अनुभव – प्रशांत

घटना मुंबईतील अंधेरी वेस्ट इथली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. आमच्या एका मित्राचा वाढदिवस होता.  दिवस आम्ही सगळे मित्र रात्री बारा वाजता आमच्या परिसरात मित्राच्या घराजवळ जमलो. केक वैगरे कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. मग नंतर आमचा पिण्याचा कार्यक्रम सुरु झाला. इथल्या तिथल्या गप्पा सुरु होत्या त्यात 2 कधी वाजले समजलेच नाही. तितक्यात अचानक आम्हाला आवाज येऊ लागले. घुंगरांचे आणि बांगड्यांचे. आमच्यातले 2 मित्र काय आहे म्हणून सहज पाहायला गेले. त्यांनी घराच्या चौफेर फिरून पहिले पण तिथे काहीच दिसले नाही. ते परत येउन आम्हाला म्हणाले की इथे तर आपल्याशिवाय कोणीच दिसत नाहीये, हा आवाज कुठून येतोय नक्की ते कळत नाहीये. आम्ही जिथे बसलो होतो तिथे एक मोठे झाड होते आणि मागच्या बाजूला झुडूपांचा परिसर होता. अचानक तिथून वेगळाच आवाज येऊ लागला.

आम्ही सगळे मित्र त्या दिशेने पाहू लागलो. तसे अचानक दोन डुक्कर जोरात पळत बाहेर आले. आम्ही दचकलो पण नंतर हसू लागलो. पावणे तीन च्या सुमारास आमचा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही घरी जायची तयारी करू लागलो. सगळे आवरले आणि सहज माझे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले आणि जाणवले की झाडामागे कोणी तरी उभ आहे. त्या भागात बऱ्यापैकी अंधार होता त्यामुळे नक्की कळायला मार्ग नव्हता. मी माझ्या एका मित्राला खुणावून सांगितले “ते बघ.. तिथे कोणी उभ असल्यासारखं वाटतय ना..?” त्याने निरखून पहिले आणि म्हणाला “ हो रे.. कोणी तरी आहे तिथे.. “ आता मात्र मला भीती नाही पण उत्सुकता वाटू लागली. आणि कोण आहे हे पाहायचे ठरवले. मी मित्राला घेऊन त्या दिशेने चालायला सुरुवात केली. 

काही पावले चालत आम्ही जसे त्या झाडाजवळ येऊ लागलो तसे अचानक झाडामागचे ते जे काही होतं ते झाडीतल्या भागात गेल्यासारखं वाटल. आणि आम्हाला खात्री पटली की इथे नक्की काही तरी आहे. आधी झाडामागे उभ असल्याच जे वाटत होतं तो भास नव्हता. आम्ही दोघ झाडामागे जाऊन झाडीत गेलो, त्या काळी नोकिया फोन्स होते आणि माझ्या कडे असलेल्या फोन ला फ्लॅश लाईट होता. त्याच्या प्रकाशात आम्ही कोणी दिसतंय का ते पाहू लागलो. आणि जे आम्हाला दिसले ते मी आज पर्यंत विसरू शकलो नाही. त्या झाडीत एक. बाई सदृश्य आकृती बसली होती.

लांबसडक केस, हात पाय एखाद्या लाकडाच्या काडीसारखे आणि पांढरे शुभ्र डोळे ज्यात बुबूळ नव्हती. ती आमच्याकडे पाहून एक निर्वीकार हास्य करत होती. माझ्या हातून मोबाईल खाली पडला आणि आमच्या तोंडून एकही आवाज निघेना. मी मोबाईल उचलला आणि आम्ही तिथून कसाबसे पळत बाहेर आलो. बाकीचे मित्र अजून तिथेच होते. त्यांना काही समजायच्या आत आम्ही म्हणालो, “चला… लगेच.” त्या रात्री आम्ही सगळे आपापल्या घरी पोहोचलो. कोणालाही त्या घटनेबद्दल काही बोलायचं धाडस झालं नाही. आजही त्या भागातून जाणं झालं की नकळत माझं लक्ष त्या झाडाकडे जातं. झाडाखाली काहीच नसतं….पण तरीही, वाटतं – कोणी तरी आहे तिथे. अजूनही.

Leave a Reply