अनुभव – सीमा देशपांडे

आमच्या घरा शेजारी एक काका राहतात. त्यांचे नाव किसन आहे. हा त्यांचा अनुभव आहे. हा प्रसंग त्यांच्यासोबत जवळपास ३० वर्षांपूर्वी घडला होता. काका नाशिक च्या नोट प्रेस मध्ये कामाला होते. त्यांची नेहमी नाईट शिफ्ट असायची. शिफ्ट १२ – १२.१५ ला संपली की ती ते लगेच घरी यायला निघायचे. सायकल ने प्रवास करायचे. त्या दिवशी त्यांना निघायला बराच उशीर झाला. घरी लवकर पोहोचायचे म्हणून ते नेहमीचा रस्ता सोडून शॉर्ट कट ने यायला निघाले. त्यांना तो रस्ता तसा माहीत होता पण इतक्या रात्री ते पहिल्यांदाच त्या रस्त्याने येत होते. रस्ता थोडा आतल्या भागातला असल्याने दिवे नव्हते त्यामुळे बराच अंधार होता. चंद्र प्रकाश असल्यामुळे थोडे फार दिसत होते. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना कोणी तरी हाक मारतय असा भास झाला. ते सायकल वरून उतरले आणि मागे वळून बघू लागले. 

गल्ली च्याच सुरुवातीला त्यांना एक बाई उभी दिसली. ती त्यांच्यापासून बरेच लांब होती. त्यांनी जसे मागे वळून पाहिले तसे तिने पुन्हा हाक मारली “किसन.. “. त्यांच्या मनात विचार आला की एवढ्या रात्री ही कोण बाई आहे, इथे काय करतेय आणि तिला माझे नाव कसे काय माहित. डोळ्यांचे पाते लवते न लवते तितक्यात तिने पुन्हा एक हळुवार हाक दिली आणि झटकन ६-७ पाऊले चालत पुढे आली. जस जशी ती हाक मारू लागली तस तशी ती पटकन पुढे सरकू लागली. अश्या वेळी असा विचित्र प्रकार पाहून त्यांना भीतीने घाम फुटू लागला. ते पटकन सायकल वर बसून सायकल वेगाने पळवू लागले. मागून हाका ऐकू येतच होत्या. पण एक भयानक गोष्ट म्हणजे त्या हाका हळु हळु अमानवीय रूप धारण करू लागल्या. त्यांना कळून चुकले की ती साधी सुधी बाई नाही. हा प्रकार बहुतेक हाकामारी चा आहे. त्यांनी पुन्हा मागे वळून पाहायचा साधा प्रयत्न ही केला नाही. जसे ते मेन रोड ला लागले तसा तो आवाज यायचा ही बंद झाला. त्या नंतर मात्र कितीही उशीर झाला तरी ते त्या रस्त्याने पुन्हा कधीच गेले नाहीत. 

Leave a Reply