कुलधरा हे राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात असलेलं एक गाव आहे, ज्याबद्दल अनेक रहस्ये आणि भयानक कथा सांगितल्या जातात. हे गाव एका रात्रीत संपूर्णपणे उजाड आणि निर्जन झालं होतं, आणि आजही त्याचं रहस्य अनेकांच्या मनात भीती उत्पन्न करतं. हे गाव 13व्या शतकात वसवण्यात आलं होतं आणि त्यावेळी पालीवाल ब्राह्मण इथे राहत होते. हे अत्यंत समृद्ध आणि बुद्धिमान लोक होते, ज्यांनी शेती आणि व्यापारात आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यांच्या प्रगत शेती तंत्रज्ञानामुळे हा परिसर समृद्ध झाला होता. कुलधरा हे गाव सुरुवातीला एक संपन्न ठिकाण होतं. गावात सुंदर वाडे, मंदिरे आणि विहिरी होत्या. गावकऱ्यांचं जीवन खूप चांगलं चाललं होतं, पण एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात अडथळा आणणारी ठरली – सलीम सिंग नावाचा जैसलमेरचा क्रूर दिवाण.

सलीम सिंग हा अत्यंत निर्दयी आणि वासनांध माणूस होता. तो कुलधरा गावातल्या एका सुंदर तरुणीवर लुब्ध झाला आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करू लागला. तिथले लोक स्वतःच्या सन्मानाबद्दल खूप जागरूक होते. त्यांना सलीम सिंगच्या इच्छेला शरण जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की, गाव सोडून जाणं हीच एकमेव उपाययोजना आहे. एका रात्री, सर्व लोकांनी गाव सोडलं, आणि ते कुठे गेले याचं आजही कुणाला काहीच ठाऊक नाही. असं म्हणतात की, त्यांनी गाव सोडताना त्याला एक शाप दिला होता की, या गावात कोणीच राहू शकणार नाही, आणि जो कोणी राहायचा प्रयत्न करेल, त्याला दुर्दैव आणि मृत्यूचा सामना करावा लागेल.

शापित झालेलं कुलधरा गाव आजही उजाड आहे. गावात कोणतंही जीवन नाही. जेव्हा तुम्ही तिथं प्रवेश करता, तेव्हा तिथल्या नीरव शांततेत एक भयानकता जाणवते. गावातील घरे आणि रस्ते अजूनही तसेच उभे आहेत, पण ते मोडकळीस आलेले आहेत. इथं कोणीही राहत नाही, पण असं सांगितलं जातं की, गावात रात्री फिरणाऱ्या लोकांना असामान्य अनुभव येतात. स्थानिक लोकांच्या मते, तिथे रात्री आवाज ऐकू येतात आवाज ऐकू येतात आणि एक विचित्र प्रकारची थंड लहर. काही जण म्हणतात की, त्यांनी तिथे पिढ्यांपूर्वीच्या वेशभूषेत असलेल्या लोकांना चालताना पाहिलं आहे. तर काहींना गावातल्या घरांमधून प्रकाश दिसतो, जणू काही तिथं अजूनही कोणी राहतं. राजस्थान पर्यटन विभागाने त्या गावात रात्री जायला सक्त मनाई केली. पण तरीही काही लोक कसल्याही सूचना न जुमानता तिथे रात्रीही गेली आहेत.

एका पर्यटकाच्या सांगण्यानुसार, त्याने एक रात्रभर तिथे मुक्काम करायचं ठरवलं होतं. रात्रीच्या वेळी त्याला एका बंद घराच्या खिडकीतून बाहेर कुणीतरी पाहत असल्याचा भास झाला. त्याला भीतीने घाम फुटला, पण त्याचं साहस संपलं नव्हतं. त्याच रात्री त्याच्या तंबूजवळ कोणीतरी चालल्याचे म्हणजे पावलांचे आवाज ऐकू आले, पण बाहेर पाहिलं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. अस म्हणतात की कुलधरा गावात जाणारे अनेक पर्यटक अर्धवट राहिलेल्या स्वप्नांमध्ये कैद होतात, आणि नंतर तीच स्वप्न त्यांना खूप त्रास देतात. अगदी आजही, कुलधरा गावात काही वेळ घालवल्यानंतर लोकांना काही दिवस विचित्र स्वप्नं पडतात, आणि काही जण मानसिक तणावाच्या अवस्थेत जातात. 

या गावाचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. शापित जागांवर शास्त्रीय स्पष्टीकरणं दिली जातात, पण कुलधरा गावाच्या भूतकाळाचं गूढ अजूनही तसंच आहे. काही वर्षांपूर्वी भारताच्या पुरातत्त्व खात्याने या गावाचं संशोधन करायचं ठरवलं. त्यांच्या संशोधनादरम्यान, त्यांना गावात काही प्राचीन वस्तू आणि अवशेष सापडले, पण या गावाच्या रहस्याबद्दल काहीही स्पष्ट झालं नाही. काही लोक असं मानतात की, या गावावरचा शाप खराच आहे, तर काही जण याला फक्त एक दंतकथा मानतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे – कुलधरा गावाचं रहस्य, त्याचं शांत आणि भयानक वातावरण अजूनही लोकांच्या मनात भीती निर्माण करतं. कुलधरा ही फक्त एक पडक्या इमारतींची जागा नाही, तर एका शापित जागेचं प्रतीक आहे. जे लोक तिथं जातात, ते या जागेचा भयानक अनुभव घेऊनच परततात.

काही वर्षांपूर्वी मी आणि माझे काही मित्र राजस्थान ला ट्रीप साठी गेलो होतो. राजस्थानातल्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक होते, कुलधरा. या गावाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते. पण आम्हाला फक्त इतकंच माहीत होत की हे गाव एका रात्रीत उध्वस्त झालेलं आणि तिथे राहणारे सर्वजण अचानक अदृश्य झालेले. आम्ही कुलधरा गावात पोहोचलो तेव्हा सुर्यास्त होत होता. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच अगदी शांत आणि भयानक वातावरण जाणवू लागलं. मला शब्दात वर्णन करता येणार नाही पण अगदीच सगळं भकास वाटू लागलं. गावाचं आजूबाजूचं दृश्य अगदी निर्जन होतं. मोडकळीस आलेली घर, सामसूम झालेले रस्ते आणि एखाद्या भयानक रहस्याची जाणीव करून देणारा नीरवपणा. तिथल्या स्थानिकांनी आम्हाला बजावले की रात्री गावात जाऊ नका.. पण त्यांना न जुमानता आम्ही आत गेलो आणि तिथला परिसर न्याहाळू लागलो.

काही वेळानंतर आम्ही एका जुन्या मंदिराजवळ येऊन थांबलो. हे मंदिरही पडक होतं आणि खूप जुनं दिसत होतं. काही वेळ तिथेच थांबून आम्ही पुढे जायला निघालो तितक्यात माझ्या एका मित्राने सांगितले की त्या परिसरात त्याला एक विचित्र आकृती दिसली. आम्हाला वाटलं की हा आल्या आल्या मुद्दामून आम्हाला घाबरवायला असे बोलतोय म्हणून आम्ही त्याच्या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवला नाही. आम्ही त्याच्या अश्या बोलण्यावर हसतच होतो, पण तितक्यात एक विचित्र गोष्ट घडली. इतक्या वेळेपासून शांत असणार वातावरण अचानक बदललं. बघता बघता अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि एक थंड हवेची लहर अंगाला स्पर्शून गेली. आम्ही सगळेच शहारलो. कदाचित पुढे घडणाऱ्या घटनांची ही एक चाहूल होती. 

गावाच्या आत गेल्यावर आम्ही एका मोडकळीस आलेल्या वाड्या जवळ पोहोचलो. वाडा कसला तुटक फुटक घर होत. छप्पर नव्हतच मुळी. पडक्या भिंती. आम्ही तसेच चालत वाड्याच्या दरवाज्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर आम्हाला आतल्या बाजूला कोणी तरी चालतं असल्याचा आवाज आला. आम्ही सगळेच जागीच स्तब्ध झालो. आम्ही थांबलो आणि कान देऊन ऐकू लागलो. आवाज स्पष्ट होता – पायांचा आवाज, एक दोन नव्हते तर जणु बरीच लोकं चालत आहेत. मी आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथं कोणीच नव्हतं! आमचं हृदय धडधडायला लागलं. पण नंतर वाटलं की आमचा भास असेल कारण आम्हाला कोणीही दिसत नव्हत. पण हा भास एकदम सगळ्यांना एकदाच कसा होईल.

