अनुभव क्रमांक – १ – सपना मोरे

हा जीवघेणा प्रसंग माझ्या आई सोबत ती गरोदर असताना घडला होता. काही दिवसांपूर्वीच तिने मला हा अनुभव सांगितला. 

तेव्हा आईला ७ वा महिना सुरू होता. मी आईच्या पोटात होते. माझे आई आणि वडील एका छोट्याश्या खोलीत राहायचे. पत्र्याने बनवलेली ती खोली अगदी लहान होती. त्यामुळे जरा सुद्धा आवाज झाला की लगेच कळत असे. रात्रीच्या वेळी लगेच जाग येत असे. त्या दिवशी रात्री आई वडील दोघे ही गाढ झोपेत होते. आणि अचानक बाहेरच्या बाजूने पत्र्यावर काही तरी वाजण्याचा आवाज आला. त्या आवाजाने आई ला अचानक जाग आली. तिने उठून सगळी कडे पाहिले. वडील खाली गाढ झोपेत होते. अचानक तिचे लक्ष दरवाज्याकडे गेले. त्या दरवाज्याला एक फट होती. तिने नीट निरखून पाहिले आणि तिच्या काळजात अगदी धस् झालं. 

दरवाज्याच्या त्या फटीतून कोणी तरी एक डोळा लाऊन आत पाहत होते. ते पाहताच आई भीती ने किंचाळली आणि तिने वडिलांना उठवले. वडील उठले त्यांनी खोलीत ला लाईट लावला आणि दरवाजा उघडून बाहेर पाहू लागले. पण आस पासच्या परिसरात कोणीही दिसले नाही. त्या काळी आमच्या इथे चोरांचा सुळसुळाट होता त्यामुळे एखादा चोरच असेल असे म्हणत वडील आई ला धीर देऊ लागले. त्या नंतर बरेच दिवस काहीच घडले नाही. काही दिवसानंतर आई गावी तिच्या माहेरी बाळंतपणासाठी आली होती. तिला ९ वा महिना चालू होता. 

इथे गावी आई आणि आजी दोघीच होत्या. कामानिमित्त वडील शहरातच होते. त्या दिवशी रात्री सगळे जेवण आटोपून बाहेर अंगणात खाट वैगरे टाकून झोपायची तयारी करू लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात खूप उकडत असे त्यामुळे सगळे अंगणात झोपत असत. घराच्या अंगणापासून काही अंतरावर एक विजेचा खांब होता. पण तो घरापासून लांब असल्यामुळे त्याचा प्रकाश जेमतेम च घरा पर्यंत यायचा. त्यामुळे अंगणात नेहमी अंधार च असायचा. आई आणि आजी च्या गप्पा संपल्यानंतर त्या दोघी झोपी गेल्या.

अचानक मध्य रात्री आई ला जाग आली. काही विशेष कारण नसताना झोपमोड झाली होती. तसे तिने उठून चोहीकडे पाहीले आणि खाटेवर पाठ टेकवून झोपायला गेली आणि तिचे लक्ष घराच्या छतावर गेले. अंधार असला तरी जवळच्या विजेच्या खांबामुळे पडणाऱ्या प्रकाशात दिसले की एक म्हातारी बाई तिथे उभी राहून तिला एक टक पाहतेय. ती हळू हळू पुढे सरकत तिच्या जवळ येत होती. तिचे लांबसडक पांढरेशुभ्र केस पाया पर्यंत लोंबत होते. आईला जखडून ठेवल्या सारखे झाले होते. 

ती बाई छतावरून चालत तिच्या दिशेने येऊ लागली आणि अतिशय गोड आवाजात म्हणाली “काय झालं.. बघ माझ्याकडे”. आई ला काही कळत नव्हते काय करावे. तिचे काळीज भीतीने धड धडू लागले होते. ती बाई छतावर आईच्या अगदी वरच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि तिचे लांबसडक केस छतावरून खाली सोडले. जे आईच्या चेहऱ्यापर्यंत येऊन पसरले. आई हा सगळा प्रकार पाहून प्रचंड घाबरून गेली तशी ती संपूर्ण ताकदीनिशी जोरात किंचाळली. आजीने धावत जाऊन तिला मिठी मारली आणि काय झाले म्हणून विचारू लागली. तो पर्यंत शेजारपाजारचे सगळे लोक जागे झाले होते.

