अनुभव – लौकिक म्हात्रे
पहिला अनुभव मला बऱ्याच बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता जेव्हा मी साधारण १२ वर्षांचा असेन. मी महिन्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या जुन्या घरी गेलो होतो. त्या घरा शेजारी काकू राहायच्या. लहानपणापासूनच तिथेच वाढलो असल्याने मी त्यांना लाडाने आई म्हणायचो. त्या सुट्ट्यांमध्ये ही मी त्यांच्याकडे गेलो. मी खूप महिन्यांनी आल्यामुळे मला पाहून त्या खूप खुश झाल्या. त्यांनी त्या दिवशी भेळ करून मला खायला दिली. मी भेळ खात खात बाहेर अंगणात येऊन बसलो. त्या मला म्हणाल्या की तू बस इथे मी जरा एक दोन काम आटोपून येते आणि तुला प्यायला पाणी घेऊन येते. इतके म्हणून त्या आत घरात निघून गेल्या.
मी अंगणात बसून मस्त भेळेचा आस्वाद घेत होतो. खूप महिन्यांनी जुन्या घरी आलो होतो म्हणून प्रसन्न वाटत होते. तितक्यात तिथे एक बाई आली. तिचे नाव रमा बेन. ती आमच्याच परिसरात ली होती कारण मी तिला या आधी बऱ्याच वेळा पाहिले होते. आणि आम्ही जुन्या घरी राहत असताना सुद्धा ती घरी कधी कधी यायची. तिची परिस्थिती हालाखीची असल्याने माझी आई तिला मुलांसाठी कपडे तर कधी वह्या पुस्तके द्यायची. मी तिला बऱ्याच वर्षांनी पाहत होतो. ती माझ्या जवळ येऊन माझ्याशी बोलू लागली. नेहमी सारखा हसरा चेहरा. परिस्थिती बिकट असूनही चेहऱ्यावरून कधीही तसे जाणवायचे नाही. अगदी न विसरता येण्यासारखा चेहरा होता तिचा.
ती माझ्याशी गप्पा मारू लागली. घरचे कसे आहेत विचारपूस करू लागली. आई तिला नेहमी मदत करायची म्हणून आई ची आठवण काढून ती तिचे कौतुक करत होती. तिच्या आई ने वेळोवेळी तिला खूप मदत केली, तुझी आई खूप चांगली व्यक्ती आहे वैगरे. ८-१० मिनिट बोलल्यावर ती चालत एका रस्त्याने पुढे निघून गेली. मला जरा आश्चर्यच वाटले कारण ती ज्या रस्त्याने पुढे चालत गेली तिथे पुढे काहीच नव्हते. म्हणजे झाडी झुडपांचा भाग होता आणि एक १० फूट उंच मोठी भिंत होती. ती त्या रस्त्याने चालत का गेली हाच विचार करत असताना आई आली आणि मला विचारू लागली “काय रे काय झाले.. एकटाच काय बडबडत होतास..” मी तिला पटकन म्हणालो “एकटा नाही ग.. ती रमाबेन आली होती आणि माझ्या शी गप्पा मारत होती”.
हे ऐकल्यावर ती मला पाहतच राहिली. तिला काय वाटले काय माहीत. तिने झटकन माझा हात धरला आणि आत घरात घेऊन गेली. तिने मला पुन्हा विचारले तसे मी तिला सगळे सांगितले. त्यावर ती म्हणाली “हे कसं शक्य आहे.. ती तर मागच्या आठवड्यात च वारली..” तिचे ते एक वाक्य ऐकुन मी अगदी निशब्द झालो होतो.
दुसरा अनुभव मी MBA च्याच दुसऱ्या वर्षाला असताना आला होता. तुम्हाला माहित असेलच की प्रोजेक्ट करावे लागते. त्यामुळे प्रोजेक्ट साठी मी आणि माझे ३ मित्र आम्ही नाशिक ला जायला निघालो होतो. माझ्या सोबत माझे तीन मित्र मंदार, गौरव आणि कार्तिक होते. ट्रॅफिक लागेल म्हणून आम्ही रात्रीचा प्रवास करायचा असे ठरवले होते. रात्री १० ला आम्ही हायवे ला लागलो. मंदार कार ड्राईव्ह करत होता. मी आणि गौरव मागे बसलो होतो तर कार्तिक पुढे मंदार सोबत बसला होता. आता रात्र भर ड्राईव्ह करायचे होते त्यामुळे कोणीही झोपायचे नाही असे ठरवले. त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो.
बऱ्याच वेळा नंतर मंदार आणि गौरव ने कोकणातले भूतांचे किस्से सांगायला सुरुवात केली. आता असा काही विषय निघाला की झोप कशी येणार. अधून मधून मी बाहेर पाहत होतो. त्या रात्री रस्त्यावर रहदारी अगदीच कमी होती. अधून मधून एखादा मालवाहू ट्रक किंवा आमच्या सारखी च कार समोरून पास व्हायची. २-३ तास झाले असतील. तितक्यात रस्त्याच्या मधोमध मला कोणी तरी उभ दिसलं. सुरुवातीला मला वाटले की मला भास होतोय पण नाही. कारण माझे तिन्ही मित्रही एकटक त्या दिशेला पाहत होते. रस्त्याच्या अगदी मधोमध खरंच एक जण उभा होता. आमची कार जस जशी त्याच्या जवळ येऊ लागली तसे तो नीट दिसू लागला.
त्यांचे शरीर डोक्यापासून छातीपर्यंत अक्षरशः चिरले होते. असे वाटत होते की तो एखाद्या अवजड वाहनाखाली येऊन चिरडला गेला य. मी काही बोलणार तितक्यात मंदार म्हणाला “काय करू.. कार चढवू का यावर”. आम्ही पटकन म्हणालो “नको.. असे नको करुस”. त्याने हळूच बाजूने कार काढली. आम्ही चौघेही प्रचंड घाबरलो होतो. आम्ही त्याला क्रॉस केल्या केल्या केल्या मी मागे वळून पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. मंदार वेगात कार चालवत च राहिला. साधारण २-३ किलोमिटर पुढे आल्यावर एका चहाच्या टपरी जवळ थांबलो. चहा च्याच टपरीवर दोघं जण होते. आम्ही चहा पीत च त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. तसे ते दोघे ही एकमेकांकडे पाहत राहिले. ते आम्हाला काहीच बोलले नाहीत. पण त्याच्या चेहऱ्यावरील हावभा वानमुळे आम्हाला कळून चुकले की त्यांना या प्रकाराबद्दल नक्कीच माहीत असावे.
आम्ही जास्त काही न बोलता पुढच्या प्रवासाला लागलो आणि सकाळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो.