लेखिका – वृंदा पाटील
सायंकाळचे साडेसहा वाजले होते. आकाशात हळूहळू नारंगी रंग मिसळत होता, आणि दूर कुठेतरी गावाच्या कडेला मातीच्या रस्त्यावर धूळ उडवत शशांकची कार थांबली. कारमधून हसतखेळत उतरले चार मित्र – शशांक, आदित्य, विनय आणि अमित. शशांक हा त्या चौघांमध्ये सर्वात उत्साही आणि थोडासा धाडसी होता. मुंबईत एका मीडिया कंपनीत व्हिडीओ एडिटर म्हणून काम करणारा शशांक, सुट्ट्यांत काहीतरी थ्रिलिंग करण्यासाठी उत्साही होता. या वेळी त्यांनी ठरवलं होतं की शहरापासून दूर एका गावी जाऊन ट्रेकिंग करायचं. पण गावात पोहोचल्यावर त्यांच्या उत्साहाला एक नवे वळण मिळालं – गावकऱ्यांकडून त्यांनी ऐकल्या त्या जंगलाच्या भयाण गोष्टी… जंगलाचं नाव घेतलं की गावात शांतता पसरायची. त्या जंगलाबद्दल प्रत्येक गावकऱ्याची एक वेगळी कथा होती. कोणी म्हणायचं – “त्या जंगलात एक संन्यासी काळ्या जादूची साधना करायचा, त्याच्या मृत्यूनंतर त्याची आत्मा अजूनही भटकते.” कुणी सांगायचं – “जंगलातल्या मठात एका मुलीचा बळी देण्यात आला होता, आणि तिचा जीव अजून मुक्त झालेला नाही.” पण या सगळ्या गोष्टी शशांकला हास्यास्पद वाटत होत्या.
“अरे, ह्या गोष्टी फक्त लोक पळवण्यासाठी सांगतात,” तो म्हणाला.
“आपण फक्त फिरून येऊ जंगलात. काही वाईट केलं नाही, तर काही होणार नाही,” विनय म्हणाला.
सूर्य मावळतीला झुकत चालला होता. चारही मित्रांनी मोबाईल, टॉर्च आणि थोडंसं खाणं घेतलं आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या दिशेने निघाले. गावाची वेस ओलांडून पुढे आले तर जंगलाच्या सुरुवातीलाच, एक जुनाट बोर्ड दिसला – “प्रवेश निषिद्ध”.
“हे बघ, मुळात हेच आकर्षक आहे!” शशांक हसत म्हणाला.
जंगलात प्रवेश केल्यावर सुरूवातीला वातावरण आल्हाददायक वाटलं. पक्ष्यांचे आवाज, गार हवा, आणि आसपासची हिरवळ. पण काही अंतर गेल्यावर वातावरण बदलत गेलं. पक्ष्यांचे आवाज अचानक थांबले. आता फक्त वाऱ्याचा आवाज आणि पानांची सळसळ. तेवढीच काय ती उरली होती.
“काय वाटतंय?” आदित्यने विचारलं.
“जरा जास्तच शांत नाही का?” विनय थोडासा कुजबुजला.
ते खूप आत चालत आले होते. तसे शशांक चे लक्ष समोर गेले. एका उंच झाडाच्या मागे त्यांना एक मठ दिसला – काळसर रंगाचा, भिंतींवर शेवाळ आणि फांद्यांनी झाकलेला. जणू तिथल्या झाडांनी, वेलिंनी त्याला कवटाळलं असावं.
त्या मठाभोवती जीर्ण झालेल्या मोडक्या मुर्त्या पडल्या होत्या.
“हे काय आहे?” अमितने विचारलं.
“हा तो मठ असेल ज्या बद्दल गावकरी बोलतात,” आदित्य काहीसा घाबरत म्हणाला.
शशांक पुढे येत म्हणाला. “चला, उघडून बघू.”
दरवाजा जड वाटत होता जणू तो कित्येक वर्ष उघडला गेला नव्हता. त्याने जरा जोर लावून उघडला. एक जोरात “कर्कश” आवाज झाला आणि दरवाजा थोडासा उघडला. वाऱ्याची एक झुळूक आत आली. आत गडद अंधार होता पण टॉर्च च्या उजेडात दिसली ती भिंतीवर कोरलेली चित्र.. विचित्र आकृत्या, विधी आणि मंत्रलेखनासारखी लिपी आणि मध्यभागी चित्र होते ते एका झाडाखाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीचे.. जणू काही बळी द्यायच्या तयारीत आहे..
“हे काय आहे?” विनयने कुजबुजत विचारलं.
“कुठलीतरी साधना दिसतेय… पण चित्रं खूप disturbing आहेत…” आदित्य म्हणाला.
शशांकने टॉर्च वरच्या बाजूला नेली आणि त्याला वाटलं की कुणीतरी त्याच्या मागे आहे. तो पटकन वळला.
पण मागे काहीच नव्हतं.
“काय झालं?” अमितने विचारलं.
