अनुभव – सोहम शेलार

ही गोष्ट साधारण चार ते पाच वर्षांपूर्वीची आहे. मी मुंबईला राहतो, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी, कोकणात गेलो होतो. तिथलं स्वच्छ आकाश, मोकळी हवा आणि शांतता हे सगळं नेहमीच मला आवडायचं. गावात तापमान जरी उष्ण असलं, तरी अंगणात झोपल्यावर एक वेगळाच गारवा मिळायचा. त्या रात्रीसुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे अंगणातच गादी घालून झोपायला तयार झालो. रात्रीचं जेवण उरकलं, थोड्या गप्पा झाल्या, आणि मग मी मोबाईलमध्ये गुंग झालो. तेंव्हा TikTok जोरात होतं, आणि मी त्यावरच काहीतरी व्हिडिओ पाहत बसलो. मामा आणि घरातले बाकीचे केव्हाच झोपले होते, पण मला अजून झोप लागत नव्हती. अचानक, घराच्या मागच्या अंगणातून भांडी आपटल्याचा आवाज आला. मी चमकून इकडे-तिकडे पाहिलं. वाटलं, एखादी मांजर असेल. गावाकडे असं नेहमीच होतं, त्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही.

फोन बाजूला ठेवला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. पण… काही मिनिटांतच घुंगराच्या आवाजाने माझी झोप उडाली! माझं मन थरारलं. आधी भांड्यांचा आवाज, आणि आता घुंगरू? मी घाबरत मामाला हलवून जागं करायचा प्रयत्न केला, पण तो अगदी गाढ झोपला होता. आता मात्र त्या सतत येत असलेल्या आवाजाने अंगावर काटा आला. मी नकळत चादर डोक्यावर ओढली, मनात देवाचं नाव घेऊ लागलो. घुंगराचा आवाज हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला. आणि आता… त्या आवाजात अजून एक भर पडली – लाकडी काठी जमिनीवर आपटल्याचा आवाज! टकटक… टकटक… तो आवाज माझ्या अगदी जवळ येत होता. असं वाटलं, जणू कोणी अंगणातच उभं राहून माझ्या बाजूला काठी आपटतय! भीतीने माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले, शरीर हलायचं नाव घेत नव्हतं. मनात सतत एकच प्रश्न – हा काय प्रकार आहे. तो आवाज हळू हळू करत माझ्या डोक्यावरच्या बाजूने येऊ लागला. आणि पुढच्या क्षणी माझ्या कानाशी काहीतरी पुटपुटल्यासारखं वाटलं, पण स्पष्ट ऐकू आलं नाही. भीतीनं मी देवाचं नाव घेत राहिलो. शेवटी, कधी झोप लागली, ते समजलंच नाही.

सकाळी जाग आली, पण अंग तापाने फणफणत होतं. कालच्या रात्रीचा अनुभव आठवून अजूनही हृदयाचा ठोका चुकत होता. मी उठून आजोबांकडे गेलो आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनी शांतपणे ऐकलं आणि हसत म्हणाले – 

“तो ‘रामचंद्र’ होता.”

मी गोंधळलो “रामचंद्र कोण?”

आजोबा गंभीर झाले आणि म्हणाले, “गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलं होतं की रामचंद्र नावाचा एक वृद्ध सतत गावभर रात्री फिरत असे. तो कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही, पण अमावस्येच्या रात्री त्याची सावली गावभर फिरते असं मानतात. तू काल त्याच्या पायवाटेत झोपला होतास, म्हणून तुला हे सगळं जाणवलं. पूर्वीच्या काळी आधाराला जी काठी घेत असत त्याला घुंगरू बांधत असत आणि ते आपटत जातं असत त्याचाच तुला आवाज येत होता”. हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. खरोखरच मी कोणाच्या तरी मार्गात झोपलो होतो का? तो आवाज खरा होता का? की फक्त भास? हे आजही एक गूढच आहे, पण त्या रात्रीचा विचार जरी केला, तरी मनात अगदी भीती दाटून येते. 

Leave a Reply