त्या दिवशी माझा मित्र आकाश मला खूप दिवसांनी भेटला होता. खर तर आमच्याच इथे राहत असल्याने त्याची नेहमी भेट व्हायची, जुजबी बोलणं व्हायचं. पण या वेळी तो खूप दिवसांनी मला भेटला होता. म्हणून मी त्याची विचारपूस केली की इतके दिवस कुठे होतास, बाहेर गावी गेला होतास का.? त्यावर तो मला म्हणाला की गेला जवळपास १ महिना मी आजारी होतो आणि आता कुठे तब्येतीत सुधारणा होतेय. मला त्याच बोलणं ऐकून आश्चर्य वाटल कारण महिनाभर आजारी म्हणजे नक्की काही तरी जास्त झाले असणार. मी त्याला विचारू लागले की नक्की काय झालय सांगशील का.? सुरुवातीला त्याने सांगायला टाळाटाळ केली पण मी सतत विचारत होते म्हणून तो सांगू लागला. जसं जसे तो घडलेला प्रसंग सांगू लागला तसे माझ्या मनात भीती घर करू लागली. जे घडलं ते कदाचित तुलाच काय पण कोणालाच पटणार नाही.
अगदी कल्पना शक्ती पलीकडचं. महिन्या भरा पूर्वी काही कामा निमित्त गावी गेलो होतो. येताना बराच उशीर झाला. बाईक होती त्यामुळे यायला वाहन मिळेल की नाही याची चिंता नव्हती. आणि त्यामुळेच निवांत परतीच्या मार्गाला लागलो होतो. येताना जंगल पट्टीचा परिसर लागला. माझी बाईक सुसाट वेगात होती. कारण रात्र बरीच झाल्यामुळे रस्ता एकदम सामसूम होता. स्ट्रीट लाईट होते पण तरीही गर्द झाडांचा परिसर असल्यामुळे गडद अंधार जाणवत होता. तितक्यात वाटेत रस्त्याकडे ला कोणी तरी उभ असल्याचं जाणवलं. सुरुवातीला कळत नव्हत की नक्की कोण आहे. पण जस जशी बाईक जवळ येऊ लागली तसे नजरेस पडले की एक म्हातारी बाई उभी आहे. सत्तरी ओलांडली असेल. एकाकी वाटत होती. कदाचित कोणाची मदत मिळेल या आशेने तिथे थांबली होती.
पाहून मला तिची खूप दया आली आणि मी तिची मदत करायचे ठरवले. मी बाईक तिच्या जवळ नेऊन थांबवली आणि तिला विचारले “ तुम्हाला कुठे जायचं आहे ? मी सोडतो तुम्हाला..” त्यावर तिने हायवे जवळ नेऊन सोडायला सांगितलं. मी ही त्याच रस्त्याने पुढे जाणार होतो त्यामुळे त्यांना बोललो “ मी सोडतो तुम्हाला बसा..” तसे जेमतेम ती बाई माझ्या पाठीमागे बसली. खूप साधी वाटत होती. कदाचित रात्री निघाल्यावर वाहन मिळाले नसेल म्हणून किती वेळा पासून मदतीसाठी उभी होती काय माहित. मी बाईक स्टार्ट केली आणि निघालो. ती बाई अगदी शांत होती. कदाचित तिला संवाद कसा साधावा हे कळत नसावं. म्हणून मी प्रयत्न करून पाहिला. “ एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघाला होता..? रस्ता बरोबर नाही.. इथे भुतांचा वावर आहे.. वाहन मिळाले नाही तर असे चालत निघू नका. आज मी लिफ्ट दिली तुम्हाला पण पुन्हा अशी लिफ्ट मिळेल च अस नाही..”
माझे बोलणे ऐकून तिने न ऐकल्या सारखे केलं. आणि शांत बसून राहिली. मग मी ही गप्प राहून बाईक चालवत राहिलो. साधारण अर्ध्या तासानंतर हायवेला पोहोचलो. तसे गाडी थोडी अलीकडे एका झाडाखाली थांबवली आणि म्हणालो “ पोहोचलो आपण..” इतकं म्हणत मागे वळलो आणि माझ्या नजरेसमोर ती बाई नाहीशी झाली. मी घाबरून धडपडत उभ्या बाईक वरून खाली पडलो. काळीज भीती ने जोर जोरात धड धडत होत. काही सुचत नव्हत की मी काय पाहिलं. प्रचंड घाबरलो होतो, बाईक तशीच टाकून धावत सुटलो. हायवे वरून अवजड वाहनांच्या गाड्या सुसाट वेगात जात होत्या. त्यांना मी हातवारे करून लिफ्ट मागू लागलो. एका भल्या माणसाने ट्रक चा वेग कमी करून थांबवला आणि मला लिफ्ट दिली. त्यामुळे मी कसा बसा घरी येऊन पोहोचलो.
घडलेला प्रकार खूप विचित्र आणि कल्पना विश्वाच्या पलिकडला होता. मी ज्यांना कोणाला हा प्रसंग सांगतो त्यांना विश्वास बसत नाही पण मला माहितीये माझ्या सोबत काय घडल. माझ्या मित्राचे असे बोलणे ऐकून मी मात्र सुन्न झाले होते. त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून त्यावर कितपत विश्वास ठेवावा हेच उमगत नव्हत. त्या दिवशी मी तशीच खिन्न मनाने घरी परतले होते.