अनुभव – पल्लवी सोनकांबळे
या गोष्टीला जवळपास 6 ते 7 वर्ष उलटली आहेत. मी तेव्हा शाळेत 8 वी इयत्तेत शिकत होते. आम्ही आमचं राहत घर सोडून नुकताच नवीन घरात राहायला आलो होतो. गणेशोत्सव नुकताच झाला होता आणि नवरात्री चे दिवस सुरु होते. आरती वैगरे आटोपून मी नुकताच घरी आले होते. नवरात्र असल्याने उपवास केला होता. फराळ खात मी टीव्ही पाहत बसले होते. घरातले सगळे कधीच झोपून गेले होते. टीव्ही पाहत असल्यामुळे मला वेळेचे भान राहिले नाही. काही तासानंतर मी घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे अडीच वाजून गेले होते. या नवीन घरात राहायला असल्यापासून इतक्या रात्री जागण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तितक्यात मला कसलासा आवाज आला.
टीव्ही सुरु असल्यामुळे मला आधी कळले नाही. म्हणून मी टीव्ही चा आवाज कमी केला तर मला जाणवलं की घराच्या बाजूच्या गल्लीतून जोरात कोणी तरी धावत गेलं. आमचं आणि बाजूच घर यात खूप अरुंद गल्ली होती. त्यामुळे तो आवाज खूप जवळून आल्या सारखा वाटला. मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू लागले पण तसाच आवाज आता घराच्या मागच्या बाजूने येऊ लागला. माहित नाही काय होतं तिथे पण जे काही होतं ते खूप भयानक होतं. कारण ते थांबून आता विचित्र आवाज करू लागलं. मी इतकी घाबरले की आतल्या खोलीत धावत जाऊन आजीच्या कुशीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी मी तापाने फण फणत होते. मला घरच्यांनी खूप विचारले की काय झाले अचानक. पण मी त्यांना काहीच सांगितले नाही. मला माहित नाही त्या रात्री मी नक्की काय अनुभवले. पण तो प्रसंग खूप भयानक होता..