अनुभव – सागर कदम
मी उल्हासनगर मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव आजही आठवला की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. घटना जवळपास 10 वर्षांपूर्वी ची आहे. जुन्या काळी गावाला आमची शेती होती पण आम्ही शहरात राहायला आल्यामुळे माझ्या आजोबांनी ती त्यांच्या मित्राला सांभाळायला दिली होती. साधारण 35 वर्षांपूर्वी ती शेती त्याच मित्राने 50 हजारात विकत घेतली. खरं तर फक्त करार झाला होता पैसे दिले नव्हते. आजोबांचा मित्र असल्यामुळे आम्हीही कधी पैश्यांचा तगादा लावला नाही. नंतर मित्र असल्यामुळे शेती त्यांच्या मुलाच्या नावावर करण्यात आली. ते पैसे अजूनही त्यांनी दिले नव्हते पण 2015 मध्ये अचानक त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की पैसे आले आहेत आता तर मी तुम्हाला ते द्यायला शहरात येतो. पण मी आणि माझा भाऊ आमचे गाव पाहायला खूप उत्सुक होतो. मी तरी एकदाही माझे गांव पहिले नव्हते. म्हणून आम्ही त्यांना म्हंटल की आम्ही च येतो तिथे पैसे घ्यायला. वडिलांची परवानगी घेऊन आम्ही गावाला निघालो.
शहरापासून गावाकडे जायला एसटी होती. त्यामुळे आम्ही एसटीने गावाकडच्या बस स्टैंड वर उतरलो पण तिथे उतरल्यावर आम्हाला कळलं की आमचं गावातलं घर त्या एसटी स्टँड पासून जवळपास सहा किलोमीटर आहात आहे. मग साधारण अर्धा पाऊण तास तिथेच थांबलो. एखादी रिक्षा किंवा काही मिळतंय का हे पाहण्यासाठी. तासाभरानंतर एक एक वाहन मिळालं आणि आम्ही सकाळी साडेदहाला काकांच्या घरी पोहोचलो. आम्ही गेल्या गेल्या काकांनी त्यांच्या घरच्यांची ओळख करून दिली. तेव्हा घरी ते काका त्यांची बायको त्यांची एक नात आणि एक नातू असे चौघेजण होते. ती मुलगी जवळपास 13 ते 14 वर्षांची असेल. ती मुलगी मात्र माझ्याकडे पाहून हसत होती जणू मला चिडवत होती कारण माझ्या केसांची हेअर स्टाईल खूप वेगळी होती. का कोण जाणे तिच्याकडे पाहून मला वेगळंच वाटलं म्हणजे ती थोडी विचित्र वाटली मला. पण मी जास्त लक्ष दिलं नाही. काकांनी आग्रह केल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जेवण उरकलं आणि आमचं घर जे काकांच्या घराच्या अगदी बाजूला होतं तिथे गेलो.
बऱ्याच वर्षांपासून ते घर बंद होतं त्यामुळे सहाजिकच खूप धूळ कचरा जाळोखी ,जमा झाली होती. आम्ही दोघांनी साफसफाई करायला सुरुवात केली. पण इतका धुळीचा थर साचला होता की विचारायला नको. जवळपास संपूर्ण दिवस गेला तरीही पूर्ण साफसफाई झाली नव्हती. आम्ही दोघ ही पार थकून गेलो होतो. आम्हा दोघांनाच सगळे काम करताना पाहून ते काका त्यांची पत्नी तेही आम्हाला येऊन मदत करू लागले. त्यांना आम्ही नको म्हणालो पण त्यांनी ऐकलं नाही. घर पूर्ण नाही पण बैऱ्यापैकी साफ झालं. जास्त दिवस नाही पण एक ते दोन दिवस तिथे राहण्याचा बेत होता. संध्याकाळ झाली होती. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही बाहेर अंगणात खाट टाकून थंड हवेची मजा घेत होतो. गावातल वातावरण आल्हाददायक वाटत होतं. तितक्यात अचानक काकांच्या घरातून ती मुलगी जोरात धावत बाहेर आली.
