अनुभव – कुशल पांडे
घटना २०१२-२०१३ सालची आहे. मी धुळे येथे वास्तव्यास आहे. आणि त्या काळी मी पुढील शिक्षण आणि जॉब साठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. माझ्या साठी स्वतःच घर सोडून वेगळ्या शहरात जायचा अनुभव पहिलाच होता. माझ्या सोबत येणार पण कोणीच नव्हत. पण पुढच्या भवितव्यासाठी मला एकट्याला जाणं भाग होत. सगळी तयारी करून, समान वैगरे घेऊन मी पुणे शहरात येऊन पोहोचलो. मोठं शहर, सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन होता. पाहिले काही आठवडे खूप त्रासदायक होते. मित्र नाही, घरची खासकरून आईची आठवण. परत जायचा विचार केला पण मग इथे यायचे कारण आठवून थांबलो. जवळपास महिना भर एका चौकात रूम मध्ये राहिलो. नंतर माझे २ मित्र यायला तयार झाले म्हणून आम्ही एक बेडरूम किचन चा फ्लॅट भाड्याने घेतला. पहिले सहा महिने खूप छान गेले.
मित्र असल्यामुळे जास्त काही जाणवले नाही, वेळ ही छान जात होता. माझे मित्र म्हणजे राहुल आणि गौरव. त्यात मी कुरापती स्वभावाचा. अश्याच एके दिवशी दुपारी नेट वर ब्राउझिंग करताना मला एक व्हिडिओ मिळाला. टॉप १० होनटेड प्लेसेस इन पुणे.. मला उत्सुकता वाटली मी तो विडिओ बघितला आणि त्यात सांगितलेल्या जगांबद्दल रिसर्च करायला लागलो. राहुल आणि गौरव ला ही सांगितले पण त्यांना त्यात काही रस नव्हता. मला अश्या गूढ आणि भुताटकी च्या विषयांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. दिवसेंदिवस मी त्या बद्दल चे नव नवीन व्हिडिओ पाहू लागलो. आणि त्याच वेळी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली, मी आउजा बोर्ड मागवायच ठरवल. आणि ते मागवण्यासाठी जवळपास २-३ महिने त्या बद्दल ची सगळी माहिती घेतली आणि सगळे वाचून घेतले की तो बोर्ड कसा वापरायचा.
सगळ्या अटी, नियम, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या टाळायच्या सगळ काही समजून घेतलं. या काळात आमच्या फ्लॅट मध्ये अजुन एक मित्र राहायला आला, त्याच नाव अंकुश. एकदा कसली तरी पार्टी करून रात्री उशिरा फ्लॅट वर आलो, जवळपास २ – २:३० वाजले असतील. मी हॉल मध्ये बसलो होतो. अंकुश आणि राहुल कसल्या तरी विषयावर गौरव सोबत बोलत बसले होते. वातावरण पण मस्त होत रात्रीचे, मग माझ्या डोक्यात आऊजा बोर्ड चा विचार आला तसे मी तो मित्रांना सांगितला. त्या तिघांपैकी कोणीच तयार नव्हते पण माझ्या हट्टामुळे ते तयार झाले. आम्ही चौघे ही बेडरूम मध्ये बसलो आणि मला माहिती होत त्या प्रमाणे क्रिया करायला सुरुवात केली. तो बोर्ड मधोमध ठेऊन आम्ही चौघही त्याभोवती बसलो. चार ही टोकांना चार मेणबत्या लावल्या. मध्ये एक नाणं ठेवलं आणि चौघांनीही त्यावर बोट ठेवलं.
पण आम्ही सर्व नियमानुसार करून सुद्धा काही झाले नाही. असं म्हणतात की ते नाणे आपोआप हलते. पण तसे काहीच झाले नाही. शेवटी गौरव ने वैतागून सर्व बंद केले आणि आम्ही सर्व झोपायची तैयारी करू लागलो. तो आउजा बोर्ड आम्ही किचन मध्ये ठेऊन दिला आणि झोपून गेलो. रात्री उशिरा झूल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. आमच्या दिनचर्ये प्रमाणे तो दिवस तसाच निघून गेला. पण त्या रात्री जे घडल ते पुढे घडणाऱ्या गोष्टींची फक्त एक चाहूल होती. अंकुश दुपारी बेडरूम मध्ये झोपला होता. खिडकीचा पडदा लावला असल्यामुळे रूम मध्ये अंधार होता. तितक्यात बेडरूम चे दार हळुवार पणे हलल्याचा आवाज आला. तसे त्याने वळून दाराकडे पाहिले तर त्या दारामागे कोणी तरी उभ असल्याचं जाणवलं.
