आपण बऱ्याच वेळा भुताटकी वैगरे या गोष्टी मजा मस्करी मध्ये घेतो. तर काही जण एक मनोरंजनाचा विषय म्हणून काहीसा रस दाखवतात. पण जेव्हा त्याच गोष्टींना सामोरे जायची वेळ येते तेव्हा त्याचे खरे गांभीर्य कळते. असाच हा एक भयाण अनुभव..
अनुभव – गणेश तांबे
मी ऐरोली ला एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करतोय. कॉल सेंटर असल्यामुळे नेहमी नाईट शिफ्ट असते. मला त्या ठिकाणी जॉब ला जॉईन होऊन जवळपास एक वर्ष झाल होत. आणि वर्ष भरात मी खुपश्या गोष्टी ऐकल्या होत्या पण कधीही कसला अनुभव आला नव्हता. माझ्या ऑफिस ची बिल्डिंग कर्व शेप मध्ये आहे त्यामुळे सगळे फ्लोअर सुद्धा तसेच आहेत. म्हणजे कॉरिडॉर मध्ये उभे राहिलो तर पूर्ण फ्लोअर दिसत नाही. पूर्ण फ्लोअर बघण्यासाठी चालत दुसऱ्या टोकाला जावे लागते. वर्ष भर त्या कॉल सेंटर मध्ये काम करत असल्यामुळे माझे काही मित्र सुद्धा बनले होते. एकदा असेच नाईट शिफ्ट करत असताना आम्ही गप्पा मारत बसलो होतो. एकदा असंच आम्ही नाईट शिफ्ट करत असताना गप्पा मारत होतो, तेव्हा आम्ही चौघांनी ठरवलं की चहा पिऊन यावं. सिस्टम वर ब्रेक टाकून आम्ही खाली 1st फ्लोअरवर चहा प्यायला गेलो जिथे आमच्या ऑफिस चे कॅन्टीन होते.
रोज जे कॅन्टीन रात्रीही भरलेलं असतं, तिथं आज फक्त एकच स्टाफ होता, तो ही नवीन आलेला. आम्ही चहा आणि काही बिस्किटं खाऊन परत वर जाणार होतो, तेवढ्यात कळलं की लिफ्टचं काम सुरू आहे. मग आम्ही ठरवलं की गप्पा मारत मारत जिना वापरून जाऊ, कारण ब्रेक संपायला अजून अवधी बाकी होता. ऑफिसची बिल्डिंग वळणदार असल्यामुळे वर जायला जास्त वेळ लागला. माझा एक मित्र म्हणाला, “चल, आपण 3rd फ्लोअरला जाऊ.” आम्ही विचारलं, “अचानक 3rd फ्लोअरला का रे?” तर तो हलक्या आवाजात म्हणाला, “इथे एकदा लोक काम करत असताना आग लागली होती, आणि काही माणसं जळून मेली होती. त्यांचं अस्तित्व अजूनही जाणवतं लोकांना.”
माझा दुसरा मित्र, ज्याचं नाव प्रसाद आहे, म्हणाला, “अरे, असं काही नसतं. तू उगाच विचार करू नकोस.” तरी आम्ही 3rd फ्लोअरला गेलो. तो म्हणाला, “आता आपण सगळे वेगवेगळ्या कॅबिनमध्ये जाऊन 5 मिनिटं बसू.” माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि थोडी का होईना पण मनात भीती घर करू लागली. कारण माझ्यासाठी हे सगळे खूप नवीन होते आणि मी असे कधीच केले नव्हते. त्याने सांगितल्या प्रमाणे आम्ही वेगवेगळ्या केबिन मध्ये गेलो आणि शांत बसून राहिलो. बरोबर 5 मिनिटांनी बाहेरून आवाज ऐकू आला, “साहेब, चहा पिणार का?” हे ऐकून मी विचारात पडलो. आवाज काही अंतरावरून आला होता पण तरीही वाटले “अरे, हा फ्लोअर तर बंद आहे, आणि आपण आत्ताच चहा पिऊन आलो मग हा आवाज!” म्हणून मी बाहेर जाऊन पाहिलं, पण बिल्डिंग वळणदार असल्यामुळे मला काहीच नीट दिसलं नाही.
मी तसाच पुढे चालत गेलो आणि मित्राला हाक मारली, “प्रसाद, इथे येतोस का? कोणीतरी चहा विचारून गेलं.” तसे तो बाहेर आला आणि म्हणाला, “अरे, हा फ्लोअर बंद आहे, काय पण बोलतोयस! कोणी दिसलं का तुला?” असं म्हणत तो परत कॅबिनमध्ये गेला. पण मी ठरवलं की पाहायलाच हवं कोण आहे ते. तो ही फुशारक्या मारायला पुन्हा आत निघून गेला होता. मी त्या कॉरिडॉर मधून चालायला सुरुवात केली. तिथलं वातावरण खूप च अस्वस्थ करणार होत. तिथून चालत जात असताना अचानक मागून कोणी तरी धावत गेलं आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी मागे वळून पाहिलं पण मागे कोणीही नव्हत. तितक्यात कॉरिडॉर मधला एक लाईट लुकलुकत बंद झाला. माझ्या हातात मोबाईल होता आणि काहीही न करता माझ्या मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू झाला. मी एकदम दचकलो आणि जागीच स्तब्ध झालो.