आई छतावर बोट दाखवून रडू लागली होती. आजीने धीर देत जवळच असलेला देवीचा अंगारा आणून आईला लावला. बहुतेक आजीला कळले असावे आईच्या घाबरण्या मागचे कारण. त्या नंतर आई ची प्रसूती होई पर्यंत आजी आईच्या शेजारीच झोपायची. झोपताना रोज देवीचा अंगारा लावायची. माझा जन्म झाला आणि काळाच्या ओघात हळू हळू या सगळ्या गोष्टींचा आई ला विसर पडत गेला. त्या नंतर ती बाई आईला पुन्हा कधीच दिसली नाही. मी आता २३ वर्षांची आहे. माझे ही लग्न झाले आहे. का कोण जाणे पण माझ्या ही मनात एक अनामिक भीती आहे की माझ्या वेळेस असे काही घडू नये. 

अनुभव क्रमांक – २ – अपूर्वा भोसले

ही घटना माझ्या गावातली आहे. त्या वर्षी आम्ही सगळे गावी गेलो होतो. मामाचे गाव म्हंटले की अगदी मजा असायची. त्या दिवशी मामा आणि त्याचा मित्र काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांना यायला ही बराच उशीर झाला. कार असल्याने काही काळजी करण्याचे कारण नव्हते. ते रात्री गावाकडे परतत असताना वाटेत त्यांना २ वयस्कर माणसे गाडीला हात करताना दिसली. इतक्या रात्री जायला वाहन मिळाले नसेल असा विचार करून त्याने दोघांना लिफ्ट द्यायचे ठरवले. तसे त्यांच्या जवळ जात त्याने गाडी थांबवली. तसे त्याने विचारले की कुठे निघालात इतक्या रात्री. तसे ते म्हणाले की आम्हाला इथेच थोडे पुढे जायचे आहे. आमचे ठिकाण आले की आम्ही सांगतो तुम्हाला. 

मामा ने ठीक आहे म्हंटले तसे ते दोघेही गाडीत बसले. मामा गाडी चालवत होता तर मामा चा मित्र त्याच्या बाजूला बसला होता. मामा च्या मित्राने काही विचारपूस करायचा प्रयत्न केला पण त्या दोघांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. काही किलोमीटर पुढे आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवायला सांगितली आणि म्हणाले “आमचे ठिकाण आले, गाडी थांबवा इथेच”. तसे मामा ने गाडी थांबवली पण गाडीतून कोणी उतरलेच नाही. तसे मामाचा मित्र दबक्या आवाजात म्हणाला “अरे वाट कसली बघतोय.. पळव गाडी. मागे कोणी नाहीये”.

घरी आल्यावर मामाने सगळे सांगितले. त्यानंतर ठीक वर्षभराने आम्ही गावाहून परतीच्या प्रवासाला निघालो होतो. नेहमीचा रस्ता असल्याने मामा गाडी चालवत होता. मध्यरात्र उलटून गेली होती. तितक्यात रस्त्याच्या कडेला त्याला कोणी तरी उभे दिसले. गाडी जवळ आल्यावर गाडीचा हेड लाईट त्यांच्यावर पडला आणि मामा विजेचा तीव्र झटका लागावा तसा शहारला. ती तीच माणसे होती ज्यांना त्याने वर्ष भरापूर्वी लिफ्ट दिली होती आणि जी गाडीतून नाहीशी झाली होती. मामा ने सांगितलेला तो अनुभव सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि आम्ही काही क्षण अगदी निशब्द झालो. तितक्यात मी म्हणाले मामा गाडी पळव. 

तसे मामा ने गाडी चा वेग वाढवला. त्यांना ओलांडून पुढे आल्यावर आम्ही मागे वळून पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. होता तो फक्त अंधार पसरलेला निर्जन रस्ता. 

अनुभव क्रमांक – ३ – नाव गुपित आहे. 

ही घटना साधारण एक वर्षांपूर्वीची आहे. आमचा सलून चा व्यवसाय असल्याने मी, माझा मामा आणि माझ्या मामाच्या मेहुणीचा मुलगा म्हणजे ऋषभ आम्ही सगळे एकत्र हा व्यवसाय सांभाळतो. माझ्या मामी चे सुद्धा पार्लर आहे. त्या दिवशी मामा च्या घरी सहज म्हणून जेवायला बोलावले होते. मटणाचा बेत होता. त्यावेळी लग्नाचा सिझन असल्यामुळे गिऱ्हाईक खूप होते आणि त्यामुळे सगळे काम वैगरे आटोपून निघायला बराच उशीर झाला. घरी आल्यावर मस्त जेवण वैगरे उरकले आणि मग हॉल मध्ये सगळे गप्पा करत बसलो. 

तितक्यात ऋषभ मोबाईल मध्ये काही तरी दाखवू लागला. त्याने कोणता तरी भुताटकी चा गेम शोधून काढला होता. ऋषभ ने सांगायला सुरुवात केली तसे तो, त्याची मोठी बहीण आणि मामा ची दोन्ही मुलं हे चौघे ही आतल्या खोलीत गेले. त्यांनी लागणारे साहित्य म्हणजे ४ मेणबत्त्या, १ कोरा कागद, २ नवीन पेन्सिल असे सगळे घेतले होते. आत गेल्यावर त्यांनी सगळे लाईट्स बंद केले जेणेकरून चांगला अंधार होईल. त्यानंतर त्यांनी चारही मेणबत्त्या पेटवून रूम च्या चार कोपऱ्यात लावल्या. कागद मध्यभागी ठेवला आणि त्याच्या वर एका कोपऱ्यात येस आणि दुसऱ्या कोपऱ्यात नो तसेच खालच्या दोन्ही कोपऱ्यात नो आणि दुसऱ्या कोपऱ्यात येस लिहिले. कागदाच्या मधोमध एका वर एक अश्या पेन्सिल प्लस साईन तयार होईल अश्या ठेवल्या. 

ते चारही जण एकमेकांचा हात धरून त्या कागदाभोवती बसले आणि ऋषभ ने बोलायला सुरुवात केली. “Bloody merry are you here?” काही वेळ सगळे शांत झाले. ते चौघेही काही घडतेय का याची वाट पाहू लागले. त्यांचे लक्ष त्या पेन्सिली कडे होते. पण काहीच घडले नाही. काही वेळा नंतर ऋषभ ने वेगळे नाव घ्यायचे ठरवले. “Charlie Charlie are you here?” पुन्हा ते एकदम शांत झाले. यावेळेस मात्र ती पेन्सिल किंचितशी हलली. तसे त्याने त्याचा व्हिडिओ काढायचे ठरवले. आता त्यांनी एकत्रित ते वाक्य म्हंटले “Charlie Charlie are you here?”. तसे ती पेन्सिल हलू लागली आणि येस लिहिलेल्या शब्दाकडे वळली. हे दृश्य पाहताच त्याची मोठी बहीण अतिशय जोरात किंचाळली. 

ती इतकी घाबरली की ते सगळे विस्कटून रूम मधून धावत च बाहेर आली. तिने मामा ला सगळे सांगितले. मामा आम्हाला चांगलाच ओरडला कशाला नाही ते असले विचित्र खेळत बसता आणि कसला तो व्हिडिओ काढलाय आत्ता माझ्यासमोर डीली ट कर. तो हो म्हणत माझ्याजवळ आला आणि डिलीट करण्याआधी त्याने मला तो व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहून माझीही चांगलीच तांतरली. तितक्यात घराबाहेर ७-८ कुत्रे अचानक जोरात भुंकायला लागले. मामी ने गॅलरी मध्ये जाऊन पाहिले तर ते सगळे कुत्रे आमच्या च घराकडे पाहून भुंकत होते. 

आम्ही सगळे भलतेच घाबरलो होतो. मामी ने देवाच्या नावाचा जप सुरू केला तसे हळू हळु सगळे शांत होऊ लागले. माझी नजर घडाळ्या कडे गेली. ठीक १२ वाजले होते. दुसऱ्या दिवशी मामी ने बोलता बोलता हा प्रकार तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला सांगितला तेव्हा कळले की तिच्या नातेवाईकाने असाच काहीसा प्रकार केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा अघटीत मृत्यू झाला होता. 

https://www.youtube.com/watch?v=SM9c-iWCVsg

Leave a Reply