अनुभव – नाथा उघडे

आम्ही सगळे मित्र मालवण – गोवा असा प्लॅन करून ट्रिपला निघालो होतो. आम्ही एकूण १२ जण होतो, त्यामुळे आम्हाला ट्रेनचा प्रवास चांगला पडेल असा विचार करून आम्ही ट्रेनने निघालो. आम्ही सगळे २९ सप्टेंबरला दुपारी पिंपरी-चिंचवडहून निघालो. सगळे मजेत होते. साहजिक च आमची ट्रेन पुण्याहून होती. सगळ्यांनी आपापल्या घरचे डबे म्हणजे जेवण घेतले होते. आमचे चेक-इन ३० तारखेला होते, म्हणून आम्ही डायरेक्ट विला वर जाणार होतो. पण त्यात आमची १०.३० ची ट्रेन, जी सकाळी ६ वाजता पोहोचणार होती ती दुपारी २:३० वाजता पोहोचली. आम्ही सगळे मित्र जास्तीच्या प्रवासामुळे थकलो होतो. मग मी माझ्या एका मित्राला सांगितले की आपण व्हिलावाल्याला कॉल करून सांगू की आम्ही आज येणार नाही, उद्या येतो म्हणून. तसे त्याने कॉल केला आणि सांगितले तर व्हिलावाला “ठीक आहे” असं म्हणाला. कोकणची माणसं साधी भोळी असतात याचा मला प्रत्यय आला.

माझा मित्र साहिल याचं गाव कुडाळवरून ८ किमी अंतरावर होतं. मग मी प्लॅन केला की आज त्याच्या गावात थांबू म्हणजे आराम पण होईल आणि जेवणाचं काही टेन्शन नाही. त्यावर सगळे “हो” म्हणाले. साहिल गावीच होता, म्हणून त्याला कॉल करून सांगितलं तर त्याने “या” म्हटलं कारण तोही आमच्या सोबत ट्रिपला येणार होता. अर्ध्या पाऊण तासात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही अचानक असे १२ जण त्याच्या घरी आलो होतो तरीही त्याच्या काकांनी आमचा खूप चांगला पाहुणचार केला. जेवणासाठी चिकन आणि भाताचा बेत केला होता. ९ च्या दरम्यान आमचं जेवण आटोपलं आणि मग नंतर झोपायची तयारी सुरू झाली. 

आम्ही सगळे मित्र एका मोठ्या खोलीत झोपलो. प्रवास करून थकून आल्यामुळे आणि मस्त चिकन भाताचा बेत झाल्यामुळे सगळ्यांना अगदी गाढ झोप लागली. गावातील वातावरण अगदी शांत होत. कारण संपूर्ण गाव निद्रेच्या अधीन झालं होत. साधारण रात्री ३ च्या दरम्यान आमच्या प्राज्वल नावाच्या मित्राला जागी आली. त्याच्या बाजूला जो मित्र झोपला होता त्याला खूप तंबाखू खायची सवय होती. प्राज्वल ने पाहिले की तो खोलीच्या बाहेर उभा राहून तंबाखू मळतोय. त्याला जरा विचित्र वाटलं कारण रात्री चे ३ वाजून गेले होते. हळूच हाक मारली पण तो काही ऐकेना किंवा त्याला आवाज जात नव्हता. तितक्यात तो बाहेरच्या बाजूला निघून गेला म्हणून प्राज्वल त्याच्या मागे गेला. घरा बाहेर आला तर खूप गडद अंधार होता, तो मित्र कुठे गुडूप झाला काही कळलेच नाही. म्हणून तो पुन्हा खोलीत आला आणि पाहतो तर काय..

