कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान – समुद्राच्या लाटा, नारळ-पोफळीच्या बागा आणि ताजी मोकळी हवा. पण प्रत्येक सुंदर ठिकाणाला एक गूढ बाजू असते, काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात, पण आपल्यावर परिणाम नक्कीच करतात. असाच हा एक भयाण अनुभव.. पण कथेला सुरुवात करण्या आधी महत्वाचे.. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल.. 

आम्ही चौघे मित्र समीर, रोहित, आदित्य आणि मी (अमोल) कोकणात फिरायला गेलो होतो. आमची योजना दोन दिवस समुद्रकिनाऱ्यावर मस्त मजा करायची आणि मग एक खास ठिकाणी जाण्याची होती. हे ठिकाण एका स्थानिकाने आम्हाला सुचवलं होतं एक जुनं, पडीक आणि काळाच्या ओघात कुठे तरी हरवलेलं घरं.. जे एका धबधब्याजवळ होतं. जे आता पूर्णपणे उजाड झालं होतं. या जागे बद्दल बऱ्याच मित्रांकडून ऐकलं होतं त्यामुळे कोकणात चाललो आहोत तर त्या जागेला भेट द्यायचं पक्क केलं होतं. जागेचं नाव आवर्जून सांगायचं टाळतोय. मुंबईहून आम्ही पहाटे कोकण एक्स्प्रेस पकडली. ट्रेनमध्ये खूपच गडबड होती कारण लोक त्यांच्या गावी चालले होते. आम्ही सगळे मित्र एकत्र बसलो होतो. माझं लक्ष ट्रेन च्या खिडकी बाहेर होतं. खिडकीबाहेरचा नजारा बदलत होता.

काही तासानंतर शहराचा गडबडाट मागे पडून हिरव्या डोंगररांगा, खोल दऱ्या, आणि छोट्या गावांची दृश्यं आमच्या डोळ्यासमोर येऊ लागली. सुमारे आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका छोट्या स्टेशनवर उतरलो. ही जागा फारशी प्रसिद्ध नव्हती. शहराच्या गजबजाटापासून दूर, एका लहानशा गावात वसलेली. स्थानिक लोक फारसे पर्यटकांना सरावलेले नव्हते. त्यामुळे आम्ही जेव्हा स्टेशन वरून उतरून बाहेर आलो तेव्हा ती लोकं आम्हाला थोड्या आश्चर्याने पाहत होती. आम्ही गावाच्या दिशेने निघालो. सांगितल्या प्रमाणे 15-20 मिनिटांची पायापीट करावी लागणार होतीज. साधी, मातीची घरं, गल्ल्यांमध्ये खेळणारी लहान मुलं आणि बाजूला हिरवीगार शेती दिसत होती. गावाच्या मधोमध एक जुनाट हॉटेल होतं, जिथे आम्ही थांबायचं ठरवलं होतं. गावाचा परिसर असल्यामुळे हॉटेल फार मोठं नव्हतं, पण जुनं आणि भारदस्त होतं. बाहेर लाकडी फळीवर “शांतिगृह” असं लिहिलं होतं. आत जाताच जुन्या लाकडी फर्निचरचा वास आला. रिसेप्शनवर एक म्हातारे आजोबा होते. त्यांनी आमच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाले,

“किती दिवस थांबणार आहात?”

“तीन-चार दिवस,” मी उत्तर दिलं.

“कुठे जाण्याचा विचार आहे?”

आम्ही हसून सांगितलं, “ 2 दिवस समुद्र किनारी मजा करणार आणि हो ते धबधब्याजवळचं घर बघायला ही जायचं आहे.”

ते हे ऐकताच अचानक थोडे गंभीर झाले. काही सेकंद ते शांत राहिले आणि मग थोड्या खोल आवाजात म्हणाले,

“रात्रीच्या वेळी तिकडे जाऊ नका. लवकर परत या.”

आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही खोलीत सामान ठेवलं आणि गाव फिरायला बाहेर पडलो. दुपारी आम्ही एका छोट्या टपरीवर चहा घेत होतो. बाजूलाच काही गावकरी गप्पा मारत होते. आम्हाला पाहून त्यातील एकजण पुढे आला आणि म्हणाला,

“तुम्ही या गावातले दिसत नाही.. पर्यटक दिसताय. कुठे फिरायला जाणार?”

आम्ही त्याला आमच्या प्लॅन बद्दल सांगितलं खासकरून त्या पडक्या घराबद्दल. 

त्याचं चेहऱ्यावरचं हसू एकदम गायब झालं. तो आमच्याकडे काळजीने पाहू लागला आणि मग हळू आवाजात म्हणाला,

“तिथे जाऊ नका. पूर्वी ते घर एका मोठ्या जमीनदाराचं होतं, पण काहीतरी विचित्र घडलं आणि संपूर्ण कुटुंब एका रात्रीत गायब झालं. कोण म्हणतं ते घरं सोडून निघून गेले तर काहीजण म्हणतात, ते तिथेच राहतात, पण दिसत नाहीत.”

आम्ही हसून त्याचं ऐकून घेतलं, पण त्याला फारसं गंभीरपणे घेतलं नाही. अशा गोष्टी गावकरी पर्यटकांना घाबरवण्यासाठी सांगत असतील, असं आम्हाला वाटलं.

