लेखक – विनायक काकडे
निकिता त्या बसस्टँडवर एकटीच उभी होती. घड्याळात पाहिले, १०:३० वाजले होते. तिच्या ऑफिसमधले काम आज जरा जास्तच वाढले होते, त्यामुळे ती रोजच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली होती. वाऱ्यामूळे झाडांची पाने सळसळत होती, आणि स्ट्रीटलाइट्सच्या पिवळसर प्रकाशाखाली पडणाऱ्या सावल्या अधिकच भेसूर वाटत होत्या. त्या रात्रीच्या भयाण शांततेत फक्त दूरवर कुत्र्यांचे भूंकणे आणि मध्येच अचानक उडणाऱ्या वटवाघळांचे आवाज येत होते. सहसा या वेळेत शेवटची बस येते, पण आज ती लेट झाली होती. आधी १०:४५, मग ११ वाजले, तरी बस काहीच दिसली नाही. स्टँडच्या बाजूला असलेल्या टपरीवरचा चहा संपला होता, आणि दुकान बंद करून चहावालाही निघून गेला होता. थोडा वेळ वाट पाहत असताना थकव्याने निकिताचा डोळा लागला. काही वेळ उलटला असेल. अचानक जोरात भिरभिरणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती दचकून जागी झाली. तिने बाजूला पहिले तर तिच्या शेजारी एक ७-८ वर्षांची मुलगी शांतपणे बसली होती..
निकिताने इकडे-तिकडे नजर फिरवली, पण स्टँडवर त्या दोघींशिवाय कोणीच नव्हते. मनात विचारांचे काहूर उठले – एवढ्या रात्री, एकटीच, ही मुलगी इथे काय करत असेल?. “तुझं नाव काय आहे आणि इथे एकटीच का बसली आहेस?” निकिताने हलक्या आवाजात विचारले. ती मुलगी तिच्याकडे पाहत राहिली, पण काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांत एक अनोखे भय होते. निकिताने पुन्हा विचारले, “तुझे नाव काय? तुझ्या घरी कोण आहे? तू इथे कोणा बरोबर आली आहेस?”. पण मुलीने उत्तर द्यायचे टाळले. ती शांत होती, तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना आनंद. निकिता तिला आणखी काही विचारणार इतक्यात ती मुलगी अचानक उठली आणि अंधाराच्या दिशेने पळत गेली. स्ट्रीट लाईट असली तरीही तिचा प्रकाश दूरवर पडत नव्हता. स्टँडच्या मागच्या बाजूला तो प्रकाश असे पर्यंत ती दिसली पण त्या नंतर असलेल्या अंधारात ती कुठेतरी गुडूप होऊन गेली.
निकिताच्या अंगावर शहारे आले.. आजूबाजूला कोणीच नव्हते, फक्त अचानक वाहणारा गार वारा आणि रस्त्यावर दूरवर दिसणाऱ्या वाहनांचे अस्पष्ट दिवे.
घरी परतताना तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत राहिला – ती मुलगी कोण होती? एवढ्या रात्री तिथे एकटीच का होती? आणि सर्वात महत्त्वाचे – ती इतक्या पटकन कुठे निघून गेली?.. रात्रीच्या त्या विचित्र घटनेनंतरही निकिता दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी ऑफिसला गेली. पण तिच्या मनातून काल रात्रीची ती मुलगी काही केल्या जात नव्हती. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तोच प्रसंग येत होता – ती मुलगी, तिच्या डोळ्यांतले भय, तिचे उत्तर न देणे आणि नंतर अचानक अंधारात गायब होणे. आज ऑफिसमध्ये विशेष दिवस होता. कंपनीच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण ऑफिस दिव्यांच्या रोषणाईने उजळले होते. ठिकठिकाणी सजावट केली होती.
मोठा हॉल पार्टीसाठी सजवला गेला होता, आणि सर्व कर्मचारी जल्लोषात सहभागी झाले होते. निकिताने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. ‘ते काही नसेल, कदाचित मला भास झाला असेल,’ असा विचार करून ती पार्टीमध्ये सामील झाली. पण तरीही, तिचे मन कुठेतरी अस्वस्थ होते. तिच्या सहकाऱ्यांसोबत बोलता-बोलता ती हॉलच्या समोर असलेल्या जिन्याकडे वळली आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. कारण त्या जिन्यावर एक परिचित आकृती दिसली – तीच मुलगी. ती मुलगी हळूहळू जिना चढत होती. तिच्या पायांचा आवाज कुठेच येत नव्हता. निकिता सुन्न झाली.
ती घाईघाईने तिच्या मागे गेली, पण कोणाची हाक ऐकू आल्यामुळे तिने क्षणासाठी दुसरी कडे पहिले पण तो पर्यंत ती मुलगी नाहीशी झाली होती. तिथे कोणीच नव्हते! फक्त ओसाड कॉरिडॉर आणि हलकासा गार वारा. तरीही निकिताच्या कपाळावर घाम जमा झाला. ‘ही मुलगी खरी आहे का, की मला फक्त भास होतोय?’ तिला समजेनासे झाले. थोड्यावेळाने, पार्टी जोमात सुरु झाली. मोठा केक कट केला गेला, म्युझिक सुरू झाले, लोक गप्पा मारत होते.
