अनुभव – तुषार गुंजल

हि एक ऐकिवात कथा आमच्या कोल्हापुरातल्या गावची. माझ्या काकांकडून हि कथा मी ऐकली होती. माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे माझे पणजोबा यांच्या सोबत घडली होती. त्यांचे नाव शामराव होते. पणजोबा खूप उंच, धिप्पाड आणि धीट होते.

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझे पणजोबा तरुण होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळेस गावात वाहन नसायचे. गावातील लोक पायीच किव्वा बैलगाडीने प्रवास करीत असत.

एकदा माझ्या पणजीला म्हणजे वडिलांच्या आजीला माहेरहून बोलावणे आले. माहेरून काही मंडळी पणजीला नेण्यास घरी आले. तेव्हा पणजोबाही त्यांच्या सोबत बैलगाडीने पणजीला सोडण्यास निघाले. गाव तसे फार लांब नव्हते. बैलगाडीने तासभर अंतरावरच होते. ते दुपारी निघाले होते आणि घरी पोहोचे पर्यंत दुपार उलटून गेली होती. आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. पणजोबांच्या सासऱ्यानी त्याना जेऊन तेथेच रात्री थांबण्याची विनंती केली, त्यांनी जेवण करण्यास होकार दिला पण रात्रीच निघणार असे सांगितले.

रात्री जेवण उरकल्यावर ते घरी जाण्यास निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. सोबत मेहुणा येण्यास तयार झाला पण पणजोबांनी त्याला सोबत घेण्यास मनाई केली आणि ते एकटेच पायी निघाले. 

रात्रीचे निखळ चांदणे पसरले होते. काही वेळातच गावाची वेस ओलांडून पणजोबा मुख्य रस्त्याला आले. खडकाळ रस्त्यावरून थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांनी डोंगर चढून जाण्याचा निर्णय घेतला. कारण डोंगर चढून उतरल्यावर गाव जवळच होते आणि वेळ ही कमी लागणार होता.

पणजोबा डोंगराचा चढ चढू लागले. गडद अंधारात चंद्राच्या निळसर प्रकाशामुळे पायवाट मात्र स्वच्छ दिसत होती. ते चालत चालत बरेच पुढे आले तेव्हा त्यांना एक शेळी दिसली. एवढ्या रात्री हि शेळी इथे कुठून आली असा विचार करून त्यांनी झडप घालून त्या शेळीचे पाय ओढले आणि तिला उचलून आपल्या खांद्यावर घेतले. शेळी खांद्यावर गप्प बसून होती तिचे दोन्ही पाय त्यांनी घट्ट पकडून धरले होते. थोडे अंतर चालून पुढे आल्यावर एक छोटा ओढा लागला. त्या ओढ्याला उथळ पाणी होते. पणजोबा पाण्यात उतरले आणि हळू हळू सावरत चालू लागले.

पाणी गूढघ्यापर्यंत आले होते. त्यांनी शेळीला घट्ट पकडून हळू हळू सावरत ओढा पार करायला सुरुवात केली आणि अचानक त्या शेळीचे पाय हळू हळू लांब पसरट होऊ लागले. बघता बघता त्या शेळीचे पाय ओढ्याच्या पाण्याला टेकले. हे बघून त्यांनी त्या शेळीला उचलून गरगर फिरवून दूर ओढ्याच्या पलीकडे फेकून दिले आणि झप झप पावले टाकत ते ओढ्याच्या पलीकडे आले. मागे वळून न पाहता ते भराभर पुढे चालू लागले आणि तितक्यात मागून एक आवाज कानावर पडला “आज वाचलास”..

असे म्हणतात की रस्ता चुकणे म्हणजे चकवा लागणे असे नाही. चकवा हा कोणत्याही रुपात, कोणत्याही वेळेत लागू शकतो. मग कधी प्राण्याच्या तर कधी अदृश्य स्वरूपात.

Leave a Reply