तो ज्या मित्राला शोधायला बाहेर गेला होता तो मित्र आत तिथेच त्याच्या जागेवर झोपला होता. प्राज्वल एकदम दचकला. त्याने इतरांना उठवून सांगायचा प्रयत्न केला पण सगळे थकले होते आणि गाढ झोपेत होते म्हणून कोणी लक्ष दिलं नाही. ती रात्र त्याने तशीच जागून काढली कारण त्याला खूप अस्वस्थ वाटत होत. सकाळ झाली. सगळे उठल्यावर त्याने रात्री चा प्रसंग सांगितला. काहींनी हसण्यावारी नेला तर काहींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्यात आम्ही सगळे निघायची तयारी करत होतो कारण आम्हाला विला वर जायचे होते. सकाळी सगळे आटोपून साधारण १० च्या दरम्यान तिथून निघालो. आम्ही तारकर्ली ला जाणार होतो कारण तिथेच आम्ही विला बुक केलं होत.

आमचं ११ वाजता चेक इन होत. पण आम्ही १२ वाजता तिथे पोहोचलो. सगळी पोरं खूप खुश होती कारण त्यांनी अशी सुट्टी कधीच घेतली नव्हती. आता सहा दिवसांची सुट्टी आणि फक्त एन्जॉय करायचं ठरलं होत. पोहोचल्या पोहोचल्या सगळे सामान ठेऊन आम्ही थेट बीच वर गेलो कारण विला च्या अगदी मागच्या बाजूलाच बीच होता. मजा, मस्ती, खेळ, फोटो काढणे सुरू होते. आम्ही जवळपास ३ वाजे पर्यंत तिथेच बीच वर होतो. तिथं अमच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. नंतर मग आम्ही विला वर आलो. आल्यावर जेवणाची ऑर्डर दिली आणि मग आमची पार्टी सुरू झाली. संध्याकाळी आमचा गोंगाट सुरू होता. तितक्यात कोणी तरी येऊन सांगितलं की इथे एका जणाचे मयत झाले आहे, वारले आहे. त्यामुळे जास्त आवाज करू नका.

तेव्हा संध्याकाळी ७ वाजत आले होते. नंतर सगळ्यांनी अंघोळ वैगरे केली, फ्रेश झालो तास दीड तास आराम झालं. पुन्हा रात्री विला च्या केअर टेकर ला बोलावून जेवण्याची आणि पिण्याची व्यवस्था केली. रात्री पावणे बारा पर्यंत आमचे पिणे सुरूच होते. मग एकदा चढल्यावर झोप कसली लागतेय.. आम्ही थोड बाहेर फिरून येता असा विचार केला. माझ्या सोबत निखिल, दीपक, सोन्या, बालाजी असे आम्ही ५ जण निघालो. व्हिल्यापासून १०० मीटरच्या अंतरावर फेर फटका मारत एके ठिकाणी येऊन बोलत थांबलो. जिथं थांबलो होतो तिथं एक आंब्याचं झाड होतं आणि अगदी त्याच्या बाजूला आम्ही बोलत उभे होतो. त्या भागात जास्त उजेड नव्हता. विलाच्या बाहेर ही एक च लाईट होता आणि त्याचाच उजेड आम्ही उभे होतो तिथं पर्यंत जेमतेम पोहोचत होता. 

कोणत्या तरी इंटरेस्टिंग विषयावर आमचे बोलणे सुरू होते. मी सहज वेळ पाहिली तर १२ वाजून ३ मिनिट झाली होती. आमचे बोलणे चालू असतानाच अचानक दीपक विल्याच्या बाजूला चालत जाऊ लागला. मी त्याला आवाज दिला “ काय रे, कुठे चाललास..” त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो पुढे चालत गेला आणि त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला आणि एका विशिष्ट ठिकाणी एक टक पाहू लागला. त्या झाडामागे एक म्हातारी बाई उभी होती. हिरव्या काश्ठाची साडी, डोक्यावर पदर आणि कपाळाला मोठं कुंकू असा काहीसा पेहराव. ती झाडाच्या दुसऱ्या बाजूला उभी होती आणि तिथपर्यंत जेमतेम उजेड पोहोचत होता.

