अनुभव – प्रितेश काप

मी मूळचा साताऱ्याचा. पण त्या काळी माझे आजोबा कामा निमित्त मुंबईत आले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. माझ्या वडिलांचे शिक्षण वैगरे ही इथेच झाले. मी ही आता मुंबईत च राहतोय. २०१५ ला माझे लग्न झाले गोष्ट तेव्हाची आहे. लग्नकार्य माझ्या गावी साताऱ्याला पार पडलं. माझ्या आत्त्याने लग्न जमवल होत. माझी बायको सुषमा बारामती ची. तिने एम कॉम पूर्ण केलं. स्वभावाने खूप समजूतदार आणि दिसायला ही अगदी सुंदर. गावी लग्न म्हटलं की खूप धमाल असते. माझे लग्न ही अगदी धूम धडाक्यात पार पडले. लग्न कार्यात कोणतीही अडचण कसलेही विघ्न आले नाही. पण जेव्हा मुंबईत आलो तेव्हा फार विचित्र प्रकार घडू लागला. गावावरून येऊन अवघे काही दिवस झाले होते. माझे आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

रविवार असल्यामुळे मला सुट्टी होती. त्यामुळे संपूर्ण दिवस मी बायको बरोबर घालवायचा अस ठरवल. दुपारच्या एका सिनेमा शो ची तिकीट मी आधीच काढून ठेवली होती. बायकोला सरप्राइज देणार होतो. जेवण झाल्यावर बायकोला सिनेमाचे सांगितले आणि ती खूप खुश झाली. आम्ही तयारी केली आणि बाहेर पडणार तितक्यात दारातच तिला चक्कर आली. आम्ही सोबत च निघत असल्याने मी तिच्या जवळ होतो त्यामुळे खाली पडता पडता तिला पटकन कसे बसे सावरले. तसेच तिला हॉलमधील सोफ्यावर नेऊन झोपवले. आणि दारातून च शेजारच्या काकूंना आवाज दिला. मी जरा घाबरलो होतो कारण ती अगदी ठीक होती आणि चक्कर येण्यासारखे काहीच कारण नव्हते. शेजारचे काका ही सुट्टी असल्यामुळे घरी होते म्हणून ते काका काकू दोघं ही लगेच धावत आले.

काकूंनी सुषमा च्या तोंडावर पाणी शिंपडलं पण तरीही ती शुद्धीवर येत नव्हती. मग काका म्हणाले एक कांदा घेऊन ये , मी किचन मध्ये धावत जाऊन कांदा घेऊन आलो. काकांनी कांदा फोडला व सुषमा च्या नाकावर धरला तरी सुद्धा ती थोडी च शुद्धीवर आली. कांदा इतका उग्र असतो की त्याचा वास दिल्यावर लगेच शुद्ध येते पण तिला अजून पूर्ण शुद्ध आलीच नव्हती. तितक्यात ती तोंडातल्या तोंडात काही तरी बडबडू लागली जे आम्हाला काहीच कळत नव्हत. मला खूप काळजी वाटत होती म्हणून मी काकांना म्हणालो की काका बहुतेक हिला खूप त्रास होतोय आणि ती शुद्धीवर पण येत नाहीये. मी हिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. मी क्षणाचाही विलंब न करता तिला उचलले आणि माझ्या कार ने जवळच्या क्लिनिक मध्ये एक डॉक्टरांकडे नेले. त्यांनी तीला तपासले.

काही वेळाने ती शुद्धीवर आले. मी डॉक्टरांना ना सांगितले की सगळे काही ठीक असताना ही अचानक चक्कर येऊन बेशुद्ध का पडली.? त्यावर ते म्हणाले की बहुतेक तिच्या हवामानात बदल झालाय म्हणून तिला चक्कर आली असेल. मला ही तेच वाटले कारण लग्न कार्यातली धावपळ मग गावावरून इथे शहरात येऊन झालेला हवामान बदल, नवीन घर, माणसे.. त्यामुळे असे झाले असावे असा विचार केला. आम्ही घरी आलो. सिनेमा वैगरे सगळा बेत बाजूलाच राहिला. कारण तिला आराम करणे गरजेचे होते. रात्री जेवण झालं आणि टिव्ही पाहत असताना पुन्हा तिला बसल्या जागेवर चक्कर आली. आणि ती तशीच सोफ्यावर पडली. आता मात्र मी खरंच घाबरलो. पुन्हा शेजारच्या काका काकूंना बोलावले. काकूंनी तीच डोकं आपल्या मांडीवर घेऊन तोंडावर पाणी शिंपडले. तर ती काही तरी पुट पुटू लागली. 

