अनुभव – ऋतुजा धुरी

त्या दिवशी मी माझ्या जुन्या शाळेतल्या मैत्रिणीला मयुरीला भेटले होते. खूप वर्षांनी भेट होत असल्यामुळे आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो. गप्पांच्या ओघात तिने शाळेत असताना सांगितलेली एक भयानक घटना आठवली जी तिच्या मावशीच्या बाबतीत घडली होती. एक अशी घटना, जी आजही तिच्या कुटुंबासाठी गूढच आहे. मयुरीची मावशी त्यावेळी सात महिन्यांची गरोदर होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते सगळे गावी गेले होते. मयुरी, तिचे आई वडील, तिची मावशी आणि मावशीचे मिस्टर. गाव तसं निसर्गरम्य, शांत, पण रात्रीच्या वेळी तिथं गूढ शांतता पसरायची. त्या रात्री मयुरी, तिची आई आणि मावशी माळ्यावर झोपले होते. तर मयुरी चे वडील आणि मावशीचे मिस्टर खाली झोपले होते. रात्री साधारण अडीच-तीन वाजताचा सुमार असेल. मावशीला अचानक पोटात दुखून आलं आणि टॉयलेट ला जावंसं वाटलं. तिने बाजूला झोपलेल्या मायुरीच्या आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गाढ झोपेत होत्या. शेवटी, एकटीच उठून मागच्या अंगणात असलेल्या शौचालयाकडे गेली.

सगळं उरकून ती बाहेर आली. बाहेर पाऊल ठेवलं, तोच तिला समोर मयुरी दिसली! त्या काळी तिचं वय 11 वर्ष असेल. घरातून येणाऱ्या ब्लब च्या अंधुक प्रकाशात ती उभी दिसत होती.  त्या अंधाऱ्या रात्रीच्या गडद सावलीतही तिला मयुरी स्पष्ट ओळखून आली.  “अगं मयू, तू इकडे काय करतेस?” मावशीने गोंधळून विचारलं. मयुरीने नॉर्मल आवाजात उत्तर दिलं, “काही नाही, मला पण जायचं होतं. तू माझ्या सोबत थांबतेस का?” मावशीने थोडंसं हसतच मान हलवली, “बरं, थांबते. जा पटकन जाऊन ये.” मावशी काही वेळ शौचालयाच्या बाहेरच थांबली. दहा मिनिट झाली, पंधरा मिनिट झाली तरी मयुरी बाहेर आली नव्हती. तसे मावशीने हाक दिली “ अग मयुरी झालं कां..? किती वेळ.. “ पण आतून तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. तिने 2-3 मिनिट वाट बघून दार वाजवल. “ मयु दार उघड.. काय झालं.. “. आता मात्र मावशीला काळजी वाटू लागली. तिने दरवाजा वाजवायला सुरुवात केली पण मयुरी आतून कसलाच प्रतिसाद देत नव्हती. 

मावशीने घरी येउन तिच्या मिस्टरांना आणि माझ्या बाबांना उठवलं. तिच्या आवाजाने माळ्यावर झोपलेली मयुरीची आई उठून खाली आली. मावशीने त्यांना घडलेलं सगळं सांगितलं. तसे मयुरीची आई चक्रावली आणि म्हणाली “ तू जे बोलतेय ते कसे शक्य आहे..? मयुरी तर माळ्यावर माझ्या बाजूला झोपली होती..? ती अजूनही तिथेच झोपली आहे.. ती कुठेच गेलेली नाही. हे ऐकताच मावशी माळ्यावर गेली आणि पाहते तर काय “ मयुरी आंथरुणात गाढ झोपली आहे.. “ पण तरीही तिने मयुरी ला उठवले आणि विचारू लागली “तू बाहेर गेली होतीस का?” मयुरीने अर्धवट झोपेतच नकारार्थी मान हलवली. ती रात्री कुठेही गेलीच नव्हती! त्या क्षणी सगळ्यांच्या लक्षात आलं ती खरी मयुरी नव्हती. कोणीतरी दुसरंच तिच्या रूपात आलं होतं! मयुरीची आई आणि मावशी पूर्णपणे हादरल्या. त्या रात्री कोणतीतरी अमानवीय शक्ती मावशीच्या वाटेवर आली होती बहुतेक. नशीब, तिला आणि तिच्या बाळाला काही झालं नाही.  आजही, मयुरी जेव्हा त्या रात्रीचा विचार करते, तेव्हा सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो.. कारण त्या रात्री तिथे नक्की कोण होतं हे अजूनही एक अनुत्तरित गूढच आहे!

This Post Has One Comment

  1. Nandkumar Makasare

    Bhayanak

Leave a Reply to Nandkumar Makasare Cancel reply