बहुतेक ती मांजरीच्या मागे धावत होती आणि तिच्या हातात कातर होती. ती ओरडतच बाहेर आली आणि तिने ती कातर त्या मांजरीच्या दिशेने भिरकावली. आता ती मांजर आमच्या समोरून पळाली आणि ती कातर तिला लागण्या ऐवजी थेट माझ्या खांद्याला लागली. अगदी जोरात. जखम खोलवर झाली नसली तरीही बरेच लागले होते. मला खूप वेदना होऊ लागल्या कारण कातरीचे टोक जोरात घासून मोठी चीर पडली होती. त्यातून खूप रक्त वाहू लागलं. वेदनेने मी विव्हळत होतो. मी रागा रागात त्या मुली जवळ गेलो आणि तिच्या कानशिलात लगावणार तसे मला माझ्या भावाने अडवले. त्याने अगोदर त्याचा रुमाल काढून माझ्या जखमेवर घट्ट बांधला जेणेकरून रक्त प्रवाह थांबेल आणि मग मला समजावत म्हणाला, “हे बघ सागर, आपण इथे फक्त 1-2 दिवसासाठी आलो आहोत, भांडण करून जायचं? आणि तसही ती पोरगी लहान आहे, तिने काय मुद्दाम तुला मारलं नाही. आणि ते काका काकू किती चांगले आहेत ते बघ. आपल्याला त्यांनी किती मदत केली. तुझा राग शांत कर..” दादाचं बोलणं मला पटलं आणि मी शांत झालो.
मला नंतर कळलं की ती मांजर तिच्या ताटातला एक नॉन व्हेज चा तुकडा उचलून बाहेर पळाली आणि म्हणून ती मुलगी रागात तिच्या मागे आली होती. पण इतके सगळे होऊन ही ती मुलगी माझ्या कडे पाहून कुतसित पणे हसत होता. ते पाहून गेलेला राग पुन्हा आला. ही मुलगी खरंच वेडी आहे बहुतेक. मी मनाशीच विचार केला. तेवढ्यात ते काका तिकडे आले आणि त्यांनी माझी जखम बघितली आणि पटकन त्यांच्या पत्नीने माझ्या जखमेवर भरपूर हळद आणून लावली कारण हळदीने रक्त वाहणं थांबतं. आणि तिकडे साधा कपडा बांधला. आम्ही दोघ ही घरात आलो तितक्यात मला माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आला, ती बोलली की “मला करमत नाही, मी पण तुझ्याकडे येतेय गावाला. मी आता ट्रेनमध्ये बसलेय.” हे ऐकून मला अजून राग आल. कारण ती असे तडका फडकी कसा काय निर्णय घेऊ शकते, ते ही मला न विचारता. आणि ती रात्री एकटी कशी येणार. मूर्खपणा करत इथे एकटी यायला निघू नकोस असे रागातच बोलत मी फोन कट केला..
रात्रीचं जेवण आम्ही त्या काकांच्या घरीच केलं. जेवण झाल्यावर ते काका बोलले की “तुम्ही आमच्या घरीच झोपा. तुमच्या घरात लाईट फॅन काहीच नाही, कशी झोप येईल तुम्हाला?” खरं तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं. साफ सफाई केली पण वीज..? ना वीज ना घरात पंखा, लाईट. आम्ही शहरात लहानाचे मोठे झालो होतो. पंख्या शिवाय झोप आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो. पण त्या काकांचं घर खूप छोटं होतं, जागा पुरली नसती म्हणून मी एकटा आमच्या घरात झोपायला गेलो. दादा पण येत होता पण मी बोललो की “अरे दादा आता ते एवढं बोलत आहेत तर झोप ना त्यांच्या घरात.” दादाला माझं बोलणं पटलं आणि तो झोपायला गेला. इकडे मी आमच्या घरात एकटाच खिडकीच्या बाजूला खाट टाकून झोपलो होतो, ना लाईट ना फॅन. खरं सांगू तर वेगळचं वाटत होतं.
माझ्या बाजूला असलेल्या खिडकीतून थंड हवा येत होती. साधारण 12.30 ला मला झोप लागली. रात्री अचानक मला कुणाचा तरी आवाज आला आणि झोपमोड झाली, आवाज खूप ओळखीचा होता. मी पटकन मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे २:३० वाजले होते. खिडकीत माझी गर्लफ्रेंड उभी होती. तिला बघून मी विचारात पडलो. आपल्याला भास होतोय की ही खरंच इथे आली आहे. मी काही विचारणार तेवढ्यात ती बोलली की “अरे मी तर तुला आधीच सांगितलं होतं की मी ट्रेनमध्ये बसलेय पण तूच माझा कॉल कट केला. मी घरी सांगितलं होतं की मी सहलीला जाणार आहे आणि तुझ्याकडे आले. तुला माझ सरप्राइझ आवडलं कां..?” मी काहीच बोललो नाही, फक्त तिच्याकडे बघतच राहिलो. या वेळेस ना राग होता ना ती गावाकडे आल्याचं आश्चर्य. ते बोलतात ना अश्या वेळेला हुशार व्यक्तीला ही काही उमगतं नाही.
