अनुभव – मयूर बाराठे
माझं नाव मयूर बराठे आहे. मी पुण्यात राहतो. ही गोष्ट साधारणपणे दोन महिन्यांपूर्वीची आहे. मी नेहमीप्रमाणे क्लासवरून रात्री १० वाजता घरी परतत होतो. मित्रांसोबत बोलत-बोलत चालत होतो तेवढ्यात मला आठवलं की, क्लासला जाण्यापूर्वी आईने सांगितलं होतं की, लवकर घरी ये, आपल्याला बाहेर गावाला जायचं आहे. त्यामुळे मी वेळ न घालवता ताबडतोब निघालो. मी मित्रांसोबत अर्ध्या रस्त्यावर आलो असतानाच आईचा फोन आला. ती म्हणाली, “लवकर ये, बाळा..” आणि इतके बोलून ती रडूच लागली. मी विचारलं, “हो आई, माहिती आहे, आपल्याला बाहेर गावी जायचं आहे. पण काय झालं?” आई रडवेल्या आवाजात म्हणाली, “बाळा… तुझे आजोबा गेले.” हे ऐकून मला मोठा धक्का बसला. माझे आजोबा फार फिट होते. ते एअरफोर्समध्ये काम करत होते आणि त्यांच्या तरुणपणी ते पैलवान होते. आता ते ९० वर्षांचे झाले होते, पण तरी त्यांना काहीच त्रास नव्हता.
ते एकदम तंदुरुस्त होते. पण, आईने सांगितलं की हृदयविकाराच्या झटक्याने ते गेलेत. माझ्या मित्रांनी विचारलं, “काय झालं मयूर?” मी त्यांना सांगितलं, तर त्यांनाही खूप वाईट वाटलं. ते मला घरी सोडायला आले आणि माझ्या घरच्यांची विचारपूस केली. तेव्हा रात्री खूप उशीर झाला होता, म्हणून काका आणि पप्पांनी ठरवलं की उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करू. कारण आजोबा रात्री ९:३० वाजता गेले होते. त्यामुळे आज रात्री त्यांचे शरीर रुग्णालयात शवगृहात ठेवण्यात आले. आम्ही त्या रात्री काहीच खाल्लं नाही आणि झोपही लागली नाही. रात्री तीन वाजता मला आजोबांच्या जुन्या आठवणी आठवत होत्या.
झोप लागत नसल्यामुळे मी पाणी पिण्यासाठी उठलो. आमचं घर २BHK आहे, एक मजल्यावर, आणि लोखंडी जिना हॉलशी जोडलेला आहे. पाणी पित असतानाच मला अचानक जोरात पावलांचा आवाज आला. कोणीतरी जिन्यावरून खाली-वर चालल्याचा आवाज येत होता. मी आधी दुर्लक्ष केलं, पण तो आवाज पाच मिनिटं सतत येत राहिला. आता मला काळजी वाटू लागली, म्हणून मी दरवाजा उघडला. बाहेर खूप अंधार होता, म्हणून मी टॉर्च लावली. पण तिथे कोणीच नव्हतं. मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो.. पण पुन्हा तोच आवाज आला. आता मला खरंच भीती वाटू लागली होती. मी पुन्हा दरवाजा उघडला, आणि बाहेर पाहिलं. हळूहळू माझं काळीज जोरात धडधडू लागलं.
कारण त्या अंधारात कोणी तरी उभ होत. त्या अंधारात मला चमकणारे डोळे तेवढेच काय ते दिसले. ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मला काहीच कळेना काय करावं. मी गारठून तिथेच उभा राहिलो. पुन्हा जिन्यावरून चालण्याचा आवाज आला. मी घाबरून घरात पळालो आणि दरवाजा लावून घेतला. देवाचं नाव घेतलं, आणि हळूहळू आवाज थांबला. मग कशीबशी मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी आजोबांचे अंतिम संस्कार आणि सगळे विधी झाले. त्या दिवसानंतर मात्र तो आवाज कधीच पुन्हा आला नाही. त्या रात्री नेमकं काय झालं होतं, हे मला अजूनही कळलेलं नाही. मी खरंच काही पाहिलं होतं का, की फक्त माझ्या मनाचा खेळ होता, हे अजूनही मला न उलगडलेलं कोडच आहे..