अनुभव – रोहिणी
मी आणि माझे मित्र, स्नेहा, राघव, संजय, आणि काव्या, आम्ही सर्वांनी ठरवलं होत की, एका विकेंडला एकत्र प्रवास करून एका निसर्गरम्य ठिकाणी जावं. आम्हाला प्रवास खूप आवडायचा, त्यामुळे नवीन ठिकाणं शोधायची सवय होती.. या वेळेस आम्ही एका गावी जाण्याचं ठरवलं होतं, ज्याचं नाव होतं ‘रुद्रवन’. हे गाव जंगलाच्या अगदी जवळ होतं, तिथल्या घनदाट जंगलांमुळे आणि निर्जन रस्त्यांमुळे त्याचं खूप नाव होतं. आम्ही प्रवासासाठी एक गाडी भाड्याने घेतली आणि शनिवारी पहाटे निघालो. सगळं ठीक चाललं होतं, वातावरण छान होतं आणि रस्ता ही चांगला होता. आम्ही गाडीत गाणी ऐकत होतो, हसत-खेळत जात होतो. दिवस खूप छान सुरू झाला होता, पण आम्हाला माहित नव्हतं की, रात्री काय घडणार आहे. गाडीत गाणी लावून प्रवास सुरू झाला. सगळे हसत-खेळत होते, वातावरण खूप आल्हाददायक होतं, आणि आमचा प्रवास अगदी आनंदात सुरू झाला होता. दिवसाचे काही तास उलटले होते, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी थांबत होतो, नवीन गावं पाहत होतो.
अशाच एका लहान गावात आम्ही चहासाठी थांबलो. ते गाव जंगलाच्या कडेला होतं, आणि तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की, त्या जंगलात रात्रीच्या वेळी काही विचित्र गोष्टी घडतात. आम्ही तिथल्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या, पण त्यांना फारसं मनावर घेतलं नाही. एक वृद्ध माणूस आम्हाला सांगत होता की, त्या जंगलात फक्त धड फिरताना दिसत. त्याचं डोकं नाही, आणि ते रात्रीच्या वेळी जंगलात फिरते, आणि प्रवाशांना त्रास देते. आम्हा सगळ्यांना वाटलं की, इतर भाकडं कथापैकी ही फक्त लोकांच्या मनातली भीती आहे. पण त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य मात्र विचित्र होतं. त्याच्या डोळ्यात एक भयानक चमक होती, जणू त्याने स्वतः अनुभवलं असावा. आम्ही तिथून निघण्यापूर्वी तो म्हणाला की, जेव्हा अंधार होतो, तेव्हा जंगलात जाणं टाळा. विशेषतः त्या रस्त्यावरून जाऊ नका जिथं “ते धड फिरत”.
संध्याकाळ झाली, आणि आम्ही अजूनही प्रवासात होतो. हळूहळू अंधार गडद होऊ लागला आणि आम्ही त्या घनदाट जंगलाच्या परिसरात पोहोचलो. आमच्या गाडीचा रस्ता आता जंगलाच्या आतून जात होता. रस्त्यावर दिवेही नव्हते आणि केवळ आमच्या गाडीचे हेडलाईट्स तेवढे दिसत होते. सगळं शांत आणि गूढ होतं. आजूबाजूच्या शांततेमुळे आम्ही सगळेच थोडे गंभीर झालो होतो. थोड्याच वेळात, गाडी चालवताना राघव म्हणाला, “तुम्हाला त्या व्यक्ती ने सांगितलेल्या गोष्टीत कितपत तथ्य वाटते?” त्यावर मी म्हणाले “ त्या गोष्टी मध्ये मला काडी मात्र तथ्य वाटत नाही. पूर्वीच्या काळी चोर, दरोडेखोर जंगलात गाठायचे आणि लूटमार करायचे म्हणून अश्या कथा पसरवल्या जायच्या जेणेकरून लोकं घाबरून रात्री जंगलातुन प्रवास करणार नाहीत..” सगळ्यांनी माझ्या बोलण्याला दुजोरा दिला. अजून ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला तास दीड तास तरी लागणार होता. वेळ पाहिली नव्हती पण अंधार पडून खूप वेळ उलटून गेला होता.