तितक्यात मला जाणवले की माझ्या समोर अंधारात कोणी तरी उभ आहे. मी हळू हळू मोबाईल चा फ्लॅश लाईट वर करू लागलो तसे दिसले की एक माणूस माझ्या समोर आहे आणि मला पाठ करून उलट दिशेने चालत जातोय. तो माणूस माझ्या ऑफिस मित्रांपैकी कोणी नाही हे ओळखायला मला वेळ लागला नाही. मी हिम्मत करून त्याला हाक मारली आणि विचारले “ हॅलो.. तुम्ही कोण आहात..? आणि या ऑफिस मध्ये काय करता ? तुमचे आयडी कार्ड दाखवा..?” तसा तो चालायचा थांबला आणि मागे वळून माझ्या कडे पाहू लागला. आता मात्र मला खरंच भीती वाटू लागली होती. मी त्याला पुढे काही विचारणार तितक्यात तो माझा दिशेने चालत येऊ लागला. तसे माझ्या मोबाईल चा फ्लॅश लाईट अचानक बंद झाला आणि त्या कॉरिडॉर मध्ये गडद अंधार पसरला.
पुढच्या क्षणी माझ्या अगदी कानाजवळ एक आवाज ऐकू आला “इथून जा, लवकर जा. थांबू नकोस!” मी झटकन २ पावलं मागे सरकलो आणि घाबरत विचारलं, “का? मी याच ऑफिसमध्ये काम करतो, मी का जाऊ इथून” तसे आधी साधा वाटणारा आवाज आता भरडा आणि जड वाटू लागला तो जोरात ओरडत मला म्हणलं, “जा! समजत नाही का तुला, जा!!!” त्याच्या त्या भरड्या आणि किळसवाण्या ओरडण्याने मी प्रचंड घाबरलो. जोरात धावण्याचा आवाज आला आणि फ्लोअर वरची खिडकी आपोआप उघडली गेली आणि असे जाणवले की त्या माणसाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. मी झटकन धावत जाऊन त्या खिडकीतून डोकावून खाली पाहिले पण खाली कोणीच दिसले नाही. बस झाले तेवढे खूप झाले, या भयानक गोष्टी सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही असा विचार करून मी तिथून धावत सुटलो. कारण चालत चालत मी त्या फ्लोअर च्या दुसऱ्या टोकाला आलो होतो. मी पळत माझ्या मित्रांकडे आलो आणि त्यांना माझ्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला.
त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी हा भयाण प्रकार जिथे अनुभवला होता तिथे सगळ्या मित्रांना घेऊन पुन्हा आलो. पण या वेळेस ना कोणी दिसले ना ती खिडकी उघडी होती. ती खिडकी जणु अशी बंद होती की गेले बरेच महिने कोणी उघडली ही नसावी. हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हत. कारण इतकं सगळं घडून सुद्धा प्रसाद म्हणाला, “जर खरंच असं झालं असेल तर आपण अजून थोडा वेळ इथे थांबूया.” मला मात्र एक क्षण ही तिथे थांबायची इच्छा नव्हती. आमचं बोलणं सुरू असतानाच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं. मला वाटलं की माझ्या मित्रांपैकी एखाद्याने हात ठेवला असेल कारण तिथे खूप अंधार होता. तो हात जसा माझ्या खांद्यावरून काढला त्याच्या पुढच्या क्षणाला समोरून एक माणूस पळत जाताना दिसला.
मी घाबरून म्हणालो, “अरे हाच माणूस होता ज्याने उडी मारली.” आम्ही सगळेच त्याच्या दिशेने धावत सुटलो. त्या माणसाने परत तेच वाक्य म्हटलं, “जा, तुमचा जीव वाचवा!” हे ऐकून प्रसादने हिम्मत करून त्याला उलट विचारलं, “तू कोण आहेस, आम्हाला असं सांगणारा?” तसे तो माणूस एकदम थांबला आणि म्हणाला “बघा मी सांगितले होते ना ती आली.. आता ती तुम्हाला ही सोडणार नाही.. “ आम्ही सगळ्यांनी समोर पाहिले तर एक बाई सदृश्य आकृती आमच्या दिशेने चालत आली, त्या माणसाला फरफटत एका केबिन मध्ये घेऊन गेली. हा सगळा भयानक प्रकार आम्ही धड धडत्या काळजाने पाहत होतो. अवघ्या काही सेकंदात आम्ही हिम्मत करून त्या केबिन मध्ये गेलो तर आत कोणीही नव्हत. काय घडलं आम्हाला काहीच कळलं नाही. पण प्रसाद सोबत आम्हाला चांगलाच अनुभव आला होता. आम्ही आमच्या फ्लोअर वर निघून आलो. त्या रात्री कोणीही काहीच काम केलं नाही. कारण घडलेल्या भयानक प्रकारामुळे कोणाचीच मनस्थिती चांगली नव्हती.
ती बाई नक्की कोण होती, तो माणूस कोण होता या बद्दल आम्हाला काहीच कळले नाही. कुठे तरी वाटून गेले की आमच्या सारखा तो माणूस कदाचित त्या बाईच्या आत्म्याच्या तावडीत सापडला असावा. म्हणून च तो आम्हाला तिथून निघून जायला सांगत होता. तो ही जिवंत नव्हताच मुळी. पण मेल्यानंतर ही तिची आत्मा त्याला नरक यातना देत असणार. आज या प्रसंगाला आज बरीच वर्ष उलटली. आज ही मी त्याच ऑफिस मध्ये नोकरी करतोय पण पुन्हा कधीच त्तिसऱ्या मजल्यावर जाण्याची हिम्मत होत नाही.