अनुभव – मोहोंमद गुर्फान गोवडा

ही घटना २०१२ साल ची आहे. तेव्हा मी अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावात राहत होतो. पोलिस व्हायची इच्छा असल्याने मी होमगार्ड म्हणून नुकताच भरती झालो होतो. तेव्हा गणपती असल्यामुळे बंदोबस्त लागला होता आणि विसर्जन साठी मला ड्युटी होती. संपूर्ण दिवस ड्युटी करून खूप थकलो होतो. रात्री अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला. माझ्याकडे सायकल असल्यामुळे सगळे आटोपल्यावर मी घरी जायला निघालो. आतल्या रस्त्याने जाण्या ऐवजी मी सरळ हाय वे वरून निघालो. 

पण माझे नशीब इतके खराब की त्या रात्री नेमक्या स्ट्रीट लाईट बंद होत्या. तरीही मी हिम्मत करून हळू हळू पुढे जात राहिलो. देवाची कृपा म्हणून एक गाडी मागे आली. मी त्या गाडी च्याच उजेडात बराच रस्ता पार केला. पण ती गाडी वेगात असल्याने काही मिनिटात मला ओलांडून त्या काळोखी रस्त्यात दिसेनाशी झाली. पुन्हा एकदा मिट्ट अंधारात मी अंदाज घेत सायकल चालवत राहिलो. त्या हाय वे वरून जाताना रस्त्या कडेला एक मोठे झाड आहे. काही दिवसांपूर्वी त्या झाडाला लटकून ३ जणांनी गळफास घेतला होता. जसे मी त्या झाडाजवळ येऊ लागलो एक वेगळीच भीती निर्माण होऊ लागली. तितक्यात मागून येणाऱ्या गाडीचा लाईट समोर पडला आणि जरा हायसे वाटले. पण ती गाडी अतिशय वेगात होती त्यामुळे २ मिनिटात माझ्या पुढे निघून गेली. 

तितक्यात माझ्या सोबत अजुन एक व्यक्ती सायकल चालवत बाजूला आला. मी खूप खूष झालो. आता आपल्याला सोबत मिळाली त्यामुळे भीती कमी झाली. समोरून एक गाडी आली तसे मी त्या माणसाकडे पाहिले पण त्याच वेळी तो रस्त्याच्या पलीकडे पाहत होता म्हणून मला त्याचा चेहरा नीट दिसला नाही. साधारण एक किलोमीटर अंतर पार केल्यावर समोरून पुन्हा एक गाडी आली तसे मी त्या व्यक्तीकडे पाहिले. पण ये वेळी सुद्धा तो माणूस दुसरीकडे पाहत होता. मला जरा विचित्रच वाटले. 

यावेळेस मी त्याच्या जवळ जाऊन त्या च्याच बरोबरीने सायकल चालवू लागलो आणि एखादी गाडी येण्याची वाट पाहू लागलो. काही वेळात पुन्हा समोरून एक गाडी आली आणि त्याच्या प्रकाशात मी त्या व्यक्ती कडे पाहिले. या वेळेस मात्र तो माझ्या दिशेला पाहत होता. मी त्याला पाहिले आणि काळीज फाटून बाहेर यावं असा मी हादरलो. त्या माणसाला चेहरा च नव्हता. डोळे, नाक तोंड काहीच नाही. मी काय पाहिले यावर एक क्षण विश्वास बसला नाही. पण पुढच्या क्षणी मी भानावर आलो आणि सायकल अतिशय वेगात घेतली. देवाचे नाव घेत जिवाच्या आकांताने मी सायकल चा वेग वाढवत राहिलो. काही अंतर पार केल्यावर एक मंदिर दिसले तसे मी थांबलो आणि मागून कोणी येतंय का ते पाहू लागलो. पण १५-२० मिनिट झाली तरी मागून कोणीही आले नाही. आज या प्रसंगाला खूप वर्ष उलटली पण मी जे पाहिले ते कधी ही विसरू शकणार नाही. 

Leave a Reply