लेखक – रोहित पांढरे

काही गोष्टी आपल्यासोबत का घडतात हे माहीत नाही. जितक आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तितकं आपलं अज्ञान, मूर्खपणा आणि शुल्लकपणा लक्षात येतो. असाच एक प्रसंग तुम्हाला सांगतो. पण कथेला सुरुवात करण्या आधी महत्वाचे.. जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल..

माझ्या कॉलेजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर मी सुट्टी घालवत होतो. एक दिवस घरी बसून कंटाळा आला होता, म्हणून बाहेर पडलो. संध्याकाळची वेळ होती. पावसाचे दिवस सुरू होते, पण त्या दिवशी पाऊस जास्त नव्हता, म्हणून छत्री न घेता बाहेर पडलो. काही अंतर पार केल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाण्यापासून बचाव करण्यासाठी एका चहाच्या टपरीजवळ थांबलो. पाऊस थांबेपर्यंत एक चहा संपवला. पाऊस थोडा कमी झाला, म्हणून चालत थोडं पुढे गेलो. पण अवघी 10 मिनिट झाली आणि पुन्हा पाऊस सुरु झाला. आता पून्हा मागे वळून टपरी पर्यंत जाणं शक्य नव्हतं म्हणून आजू बाजूला नजर फिरवली. तर जवळच असलेल्या एका शेड मध्ये शिरलो. पाहिलं तर ते फरसाण वैगरे चं दुकान होतं. तिथे दाबेली आणि बटरचा खमंग वास येत होता. एक दाबेली मागवली आणि खात बसलो. थंडगार वातावरणात गरमा गरम दाबेली खाताना खूप बरं वाटत होतं. तेवढ्यात विनायक समोर आला.

विनायक: अरे, तू इथे…? (हसत म्हणाला.)

मी: अरे भावा, सुट्टी होती आणि घरी बसून कंटाळा आला होता, म्हणून बाहेर पडलो… आणि आता ही दाबेली… तू घेणार?

विनायक: नको रे…

विनायकला दीड महिन्यापूर्वी स्विमिंग क्लासमध्ये भेटलो होतो. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता, पण कधीही वयानं अंतर जाणवू दिलं नव्हतं. पंधरा दिवसांचा तो क्लास संपल्यानंतर आमचं बोलणंही झालं नव्हतं.

त्यामुळे मी कुतूहलानं त्याची विचारपूस करू लागलो.

शेडमधले लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. आणि काही तरी कुजबुजत होते. मला वाटलं, कोणत्या तरी वेगळ्या माणसाकडे बघत असतील, म्हणून दुर्लक्ष केलं.

मी: आपण जवळच्या पार्कमध्ये जाऊन निवांत बोलू? वेळ आहे ना तुझ्याकडे?

विनायक: हो…

पावसामुळे पार्कमध्ये फारसं कोणी नव्हतं. आम्ही एका बाकड्यावर बसलो.

मी: अरे, तुझ्या कॉलेजच्या अ‍ॅडमिशनचं काय झालं? सुट्टीत काय केलंस?

विनायक: सगळं सांगतो, पण ऐकण्याची तयारी आहे का तुझी?

मी: हो… (त्याने अशा तऱ्हेने बोलणं नवीन होतं.)

विनायक: माझ्या आयुष्यात वीस दिवसांपूर्वी एक प्रसंग घडला…

वडील आजारी होते. चार महिने नोकरीवर गेले नव्हते. मी एमपीएससीची तयारी करत होतो. घरात पैसे येणं बंद झालं. नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मिळाली नाही. काही लोकांकडून पैसे उसने घेतले होते. ते वसूल करण्यासाठी ते लोक माझ्या मागावर होते.

मी: किती बाकी होते?

विनायक: बारा…

मी: बारा हजार?

विनायक: नाही, बारा लाख!

(मला प्रश्न पडला, याला इतक्या पैशांची काय गरज होती?)

विनायक: पैसे का घेतले, हे सांगू शकत नाही. पण प्रसंग नीट ऐक… मध्ये बोलू नकोस.

