्याकडे बघतंय असे काहीसे वाटले. आता खरंच तसे होते की मला तसे वाटत होते हे मात्र सांगणे कठीण आहे. अंधार होता आणि मी चौफेर तो परिसर पाहत होतो. झाडें…पानांची सळसळ आणि भयाण शांतता.. घरा समोर असलेल्या झाडाकडे मी बघत होतो. मला माझ्या नावाची हाक ऐकू आली. मी पाठी वळून दारा कडे पहिले. दारं खिडक्या बंद होती. कुणीच नव्हते. मला विचित्रच वाटले मी पटापट दाराकडे चालू लागलो तसेच आपल्या पाठी कुणी चालतंय असे वाटल. मी आजीला हाक मारली.. तिचा “ओ” “आले रे आले” असे शब्द ऐकले तेव्हा जीवात जीव आला.दिवस अगदी मजेत गेला.

रात्री मटण, मासे,तांदळाच्या भाकऱ्या, माशाची आमटी आणि भात असा बेत झाला. मी बोटं चाटत जेवण संपवून उठलो. टीव्ही न बघता जेवण्याचा आनंद मी पहिल्यांदा घेतला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. रात्री शतपावली करावयास घरा पाठी गेलो. वातावरण अगदी वेगळे आणि तितकेच विचित्र होते. तितक्यात मला लांब असलेल्या झाडावर कुणी बसलय अशी जाणीव झाली. अंगावर काटा उभा राहिला. चालत मी पुढे गेलो. बघतो तर खरंच तिथे कुणी तरी होते. मी स्तब्ध झालो. तितक्यात माझ्या पाठीवर धपाटा पडला. माझ्यात पाठी बघायची हिम्मत नव्हती. झाडा कडे पहिले तर ती आकृती झाडावरून नाहीशी झाली होती. “काय र माझ्यावर नजर ठेवत व्हतास काय?”. एक घाणेरडा आवाज कानावर पडला. मी चौफेर शोधू लागलो. तेवढ्यात एक काळे वस्त्र घातलेली, केस विस्कटलेली स्त्री माझ्यावर धाव घेऊन आली. मी ओरडलो आणि डोळे मिटले. आजोबा आजी धावतच माझ्या जवळ आले व मला समजाऊ लागले “अरे सोन्या ही तुमची मुंबई न्हवं. रात्री अपरात्री फिरू नकोस बाहेर. चल आधी घरात. मी हात पाय धुऊन घरात आलो. माझ्यात आज्जी सोबत त्या प्रसंगाबद्दल चर्चा करण्याएवढी हिम्मत नव्हती. मी झोपलो.

रात्री झोप शांत नाही लागली. स्वप्न पडत होती विचित्र. स्वप्नात आज्जीचे घर दिसायचं. अंधारे कोपरे…आणि तीच काळ्या साडीतली बाई. तिचा चेहरा दिसायचा नाही. आवाज यायचे. स्वप्नाच्या शेवटी मी माझा मृत देह पाहायचो व घाबरून जागा यायची. दिवस तेवढा शांततेत जात…पण रात्र येऊ लागली की भीती दाटून यायची. पुन्हा तेच स्वप्न…तीच बाई…

त्या रात्री वेगळाच अनुभव आला. मी डोळे उघडले चौफेर पाहीले. 3:20 झाले होते मी पाणी प्यायला स्वयंपाक घरात मध्ये गेलो. आणि तिथल्या खिडकी कडे बघितलं तर अंगावर शहारे आले. तीच बाई वाकून बघत होती मी भीतीने खाली कोसळलो व आरडा ओरडा केला. या वेळी आजीला खरे सांगावे लागले… तिला याचे कारण समजले असावे… मला सकाळी देवळात घेऊन गेले….त्या नंतर मला सरळ घरी धाडले. याचे कारण मला आजीने आजही सांगितले नाही…त्या घरातले काही दिवस आठवले की आजही भीती दाटून येते…आजही कधी कधी ती स्वप्न मला पडतात….

Leave a Reply