“काही नाही… मला वाटलं कोणीतरी…”
ते चौघही तिथून बाहेर आले. एव्हाना गडद अंधार पडला होता. शशांक मात्र या गोंधळात एकटाच शांत होता. त्याचं लक्ष दूर कुठेतरी झाडांआड चमकणाऱ्या एका प्रकाशाच्या ठिपक्यावर गेलं.
“तुम्हाला दिसतंय का हे?” त्याने बोट दाखवलं.
तिघं त्याच्यासोबत त्या झाडाच्या दिशेने चालू लागले.
एका जुनाट वडाच्या झाडाखाली मोठ्या दगडावर एक जुनी, धुळीने माखलेली, लोखंडी पेटी होती. त्यावर ठेवलेला दिवा इतक्या लांबूनही शशांक ला दिसला होता. या जंगलात तर कोणी येत नाही मग हा दिवा कोणी पेटवला असेल. सगळ्यांनाच प्रश्न पडला. पेटीवर कोणत्यातरी वेगळ्याच भाषेत कोरलेली चिन्हं होती. मध्यभागी एकच चित्र – त्या झाडाखाली उभा असलेला माणूस, अगदी त्याच झाडाखाली. ते चित्र मठातल्या त्या भिंतीवर कोरल्याप्रमाणे होतं.
“हे… हे आपण आताच मठात पाहिलं होतं ना?” विनय घाबरून मागे सरकला.
“हो… तेच झाड, तोच माणूस… आणि ही पेटी!” आदित्य थरथरला.
“मग ही पेटी इथेच होती… किती वर्षांपासून?” अमितचा आवाज जड झाला.
शशांक पुढे सरसावला. “आपण ही उघडून बघूया.”
“नाही! त्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं… जे या पेटीला हात लावतात, ते परत येत नाहीत!” असं बोलत विनयने त्याचा हात पकडला.
पण उशीर झाला होता. तो बोले पर्यंत शशांकने पेटी उघडली.
जशी पेटी उघडली तसा एक जोरदार वाऱ्याचा झोत आला – जणू काही जंगल स्वतः जागं झालं. त्यात होतं – एक प्राचीन पुस्तक. काळसर मळकट, गंधही विचित्र – काहीतरी सडलेलं, पण अजूनही जिवंत असल्या सारखं.
पुस्तक उघडताच, आतमध्ये अस्पष्ट लिपीत काही लिहिलं होतं. त्याकडे पाहून अक्षरं हलत असल्यासारखी वाटत होती – जणू तुम्ही जितकं पाहाल, तितकं ते बदलत जातं होतं..
“हे कोणती भाषा आहे?” आदित्यने कुजबुजत विचारलं.
शेवटच्या पानावर – पुन्हा एक चित्र – तेच झाड, तोच माणूस. पण आता त्याच्या आजूबाजूला चार सावल्या – चार मित्रांच्या
“या.. या सावल्या 4 च कश्या आहेत.. म्हणजे आपल्या सावल्या?” अमितने मागे सरकताना विचारलं.
तेवढ्यात अचानक सगळ्यांच्या टॉर्च बंद पडल्या.
सगळीकडे अंधार झाला. कुणाचा श्वास जड. कुणी ओरडलं – “शशांक?”
पण उत्तर नव्हतं.
“शशांक?!” आदित्यने पुन्हा हाक दिली.
काहीच नाही.
एका क्षणात सर्व आवाज विरले – वाऱ्याचाही. फक्त काळोख आणि भयाण शांतता..
टॉर्च पुन्हा आपोआप चालू झाल्या पण तिथे शशांक तिथं नव्हता.
“तो कुठं गेला?” विनय घाबरून पुढे गेला. फक्त जमिनीवर पायांचे ठसे – शशांकचे, ते एका दाट झाडीतल्या दिशेने जात होते.
“हे बघ… हे पाय फक्त एका दिशेने गेलेत… मागे आलेले नाहीत.” अमित जवळजवळ रडायलाच लागला.
अमित काही पावलं पुढे चालत गेला आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.. समोर एक खोल दरी होती. एक पाऊल आणि… अनर्थ झाला असता..
“आपण इथून निघूया. लगेच!” विनयने सुचवलं.
“पण शशांक?” अमित थांबला.
“तो… आपल्याला मिळणार नाही. काहीतरी भयानक आहे इथे.” आदित्य शांतपणे म्हणाला.
तीन तासांनी ते तिघं गावात परतले – फाटलेले कपडे, धुळीने माखलेले चेहरे, आणि मनात एकच भावना – काळजात खोल वर रुतलेली भीती.
गावकऱ्यांना ते सांगायला गेले.
“तुम्ही पेटी उघडली…” एक म्हातारी स्त्री ओरडली.
“तुम्ही त्याला तिथंच सोडलं!”
“आता तो परतणार नाही… आणि ते जंगल शांत बसणार नाही…”
ते तिघही हताश झाले होते.. शशांक त्या दरितून… कदाचित.. पण जर तो तिथे गेला नसेल तर…
पण ते झाड आणि त्या खाली पेटी आज ही तशीच आहे.. आपल्या पुढच्या भक्षाची वाट पाहत..