मी मुंबईतील एका मोठ्या कंपनीत काम करतोय.. माझं मूळ गाव साताऱ्याजवळ आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो, कारण तिथे माझ्या आजोबांची तब्येत खूपच बिघडली होती. मुंबईहून साताऱ्याला जाण्यासाठी रात्रीची बस पकडावी लागली कारण मला पूर्ण दिवस काम करून मग निघाव लागलं. रात्रीचे 10 वाजले होते. त्या दिवशी बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. काही प्रवासी बसची वाट पाहत होते. मी तिकीट काढलं आणि बस येण्याची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळानंतर, माझी बस आली आणि मी बसमध्ये चढलो. बसमध्ये ही फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे मला आरामात बसायला जागा मिळाली. माझ्या जवळच्या सीटवर एक वृद्ध माणूस बसला होता, त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसत होती.
मी त्यांची विचारपूस करायला जाणार होतो पण का कोण जाणे मी काही बोललो नाही. मी खिडकीतून बाहेर बघत प्रवासाचा आनंद घेत होतो. रात्रभर प्रवास करायचा असल्यामुळे मी कानात हेडफोन्स लावले आणि गाणी ऐकायला सुरुवात केली. प्रवास सुरळीत चालला होता, पण काही वेळानंतर बसचा रस्ता बदलला आणि ती एका दुर्गम रस्त्यावरून जाऊ लागली. त्यात बाहेरच्या गडद अंधाराने वातावरणात एक विचित्र शांतता जाणवू लागली होती. आवाज होता तो फक्त बसच्या इंजिनचा.
बस अंधारात एका निर्जन रस्त्यावरून जात होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त अंधार आणि भाली मोठी उंच झाडं दिसत होती. तेवढ्यात अचानक बस थांबली. काही कळायच्या आत ड्रायव्हरने प्रवाशांना सांगितलं, “थोडा वेळ थांबा, बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय. मी पाहतो काय झालंय.”. माझ्या सोबत इतर प्रवासी ही अस्वस्थ झाले. प्रवास सुरू होऊन तास उलटून गेला होता म्हणून पाय मोकळे करायला मी बसमधून खाली उतरलो.
पाहिलं की तिथे एकही घर किंवा दुकान नाही. फक्त अंधार आणि जंगल होतं. परत बसमध्ये जाऊन मी माझ्या सीटवर बसलो. ड्रायव्हर अजूनही ने बिघाड दुरुस्त करायला सुरुवात केली. तितक्यात अचानक, बसमध्ये एक अनोळखी प्रवासी चढला. अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो येऊन मागच्या सीटवर बसला. मी त्याच्याकडे थोडा वेळ पाहिलं आणि परत माझ्या जागेवर बसलो. थोड्याच वेळात बस दुरुस्त झाली आणि परत प्रवासाला लागली.
प्रवास पुढे चालू असताना, माझं लक्ष त्या अनोळखी प्रवाशाच्या विचित्र हालचालींवर गेलं. तो सतत आपल्या सीटवर वेगळ्याच अंदाजात हलत होता आणि काहीतरी बोलत होता, पण त्याचा आवाज अस्पष्ट होता. आधी वाटलं की तो दारू वैगरे प्यायला असेल पण का कोण जाणे त्याचे वागणे मला खूप अस्वस्थ करू लागले. तितक्यात अचानक जोरात ब्रेक चा आवाज आला आणि बस जोरात झटका देऊन थांबली.
ड्रायव्हरने बस थांबवून खाली उतरून पाहिलं, आणि परत येऊन म्हणाला, “बहुतेक बस चे पुढचे टायर पंक्चर होऊन फटलय.. बदलावे लागेल.. आणि वेळ लागेल.. “ त्याचे बोलणे ऐकून सर्वच प्रवासी कंटाळून गेले. गेल्या २-३ तासात हे दुसऱ्यांदा थांबावं लागतं होत. मी सहज खिडकीतून बाहेरचा परिसर न्याहाळत होतो. तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला आणि मी एकदम दचकलो. प्रवासात मध्येच चढलेल्या प्रवासी होता तो. चेहऱ्यावर विचित्र हसू होत आणि डोळे ही लालसर वाटत होते जणू तो काही दिवस नीट झोपला नसावा. त्याने माझ्या जवळ येत अगदी हळू आवाजात सांगितलं, “हे ठिकाण सुरक्षित नाही. आपण इथे थांबायला नको..” मी आधीच जरा अस्वस्थ होतो म्हणून त्याचं म्हणणं गंभीरपणे घेतलं.
मला त्याच्या सांगण्यातली भीती खरी वाटत होती. तेवढ्यात ड्रायव्हरने टायर बदलून बस परत सुरू केली आणि आम्ही पुढे निघालो. पण वातावरण अजूनही तणावग्रस्त होतं. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो तसे मला रस्त्याच्या कडेला एक उंच सावली दिसली आणि अंगावर भीतीने शहारे उमटून गेले.. मी त्या प्रवाश्याकडे पाहिले तर तो माझ्या कडे पाहून इशारा करू लागला की बाहेर पाहू नकोस.. कधी एकदा तिकडून दूर जातोय असे झाले होते पण माझ्या नशिबात काही वेगळच लिहून ठेवलं होतो. तिसऱ्यांदा बस झटके देत बंद पडली. ड्रायव्हरने उतरून बस बाहेरून पाहिली आणि आमच्याकडे येऊन सांगितलं की “मोठा बिघाड दिसतोय.. दोन अडीच तास लागतील किंवा मला डेपो मध्ये फोन करून मदत मगवावी लागेल.” सगळे जण नाराज झाले पण काही करू शकत नव्हते.
तितक्यात तो वाटेत चढलेला प्रवासी माझ्या बाजूला येऊन बसला आणि तेच वाक्य पुन्हा म्हणाला “हे ठिकाण सुरक्षित नाही. आपण इथे थांबायला नको..” तसे या वेळेस मी त्याला विचारले “ तुम्हाला अस का वाटतं..?”
त्यावर तो म्हणाला, “मी इथे आधी एकदा आलो होतो. इथे अनेक विचित्र गोष्टी घडतात. इथल्या भागात अतृप्त आत्म्याचा वास आहे.. तुम्ही म्हणत असाल तर इथून अर्ध्या किलोमिटर वर एक गाव आहे, तिथे जाऊ शकतो आपण. पण आतल्या वाटेने जावे लागेल.. “ त्याच्या बोलण्याने माझ्या मनात अजून भीती पसरली आणि मी त्याचं म्हणणं मान्य केलं. तसे ही २ अडीच तास थांबावे लागणार होते आणि या अश्या भयानक जागेत थांबण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. आम्ही दोघंही बसमधून खाली उतरलो. बसमधून उतरल्यानंतर आम्ही अंधारात काही अंतर चालत गेलो. तेव्हा तो अनोळखी प्रवासी मला सांगू लागला, “हे जंगल शापित आहे. इथे अनेक वर्षांपूर्वी एक भयंकर घटना घडली होती. इथल्या लोकांनी इथे आलेल्या प्रवाशांना लुटून, मारून टाकलं होतं. त्यांच्या आत्म्यांना अजूनही शांती लाभलेली नाही.” आता मात्र मी संभ्रमात पडलो की इथे येण्याचा निर्णय योग्य होता की नाही.
तितक्यात आम्हाला समोर एका पडक्या घरातून किंचित सा उजेड येताना दिसला. आम्ही त्या घराच्या दिशेने चालत गेलो. घराला दार असून नसल्यासारखे. मी हाक दिली “ कोणी आहे का घरात..? “ तसे एक वृद्ध व्यक्ती बाहेर आला. मी त्याला पाहून आश्चर्य चकित झालो कारण त्याला कुठे तरी पहिल्या सारखे वाटत होते पण आठवत नव्हते. त्याने आम्हाला घरात यायला सांगितले. आत जेमतेम २ रॉकेल चे दिवे होते ज्यामुळे थोडा उजेड वाटत होता. त्या वृद्धाने आमची विचारपूस केली तसे आम्ही त्याला सगळे सांगितले. त्यावर तो एकच वाक्य म्हणाला जे ऐकून माझा पायाखालची जमीनच सरकली.. तो म्हणाला “इथे रात्री येणारे लोक कधीच परत जात नाहीत. इथे अतृप्त आत्म्यांच वास्तव्य आहे.”
त्याने आम्हाला एक रॉकेल चा दिवा दिला आणि म्हणाला “ह्या दिव्याचा प्रकाश तुम्हाला वाचवू शकतो..” मला काही कळले नाही. कारण जे घडतं होत ते खूपच विचित्र होत. अगदी एखाद्या चित्रपटासारखे.. पण या सगळ्यात भीती सतत वाढत चालली होती. आम्ही दिवा घेतला आणि घरातून बाहेर पडलो. जंगलातल्या रस्त्यावर दिव्याच्या प्रकाशात चालत होतो. अचानक त्या अनोळखी प्रवाशाने मला सांगितलं, “तुला माहित आहे का? तो वृद्ध व्यक्ती आपल्याला फसवत होता. हा दिवा आपल्याला इथल्या आत्म्यांपासून वाचवणार नाही, तर त्यांना आकर्षित करणार आहे.” आता मात्र मी भीती ने थरथरू लागलो. तो असे बोलताच समोरून अंधारात काही तरी हलल्याच जाणवलं आणि माझी पावले जागीच थिजली. मानव सदृश्य आकृत्या माझा दिशेने पुढे सरकू लागला. माझ्या हृदयाची धड धड प्रचंड वाढू लागली होती. तसे आम्ही दोघांनीही पाळायला सुरुवात केली.
आम्ही पळत होतो, पण ती आकृत्या आमच्या मागे येत होत्या. मला वाटलं की आता आपला शेवट जवळ आला आहे. तेवढ्यात वस्तीचा परिसर दिसू लागला तसे जीवात जीव आला. तिथे एका झाडाजवळ एक बाईक उभी दिसली. मी कसलाही विचार न करता हॅण्डल खालची वायर काढून ती बाईक सुरू केली कारण मला ते माहीत होत. आणि आम्ही एकदाचे वस्तीच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. जसे मी खाली उतरलो तेव्हा माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. जो वृध्द माणूस पडक्या घरात दिसला होता तोच माझ्या बाजूला बस मध्ये बसला होता..