अनुभव – अमेय

साधारण ४-५ वर्षांपूर्वी मी एका वॉच च्या शोरुम मध्ये जॉब ला होतो. शोरुम तसे बरेच मोठे होते. त्याच वर्षी शोरुम ला २ वर्ष पूर्ण झाली होती म्हणून बॉस ने सगळ्या स्टाफ साठी हॉटेल मध्ये डिनर पार्टी चे आयोजन केले होते. तेव्हा माझा कडे कायनेटिक होंडा बाईक होती. पार्टी च्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणी ला ही सोबत घेऊन गेलो. पार्टी संपेपर्यंत बराच उशीर झाला आणि मला लक्षात च आले नाही. रात्रीचे १२.३० तर तिथेच झाले होते. वेळ लक्षात आल्यावर मी सगळ्यांचं निरोप घेतला आणि मैत्रिणीला घेऊन निघालो. तिला घरी सोडून मग घरी जाणार होतो. माझ्या मैत्रिणी चे घर खूप लांब होते त्यामुळे मला सोडायला जवळपास १.१५ झाला. नंतर मग मी माझ्या घरी यायला निघालो. मी जिथे राहतो ती एक सरकारी कॉलोनी आहे. आणि तो भाग थोडा डोंगर भागात आहे, मुख्य वस्तीपासून जरा दूर. रस्त्यात जाताना एक छोटासा सा घाट सारखा लागतो. मला एरव्ही सुद्धा तिथून जाताना जरा भीती च वाटायची. आणि आज तर मला जवळपास २ वाजले होते. त्या रस्त्यावर साधे चीट पाखरु ही दिसत नव्हते.

सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या घाटाच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. गावात एखादे मयत झाले की गावापासून लांब ही एक स्मशानभूमी जिथे सगळ्यांना आणले जाते. त्या रात्री तर नियतीने जणू माझ्या धैर्याची परीक्षा च घेणं ठरवल होत. कारण त्या स्मशानात एक प्रेत जळत होत. आजूबाजूला लोक ही दिसत नव्हते. बहुतेक वेळा २-३ जण तरी शेवटपर्यंत थांबतात पण मला त्या प्रेता जवळ कोणीही दिसले नाही. घाटाचा रस्ता, किर्र अंधार आणि बाजूच्या स्मशानात जळत असलेलं प्रेत हे सगळे भयाण वातावरण. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अगदी खोलवर भीती उत्पन्न करू लागलं. स्ट्रीट लाईट असून नसल्या सारखे होते. मी जमेल तितक्या वेगात बाईक चालवू लागलो. तितक्यात अचानक गाडीचा वेग कमी झाला. मला जाणवू लागले की बाईक कोणी तरी मागून पकडली आहे किंवा त्यावर बराच भार आहे. त्या भारामुळे वेग अतिशय कमी झालाय. मला काही सुचत नव्हत की काय झालंय. मी हिम्मत करून मागे पाहिलं पण मागे कोणीही नव्हतं. भीतीमुळे सर्वांगाला घाम फुटला होता. तितक्यात स्ट्रीट लाईट चा जो काय थोडा आधार होता तो ही गेला. कारण त्या भागातली वीज गेली. 

माझ्या सोबत होता तो गडद अंधार आणि माझ्या बाईक चा आवाज. बाईक हळु हळु होऊन शेवटी एकाच जागी थांबली. बंद पडली नव्हती, बाईक सुरू च होती फक्त पुढे जात नव्हती. मी एक्सी लेटर जोरात फिरवले पण गाडी काही जागची हलली नाही. तितक्यात स्मशानाच्या दिशेने जोरात आवाज आला “सोड त्याला..” तसे बाईक वरचा भार अचानक कमी झाला आणि बाईक तिथून जोरात पुढे निघाली. मी कसा बसा घरी पोहोचलो. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. आई ला घडलेली सगळी घटना सांगितली. ती मला खूप ओरडली की का उशिरा आलास इतक्या. तुला कळत नाही का. मी काहीच बोललो नाही कारण चूक माझीच होती. रात्री २ नंतर ही घरी यायची वेळ नाही हे मला ही माहीत होत. झोपे पर्यंत अडीच वाजले. मी माझ्या बेडवर एकटाच झोपायचो. एका कुशीवर झोपलो होतो. अंथरुणात पडून अवघे १०-१५ मिनिट झाले असतील. मला जाणवले की माझ्या शेजारी कोणी तरी झोपले आहे. मी हळूच कुस बदलायला आणि कोण आहे हे बघायला मागे वळलो आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. काळीज भीती ने धड धडू लागले. एक बाई माझ्या बाजूला झोपली होती. 