त्या थोड्या उजेडात हा तिचा पेहराव त्याने पाहिला पण चेहरा मात्र नीट दिसत नव्हता. दीपक ला आश्चर्य वाटलं की ही आणि इथे इतक्या रात्री काय करत असेल. त्याने विचारपूस करायचे ठरवले तसे ती आजी स्वतःच २ पावलं पुढे आली आणि त्याला विचारले “ बाळा, कुठून आलास..? जेवण वैगरे केलस का..?” दीपक ने ही तिला उत्तर दिले “ आम्ही पुण्याहून आलो आहोत.. आणि हो आजी जेवण झालं कधीच.. तुमचं जेवण झालं का..?” त्यावर त्या म्हातारी ने पुढचा प्रश्न केला.. “ कोण कोण आला आहात तुम्ही..? “ दीपक ने सांगितले “ आम्ही १२ जण आलो आहोत.. सगळे मित्र..” इतकं बोलत असतानाच आमचा मित्र ओमकार जो विला मध्येच होता तो बाहेर आला आणि येताना वाटेत दीपक ला पाहून विचारले “काय रे.. इथे काय एकटा का अंधारात बसलाय.. चल झोपायला.. त्यावर तो येतो मी असे म्हणून तिथेच बसून राहिला. 

तो आमच्या जवळ आला आणि म्हणाला “अरे चला ना, झोपायचं नाही का? आधीच इथं वारलं आहे कोण तरी. चला.. पोरं वाट बघतायत…” तसे आम्ही ओमकार चे बोलणे ऐकून वीलाच्या दिशेने चालू लागलो. जाताना माझे लक्ष दीपक कडे गेलं तर तो तसाच त्या आंब्याच्या झाडाखाली बसून उलट दिशेला तोंड करून काही तरी बोलताना दिसला. मी त्याला काही बोलणार तेव्हड्यात तो उठला आणि त्या दिशेला हात करत म्हणाला “ चला.. मित्र येत आहेत, निघतो मी..” इतकं म्हणून तो आमच्याकडे आला आणि चालू लागला. त्यावर मी त्याला विचारले “ काय रे इतक्या अंधारात बसून काय करत होतास.. कोणाशी फोन वर बोलत होतास.. आमच्यात थांबायचं नव्हत म्हणून तिथे एकता बसला होतास का..?” मी सहज मस्करीच्या स्वरात त्याला म्हणालो.

त्यावर तो लगेच बोलला “ अरे, ती आजी आली होती, तिच्याशी बोलत होतो..” आम्ही सगळेच विचारू लागली “ कुठली आजी..? काय बोलतोय तू.. गेले २० मिनिट तिथे तू एकटा बसला होतास.. आम्ही ३-४ वेळा पाहिले तुझ्याकडे.. तिथे कोणीच नव्हते..” त्यावर दीपक म्हणाला “अरे, इथं माझ्यासमोर उभी होती ती. तुम्हाला कशी दिसली नाही?”. तसे आम्ही ओमकार कडे पाहिले कारण येताना तो दीपक जवळ जाऊन त्याच्याशी बोलून आला होता.. “ काय रे ओमकार काय बोलतोय हा..? तू आता तिथूनच आलास ना..” त्यावर ओमकार ही कोड्यात पडला आणि म्हणाला “अरे भाई, वेडा झालास का तू..? एकटा बसला होतास म्हणून तुला “चल” बोलायला आलो होतो.. हे ऐकताच दीपक जरा घाबरला. 

त्याला कळेनासं झालं की जर तिथे कोणीच नव्हत तर १५-२० मिनिट जे आपल्याशी बोलत होत ते कोण होत. आम्हा मित्रांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली, मस्करी करू लागलो. साधारण पावणे बारा ला आम्ही विलात आलो आणि झोपायला जाऊ लागलो. त्यावर दीपक बोलला “ अरे.. कुठे झोपता इतक्यात.. मला झोप येत नाहीये आणि बरे वाटत नाहीये..” त्यावर मी म्हणालो “ ठीक आहे, चला पत्ते खेळू थोड्या वेळ..” तसे सगळ्यांनी होकार दिला. आमचा पत्त्याचा डाव सुरू झाला. पण दीपक मात्र कोणत्या तरी विचारात हरवून गेला होता. कदाचित घडलेल्या प्रसंगाचा विचार करत असावा. बघता बघता आमचे ३ डाव झाले आणि पुढचा डाव हसा सुरू झाला तसे अचानक दीपक ने डोळे मोठे विस्फारले आणि घाबरून आमच्याकडे पाहू लागला. मी त्याला विचारले “ काय रे.. काय झालं.. असा का बघतोय..?”

त्यावर तो म्हणाला “ ती आजी मला आवाज देतेय.. बाहेर बोलावतेय..” इतके बोलून त्याने अचानक रडायला सुरुवात केली. आम्हाला काही कळत नव्हत त्याला अस काय झालंय. कारण तो रडणाऱ्या मुलांसारखा अजिबात नव्हता. सगळे त्याला विचारू लागले.. “ दीपक काय झालं..? असं का करतोय.. रडायला काय झालं इतकं..? “ पण ती काहीच बोलत नव्हता. कदाचित भीतीमुळे त्याची वाचा बसली होती आणि त्याला काहीच सांगता येत नव्हत. मी दीपक ला शांत करायचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र माझे सगळे मित्र खूप घाबरले. दीपक ला काय होतंय , काय करायचं असं विचारू लागले. दीपक ला जरी बोलता येत नसलं तरी तो शुद्धीत होता हे मी हेरल होत.

तसे मी एक शक्कल लढवायची ठरवली. मी त्याला बोललो, “दीपक, फक्त हो किंवा नाही हे इशाऱ्याने सांग.” त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली. तसे मी त्याला विचारलं, “ती म्हातारी आपल्या रूममध्ये आहे का?”.. पण तो सुन्न च होता तसे मी परत विचारलं, “आपल्या रूममध्ये आहे का?” त्याने माझ्याकडे पाहत फक्त इशारऱ्याने नाही म्हटलं. मी पुढे विचारले.. “ तुला आवाज देतेय का अजूनही..” तसे तो हो असा इशारा करत पुन्हा रडू लागला. त्याच रडणं ही खूप विचित्र होत. जसं की तो स्वतः रडत नाहीये पण कोणी तरी त्याला रडवतय. तितक्यात आमच्या एका मित्राने विचारले “ती म्हातारी तुला धमकी देतेय का, इजा पोहोचवेल असे काही बोलतेय का..?” त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली आणि आमच्या सगळ्यांच्या अंगावर भीती ने काटाच आला. आम्ही पाच जण त्या एका रूम मध्ये होतो.

तितक्यात पटकन आमच्या सोन्या नावाच्या मित्राने तुळजापूरच्या देवीचं कुंकू आणलं होतं. ते आणलं तसे मी दीपकच्या डोक्यावर लावलं, त्याच्या कपाळाला लावलं. का कोण जाणे पण मला वाटलं की ती आपल्या रूममध्ये येईल, म्हणून मी रूमच्या चार ही बाजूला थोड थोड कुंकू लावलं. इतकंच नाही तर बेडच्या चार बाजूला लावलं, रूमच्या उंबरठ्याला लावलं. आणि हे सगळं करत असताना मी तुळजापूरच्या देवीच नाव घेत होतो. तितक्यात अजुन एक गोष्ट लक्षात आली की बाहेर जाताना आम्ही सिगारेट, तंबाखू अस सगळ सामान घेऊन गेलो होतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे सिगरेट होती, ती पेटवली आणि दीपकच्या अंगावरून उतरवून त्या भिंतीच्या पलीकडे टाकली. मी इतरांना विचारले “कोण कोण काय खात होतं तिथं?” तसे एक मित्र बालाजी बोलला, “अरे, मी विमल खात होतो.” 

