अनुभव – रवींद्र दिवटे
मी कधी रात्रीचा प्रवास नव्हता केला पण त्या दिवशी मी बस चा प्रवास करणार होतो. रात्रीचे 9 वाजले होते, मी ज्या बसची वाट पाहत होतो ती बस जरा लेट झाली होती. म्हणून मी बस स्टॉपवर फेरफटका मारायला लागलो होतो. मी एकटा होतो म्हणून मला बस स्टॉपवर बोर झाल्यासारखं वाटतं होतं.
समोरच्या बाजूला एक पानटपरी होती, मी त्या पानटपरी जवळ गेलो आणि त्या पानटपरीवाल्याला विचारले, “अहो मामा, बारामतीला जायची बस कधी येणार आहे? 9 वाजता येणार होती, ती बस अजून आली नाही…? तुम्हाला काही माहिती आहे का?”
त्या वर तो पानटपरीवाला म्हणाला, “अरे पोरा, तुला माहित नाही का? बारामतीला जाणारी बस 8 वाजता निघून गेली आहे. तिचा टायमिंग ९ नाही ८ आहे.”
मी विचार केला, आता काय करायचं? मी पाच मिनिटं विचार करत होतो तेवढ्यात माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की इथून 8 ते 9 किलोमीटरवर एक वस्ती आहे. मी जर त्या वस्तीत गेलो तर मला सकाळी बारामतीला जायला कुठली तरी गाडी मिळेल.
म्हणून मागे वळून परत त्या पानटपरीजवळ गेलो आणि त्या माणसाला विचारले, “ओ मामा, गव्हाणे वस्तीस जायला कुठला रस्ता आहे? मी याआधी आलो होतो पण दिवसा आलो होतो. त्यामुळे आता रात्री रस्ता शोधायला जमणार नाही. गव्हाणे वस्तीस कुठल्या मार्गावरून जायचं आहे माहितीये का तुम्हाला..?
तेव्हा तो पानटपरीवाला म्हणाला, “पोरा, तू आज नको जाऊ. वाटल्यास तू आज इथेच झोप आणि सकाळी बस आली की तू बसमध्ये बसून जा बारामतीला. पण तू आज त्या त्या मार्गाने नको जाऊ.”
मी विचारलं, “असं काय आहे त्या मार्गावर.. तुम्ही एकदम जाऊ नका असं म्हणत आहात..”
तेव्हा तो पानटपरीवाला म्हणाला, “त्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. कितीतरी लोक त्या अपघातात मरण पावले आहेत. आणि आज जाऊ नकोस हे सांगतोय कारण अमावास्या आहे.”
मी जरा
त्यावर मी त्याला म्हणालो, “काय होतं नाही? माझा असल्या गोष्टीवर विश्वास नाही. तुम्हाला रस्ता माहीत असेल तर सांगा.. आणि जर भूतं माझ्या समोर आली तर मी माझं बघून घेईन.”
तो पानटपरीवाला माझ्याकडे पाहत म्हणाला “बरं, तू जायचं ठरवलं आहे तर सांगतो. तुला ह्याच रोडवरून जायचं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही रोडवरून जाऊ नको नाहीतर चकवा लागेल.”
मी म्हणालो, “बरं मामा, धन्यवाद..”
त्याचा निरोप घेऊन त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. रस्त्याकडे च्या स्ट्रीट लाईट मधील अंतर इतके जास्त होते की एक स्ट्रीट लाईट पासून चालायला सुरुवात केल्यावर मध्ये गडद अंधार जाणवायचा कारण पुढचा स्ट्रीट लाईट खूप लांब असायचा. काही अंतर चालल्या नंतर मला एक पाटी दिसली, त्यावर लिहिलं होतं, “गव्हाणे वस्ती 4 किलोमीटर ” मी दुसरीकडे बघितलं तर रोडच्या डाव्या बाजूला पण एक पाटी होती, त्यावर लिहिलं होतं, “गव्हाणे वस्ती 9 किलोमीटर.” मी विचारात पडलो. एकच ठिकाणी दोन पाट्यांवर इतकी तफावत कशी काय असू शकते. मला कळत नव्हतं की कुठल्या दिशेने जाऊ. तितक्यात मला जाणवले की जवळच्या झुडुपातून कोणी तरी मला लपून पाहतंय.
अंगावर सरकन काटा येऊन गेला. मी क्षणाचाही विलंब न करता ज्या बाजूला गव्हाणे ४ किलोमिटर ची पाटी लावली होती त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. रस्ता अगदीच सामसूम आणि निर्मनुष्य. तिथली शांतता ही भयाण वाटत होती. माझ्या पावलांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. मी बराच वेळ त्या रोडवर चालत राहिलो आणि साधारण तासाभराने मी एका जागी येऊन पोहोचलो. जिथे तीच पाटी होती “गव्हाणे ४ किलोमिटर..” मला कळायला वेळ लागला नाही की मी एका चकव्यात अडकलो आहे. त्या टपरी वाल्या चे वाक्य आठवले “तुला ह्याच रोडवरून जायचं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही रोडवरून जाऊ नको नाहीतर चकवा लागेल..”
तितक्यात अचानक माझ्या मागून आवाज येऊ लागला. माहीत नाही कसला आवाज होता तो. पण खूप च भयानक आणि कोणाही एकट्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करण्या साठी पुरेसा होता. आता मात्र मी मागे लक्ष न देता समोर बघून चालू लागलो. मनात नको नको ते विचार येऊ लागले. काय असेल मागे.. कोणी अनोळखी व्यक्ती की एखादी अमानवीय शक्ती.. हा विचार करत असताना तो आवाज प्रत्येक क्षणाला माझ्या जवळ येऊ लागला. माझी पावले जड वाटू लागली. एके क्षणी वाटले की माझा पाय पकडून ते मला फरफटत ओढत घेऊन जाईल आणि मारून टाकेल.. मला माझ्यावर च राग येत होता की मी त्या पान टपरीवाल्याचे ऐकले असते तर बरे झाले असते. तेवढ्यात मला एका वाहनाचा आवाज येऊ लागला.
एक वाहन माझ्या दिशेने येत होते. मला बघून हायसे वाटले कारण मला मदत मिळणार होती. पण त्या वाहनाचा वेग खूप होता आणि जरी माझ्या दिशेने ते वाहन येत असले तरीही वेग कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. मी रस्त्याच्या कडेला उभा राहिलो आणि मोबाईल काढून वेळ पाहिली. तितक्यात जोरात आवाज झाला. त्या अवघ्या सेकंदात ते वाहन समोरच्या झाडाला जाऊन जोरात आदळले होते. मी घाबरून रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पाहिले आणि पुन्हा एकदा त्या अपघात झालेल्या दिशेला पाहिले. तर ना तिथे ते झाड होते ना ते वाहन.. आता मात्र माझ डोकं सुन्न व्हायची पाळी आली होती. मी त्या भागापासून उलट दिशेला पळू लागलो. खूप धाप लागत होती कारण मी प्रचंड घाबरलो होतो. पण धावून मी जणू कुठे पोहोचतच नव्हतो. शे
वटी दमून मी त्या रस्त्याच्या एका कडेला दगडावर बसलो. तितक्यात मला पुन्हा गाडीचा आवाज येऊ लागला. समोर एक गाडी पुन्हा माझ्या दिशेने येत होती. मी पटकन तिथून उठून एका झाडाच्या मागे जाऊन लपलो. मी नीट लक्ष देऊन पाहू लागलो तर तो एक दुधाचा कंटेनर होता. हे बघून माझ्या जीवात जीव आला. मी पळत रोडच्या कडेला थांबलो आणि त्या ट्रकला हात करून थांबवले. तो ट्रक ड्रायव्हर मला पाहत म्हणाला, “तुम्ही काय करताय ह्या रस्त्यावर? तुम्हाला माहिती नाही का काही? आधी आत या बसा..”
मी त्यांच्या बाजूला येऊन बसलो आणि धाप टाकतच म्हणालो म्हणालो, “मला बारामतीला जायचं होतं.. मी ९ ची बस आहे असा विचार करून निघालो होतो पण बस 8 वाजता ची होती आणि निघून गेली.. आता कुठे जाणार म्हणून मी गव्हाणे वस्तीस जायचं ठरवलं.. आणि तिथेच चाललो होतो पण गेले काही तास मी याच रस्त्यावर भटकतोय.. बर झाल तुम्ही मला भेटलात..”
आमचं बोलण सुरू असे पर्यंत आम्ही त्या भागापासून बरेच दूर आलो होतो.
तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला, “तुम्ही जिथे उभे होता तिथे असा कोणता रस्ताच नाहीये.. वळण घेत असताना माझ्या कंटेनर चा लाईट पडला तेव्हा मला तिघे कोणी तरी उभे असल्याचे दिसले म्हणून मी त्या रस्त्याला तुमची मदत करायला आलो. तुम्ही ज्या भागात उभा होता तो भाग खूप विचित्र आहे. इथले लोक सांगतात की तिथे चकवा लागतो आणि माणसाचा शेवट होई पर्यंत पाठ सोडत नाही.. तुमचं नशिब चांगलं आहे की मी तुम्हाला पाहिले आणि मदत करायला आलो नाही तर तुमचे काही खरे नव्हते.. “
त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मी सुन्न झालो होतो. पण मनोमन देवाचे आभार मानले की या भयानक प्रकारातून मी थोडक्यात वाचलो होतो..