तितक्यात राघव अचानक म्हणाला “तुम्हाला समोर काही दिसतंय का?” आम्ही सगळ्यांनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं कारण आमच्या गप्पा सुरु होत्या, पण त्यानं परत विचारलं, “समोर कोणीतरी आहे… कोणीतरी उभ आहे!”. आता मात्र आम्ही सगळ्यांनीच घाबरून पुढं पाहिलं. खरंच, अंधारात समोर एक आकृती दिसत होती, जी रस्त्याच्या कडेला चालत होती. आम्ही गाडी जवळ नेली, आणि कार हेडलाईट चा प्रकाश पडल्यामुळे ती आकृती स्पष्ट दिसू लागली. तो एक माणूस होता, पण एक गोष्ट विचित्र होती. त्याचं शरीर पूर्ण होतं, पण त्याचं डोकं नव्हतं! होय, त्याचं शिर नव्हतं. सुरुवातीला तर मला कळलेच नाही कि मी नक्की काय पाहतेय. पण अगदी काही वेळा पूर्वी झालेल्या संभाषणामुळे मला गोष्टी पटकन कनेक्ट करता आल्या. कार जसं जशी जवळ जाऊ लागली तस तसे भीती वाढू लागली. अंगावर शहारे येऊ लागले. तो माणूस अंधारात रस्त्याच्या कडेला चालत होता, जणू काही त्याला माहीतच नव्हतं की तो कुठं चालला आहे.
नेहाने थरथणाऱ्या आवाजात म्हटलं, “हे काहीतरी भयानक आहे. गाडी वळवू या!” पण राघव थांबला नाही. त्याला कुतूहल वाटत होतं, त्यानं गाडी अजून पुढं नेली आणि ती आकृती आता स्पष्ट दिसू लागली. त्या माणसाचा पोशाख जुनाट आणि फाटका होता, त्याच्या हातात एखाद्या वस्त्राचं तुकडा होता, आणि त्याच्या पाठीमागून कुजलेल्या मांसाचा वास येत होता. राघव त्याच्या अगदी बाजूने गाडी नेऊ लागला. आम्ही धड धडत्या काळजाने तो भयाण प्रसंग अनुभवत होतो. या क्षणापर्यंत मी एक गोष्ट नोटीस केली नव्हती जी मी आता केली आणि अंगावर सरसरून काटा आला. तो माणूस किंवा ते जे काही होत ते चालत नव्हतं. तर साधारण 1 फूट हवेत तरंगत पुढे सरकत होत. आम्ही विचार करत होतो की आता काय करायचं. तेवढ्यात राघवने अचानक जोरात ब्रेक मारला. आमचं सगळ्यांचं काळीज थरारलं आणि आम्ही राघवकडे रागाने पहिले. पण तो बाजूला नाही तर रस्त्याच्या मधोमध पाहत होता. आम्ही जेव्हा त्या दिशेने पाहिलं, तेव्हा तो शिरविरहित माणूस रस्त्याच्या मधोमध उभा दिसला. फरक फक्त एवढाच होता कि आता तो आमच्या गाडीच्या दिशेनं फिरला होता.
अगदी आमच्या गाडी समोर 2-3 फुटांच्या अंतरावर उभा होता. स्नेहा जोरात ओरडली, “गाडी मागं घे, लवकर!” राघव गाडी सुरु करायचा प्रयत्न करू लागला पण एक्सीलरेट करून सुद्धा गाडी जागची हलत नव्हती. गाडी अचानक बंद पडली होती, आणि आमचं काळीज अक्षरशः धडधडत होतं. ते जे काही होत ते आता आमच्या गाडीच्या दिशेनं तरंगत येऊ लागलं. आम्हाला त्याचं शिर दिसत जरी नसलं तरी त्याच्या शरीराच्या हालचालींवरून त्याचा प्रचंड संताप दिसत होता. तो भयाण प्रसंग पाहून नेहा रडायलाच लागली, आणि आम्ही सर्वजण घाबरलो असलो तरी तिला धीर देऊ लागलो. ते गाडीच्या जवळ आले आणि बोनेट वर जोरात हात मारला. तो आघात इतका जोरात जोरात होता कि बोनेट वर मोठी खोप पडली. त्यानं जणू काही आम्हाला धमकावल्यासारखं वाटलं.
नेहा जोरात किंचाळली, “तो आपल्याला मारायला आला आहे!” आम्ही सगळे घाबरून देवाचा धावा करू लागलो. गाडीतून उतारायची तर अजिबात हिम्मत नव्हती. गाडीच्या आत आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो, आमचं श्वास कोंडत चालला होता. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. इतक्यात, तो माणूस अचानक थांबला, आणि मागे वळला. आणि हळू हळू आमच्या गाडीपासून दूर जात अंधारात दिसेनासा झाला. काही क्षणातच गाडी अचानक सुरू झाली. राघवने काही न बोलता गाडीला वेग दिला, आणि आम्ही तिथून तडक निघालो. कोणाच्याही तोंडातून शब्दही फुटत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त भीती होती, आणि आम्ही सगळेच या भयानक अनुभवाने हादरलो होतो. पण आम्ही फार लांब गेलो नव्हतो, तेवढ्यात गाडीच्या मागे एक जोरात आवाज झाला. जणू काही कोणीतरी मागच्या बाजूने गाडीला धडक दिली होती.”हे काय झालं?” स्नेहा घाबरून म्हणाली.
