अनुभव – आदित्य सुतार

२०१८ चा डिसेंबर महिना. थंडीचा ऋतू होता, आणि सणासुदीच्या वातावरणाने संपूर्ण घर आनंदाने भारले होते. या वेळेस आनंदाचं आणखी एक कारण होतं – आमच्या मोठ्या ताईचं लग्न. घरात लगबग, लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा, आणि नाचगाणी अशी लग्नाची धामधूम होती. लग्न अतिशय सुंदर पार पडलं आणि अखेर ती वेळ आली, जी प्रत्येक कुटुंबासाठी जड जाते – वधूची पाठवणी. ताईचं लग्न झालं आणि आम्ही भावंडं तिच्या सासरी तिला सोडायला गेलो.

रात्री साधारण ९:३० वाजता तिच्या घरी घरभरणीचा सोहळा पार पडला. घरच्यांनी आमचं भरभरून स्वागत केलं. जेवण झालं, मानपान उरकले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही चार भावंड होतो आणि दोन बाईक घेऊन निघालो होतो. एक बाईक मी आणि माझा भाऊ चालवत होतो, तर दुसऱ्या बाईकवर आमचे दोन चुलत भाऊ होते. साधारण १०:३० वाजले असतील. ताईच्या सासरच्या घरापासून ३-४ किलोमीटर पुढे आलो असू. कोकणातल्या त्या वाटा, गर्द झाडीने वेढलेल्या रस्ते आणि तिथली नीरव शांतता थोडी भितीदायक वाटत होती. झाडांच्या फांद्या वार्‍याने हलत होत्या आणि क्वचितच एखादी गाडी त्या रस्त्यावरून जाताना दिसत होती. आम्ही थोडं पुढे होतो, तर दुसरी बाईक आमच्या थोड्या अंतराने मागे येत होती. तेवढ्यात आम्हाला रस्त्याच्या कडेला एक बाईक दिसली. त्या बाईकवर दोन प्रवासी बसले होते. ते मदतीसाठी हात दाखवत होते. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो, पण मनात एक विचार आला की, “रात्रीच्या वेळी कोणी अडचणीत असतील तर मदत करावी.” म्हणून आम्ही हळू गतीने गाडी थांबवली.

तितक्यात आमची दुसरी बाईकही मागून जवळ आली आणि त्यावरचा माझा चुलत भाऊ चिडून म्हणाला, “काय रे, येडे झालात का? मध्येच अचानक बाईक थांबवली आहे!” आम्ही त्याला सांगितलं, “पाठी जे बाईक वर थांबले आहेत, त्यांची मदत करावी असं वाटलं.” इतक बोलून मी मागे इशारा करत त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आमच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले! तिथे कोणीही नव्हतं. ना ती बाईक ना त्यावर बसलेले दोघे इसम. हो, अगदी डोळ्यासमोर गायब झाले होते ते… आम्ही एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांचे चेहरे भयचकित झाले होते. काही क्षण आम्ही सुन्न होतो. अंगभर सरसरून काटा आला. काहीही न बोलता आम्ही गाड्या चालू केल्या आणि भरधाव वेगाने घराच्या दिशेने निघालो.

घरी पोहोचल्यावर श्वास सावरत आम्ही अनुभवलेलं सगळं घरच्यांना सांगितलं. आजीने आमचं ऐकताच देवासमोर हात जोडले आणि म्हणाली, “नशीब तुमचं चांगलं की गाडीतून उतरला नाहीत. त्या ठिकाणी असं नेहमी दिसतं. रात्रीच्या वेळी तिथ कोणीही थांबत नाही..” हे ऐकताच पुन्हा तो क्षण डोळ्यासमोर आला. जेव्हा आम्ही त्या दोघांजवळून गेलो, त्यावेळी काहीतरी विचित्र जाणवलं होतं. मला आता स्पष्ट आठवत होतं – त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. हो, त्यांचे डोळे नव्हते! त्याजागी पोकळ रिकाम्या खोबण्या होत्या.. ते दृष्य आठवून मनात भीतीने अगदी चेर्रर्रर्र झालं. आम्ही थोडक्यात वाचलो होतो. हा प्रसंग आम्हा चौघांच्या मनावर कायमचा कोरला गेला. आजही आम्ही त्या रात्रीची आठवण काढली, की अंगावर काटा येतो. कोकणातल्या त्या भयावह रस्त्यावर आलेला हा अनुभव आमच्या आयुष्यातला सर्वांत भयानक अनुभव ठरला!

Leave a Reply