तसे त्याला म्हणालो की दीपक वरून ओवाळून बाहेर टाकून दे पटकन. आमचा गोंगाट ऐकून बाजूच्या रूम मधले इतर मित्र आमच्या रूम मध्ये आले आणि आम्हाला काय झालं ते विचारू लागले. या सगळ्यात दीपकला अजून ही तो आवाज येतच होता. त्याला काही कळत नव्हतं की काय होतंय. त्याला हळु हळू ताप चढत चालला होता, कारण मी त्याला कुंकू लावताना जेव्हा हात लावला तेव्हा त्याचं अंग अक्षरशः भाजत होत. मी अजून एक गोष्ट पाहिली की त्याचे हावभाव आणि वागणं बदलत आहे. डोळे विस्फारून तो आम्हा सगळ्यांना पाहत होता. त्याला मी हलवून भानावर आणायचा प्रयत्न केला पण माहीत नाही त्याला काय झालं होत. शेवटी मी माझ्याकडची सिगारेट पेटवून त्याला हातावर हलका चटका देऊन पहिला पण त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. हे पाहून मी आणि माझा मित्र साहिल खूप घाबरलो.

तो मला म्हणाला की गावातून गाडी बोलावून आत्ताच याला इथून घेऊन जाऊ नाही तर काहीतरी अभद्र व्हायचं. हा प्रकार खूप भयानक वाटतोय मला. या सगळ्यात अडीच वाजून गेले होते. आम्ही दीपक जवळच बसून होतो. सुमारे पावणे तीनच्या सुमारास तो अचानक शांत झाला. उठला आणि रुमच्या बाहेर जाऊ लागला. मित्र त्याला अडवू लागले पण मी म्हणालो की जाऊ दे बाहेर आपण याच्या मागे जाऊ. पण विलाच्या मेन गेट बाहेर याला जाऊ द्यायचे नाही. तो उठून त्या रूम च्या बाहेर गेला जिथे आम्ही सिगारेट, तंबाखू वैगरे साहित्य फेकल होत. तिथे जाऊन तो म्हणाला “तुला जे पाहिजे ते तुला दिलं. आता माझ्या मागे येऊ नकोस. मला आवाज देऊ नकोस.” मी त्याच्या अगदी मागेच उभा होतो पण मला तिथे कोणीच दिसलं नाही. 

दीपक तसाच चालत रूम मध्ये आला आणि पाणी मागितलं. आम्ही ते त्याला दिलं तसे तो पिऊन थेट झोपून गेला. आम्ही कोणीही त्याला विचारायला गेलो नाही. इतक्या वेळानंतर तो शांत झाला होता म्हणून सगळ्यांनी विचार केला सकाळी उठल्यावर काय ते बघू. माझ्या सोबत साहिल ही बसला होता. ५ वाजेपर्यंत आम्हा दोघांना अजिबात झोप आली नाही. तो मला म्हणाला की नाथा जरा हळू आवाजात एखाद गाणं लाव, बघू झोप लागते का.. तसे मी मंद आवाजात एक गाणं लावलं. आम्ही कोणी रूम ची लाईट बंद केली नव्हती कारण सगळी पोर खूप घाबरली होती. सकाळ आली. दीपक ला जाग आली तेव्हा ती सगळ काही सांगू लागला. ती म्हातारी बाई त्याला सतत आवाज देत होती, सांगत होती की लवकर बाहेर ये.. त्याने बाहेर जाऊन तिला तंबाखू ची पुडी स्वतःच्या हाताने उचलून दिली तेव्हा ती कुठे तरी अंधारात गुडूप होऊन गेली. भानावर आणण्यासाठी त्याच्या हाताला दिलेला चटका त्याला आता झोंबी लागला होता. ती म्हातारी फक्त दीपक ला दिसली होती आम्हाला नाही. तिचा आवाज फक्त त्याला ऐकू आला होता आम्हाला नाही. तिला जे हवं होत ते जर दिलं नसतं तर कदाचित दीपक चा पाठलाग तिने कधीच सोडला नसता. प्रसंगावधान राखून मी जो मार्ग काढला त्यातून आम्ही दीपक ला सुखरूप बाहेर काढू शकलो..

Leave a Reply