अनुभव – सलोनी सात्विडकर
आज मी माझ्याबरोबर घडलेला एक खरा अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते. ही गोष्ट माझ्या लग्नानंतरची आहे आणि ती अजूनही माझ्या मनात तशीच ताजी आहे.
माझ्या लग्नानंतर आम्ही रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वीराग चाळीत राहायला गेलो. ती चाळ, तो परिसर आमच्या साठी नवीन होता. तिथे राहायला येउन आम्हाला अवघे काही दिवस झाले होते. माझे पती मुंबई विमानतळावर काम करत असल्याने त्यांना अनेकदा रात्री उशिरा घरी यावे लागायचे. मी घरात एकटी असायचे, त्यामुळे सुरक्षिततेसाठी आम्ही एक संकेत ठरवला होता.. ते जेव्हा दरवाज्यावर तीन वेळा ठोठावतील, तेव्हाच मी दरवाजा उघडणार!” त्या काळी माझ्या पतींना रेल्वे स्टेशनवर उतरून घरी येण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून जंगलपट्टीच्या भागातून यावे लागायचे.
तिच वाट त्यांना सोयीस्कर वाटायची कारण तिथून आल्यावर आमची चाळ समोरच होती. एका रात्री त्यांना घरी लवकर यायला मिळाले. पण ती रात्र काही वेगळीच भासत होती आम्हाला. एक विचित्र शांतता, ना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ना रात्कीड्यांची किरकिर.. वारा मंद गतीने वाहत होता आणि त्यात अजब गारवा होता. रात्रीचे दीड वाजले होते. आमचा तो परिसर अगदी शांत होता. आजूबाजूच्या घरातली सगळी लोकं कधीच निद्रच्या आहारी गेली होती. आम्ही आमच्या खोलीत सिनेमा पाहत बसलो होतो. तेव्हा अचानक दरवाज्यावर ठोठावण्याचा आवाज आला!”
(💥 ठक ठक ठक… )
माझा नवरा उठून दरवाजा उघडायला जाणार तितक्यात मी त्याला थांबवलं आणि हळू आवाजात म्हणाले “ “श्श्श्श… कोण असेल? रात्री एवढ्या उशिरा कोण येईल? नको उघडूस दरवाजा राहू देत.. “. त्याने होकारार्थी मान हलवली आणि आम्ही टीव्ही बंद करून झोपायला गेलो. दरवाज्याला लागूनच एक खिडकी होती. मला इतकी भीती वाटत होती की मला त्या खिडकी कडे पाहवत ही नव्हतं. पण त्या रात्री खूप भयानक गोष्ट घडली. काही वेळा पूर्वी बाहेर कोण आलं होतं या विचाराने आम्हा दोघांनाही झोप लागत नव्हती. शेवटी न राहवून काही वेळानंतर
माझ्या पतींनी हळू आवाजात माझ्या कानात विचारले, “कोण होतं ग? काय वाटत तुला? जे कोणी असेल ते गेलं असेल कां आता?” हा प्रश्न त्यांनी माझ्या कानात अगदी पुट पुटला होता पण तरीही पुढच्या क्षणी दाराजवळच्या खिडकीतून आवाज आला “ नाही.. मी अजूनही बाहेरच उभी आहे.. “
तो आवाज ऐकून आम्हा दोघांच्याही अंगावर सरसरून काटा आला. माझे पती तर खूप हळू आवाज अगदी माझ्या कानात पुट पुटले होते तरीही बाहेर आवाज कसा काय गेला. ती रात्र वैऱ्याची होती बहुतेक.. आम्हाला ग्लानी येउन जणू आम्ही बेशुद्ध च पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 12.30 झाले तरीही आम्ही उठलो नाही. शेजाऱ्यांना सौंशय आला म्हणून त्यांनी आम्हाला हाका मारायला सुरुवात केली, दरवाजा वाजवू लागले. त्या आवाजाने शेवटी आम्हाला जाग आली. आम्ही रात्रीचा सगळा प्रसंग त्यांना कथित केला तेव्हा शेजारी म्हणाले “हो, इथे एका स्त्री चा फेरा आहे… ती जवळच्या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करून मेली होती. तेव्हापासून ती चाळीत फिरताना दिसते!’” खर सांगायचं तर त्या रात्रीचा तो आवाज मी कधीच विसरू शकत नाही. ही गोष्ट आजही आठवली की अंगावर शहारा येतो.