(मी शांत बसलो. त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.)

ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले होते ते माझ्या मागे लागले होते. माझा पाठलाग करत होते. आणि त्यांच्यापासून मी लांब पळत होतो. त्यातल्या एका माणसानं माझ्या दिशेने मोठा दगड फेकला आणि तो माझ्या पायाला लागला. तरीही मी धावत राहिलो. शेवटी एका अर्धवट बांधकाम चालू असलेल्या बंगल्यात शिरलो. गेटजवळ कोणी नव्हतं, म्हणून पटकन जिने चढत वर गेलो. तो बंगला तीन मजली होता. मी टेरेसवर लपून त्या लोकांकडे पाहत होतो. धावत आल्यामुळे धाप लागली होती. श्वास कमी पडत होता. त्यांनी बराच वेळ खालच्या भागात शोधाशोध केली आणि मग हताश होऊन तिथून निघून गेले. ते तिथून दूर गेल्यावर खाली येण्यासाठी निघालो. एक मजला खाली उतरलो, तेव्हा सीमेंटच्या ठोकळ्यावर एक मुलगी बसलेली दिसली. लांब केस, कमनीय बांधा, गोरा वर्ण. तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. ती बाहेरच्या दिशेने वळून बसली होती.

तिला असं तिथं बसलेलं पाहून काही क्षण माझी पावलं जागीच थांबली. पण नंतर मी तिच्या जवळ जाऊ लागलो. तिच्या बाजूने पाहिलं आणि थबकलो. ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती. पण नकळत पणे माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं आणि घाबरून मी दोन पाऊल मागे सरकलो. कमरेपासून खाली पायांमध्ये लाकडाचे तीक्ष्ण तुकडे घुसले होते. जीन्स फाटली होती, बटण उघडी होती. तरीही ती शांत बसली होती जस तिला काही झालचं नाहीये.. मी तिला काय झालं विचारणार, तेवढ्यात तिला माझी चाहूल लागली आणि तिने मान वळवली. माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मी खूप घाबरलो होतो पण तिच्या सौंदर्यानं मोहूनही गेलो होतो. तिचा चेहरा तिच्या शरीर यष्टीला शोभेल असा होता.. पण तिच्या लांब केसांनी तिचा गळा झाकला होता.

ती थंड स्वरात बोलली, ‘मला काय झालाय हे जाणून घ्यायचय ना तुला.?’

ती जणू माझ्या मनातलं म्हणाली होती जे साहजिकच मला तिला विचारायचं होतं.

‘हो… म्हणजे… हो…’ (मी अडखळत म्हणालो.)

‘त्या कोपर्‍यात जा. तुला सगळी उत्तरं मिळतील.’

तिने त्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात इशारा करून खुणावलं. एव्हाना मला कळून चुकलं होतं की हे जे काही घडतंय ते साधं सुध नक्कीच नाही. मी तिथून पळ काढायला एक पाऊल मागे टाकलं तितक्यात तिने माझा हात पकडला. लोखंडासारखा थंड स्पर्श! हो एखाद्या जिवंत माणसाचा स्पर्श असा कधीच नसतो.  ती विचित्र स्वरात म्हणाली, ‘राजा… जा ना तिकडे!’

त्या नंतर जणू मोहिनी घातल्या सारखा मी नाईलाजानं त्या कोपर्‍यात गेलो.

