अनुभव – अजय कदम

गणपती दर्शनासाठी मी, माझा मोठा तुषार आणि माझा मित्र सुमित आम्ही माझ्या गावी नाशिक ला गेलो होतो. माझा मित्र पहिल्यांदाच माझ्या गावी आला होता. गणेशोत्सव असल्या कारणाने ३ दिवस आम्ही खूप मजा केली. त्या काळी माझे आजोबा एका गार्डन मध्ये वॉचमन चा जॉब करायचे. आम्ही तिघांनी तिथे नाईट आऊट करायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी चिकन वैगरे चा बेत केला होता. नऊ साडे नऊ च्या दरम्यान आम्ही गार्डन मध्ये आलो, जेवण केलं आणि तिथेच एक छोटी रूम आहे त्यात बोलत बसलो. बरीच रात्र झाली होती आणि सगळा परिसर साम सुम झाला होता. माझे आजोबा गार्डन च्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ऑफिस मध्ये जाऊन झोपून गेले. रात्री साधारण दीड वाजे पर्यंत आम्ही बोलत बसलो होतो. इथल्या तिथल्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात बाहेरून कुत्र्याचा भिबत्स रडण्याचा आवाज येऊ लागला.

मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. कारण त्या कुत्र्यांचं रडणं साधं नव्हत. मी त्यांना म्हणालो की आपण आजोबांकडे ऑफिस मध्ये झोपायला जाऊ मला जरा भीती वाटतेय. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो आणि काही मिनिटात ऑफिस मध्ये जाऊन झोपून गेलो. केवळ अर्धा तास झाला असेल मला माझ्या मोठ्या भावाने उठवले आणि काही तरी सांगू लागला. मला आधी कळलेच नाही तो काय सांगतोय. तो म्हणाला “ सुमित बघ.. बाहेर बसून एकटाच रडतोय जोरात.. “ मी तसाच झोपेतून उठलो आणि त्याला पाहायला बाहेर गेलो. तर तो बाहेर एका बाकावर बसून जोर जोरात रडत होता. रात्री २ सव्वा दोन ची वेळ आणि त्याचे असे रडणे पाहून माझ्या अंगावर काटाच आला. तरीही मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारू लागलो की काय झालंय ? पण तो काही बोलतच नव्हता. त्याचे रडणे सुरूच होते. 

मी त्याला आत जाऊ म्हणालो तर तो सांगू लागला की मला घरी जायचंय. आता इतक्या रात्री आम्ही पुन्हा आमच्या घरी कसे निघणार. या वेळेला एकही वाहन मिळणार नव्हते. मी त्याला समजावू लागलो पण तो जणू वेड्यासारखे वागू लागला. वर आकाशात बघून ओरडू लागला आक्रोश करू लागला. त्याच ओरडणं साधं वाटत नव्हत. अचानक तो आमच्या अंगावर धावून आला आणि आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. मी भावाला म्हणालो की याला इथे असे ठेवण बरोबर नाही घरी न्यायला हवं. मी गावातल्या एका मित्राला फोन करून त्याची फोर व्हीलर घेऊन यायला सांगितली. त्यात बसवून मित्राला कसे बसे घरी घेऊन आलो. आल्या आल्या थेट देवघरासमोर नेऊन बसवलं.

त्याचं ओरडणे तर थांबले पण तो रात्र भर तिथे बसून रडत राहिला. आणि मग कधी तरी पहाटे थकून झोपून गेला. सकाळ झाली तरी मी त्याला उठवले नाही. विचार केला की त्याला स्वतःहून जाग आली की मग च बघू. खूप उशिरा उठला तो. मी आणि भावाने थोडा अंदाज घेऊन त्याला विचारले की सगळे ठीक आहे ना..? काल रात्री तुला काय झालं होत..? त्यावर तो म्हणाला “ कुठे काय..? असे काय विचारात आहेत ? “ माझ्या मित्राला काल रात्री घडलेले भयानक प्रसंग अजिबात आठवत नव्हते. त्याच रडणे , ओरडणे , आक्रोश करणे यातले त्याला काहीच आठवत नव्हते. आम्ही ही त्याला जास्त विचारात बसलो नाही आणि तो विषय तिथेच सोडून दिला. त्याला नक्की काय झाले होते, तो असे का वागला या बद्दल आम्हाला आज पर्यंत कळू शकले नाही. पण माझ्या सोबत घडलेला हा सगळ्यात वाईट अनुभव होता. 

Leave a Reply