तो झटकन उठून बसला आणि त्या दारामागे पाहू लागला. तिथे एक मुलगी उभी होती जी काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा आवाज खूप खोल गेल्या सारखे वाटत होते. अंकुश चे हात पाय भीती ने थंड पडले होते, वाचा बसली होती. तरीही ती काय बोलतेय ते तो समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तीच एक वाक्य त्याला कळलं “ मला का बोलावले..” तसे त्याला कळून चुकले की हे सगळा प्रकार त्या आउजा बोर्ड मुळे घडतोय. त्याने बेड वरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला हातपाय हलवता येत नव्हते, त्याने ओरडायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द च फुटत नव्हता. शेवटी मनातल्या मनात त्याने देवाचा धावा सुरू केला, विनवण्या करू लागला. तसे त्याला हळु हळू भोवळ येऊ लागली आणि तो बेशुद्ध पडला. संध्याकाळ झाली.
जशी त्याला शुद्ध आली तो सगळ्यात आधी माझ्या कडे आला आणि माझ्यावर ओरडू लागला, मला शिव्या देऊ लागला. तो खूप चिडला होता आणि मला सांगू लागला “साल्या तुझ्या मुळे झालं सगळं, हे सर्व तू सुरु केलाय आता कसं निस्तरायच ते बघ, मला काही सांगू नको..” मला काही कळले नाही कारण मला वाटले की त्याने एखादे वाईट स्वप्न बघितले असेल. म्हणून मी जास्त काही विचार केला नाही. पण मला कुठे माहित होत की एका भयानक गोष्टीची मी सुरवात करून ठेवली आहे. तो दिवस उलटला, रात्री अंकुश माझ्या जवळच झोपला कारण तो घडलेल्या प्रकारामुळे खूप घाबरला होता. अंकुश आणि मी हॉल मध्ये तर गौरव आणि राहुल बेडरूम मध्ये झोपले होते. मध्य रात्र झाली होती तितक्यात अचानक बाजूच्या सोसायटी मधून रडण्याचा आवाज येऊ लागला.
मी उठून हॉल च्या खिडकीतून बाहेर बघितले तर त्या सोसायटी मध्ये कोणाचे तरी मयत झाले होते. त्या बिल्डिंग खाली लोकांची गर्दी जमा होऊ लागली होती. मी पुन्हा आत झोपायला येण्याआधी नकळत माझं लक्ष सोसायटीच्या टेरेस वर गेले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. टेरेस वर एक मुलगी उभी दिसली. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लक्ष तिची नजर बरोबर माझ्याकडे होती. माझा या गोष्टींवर विश्वास होता पण मला कळायला वेळ लागला नाही. मी काहीच प्रतिक्रिया न देता खिडकी लावून परत झोपायला आलो. बराच वेळ मी अंकुशने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होतो. आणि त्यात काही वेळा पूर्वी पाहिलेले दृश्य.. विचारातच ती रात्र ओसरली. दुसऱ्या दिवशी मी, राहुल आणि अंकुश आप आपल्या कामासाठी बाहेर गेलो होतो. गौरव एकटाच फ्लॅट वर होता.
मला राहुल गावातच भेटला तस आम्ही दुपारचे जेवण सोबत करायचे ठरवले. हॉटेल मध्ये जेवायला बसलोच होतो की अचानक गौरवाचा फोन आला. तो खूप घाबरला होता आणि आम्हाला सांगत होता की आत्ताच्या आत्ता सगळे काम बाजूला ठेवून फ्लॅट वर या.. मी बिल्डिंग च्या खालीच बसलोय. त्याच्या आवाजावरून मी ओळखले की नक्कीच काही तरी भयानक घडलय. जेवण तसेच अर्ध्यावर टाकून आम्ही पटकन ऑटो करून फ्लॅट वर गेलो. गौरव खूप घाबरलेल्या परिस्थितीत सोसायटीच्या खाली बसला होता. आम्ही दोघं ही त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारणार तसे त्याने फ्लॅट कडे इशारा केला. मी वर पाहिले पण मला काही कळले नाही. मी त्याला म्हणालो की चल फ्लॅट वर , आम्ही पण आहोत आता. तसे त्याने मान हलवून फक्त नाही म्हटलं.