माझी अवस्था तशीच काहीशी झाली होती. मी तिला म्हणालो “तु आता आलीच आहेस तर बाहेर का उभी आहेस, आत ये.” तर ती बोलली “अरे नको, इथे येताना वाटेत खूप मस्त जागा बघितली. मला तुझ्यासोबत पुन्हा तिथे जायचे आहे. चल ना रे.. आपण थोड्या वेळ फिरून मग घरी येऊ..” ती इतकी प्रेमाने बोलली की मला तिला काही बोलताच आलं नाही. मी उठून दाराच्या दिशेने जाऊ लागलो तसे ती पटकन म्हणाली “अरे दार कशाला उघडतोय आता.. इतके फिरून येण्या पेक्षा इथूनच खिडकीतून ये..” खिडकी मोठी असल्यामुळे तिथून सहज बाहेर जाता येणार होतं. मी ही जास्त विचार न करता खिडकीतून उडी मारून बाहेर आलो. मला बघून ती खूप खुश झाली. तिने माझा हात पकडला आणि आम्ही दोघं गावातल्या रस्त्यावरून फेरफटका मारू लागलो. परिसर अगदी निर्मनुष्य होता. रात्रीचे अडीच पावणे तीन झाले होते. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं. वातावरण खूप शांत होतं. हलकासा गारवा जाणवत होता. अधून मधून दूर कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा. चालत असताना माझेच जास्त बोलणे सुरु होते. ती मात्र माझं सगळं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होती.
चालत चालत आम्ही घरापासून खूप लांब पोहोचलो असू पण प्रेयसीचा हात हातात होता म्हणून मी ही चालत राहिलो. अचानक माझ्या खिशात असलेला माझा मोबाईल जो सायलेंट मोड वर होता तो वायब्रेट झाला आणि बऱ्याच वेळेपासून शांत असलेली माझी गर्ल फ्रेंड अचानक बोलली “फोन अजिबात उचलू नकोस.” मी तिला ठीक आहे म्हंटल. कदाचित तिला डिस्टरबन्स नको होता. पण नंतर सहज मनात विचार आला की वायब्रेशन इतकं स्लो होतं की मला ही कळायला वेळ लागला पण तरीही हिला कसं समजलं की मोबाईल वाजला? मी हळू हळू भानावर येऊ लागलो. मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. बसस्टॉपपासून घर ६ किमी लांब आहे आणि हे खेडेगाव असल्यामुळे गाड्या रात्री ८:०० लाच बंद होतात मग ही आलीच कशी? आणि मी येताना किंवा नंतर फोन वर बोलताना हिला गावाचा पत्ता ही दिला नव्हता, तरी सुद्धा ही बरोबर माझ्या घराजवळ किंबहुना घराच्या थेट खिडकी जवळ कशी आली. हिला कसे काय माहित मी घरात कुठे झोपलो आहे..
आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे माझ्या हातावर एवढी मोठी जखम असूनसुद्धा तिला एकदाही माझी विचारपूस करावीशी नाही वाटली..? काय झाले काय लागले तिने एकही प्रश्न विचारला नव्हता. मला काही तरी चुकत असल्याची जाणीव होऊ लागली. तसे ती माझ्या हाताची पकड हळूहळू घट्ट करू लागली. एवढ्या थंडीमध्ये ही मला घाम येऊ लागला. माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाढू लागले. आणि तेवढ्यात एक मेसेज आला. मला माझा फोन पाहायचा होता. पण हिने आत्ताच सांगितले की फोन पाहू नकोस. काय करू. एखादा महत्वाचा मेसेज कॉल असेल तर.. घरी सगळे ठीक असेल ना.. शेवटी न राहवून तिच्या नकळत झटकन मोबाईल काढून स्क्रीन ऑन केली. त्यात एक मेसेज होता माझ्याच गर्ल फ्रेंड चा.. “हाय सागर, मी केव्हा पासून तुला कॉल करतेय. उचलत का नाहीयेस. ठीक आहेस ना.. मला झोप येत नाही म्हणून कॉल करतेय कधी पासून.. प्लिज कॉल रिसिव्ह कर”