चेहऱ्यावर प्रचंड राग आणि नजर माझ्यावर रोखली होती. तिचे ते भयाण रूप पाहून माझ्या अंगातला त्राण च निघून गेला. ओरडा वेसे वाटत होते पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. काही कळण्याच्या आत ती बाई पुटपटली “आज अमावास्येची रात्र आहे.. तुला सोडणार नाही..” त्या वाक्या नंतर तिच्या चेहऱ्यावर चे ते भयाण खुनशी हास्य पाहून मी जोरात ओरडलो आणि आई च्या खोलीत धावत गेलो. तिला उठवून सगळे सांगितले. ती मला धीर देत म्हणाली की इथेच झोप, मी आहे. पण त्या रात्री आम्हा दोघांना काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवले की एका मांत्रिकाकडे जाऊन त्याला सगळे सांगावे. आम्ही जवळच्याच एका गावात गेलो. पत्ता आधीच विचारून घेतला होता. त्यामुळे घर शोधायला जास्त वेळ लागला नाही. मी त्याच्या घरात शिरलो आणि त्याने मला पाहताच म्हंटले “ती तुमच्यासोबत च आली आहे.. या घरात कोणतीही अमानवीय शक्ती, अतृप्त आत्मा आत शिरू शकत नाही. ती बाहेरच आहे. तुझ्या बाहेर जाण्याची वाट पाहतेय..” हे ऐकल्यानंतर माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. त्यावर तो मांत्रिक म्हणाला “घाबरु नकोस.. काय झाले आहे सविस्तर सांग..”. मी घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

त्याने नीट ऐकून घेतले आणि म्हणाला “उपाय आहे पण जोखीम आहे.. कारण पुन्हा एकदा तुला त्या जागेवर जावे लागेल ते ही अनवाणी..” मी होकारार्थी मान डोलावली तसे त्याने एक मडके घेऊन काही तरी मंत्र पुटपुटले आणि माझ्या हातात देत म्हणाला “हे मडके घे.. तुला ज्या वेळी तो प्रसंग आला होता त्याच वेळी तिथे जाऊन हे मडके फोडायचे.. तुला मागून कसलीही हाक ऐकू आली, अगदी कोणीही हाक दिली मग तुझ्या आई ने च का नाही, तू चुकूनही मागे वळुन पाहायचे नाही. काहीही झाले तरीही.” त्यांचे आभार मानून मी तिथून घरी आलो. रात्र येई पर्यंत माझे कुठे ही लक्ष लागत नव्हते. पण स्वतःला यातून बाहेर काढायचा हा एकच मार्ग मला दिसत होता. रात्र झाली. ठरल्याप्रमाणे आई चा निरोप घेऊन बाहेर पडलो. निघताना घराची कडी बाहेरून लाऊन घेतली आणि मनात असंख्य विचार आणि भीती साचवून त्या रस्त्याकडे चालत निघालो. या वेळी काय भयानक अनुभवायला मिळणार आहे या साध्या विचाराने दरदरून घाम सुटू लागला होता. १०-१५ मिनिटात मी त्या जागेवर येऊन पोहोचलो आणि तितक्यात आल्या रस्त्याने मागून आवाज आला “अरे अमेय हे बघ.. हे घरीच विसरलास तू..”. तो आवाज ऐकून काळजाचं पाणी च झालं. कारण तो आवाज माझ्या आई चा होता. 

नकळत मी मागे वळू लागलो तितक्यात आठवले मी तर निघताना घराला बाहेरून कडी लावून निघालो होतो. मग हा आवाज.. काळीज भीती ने धड धडू लागले. त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मी जास्त वेळ न घालवता ते मडके जोरात त्या जागेवर फोडले. मागे वळलो पण नजर खाली जमिनीवर होती. आजूबाजूला कोणीही असल्याची चाहूल जाणवली नाही. झपाझप पावले टाकत मी घरी आलो. काही दिवस उलटले पण मला असा भयाण अनुभव पुन्हा कधीही आला नाही. नंतर मी मित्रांना विचारून चौकशी करायला लावली तेव्हा कळले की बऱ्याच वर्षांपूर्वी एक रोजंदारी करण्याऱ्या बाई ने त्या घाटाच्या रस्त्यावरच्या झाडाला लटकून गळफास घेतला होता. तेव्हा पासून तिथे असे प्रकार घडल्याचे काही लोक सांगतात..

Leave a Reply