अनुभव – संजय पाटील
ही गोष्ट २००८ सालातली आहे. माझे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोकण बाऊंड्री वर आहे. माझी १२ विची वार्षिक परीक्षा नुकताच संपून सुट्टी लागली होती. सुट्ट्या असल्यामुळे आम्ही मुलं दिवस रात्र फिरत असायचो. एकदा माझ्या भावाने मला विचारले की मी रात्रीच्या वेळी उसाला पाणी द्यायला जातो तू ही सोबत येतोस का.. मी लगेच त्याला हो म्हणालो. त्या काळी आमच्या इथे लाईट चा खूप प्रॉब्लेम असायचा. कधी कधी संपूर्ण आठवडा भर लाईट नसायची. म्हणजे कधी संपूर्ण दिवस लाईट नाही तर कधी संपूर्ण रात्र. त्यामुळे दिवसा लाईट नसली की मग रात्री शेताला पाणी द्यायला जावे लागायचे. त्या रात्री घरातून निघायला रात्री चे १० वाजले. मी एक टॉर्च, एक कॅसेट घालून गाणी ऐकायचा टेप आणि झोपायला एक पांघरूण आणि चादर घेतली. तेव्हा त्याच्याकडे m८० गाडी होती. त्याने माझ्या हातात खोर दिलं आणि आम्ही गाडीवर दोघेही निघालो.
गाडी अगदी शेतात जायची नाही त्यामुळे आम्ही गाडी बाहेरच अर्ध्या रस्त्यावर लावली आणि चालत जाऊन तिथे पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा साधारण ११ वाजत आले होते. भावाने विहिरी वरचा पंप चालू केला आणि आम्ही दोघेही उसाला पाणी देऊ लागलो. जवळपास दीड तास झाला. १ वाजत आला होता आणि मला थकायला झाले होते म्हणून मी शेताच्या बांध्यावर टेप घेऊन गाणी ऐकत बसलो. तितक्यात भाऊ आला आणि म्हणाला की थकला असशील तर कोरडी जागा बघून जरा वेळ झोप म्हणजे जरा बरे वाटेल. मी त्याला हो म्हणत तिथून उठलो आणि शेतातच कोरडी जागा बघून अंथरूण करून झोपलो. शेताला पाणी दिल्यामुळे अगदी थंडावा जाणवत होता. वातावरण ही शांत होत. फक्त विहिरी वरच्या मोटर चा आवाज दूर वरून ऐकू येत होता. अधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन जायची. मी अंगावर चादर घेऊन पडलो होतो. अश्यातच मला गाढ झोप लागली.
झोपेत असताना माझ्या डोक्या जवळ मला कोणी तरी चालत असल्याचे जाणवले. पण मी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने माझ्या डोक्या वरून घेतलेली चादर ओढली जाऊ लागली. मला वाटले की माझा भाऊ असेल म्हणून मी त्याला बोललो “गप्प रे दादा, मला झोपू दे..” तसे तो निघून गेला बहुतेक असे मला वाटले. पण पुन्हा काही वेळानंतर माझी चादर एकच वेळी डोक्याच्या आणि पायाच्या बाजूने खेचली जाऊ लागली. मी झोपेत असल्यामुळे मला हे कळायला जरा वेळ लागला. तरीही मला वाटले की वाऱ्यामुळे तसे जाणवत असेल आणि माझा भाऊच माझी मस्ती करतोय. मी पुन्हा त्याला म्हणालो “अरे झोपू दे ना मला.. काय मस्ती करतोय..” एवढे बोलून मी पुन्हा गाढ झोपून गेलो. सगळे काही शांत झाले. तितक्यात कसल्याश्या आवाजाने मला जाग आली. माझे लक्ष गेले तर दादा माझ्या पासून जवळपास १०० मीटर अंतरावर उभा राहून शेताला अजूनही पाणी देतोय. मी जरा दचकलो कारण मी कसल्याश्या आवाजाने जागा झालो होतो. तेवढ्यात माझ्या अंगावरची चादर पुन्हा ओढली गेली आणि मी ताडकन उठून बसलो.
जसे मी उठून बसलो तसे मला माझ्या मागून मोठमोठ्याने श्वास घेण्याचे आवाज येऊ लागले. नकळत माझ्या ह्रदयाचे ठोके वाढले आणि मला भीतीने मला घाम फुटू लागला. जर दादा इतक्या लांब आहे तर मग इतक्या वेळ मी अंगावर घेतलेली चादर कोण ओढत होत. मला समजत च नव्हते की हे काय चाललंय. मी अंगावरची चादर काढली आणि त्याला जोरात हाक दिली ” दादा पटकन इकडे ये..” ती ही हातातले खोर तसेच टाकून माझ्या दिशेने धावत सुटला. माझ्या जवळ येताच मी त्याला म्हणालो “अरे इथे काही तरी आहे..” त्याने चारही बाजूला पहिले पण काहीच दिसले नाही. माझ्या चेहऱ्यावरची भीती आणि घाम पाहून तो ही जरा दचकला. त्यात मी भीतीने थर थर कापत होतो. मी त्याला म्हणालो “दादा चल इथून..” त्याने पटकन जाऊन कसाबसा पाण्याचा पंप बंद केला. आम्ही झपाझप पावले टाकत शेतातून बाहेर पडू लागलो. तितक्यात समोरच्या झाडावर एक वेगळीच सळसळ जाणवली. आम्ही दोघांनी तिथे पाहिले आणि त्या झाडांच्या फांदीवरून काही तरी वेगात गेले. आता मात्र दादा ही प्रचंड घाबरला.
कळत नव्हते काय आहे. पण ते झाडांच्या फांद्यांवरून इतक्या वेगात जात होते की दिसत नव्हते. एखादा प्राणी असेल तरी तो इतक्या वेगात जाणे जवळजवळ अशक्य होते. दादा म्हणाला “पटकन गाडी वर बस, आपल्याला होईल तेवढ्या लवकर निघायला हवे..” आम्ही गाडी जिथे लावली होती तिथून मुख्य रस्ता बराच लांब होता. मी हातात खोर घेऊन गाडीवर बसलो आणि दादा ने गाडी जोरात घेतली. मला म्हणाली की काहीही झाले तरी मागे बघू नकोस. त्याचे ऐकून मी मागे बघत नव्हतो पण तरीही मला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कोणी तरी झेपावत आमच्या दिशेने येत असल्याचे वाटत होते. पुढच्या काही मिनिटात आम्ही मुख्य रस्त्यावर आलो. त्या रात्री आम्ही कसे बसे घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी सगळा प्रकार सांगितला तसे आजोबा अम्हणाले की आमच्या सोबत ही असे घडले आहेत. जर मला कळले असते की तुम्ही रात्री शेतावर पाणी द्यायला जाणार आहात तर मी तुम्हाला पाठवले च नसते.