तो मेसेज बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जर माझ्या गर्लफ्रेंड चा मेसेज आलाय तिला झोप लागत नाहीये.. म्हणजे ती तिच्या घरी आहे.. पण मग मी जिच्या सोबत गेल्या तासाभरापासून आहे ती कोण आहे? मी प्रचंड घाबरलो. करण माझा हात अजूनही तिच्या हातात होता. मी भीती ने थरथर कापत होतो. पुन्हा फोन वाजू लागला आणि मी कसाबसा फोन रिसिव्ह केला. तेवढ्यात ती जोरजोरात हसू लागली “काय रे? मी तुला बोलली होती ना की फोन उचलू नकोस, तर मग कसा काय उचललास तू?” माझी तर बोबडीच वळली. मला ओरडायचं होतं पण माझ्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. मला तिकडून पळायचं होतं पण माझे पाय मला साथ देत नव्हते. माझ्या डोळ्यांदेखत तिचं रूप बदललं. तिच्या अंगावर एक काळसर डागांनी माखलेली जुनी साडी होती, जी वाऱ्याने अलगद हलत होती. तिचा देह इतका उंच झाला होता की ती जवळपास सहा फुटांहूनही उंच भासत होती. उंचीमूळे मान एका विशिष्ट कोनात वाकली होती. त्यात तिची भयानक लांब जीभ तोंडातून सळसळत बाहेर आली होती – काळसर-हिरवट रंगाची… तिचे डोळे – ते लाल भडक रक्तासारखे भासत होते. तिचे केस काळे कुट्ट, भिजलेल्या शेवाळासारखे चेहऱ्यावर पडलेले होते. ती आता अतिशय वेगळ्या घोगऱ्या आवाजात बोलू लागली.. “ माझ्यासोबत चल.. इथपर्यंत आलास.. तुला काहीतरी सांगायचं आहे.” मी इतका घाबरलो होतो की देवाचे नाव घेण्याशिवाय मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. म्हणून मी जोरजोरात हनुमान चालीसा बोलू लागलो. ती माझ्याकडे रागाने बघू लागली. हनुमान चालीसा जशी सुरु केली तिने माझा पकडलेला हात झटकात सोडवला..
मला समजून चुकलं होतं की मी आज काही जिवंत वाचत नाही. मी होता नव्हता तेवढा जोर लावून पळू लागलो. मागे बघायची माझ्यात हिंमत नव्हती.
पण काही क्षणात चं जाणवलं की ती माझ्याच वेगात अगदी माझ्या बाजूने पळतेय. मी किती ही वेग वाढवला तरी काहीच फरक पडत नव्हता. पुढे जे घडले ते खूप भीषण होतं. ती चक्क उलट फिरली आणि उलट्या पावलांनी त्याच वेगात धावू लागली. एव्हाना मला कळून चुकलं होतं की मी एका हडळीच्या तावडीत सापडलो आहे. धावत असताना माझ्या पायात काही तरी घुसलं तसे मी अडखळून खाली पडलो. पाहिलं तर एक खिळा घुसला होता. मी वेदनेने व्हिवळू लागलो आणि त्यातच हनुमान चालीसा बोलण्यात खंड पडला. तशी ती हडळ माझ्या दिशेने झेपावली. मला माझा मृत्यू डोळ्यांसमोर दिसू लागला. पण तितक्यात कुठून तरी एका गायीचं वासरू जे पूर्णपणे कुंकवान भरलेलं होतं ते जोरात धावत आलं आणि धडक दिली. त्या आघाताने मी बेशुद्ध झालो. जेव्हा जाग आली तेव्हा गावातल्या माझ्या घरात होतो. तापाने फण फणत होतो. मला बोलताही येत नव्हतं. आजू बाजूला काही गावातले म्हातारे लोक होते आणि माझा भाऊ होता. मी झालेली घटना कशीतरी एका कागदावर तोडकी मोडकी लिहिली. तेव्हा एक वृद्ध माणूस म्हणाला की ” गावातलीच असेल ती.. लग्न ठरलं होतं तिचं. हळदीच्या रात्री बाहेर पडली आणि परत आलीच नाही. सकाळी तिच प्रेत गावातल्या विहिरीत सापडलं.. तिचा मृत्यू कसा झाला हे रहस्य आहे.. पण या गावात अशी मान्यता आहे की ओल्या हळदीच्या अंगाने जर कोणा स्त्रीचा मृत्यू झाला तर तीला हडळ योनी प्राप्त होते. ती कोणाचेही रूप घेऊ शकते. तुझ्या हाताला लागलेल्या हळदीचं तिला आकर्षण झालं असेल म्हणून ती तुला भुलवून घेऊन गेली..
हे ऐकून मी जास्तच आजारी पडलो आणि लगेच भावासोबत उल्हासनगरला निघालो. आजही रात्री ११ नंतर मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत एकटं कुठे जाण्याची हिंमत करू शकत नाही कारण ती मला त्याच रूपात भेटली होती..