हा प्रसंग मी शाळेत असताना चा आहे. परीक्षेचा शेवटचा दिवस होता. वेळ संपल्याची शेवटची घंटा झाली तसे मी पेपर देऊन बाहेर आलो. माझी शाळा ३ मजल्यांची होती. आणि माझा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. त्या दिवशी माझे वडील मला घ्यायला येणार होते त्यामुळे मी खाली त्यांची वाट बघत थांबलो होतो. पण खूप वेळ झाला तरी ते आले नव्हते म्हणून मी वेळ बघायला हातावरच्या घडाळ्यात पाहिले तेव्हा जाणवले की आपण वर्गातच घड्याळ विसरून आलो आहोत.

संध्याकाळ झाली होती आणि शाळेतल्या सगळ्या मुलांची परीक्षा संपल्यामुळे शाळेत ही कोणी नव्हते. मी शाळेतल्या शिपाई काकांना म्हणालो की माझे घड्याळ वर्गातच राहिले आहे मी पटकन जाऊन घेऊन येऊ का ?. तसे ते म्हणाले की तू कशाला जातोस तू इथे थांब मीच आणतो. पण मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जाऊन शोधावे लागेल त्या पेक्षा मीच जातो आणयला म्हणत मी पटापट जिने चढायला सुरुवात केली. 

पण पुढची ५ मिनिट माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ ठरणार होती आणि याची पुसटशी ही कल्पना मला नव्हती. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर मला कसलीशी चाहूल जाणवली पण मी त्याकडे दुर्लक्ष करत वर जात राहिलो. तिसऱ्या मजल्यावर च्या माझ्या वर्गात जाऊन मी घड्याळ घेतले आणि जसा वर्गाच्या बाहेर पडलो तसे मला अगदी हळू आवाजात हाक ऐकू आली. मी त्या मजल्याच्या वरह्यांड्यात उभा होऊन त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. माझ्या वर्गापासून काही अंतरावर एक बाई उभी होती.

मी तिच्या दिशेने काही पावले चालत गेलो आणि नीट पाहिल्यावर तिची ओळख पटली. त्या आमच्या शिक्षिका होत्या. आम्हाला शिकवायला किशोरी नावाच्या एक शिक्षिका होत्या आणि २ वर्षांपूर्वी शाळेतच हृदय विकाराचा तीव्र झटक्याने त्या मरण पावल्या होत्या. त्यांना तिथे पाहून माझे हात पाय च गळाले. त्या माझ्याकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मी त्यांच्याकडे पाठ करून सरळ तिथून धावत सुटलो. पण जिन्यावरून खाली उतरताना त्या मला प्रत्येक मजल्यावर दिसत होत्या. आणि मला खुणावून त्यांच्या जवळ बोलवत होत्या. 

खाली पोहोचे पर्यंत मला रडू कोसळले होते. खाली शिपाई काकांनी मला विचारले की रडायला काय झाले आणि इतका वेळ कुठे होतास ? त्यांना मी काहीच सांगितले नाही. तोपर्यंत माझे वडील ही माझी वाट पाहत थांबले होते. त्यांना पाहून जीवात जीव आला. मी वडिलांना ही काहीही बोललो नाही पण जाताना पुन्हा एकदा शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर नजर गेली. त्या तिथेच होत्या मला जाताना एक टक पाहत. माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. झटकन नजर वळवली आणि गप्प बसून राहिलो. 

दुसऱ्या दिवशी मोठ्या भावाला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की तुला भास झाला असेल. पण मला माहित होते की तो माझा भास नव्हता. ज्या अर्थी त्यांना काही सांगायचे असावे असे मला वाटले त्या अर्थी त्यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही. हा प्रसंग किती ही जुना असला तरी मात्र माझ्या आठवणीत अगदी तसाच शाबूत आहे आणि आज ही तो प्रसंग आठवला की मन अगदी कासावीस होत. आज ही वाटतं राहत की त्यांना नक्की मला काय सांगायचे होते ?

Leave a Reply