काकांना एव्हाना वेगळा च संशय येऊ लागला होता, ते मला म्हणाले की मी आलो लगेच. ते त्यांच्या घरात गेले आणि काही मिनिटांनी साई बाबांचा अंगारा घेऊन आलास. ओम साई राम म्हणत तिच्या कपाळाला लावला तसे ती अचानक हता पाय झटकू लागली. जणू तिला खूप राग आला होता. मी तिचं अस वागणं पाहून हैराण च झालो. काही कळत ना कळत ती रागात उठली आणि मला मारायला माझ्या अंगावर धावून आले. काका काकूंनी दोघांनीही तिला कस बस सावरलं पण तेवढ्यात ती पुन्हा बेशुद्ध पडली आणि शांत झाली. हा सगळा प्रकार पाहून मला काहीच सुचत नव्हत. काका काकी ला म्हणाले की तू जरा हिच्या जवळच बस. त्यांनी मला खुणावले आणि घराच्या बाहेर यायला सांगितले.

मी ही त्यांच्या सोबत बाहेर गेलो तर ते मला म्हणाले “ हे बघ, हा प्रकार मला काही तरी वेगळाच वाटतोय, कदाचित हे डॉक्टरांकडून होणार नाही.. बहुतेक बाहेरच काही तरी वाटतं आहे. तू काळजी करू नकोस. मला एक व्यक्ती माहीत आहे तो सांगेल काय आहे ते. पण आता रात्री तिला नेण ब्रोबा वाटत नाही.. आजची रात्र जाऊ दे. उदय सकाळीच आपण त्या व्यक्तीकडे जाऊ.” मी काकांना पाहून फक्त होकारार्थी मान हलवली. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला न बोलताच धीर दिला की सगळ ठीक होईल. त्यांचा खूप आधार वाटून गेला. सुषमा पुन्हा शुद्धीवर येऊ लागली तसे कसे बसे २ झोपेच्या गोळ्या तिला दिल्या आणि शांत झोपवले. मी काका काकूंना ही विनंती केली की आजच्या दिवशी आमच्या घरीच झोपा कारण घरी दुसरं कोणी नव्हत. शिवाय काकांनी सांगितल्या पासून थोडी का होईना पण मला सुषमा ची भीती वाटू लागली होती. 


त्या रात्री मी सतत उठून तिला पाहत होतो, काही त्रास होतोय का वैगरे. पण ती खूप शांत पणे झोपली होती. कदाचित झोपेच्या गोळ्यांचा असर होता तो. सकाळ झाली. सुषमा शांत वाटत होती. रात्री सारखे काहीच जाणवले नाही. तिला काहीच न सांगता काकूंनी तयार केलं. आम्ही चौघ ही आमच्या कार ने त्या व्यक्ती कडे जायला निघालो. तिला आम्ही अजिबात जाणवू दिलं नाही की काही झालंय. सांगितले ही नाही की आपण कुठे चाललो आहोत. आम्ही त्या व्यक्तीच्या घरा कडे येऊन पोहोचलो आणि जसे ती गाडीतून खाली उतरली तसे एकदम तिचे हावभाव बदलले. ती खूप चिडली आणि रागात विचारू लागली “ मला नक्की कुठे घेऊन चालला आहात.. ? “ तिला म्हणजे तिच्या शरीरावर ज्या कोणी ताबा मिळवला होता ते जे काही होत त्याला कदाचित चाहूल लागली होती.

काकांनी मला इशारा केला कारण ती पळून जाण्याच्या तयारीत होती. आणि तसेच झाले. ती त्या व्यक्तीच्या घरापासून उलट दिशेने पळू लागली तसे काका ओरडले “ पकड तिला..” मी झटकन तिला पकडलं. काकांनी आणि मी दोघांनीही तिला पकडुन त्या व्यक्तीच्या घरात नेले. तिथे आत गेल्यावर ती अजूनच भयानक आवाजात ओरडू लागली. तिला पकडुन आणण्यात झटापट झाली होती, त्यात तिचे बांधलेले केस ही मोकळे झाले होते. डोळे अगदी लाल भडक झाले होते. आम्हा दोघांनी तिला घट्ट पकडले होते तरीही ती बाहे पळून जाण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी जोर लावत होती. तितक्यात आतून एक साठी ओलांडलेला व्यक्ती आला. त्यांनी तिच्या कपाळावर कसलासा अंगारा लावला आणि म्हणाले “ गप गुमान या रिंगणात येऊन बस.. नाही तर बघ.. “ एवढं ऐकताच ती चालत रिंगणात जाऊन बसली.