त्या वसुली करणाऱ्या लोकांपासून लपण्या साठी जेव्हा मी या अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात शिरलो होतो तेव्हा तर रात्र होती. पण त्या कोपऱ्यात जाताच वातावरण बदललं. बाहेरची हिरवी झाडं सुकली. आकाश जांभळं-निळं झालं. अचानक काही कामगारांचा आवाज येऊ लागला. खिडकीतून खाली पाहिलं तर काही कामगार लोखंडी सळ्या बसवत होते. माझ्यासोबत काय घडतंय याचा विचार करत असतानाच अचानक तीच मुलगी मागून धावत आली तिच्या पायात लाकडाचे तुकडे घुसले नव्हते, ना तिची पॅन्ट फाटली होती. बघता बघता तिने त्या खिडकीतून खाली उडी मारली. मी धड धडत्या काळजाने खाली पाहिलं तर खालच्या उभ्या लोखंडी सळयांवर जाऊन ती पडली होती. दोन सळया तिच्या गळ्यातून घुसून मानेतून बाहेर आल्या होत्या. त्याच सोबत तिच्या मानेच हाड तुटून बाहेर आलं होतं. जोरात आदळल्यामुळे स्लॅब च्या लाकडाच्या फळ्या तिच्या पायात घुसल्या होत्या. ते दृष्य पाहत असतानाच क्षणात परत अंधार झाला. आणि वातावरण पूर्ववत झालं. मी झटकन मागे वळून पाहिलं तर ती सिमेंट च्या ठोकळ्यावर बसलेली होती.. हो.. पुन्हा तशीच.. त्याच अवस्थेत.. आणि ती पुढे बोलू लागली..

‘त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडने मला फसवलं. ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं. आमच्यात खूप वाद झाला. रागानं मी त्याला एक कानफटात मारली. त्याने काय केले माहितीये, ठरत बॅगमधून पिस्तूल काढली. मला धमकावलं. जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या डोळ्यात मी पाहिलं होतं, माझा पिच्छा सोडविण्यासाठी तो मला कायमच संपवायला निघाला होता. हे जेव्हा घडलं तेव्हा हा मजला झाला होता पण भिंती झाल्या नव्हत्या. मी त्याच्यापासून वाचायला पळायला गेले आणि इथून माझा तोल जाऊन खाली पडले आणि..

‘आणि तेव्हापासून तुझ्यासारख्या तरुणाच्या शोधात होते… आणि तू मला भेटलास. माझं म्हणणं ऐकून घेतलस. मला माझं मन व्यक्त करायचं होतं. मसझ्यासोबत नक्की काय घडलं ते कोणाला तरी सांगायचं होतं..’

ते ऐकताच माझ्या अंगावर शहारा आला. ते तीक्ष्ण तुकडे, तिचे फाटलेले कपडे… आता सगळं समजलं.

मी जिवाच्या आकांताने पळत सुटलो!”

इतक बोलून विनायक शांत झाला.

मी: काय??? तू काय बोलतोय तुला तरी कळतेय कां..? शुद्धीत आहेस का? की घेऊन आला आहेस.? 

विनायक: अरे, भावा! चेष्टा केली. काल एक जुना चित्रपट पाहिला, त्याची स्टोरी सांगत होतो.

मी: खरंच?

त्याने उत्तर दिलं नाही. कदाचित ते देण्याचं टाळल. उठला आणि माझा निरोप घेऊन निघाला. .

तो रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या पायात लाकडाचे दोन तुकडे घुसलेले दिसले, झालेल्या जखमा दिसल्या. 

मी आवाज देणार, तोवर तो नजरेआड झाला. एक मिनिट.. तो आला तेव्हा त्याच्या पायाला तर काहीच झालं नव्हतं. मग आता त्याच्या पायावर इतक्या जखमा..

मी गोंधळलो आणि उठून तिथून जायला निघालो. 

तोच दाबेलीवाला हाक मारून म्हणाला, “ओह दादा.. तासभर कोणाशी बोलत होतात एकटेच बसून.. काय विचार लॉग वैगरे आहे का, यु ट्यूब वर चॅनल वैगरे..” 

नाही हो.. मी तर माझ्या मित्राशी बोलत होतो.

“हु.. मित्र.. कोणता मित्र.. कुठे होता. अहो गेले तासभर एकटे बडबडत होतात तुम्ही.. खोटं वाटतंय तर छत्रीवल्या काकांना विचारा..”

तिथे बाजूलाच छत्री दुरुस्त करणारे काका बसले होते मी त्यांच्याकडे पहिले तर ते म्हणाले “ बरोबर बोलतायत ते.. तू नक्की कोणाशी बोलत होतासं..?”

मी काहीच न बोलता खिन्न मनाने तिथून निघालो..

Leave a Reply