हॉलमध्ये सगळेजण मजेत होते, पण निकिता मात्र अजूनही अस्वस्थ होती. ती त्या मुलीला शोधत होती. आणि अचानक, लोकांच्या गर्दीत तिला पुन्हा ती मुलगी दिसली. ती एका कोपऱ्यात उभी होती आणि हळूहळू केक खात होती. तिच्या लहानशा हातांनी ती काजू-बदाम असलेला एक तुकडा तोडून तोंडात टाकत होती. पण तिची नजर मात्र सरळ निकिताकडे होती—निव्वळ शांत आणि विचित्र. निकिता सावधपणे तिच्या दिशेने निघाली. पण जसेच ती जवळ पोहोचली, तशी मुलगी मंद हसू देत बाहेरच्या दिशेने धावत गेली. “थांब! ऐक ना!” निकिताने हाका मारल्या, पण मुलगी ऐकत नव्हती. ती जिना उतरू लागली पण तिने घातलेल्या सॅंडल्स मूळे तिला धावता येत नव्हतं. ती बिल्डिंग च्या गेट जवळ जाईपर्यंत ती पुन्हा दिसेनाशी झाली होती.
आता निकिताला पक्के जाणवले की काहीतरी अघटीत घडत आहे. ती मुलगी खरंच होती का? आणि जर असेल तर ती इथे कशी आली? आणि सर्वात महत्त्वाचे – ती कोण होती?.. पार्टी संपल्यानंतर निकिता उशिराच निघाली. ऑफिसमधून बाहेर पडताना ती गेटजवळ काही क्षण थांबली. रात्रीचा गार वारा हलकेच स्पर्श करून गेला. त्या मुलीच्या आठवणींनी तिच्या अंगावर अजूनही शहारे येत होते.. ती स्टँडकडे निघाली. अजूनही तिथे तुरळकच वर्दळ होती. तिच्या मनात एका गोष्टीचा आनंद होता – कदाचित आज पुन्हा भेट होईल. आणि खरोखरच ती मुलगी पुन्हा तिथेच बसलेली होती. निकिता तिच्याजवळ जाऊन बसली. आज पहिल्यांदाच ती मुलगी तिच्याकडे पाहून मंद स्मित हास्य करत होती. निकिताच्या मनात एक गूढ कुतूहल दाटून आले.
“तुझे नाव काय?” निकिताने हळू आवाजात विचारले.
“पिहू,” मुलगी शांतपणे म्हणाली.
निकिताच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले.
“तू इथे एकटीच आहेस? तुझे कोणी नाही का इथे?”
पिहू काही क्षण गप्प बसली. मग हलक्या आवाजात म्हणाली, “निकु ताई… सगळे आपल्याकडे असे का बघतायत? भूत बघितल्यासारखे?”
निकिता एकदम आश्चर्य चकित झाली.
“तुला माझे नाव कसे माहित..? तू ओळखतेस मला…?”
तिने आजूबाजूला पाहिले. काही लोक त्यांच्या दिशेने विचित्र नजरेने पाहत होते. एकजण चक्क घाबरून मागे सरकला. निकिताला हे सगळं फार विचित्र वाटत होतं. तिने लोकांकडे दुर्लक्ष करून पुन्हा पिहूकडे लक्ष दिले. तिच्याशी बोलण्यात मग्न झालेली निकिता तिच्यासाठी कासावीस होत होती,पण पीहु काहीच बोलली नाही.
“ते सगळं सोड. तू सांग, तुझे मम्मी-पप्पा कुठे आहेत?”
पिहू ने काहीच उत्तर दिले नाही. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती, जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीचे अकरा वाजले होते. हवा आणखीनच थंड झाली होती. स्टँडवरील दिवे मंद प्रकाश टाकत होते. काही क्षण दोघी शांत बसल्या. अचानक, पिहू उठली आणि तिने काही न बोलता अंधारात स्टँडच्या मागे जाण्यास सुरुवात केली.
“पिहू, थांब!” निकिताने तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण पिहू ऐकत नव्हती.
ती लांब, रिकाम्या रस्त्याच्या दिशेने चालू लागली. निकिताही तिच्या मागे जाऊ लागली. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. फक्त दूरवरचे काही दिवे लुकलुकत होते. तेवढ्यात, एका बाजूला एक गाडी थांबली. काळसर रंगाची मोठी गाडी. पिहू त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागली. गाडीमध्ये कोणी तरी होते. पिहू त्यांच्या सोबत काहीतरी बोलत होती, पण निकिताला काहीच ऐकू येत नव्हते.
आणि मग… पिहूने आरशात पाहिले आणि जोरात किंचाळली.
ती भयभीत झाली, आणि एकाच झटक्यात गाडीत शिरली. गाडीने वेग घेतला आणि दूर निघून जात नजरे आड झाली. निकिता सुन्न झाली.
सकाळी जेव्हा पिहू ला जाग आली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला काल रात्री गाडीत बसताना का किंचाळलीस ते विचारले. त्यावर तिने निकिता ताई बद्दल सांगितले. पण तिचे आई वडील तिला म्हणाले की तिथे कोणी नव्हतं, असत तर इतक्या रात्री आपण तिला लिफ्ट दिली असती आपल्या गाडीत.. पिहू ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली “ बाबा मी तुमच्याशी भांडण करून स्टॅन्ड वर जाऊन बसलेले आणि तिथे ती होती. नंतर माझ्या मागे आली. पण जेव्हा मी आरश्यात पाहिलं तर तिच्या जागी काही तरी वेगळचं दिसलं. एक काळी कुट्ट आकृती. तेव्हा पिहूच्या वडिलांनी काहीच सांगितले नाही पण त्या भागात चौकशी केल्यावर कळले “त्यांच्या ऑफिस मध्ये एक जुनी क्लायंट होती जिचे नाव निकिता होते. काही वर्षांपूर्वी तिच्या लहान मुलीला ऑफिस मध्ये घेऊन आली होती. आणि तिथून परतताना तिचा रोड अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून ती तिच्या मुलीला शोधात असते. ती त्या पार्टीत ही आलं होती. आजही रात्री अपरात्री कधी ती त्या रस्त्यावर फिरत असते तर कधी त्या एस टी स्टॅन्ड वर बसलेली दिसते…