मी शांतपणे सर्व प्रकार पाहत होतो. त्या व्यक्ती ने कडुलिंबाच्या झाडांची फांदी घेतली आणि त्या काठी ने तिला जोरात मारलं. आणि प्रश्न केला “ कोण आहेस तू.. हिला का धरलय..” सुषमा त्याच्याकडे फक्त रागाने पाहू लागली पण काहीच बोलत नव्हती. तिच्या आवाजातली घर घर आम्हा सगळ्यांना जाणवत होती. त्या व्यक्ती ने पुन्हा काठी उगारली तसे अचानक तिच्या अंगात जे काही होत ते बोलू लागलं.. “ मारू नका सांगतो.. मी साताऱ्याचा.. बस मधून प्रवास करताना अटॅक आला मला आणि मी त्या सीट वरच जीव सोडला. माझ्या इच्छा अजुन अपूर्ण आहेत म्हणून मी त्या बस मध्येच भटकत होतो. त्या दिवशी रात्री ही बस मध्ये आली, मोगऱ्याचा गजरा घातला होता हिने.. त्या वासाने मी आकर्षित झालो आणि धरलं हिला..” आम्ही हे सगळे ऐकून सुन्न झालो होतो. त्या व्यक्ती ने पुन्हा प्रश्न केला.. “ हिला सोड, तुला काय पाहिजे ते सांग..”

तसे सुषमा एकदम जोरात ओरडली “ ही आता माझी आहे.. माझ प्रेम जडल आहे हिच्यावर.. मी नाय सोडणार हिला.. “ असे बोलणे ऐकून तो व्यक्ती प्रचंड चिडला आणि त्याने एका डब्यात हात घालून एक बाहुली बाहेर काढली. त्यावर काही मंत्र पुटपुटत अंगारा लावला आणि म्हणाला “ तू आत्ताच्या आत्ता सोड तिला आणि या बाहुली त जा.. नाही तर खूप पिडेन.. “ तरीही ते जे कोणी होत ते ऐकत नव्हत. बऱ्याच वेळा नंतर त्याने एक इच्छा सांगितली की त्याला सिगारेट पाहिजे. त्या व्यक्ती ने त्याच्या सहकाऱ्याला एक सिगारेट आणायला सांगितली. ती आणल्यावर पेटवून सुषमाच्या हातात दिली. तिने घरातील सर्वांकडे रागाने पाहत ती संपूर्ण सिगारेट ओढून संपवून टाकली. 

एखाद्या नवख्याने जर सिगारेट ओढली तर खूप जोरात खोकला येतो पण तिच्या बाबतीत असे काहीच झाले नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच आ वासून घडतं असलेला प्रकार धड धडत्या काळजाने पाहत होतो. या प्रकारानंतर ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्या व्यक्ती ने तिच्या हातात एक ताविज बांधलं आणि माझ्याकडे एक अंगारा असलेली पुडी दिली. रोज सकाळी न चुकता हिला लावायची असे सांगितले. साधारण 15 ते 20 मिनिटा नंतर ती शुद्धीवर आली. आणि अनोळखी घरात त्या व्यक्ती ला पाहून घाबरली. उठून धावत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली “आपण इथे कसे आलो..” मोकळे केस आणि स्वतःचा अवतार लक्षात येताच  ती रडू लागली.

पण काकूंनी तिला शांत केलं आणि बाहेर घेऊन गेली. मग मी काकांना विचारलं की यांना किती पैसे द्यावे लागतील त्यावर तो व्यक्ती म्हणाला “ पैसे.. मी भोंदू बाबा असतात त्यातला वाटलो की काय.. मी पैसे घेत नाही.. तिची काळजी घे..” मी त्यांची माफी मागितली आणि पाया पडलो. तिथून थेट घरी निघून आलो. त्या बाहुलीच त्या व्यक्तीने काय केलं ते माहित नाही पण त्या नंतर आजपर्यंत सुषमा ला कधीच काही जाणवलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात अश्या भुताटकी चा प्रकार पहिला नव्हता. पण जेव्हा कधी सुषमा केस मोकळे ठेवते तेंव्हा मला त्याच प्रसंगाची आठवण येते.

Leave a Reply