तो तिथेच आम्हाला सगळ सांगू लागला. “दुपारी, मी पुस्तक वाचत बसलो होतो, बराच वेळ वाचन केल्याने डोळे जड झाले होते म्हणून थोड्यावेळ झोप काढायचा विचार केला. म्हणून पुस्तक बाजूला ठेऊन तिथे डोळे मिटून पडलो. मला झोप लागलीच होती तितक्यात मला रडायचा आवाज येऊ लागला. मी झोपेतून उठून पाहिले आणि समोरच दृश्य पाहून माझ्या ह्रदयाचे ठोके बंद पडत आहेत की काय असे वाटू लागले. कारण माझ्या पायाजवळ ती मुलगी बसून रडत होती. हुंदके देत कण्हत होती. तिचा तो जीवघेणा रडण्याचा खोलात गेलेला आवाज. मी माझ्या अंगातली सगळी शक्ती एकवटून बाहेर धावत आलो.” त्याच बोलणं ऐकून मला काही सुचत नव्हतं काय बोलावं. त्याने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हटलं “कुशल तू फार मोठी चूक केली आहेस आणि त्याची शिक्षा आम्ही सर्व भोगतोय..”
त्याचे ते एक वाक्य ऐकून मला संताप अनावर झाला. मी रागात पाय आपटत सरळ फ्लॅट मध्ये गेलो. फ्लॅट चा कानाकोपरा तपासला पण मला तिथे काहीच दिसले नाही. तसे पुन्हा खाली जाऊन मी गौरव ला आत बोलावले. मी आणि राहुल ने गौरवाची समजूत काढली. त्या रात्री आम्ही चौघांनी बेडरूम मध्ये झोपायचे ठरवले. पण तरीही गौरव ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या सांगण्या वरून आम्ही झोपताना एखादे देवाचे गाणे मोबाईल वर लाऊन झोपलो. त्या रात्री आम्हाला कोणालाही कलसाच अनुभव आला नाही. दुसरा दिवस उजाडला. पण आता मी शांत बसणार नव्हतो. जर हा प्रकार घडत असेल तर मी हे सगळे मोबाईल मध्ये रेकॉर्ड करेन असा विचार करून जेव्हा दुपारी सगळे जेवायला बाहेर गेले तेव्हा मी मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून तिथे ठेवला. तसे ही आम्हाला यायला उशीर होणार होता.
आम्ही जवळपास ५ वाजता रिटर्न आलो. माझा मोबाइल जाताना मी खाली फरशीच्या कोपऱ्याला आडवा ठेवला होता. आणि येऊन पाहतो तर काय माझा मोबाईल एका कोपऱ्यात पडला होता आणि मोबाईल ची बॅटरी दुसऱ्या बाजूला. मोबाईल हातात घेतल्यावर असे वाटले की तो कोणीतरी जोरात आपटला आहे. मी पटकन बॅटरी घेऊन मोबाईल कसा बसा सुरू केला आणि गॅलरी मध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू लागलो. व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. व्हिडिओ मध्ये मोबाईल दोन वेळा जोरात फेकल्याचे रेकॉर्ड झाले होते. पहिल्या वेळेस मोबाईल फेकताना रेकॉर्डिंग झालं होत आणि दुसऱ्या वेळेस झालेल्या आघाताने बॅटरी वेगळी झाली होती. पण दोन्ही वेळेस त्या रूम मध्ये कोणीच नव्हत. त्या फ्लॅट मध्ये घडतं असलेल्या गोष्टींवर माझा विश्वास आता बसला होता.
मी लगेच गौरव, राहुल आणि अंकुश शी बोलून तो फ्लॅट रिकामा केला. त्याच दिवशी आम्ही सर्व आमच्या गावी परत आलो. कारण दुसरा फ्लॅट लगेच मिळणं शक्य नव्हत. पण सुदैवाने आम्हाला २ दिवसातच दुसरा फ्लॅट मिळाला आणि आम्ही तिकडे शिफ्ट झालो. आणि घडतं असलेल्या भयानक गोष्टींना पूर्णविराम मिळाला. आज इतके वर्ष उलटल्यावर ही मला खूप पश्चाताप होतो कि माझ्या मुळे माझ्या मित्रांना खूप त्रास झाला आणि त्यांचे खूप मोठे नुकसान होता होता राहिले. पण आम्ही तो फ्लॅट सोडल्यावर फ्लॅट च्या मालकाला आम्ही सांगून तिथे एक महापूजा करून घेतली आणि प्रार्थना केली की जी कोणी अतृप्त आत्मा तिथे आहे तिला मुक्ती मिळो… या घटनेतून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली की तरुणाईच्या काळात, त्या भावनेत आपण कुतूहल म्हणून एखादी गोष्ट करायला जातो ज्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात.