अनुभव – गौरव सर्देकर
घटना मागच्या वर्षी ची डिसेंबर महिन्यातील आहे. २५ डिसेंबर २०२३ च्या रात्री मी, माझा १ मित्र आणि दोन मैत्रिणी आमच्या इथे राहायला आले होते. त्या रात्री जेवण वैगरे आटोपून आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो. साधारण १० वाजले असावेत. चालत चालत आम्ही घराजवळच्या फाट्यावर आलो. तिथेच जवळपास दीड पावणे दोन तास घुटमळत गप्पा करत राहिलो. मैत्रिणी बोलल्या की आपण असेच चालत जाऊन कुठे तरी फिरून येऊ, फोटो वैगरे पण काढता येतील. मी त्यांना म्हणालो की आता रात्रीचे १२ वाजायला आलेत, आता कुठे जायचं? पण त्या अजिबात ऐकत नव्हत्या म्हणून मग तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या नदीजवळ घेऊन गेलो.
त्यावर एक पूल होता आणि तिथे लाईट वैगरे चांगले होते म्हणून वाटले की यांना फोटो ही नीट काढता येतील. परिसर अगदी शांत झाला होता. वारा असा नव्हता पण अधून मधून एक थंडगार हवेची लहर येऊन जायची. त्या दोघीही फोटो काढण्यात मग्न झाल्या. १०-१५ मिनिट झाले होते तरीही त्यांचे फोटो काढणे अजुन सुरूच होते. तितक्यात एका मैत्रिणीने केस सोडले म्हणजे अजुन वेगळ्या पोज मध्ये फोटो काढता येतील. तसे मी पटकन त्यांना म्हणालो “ अग असे रात्री अपरात्री पाण्या जवळ असताना कधी केस सोडायचे नसतात. तुम्हाला इथल्या काही गोष्टी माहीत नाही म्हणून सांगतोय.. “ पण त्या दोघींनीही माझे अजिबात ऐकले नाही. फोटो काढून झाल्यावर त्या ब्रीज वरच्या कठड्याला टेकून उभ्या होत्या आणि बाहेरच्या बाजूला पाहत होत्या.
तितक्यात एकीला नदीकाठच्या झाडाजवळ एक माणूस उभा दिसला. ती एकटक तिथे बघत होती पण अंधार असल्यामुळे तिला नीटस काही दिसत नव्हत. पण तिला सतत अस वाटत होत की तो माणूस आपल्याकडेच बघतोय. तिला वाटेल की इथलाच कोणी स्थानिक असेल म्हणून तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. काही वेळानंतर आम्ही घरी निघून आलो. आल्यावर ही झोप लागत नव्हती म्हणून आमच्या गप्पा आणि टाईमपास सुरु होता. घरी येऊन आम्हाला साधारण १ ते दीड तास झाला असेल. माझी मैत्रीण पाणी प्यायला म्हणून स्वयंपाक घरात गेली. फिल्टर चा नळ सुरू करून ग्लास मध्ये पाणी घेत होती. तसे नकळत तिचे लक्ष जवळच्या खिडकीत गेले. तिथे कोणी तरी उभ होत. आणि नुसतं उभ नव्हत तर आपला हात खिडकीतून तिच्या दिशेला जवळ आणत होत. ती भीती ने अगदी जोरात किंचाळली.
आम्ही सगळे धावत स्वयंपाक घरात बघायला आलो की ती एवढ्या जोरात का किंचाळली. त्यावर तिने आम्हाला दोन्ही प्रसंग सविस्तर सांगितले. ब्रीज वर असताना दिसलेला तो माणूस आणि नुकताच घडलेला प्रसंग. आम्ही तिची बरीच समजूत काढली की तुला नक्की भास झाला असेल. तू खूप विचार करतेस म्हणून तुला तसे वाटले असेल. मी जाऊन बाहेर पाहून ही आलो पण बाहेर मला कोणीच दिसले नाही. आम्ही तिला दुसऱ्या खोलीत घेऊन आलो आणि बसवले. तेवढ्यात तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अवघ्या काही मिनिटांत खूप ताप भरला. आम्ही तिला पाणी प्यायला दिलं पण तरीही तिला काही तरी होऊ लागलं जे आम्हाला कळत नव्हतं.
तिने सांगितलेल्या दोन्ही प्रसंगामुळे मला वेगळीच शंका येऊ लागली होती. जे काही दिसलं त्याचाच परिणाम तर नाही ना असा विचार मनात आला. मी लगेच देव्हाऱ्यात गेलो आणि देवीचा भंडारा आणून तिच्या कपाळाला लावला. जसा मी भंडारा लावला तिला लगेच बर वाटायला लागलं. श्वास घ्यायला जो त्रास होत होता तो एकदम बंद झाला. ती रात्र आम्ही तशीच जागून काढली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळ काही नीट झालं तेव्हा मी त्यांना सांगणं योग्य समजलो. मी त्यांना सांगितले की तुला ज्या झाडाजवळ तो माणूस दिसला होता तो या आधी बऱ्याच जणांना दिसला आहे. कारण एका बाई ने त्याला जीवे मारून त्या झाडावर लटकवल होत. तेव्हा पासून त्या भागात कोणी स्त्री गेली की तो त्यांच्या मागे लागतो, त्यांना झपाटतो. बहुतेक हिच्या बाबतीत ही तेच झाले. म्हणून मी सांगत होतो की केस मोकळे सोडून वैगरे नका राहू पण तुम्ही माझे ऐकले नाही. या घटने नंतर तिने कानाला खडा लावला की पुन्हा अश्या ठिकाणी केस मोकळे ठेऊन कधीच जाणार नाही.