तुमच्याही ऑफिसमध्ये एक असा कोपरा असेल… जिथे कोणालाच एकटं थांबायला आवडत नाही. कुणी तिथं बसलं की अस्वस्थ वाटत. आमच्या ऑफिसचा तिसरा मजला असा होता. मी मुंबईतल्या एका MNC मध्ये सिनियर इंजिनीयर आहे. सगळं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. पण २०२२ च्या मार्चमध्ये, मला अचानक एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी नाईट शिफ्ट करायला सांगितली. प्रोजेक्ट क्रिटिकल होता, म्हणून ‘नाही’ म्हणू शकलो नाही. नाईट शिफ्ट ला फारसे लोकं नसायचे. एक HR, एक सिक्युरिटी गार्ड आणि आमच्या टेक टीमचे ४ लोकं. सगळे आपल्या जागी काम करत असत. पण मी ज्या डेस्कवर बसायचो तिथे मात्र कोणी फिरकायचे ही नाही. डेस्कच्या मागे एक मोठी काच होती – म्हणजे खिडकी. पण बाहेर अंधार इतका होता की त्यात स्वतःचं प्रतिबिंबच फक्त दिसायचं. माझं लक्ष सारखं त्या खिडकीकडे जायचं.
त्या दिवशी साधारण २:३० वाजता झोप उडवण्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारायला वॉशरूमकडे निघालो. 10 मिनिटांनी जेव्हा परत आलो तेव्हा त्या काचेकडे पाहून स्तब्धच झालो. कारण खिडकीच्या काचेवर एक हाताचा ठसा उमटलेला स्पष्ट दिसत होता… अगदी आतून. पण मी स्वतःला समजावल की कदाचित टीम मधलं कोणी इथं येउन उभ राहील असेल आणि त्यांच्या हाताचा ठसा असेल बहुतेक. दुसऱ्या रात्री आमचा एक टीम मेंबर सुजय आला नाही. त्याचं म्हणणं होतं की काल रात्री त्याला काहीतरी विचित्र स्वप्न पडलं, ऑफिस मधलं आणि उठल्यावर थंडी वाजत होती, ताप भरला होता. त्यामुळे आमच्या टीम मधले आम्ही तिघेच होते. साडेतीन वाजता, मी चहा प्यायला कँटीनकडे निघालो. ऑफिस मध्ये जास्त स्टाफ नसल्याने मोजकेच लाईट्स चालू होते. तिसऱ्या मजल्याचा शेवटचा कॉरिडॉर पार करताना अचानक लाइट्स बंद झाले… आणि एका स्त्रीच्या विवाहळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला..
मी एकदम मागे वळलो आणि लगेच खिशातून फोन काढून फ्लॅश लाईट सुरु करण्याचा प्रयत्न करू लागलो.. पण तितक्यात पॅसेज मध्ये दोन लाईट्स आवाज करत सुरु झाले. मी पहिले तर त्या पैसेज मध्ये कोणीही नव्हते.. मग तो रडण्याचा आवाज्.. मी घाई घाई ने माझ्या डेस्क जवळ आलो तर त्या काचेच्या बाहेरच्या बाजूला एक सावली उभी दिसली. अंगावर सर्रकन काटा येउन गेला. माझी पावले मागे सरकू लागली. तिथून काही अंतरावरच टीम मधला एक मुलगा होता पण तो कामात मग्न असल्या कारणाने माझ्याकडे पाहत नव्हता. मी दाबक्या पावलाने त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो समोर काचेत बघ. त्याने पहिले आणि म्हणाला “कुठे काय..”.. मी त्याला पुन्हा म्हणालो “ तुला ते जे काही आहे ते दिसत नाहीये कां..? “
तसे तो चिडूनच म्हणाला “मला वेड्यात काढू नकोस.. काम कर खूप पेंडिंग आहे..” याचा अर्थ ती सावली फक्त मलाच दिसत होती. मी निमूटपणे जाऊन माझ्या डेस्क वर बसलो आणि कशी तरी शिफ्ट पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जाण्याची इच्छाच नव्हती. पण त्या दिवशी मी ठरवलं की काहीही झालं तरी फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं. पण मनात एक भीती दाटून राहिली होती. साधारण १:४५ वाजता, मी headphones घालून लॉग इन डेटा चेक करत होतो. तेवढ्यात मला वाटलं कुणीतरी माझ्या मागे उभं आहे. मी हलकेसे डोळ्याच्या कडेनं पाहिलं… आणि… माझ्या खुर्चीच्या मागे एक स्त्री उभी होती. लांबसडक काळेभोर केस पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता… पण तोंडातून हलक्या आवाजात एक वाक्य सतत बोलत होती…
“मी अजूनही इथंच आहे…”
मी उठलो आणि धावत बाहेर आलो. सिक्युरिटीला सांगितलं… पण तेव्हा ते फक्त हसले आणि म्हणाले “सर, याआधीसुद्धा काही लोकांनी अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. पण इथे काही नाही..” मला माझ्या डेस्क वर जाण्याची इच्छा नव्हती पण तरीही सेक्युरिटी ला घेऊन चं मी तिथे गेलो, माझी बॅग उचलली आणि ऑफिस मधून बाहेर पडलो. अजूनही मी त्याच ऑफिस मध्ये आहे पण नाईट शिफ्ट कधीही करत नाही. आजही, जेव्हा मी रात्री उशिरा ऑफिसमध्ये थांबतो, तेव्हा ती खिडकी नुसती पाहिली तरी अंगावर सरसरून काटा येतो.