राघवने गाडी थांबवली, आणि आम्ही सगळेच घाबरलो होतो. नेहा आता जोरात रडायला लागली होती, आणि संजय तिला धीर देत होता. “सगळं ठीक होईल. फक्त शांत राहा,” तो म्हणाला, पण त्याच्या आवाजातही भिती स्पष्ट होती. “आपल्याला बाहेर बघावं लागेल,” मी घाबरत म्हणाले .”बाहेर?” राघव उत्तरला. “तू वेडी आहेस का? बाहेर काहीतरी विचित्र आहे. आपण गाडीतच राहू.” माझं मनही गोंधळलेलं होतं. आम्ही बाहेर जायला हिम्मत करत नव्हतो, पण त्या आवाजाचं कारण समजून घ्यावं लागणार होतं. शेवटी, काहीतरी विचित्र होतं.आम्ही सर्व गाडीत शांत बसलो होतो. माझ्या मनात विचार येत होते, “ते पुन्हा आलं असेल का? त्याचं डोकं शोधत ते आपल्यामागं तर आलं नसेल ना ?” काही मिनिटांनी, धीर एकवटून राघव म्हणाला, “मी बाहेर जाऊन बघतो ” आम्ही सगळे त्याचा हा निर्णय ऐकून आश्चर्यचकित झालो. त्याने ठामपणे गाडीचं दार उघडलं आणि बाहेर आला. त्यानं बाहेरचं निरीक्षण करायला सुरुवात केली.
आम्ही सर्व आत बसलो होतो आणि त्याच्याकडेच पाहत होतो. राघवने गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन पाहिलं. पण, तिथं काहीच नव्हतं. काहीही विचित्र किंवा भयानक दिसत नव्हतं.”इकडे काहीच नाहीये!” राघव ओरडून म्हणाला, आणि त्यानं परत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला.पण अचानक, राघव जोरात किंचाळला! आम्ही सगळे धडपडत खिडकीकडे पाहू लागलो. त्या अंधारात आम्हाला एक विचित्र आकृती दिसू लागली. ती हळूहळू राघवच्या जवळ येत होती. ते जे काही होत ते पून्हा आमच्या मागावर आलं होत. राघव झटकन गाडीत येउन बसला आणि देवाचे नाव घेऊन गाडी सुरु केली. गाडीचं स्टेअरिंग पकडून वेगात घेतली. गाडी आता जंगलाच्या बाहेर जाण्यासाठी धावत होती, पण ते जे काही होत ते अजूनही मागे येत होत. जशी आम्ही जंगलाची हद्द ओलांडली तसे तो अचानक दिसेनासा झाला. जणू काही त्याला तिथून पुढे आम्हाला पाठलाग करण्याची परवानगी नव्हती.
हळूहळू, तो त्या अंधारात विरून गेला. आम्ही थरथरत एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते, आणि आता आम्हाला जाणवलं की जे काही आम्ही अनुभवत होतो, ते अगदी खरं होतं. आम्ही जे ऐकलं होत ती फक्त एक दंतकथा नव्हती. राघवने गाडी हॉटेलकडे वळवली. आम्ही सगळेच गप्प बसलो होतो. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कोणाचंही बोलायचं धाडस होत नव्हतं. त्या रात्री आम्ही जेमतेम झोपू शकलो. प्रत्येकजण आतून हादरलेला होता, आणि कोणालाच त्या घटनेवर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावातल्या काही लोकांशी बोललो. तेव्हा त्यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपूर्वी त्या जंगलात एका माणसाचा भीषण अपघात झाला होता, आणि एस यु वि कार ने त्याला चिरडलं होत.. ज्यात त्याच डोकं शरीरापासून वेगळं झालं होत.
त्याचं डोकं कधीच सापडलं नाही. .ते गावकरी आम्हाला म्हणाले की, तो माणूस अजूनही आपल्या डोक्याच्या शोधात आहे, आणि जो त्याच्या मार्गात येतो, त्याला तो आपल्याबरोबर घेऊन जातो. या गोष्टीने आम्ही अधिकच हादरलो होतो. त्या अनुभवानंतर आम्ही त्या जंगलात पुन्हा कधीच पाऊल ठेवलं नाही. ती रात्र आमच्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती, आणि ती आम्ही कधीच विसरू शकणार नाही. या विषयाबद्दल आम्ही नंतर कधीच बोललो नाही. पण त्या अनुभवाने आम्हाला एक गोष्ट मात्र शिकवली – अज्ञात गोष्टींच्या वाट्याला जाऊ नये, कारण त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.. आणि त्या जीवावर ही बेतू शकतात..