प्रत्येक क्षणाला तो आवाज वाढत चालला होता. खर तर आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली होती पण तरीही आम्ही त्या ठिकाण हून निघालो नाही. मित्रांपैकी एकाने काही फोटो काढायचं ठरवलं. त्याने त्याच्या कॅमेरात क्लिक केलं, आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर चे हावभाव पूर्णपणे बदलून गेले. “हे खूप भयानक आहे” इतकेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. कारण डोळ्यांना जे दिसलं नव्हत ते कदाचित कॅमेरा ने टिपले होते.. आम्ही त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि फोटो पाहिले. फोटोमध्ये बऱ्याच सावल्या दिसत होत्या.. मनवसादृष्य पण अस्पष्ट.. आम्हाला कळेना की हे कसं शक्य आहे, कारण तिथं कोणीच दिसत नव्हतं.

या घटनेनंतर आम्हाला खूप अस्वस्थ वाटू लागलं. आम्ही ठरवलं की, आता इथून निघून जावं. परंतु, त्या जागेपासून निघण्याचा प्रयत्न करताच आम्हाला आणखी विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. त्या भागातून बाहेर पडतच होतो की एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज कानावर पडला. हा आवाज इतका तीव्र होता की, आमच्या हृदयाचा ठोका च चुकला. आम्ही सगळ्यांनी भयभीत नजरेने एकमेकांकडे पाहिलं आणि एक क्षणभर आम्हाला काहीच सुचलं नाही. काही कळण्याच्या आता पुन्हा एकदा आवाज आला, आणखी जोरात. आम्ही धावतच गावाच्या बाहेर जायचं ठरवलं. बस झालं, आता इथून निघालो नाही तर उद्याची सकाळ पाहायला मिळणार नाही असा विचार करून आम्ही सगळे बाहेरच्या दिशेने धावत सुटलो.

गावाच्या बाहेर पडताना आम्हाला एक जुनी विहीर दिसली. मी पटकन तिथे टॉर्च मारली तर विहिरीच्या बाजूला एका स्त्री ची मूर्ती होती जी खूप जुन्या काळातली वाटत होती. आमच्या पैकी एक जण त्या दिशेने धावत गेला आणि त्या मूर्तीला हात लावणार तितक्यात विहिरीतून एक विचित्र आवाज आला. तसा तो घाबरून भानावर आला आणि आमच्या दिशेने पुन्हा धावत आला. कसे बसे आम्ही त्या गावातून बाहेर आलो. तिथून बरीच अंतर पायपीट करून जवळच्या हॉटेलमध्ये परतल्यावर काही क्षण निवांत बसलो. आम्ही काहीच बोलत नव्हतो, कारण प्रत्येकाच्याच मनात तेच विचार चालले होते – जे अनुभवलं ते नक्की काय होतं?

त्याच रात्री आमच्या मित्रांपैकी एका मित्राला विचित्र स्वप्नं पडायला लागली. तो अचानक जागा झाला आणि म्हणाला की त्याला कुठेतरी एका अंधाऱ्या खोलीत बंधिस्त केल्याचा भास झाला, जिथे त्याला कोणी तरी सतत बघत आहे. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती आणि आम्हाला कळले की तो मस्करी करायच्या परिस्थिती मध्ये अजिबात दिसत नाहीये. आम्ही त्याला शांत केलं, पण त्या रात्रीनंतर तो काहीसा विचलित झाला होता. त्या गावाचं रहस्य आजही कायम आहे. आम्ही त्यानंतर राजस्थान सोडलं, पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनात आजही ताजाच आहे. त्या अज्ञात शक्तीची जाणीव, ती विचित्र सावली, आणि तो आवाज – सगळं अजूनही माझ्या डोक्यात घर करून बसलंय. कुलधरा हे फक्त एक गाव नाही, ते एक भयावह रहस्य आहे, जे कदाचित कधीच उलगडणार नाही.

Leave a Reply