संध्याकाळी आम्ही समुद्रकिनारी गेलो. बराच वेळ तिथे बसलो. तिथे असलेल्या एका मोठ्या खडकावर आम्ही बसलो होतो. लाटा आमच्या पायांना स्पर्श करत होत्या. शांत, निरव संध्याकाळ होती ती. सूर्य हळूहळू पाण्यात मावळत होता, पण आमच्या मनात फक्त उद्याच्या प्रवासाचं चित्र होतं. संध्याकाळी आम्ही हॉटेल रूम वर आलो आणि जेवण करून लवकर झोपून गेलो. सकाळी उठून आम्ही थोडं नाश्ता केला आणि प्रवासाला निघालो. गावाच्या बाहेर एक पायवाट होती जी जंगलाच्या दिशेने जात होती. ती वाट आम्हाला धबधब्याजवळच्या त्या जुन्या घराकडे नेणार होती. तशी आम्ही आधीच विचारपूस करून ठेवली होती. आम्ही चालायला सुरुवात केली. आजूबाजूला घनदाट झाडं होती, वातावरण खूप गूढ वाटत होतं. मधेच पक्ष्यांचा आवाज यायचा, तर कधी एकदम शांतता पसरायची.

अचानक, समीर थांबला. “काहीतरी विचित्र वाटतंय,” तो म्हणाला.

“काय झालं समीर?” मी विचारलं.

“काही नाही… फक्त वाटतंय की कोणीतरी आहे आस पास, नजर रोखून बसलय असं वाटतंय”

मी आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच नव्हतं. विचार केला की अनोळखी जागी आलो आहोत म्हणून समीर ला भास होतं असेल. आम्ही परत चालू लागलो. जवळपास पाऊण तास चालल्या नंतर अखेर आम्ही त्या घरापाशी पोहोचलो. घर खरोखरच जुनं आणि उजाड होतं. छप्पर अर्धं कोसळलं होतं, दरवाजे सडले होते, आणि भिंतींवर शेवाळं वाढलेलं होतं. घराच्या पुढच्या अंगणात एक कोरडी विहीर होती.

“विहीर बघूया का?” आदित्यनं विचारलं.

आम्ही हळूहळू विहिरीकडे गेलो. आत डोकावून पाहिलं. विहीर तशी बरीच खोल होती. त्यामुळे विहिरीचा तळ दिसत नव्हता.. होता तो फक्त गडद अंधार.. 

तिथून पुढे जाऊन आम्ही घरात पाऊल ठेवलं. आत एक विचित्र गारवा जाणवला. घरात जुन्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या—फाटक्या चाटया, मोडकळीस आलेली खुर्ची आणि एक मोठं, धुळीनं माखलेला आरश्याचा तुकडा. 

समीर ने खाली पडलेली एक वस्तू उचलली तेवढ्यात रोहितने अचानक जोरात किंकाळी फोडली. आम्ही सगळे दचकून त्याच्याकडे बघितलं.

तो इशारा करत भिंतीकडे बोट दाखवू लागला.. तिथे कोरलेल्या आकृत्या दिसत होत्या. खूपच विभत्स, भयानक आणि किलासवाण्या – अर्धवट चिरलेले चेहरे, फक्त खोबण्या असलेले डोळे आणि शरीर जनावराच. अशी इतकी भयानक चित्र त्यांनी कधीच कुठे हीं पाहिली नव्हती. आम्ही एकमेकांकडे बघितलं. तितक्यात माझं लक्ष समीर च्या हातावर गेलं. काही वेळा पूर्वी त्याने उचललेली ती वस्तू एक अर्धवट तुटलेली मानवी कवटी होती. मी जोरात ओरडलो “ समीर हातात ली वस्तू खाली टाक.. “ त्याने माझं ऐकुन हात झटकला आणि ती कवटी खाली पडून अंधारात घरंगळत गेली. आणि घरंग गळत जाताना ती अचानक थांबली. जणू कोणी हातात धरली. त्याच सोबत गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की गावकरी जे सांगत होते त्यात तथ्य होतं. आता मात्र आम्ही घराच्या बाहेर पळालो. अंगण ओलांडून आम्ही झपाट्याने जंगलात शिरलो. मागून अजूनही तो गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही घाबरून परत गावाकडे निघालो. आम्ही तिथून दूर जात असताना मी मागे वळून पाहिलं, तेव्हा ते घर तसंच उभं होतं.. शांत, काळवंडलेलं आणि काहीतरी आत लपवून ठेवल्यासारखं.

गावात परतल्यानंतर आम्ही सगळे थोडे गप्प होतो. सकाळी मोठ्या उत्साहाने निघालेलो आम्ही आता जरा गोंधळलेलो आणि अस्वस्थ झालो होतो. त्या जुन्या घरात जे काही पाहिलं, ऐकलं, त्याने मनात एक प्रकारची भीती रुजली होती.

हॉटेलमध्ये परत आल्यावर समीर मात्र अगदी नॉर्मल होता. ती असे दाखवू लागला की त्याला कसलच गांभीर्य नाही. तो बोलला, “आपण फक्त काही जुन्या कोरीव खुणा आणि आवाज ऐकले. त्यात काही विशेष नाही. कदाचित फक्त भीती मूळे आपल्याला तसं वाटल असावं. त्यावर मी त्याला म्हणालो “ समीर आपण सगळ्यांनी त्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्या पाहिल्या, आणि ते गुरगुरण स्पष्ट ऐकलं तरीही तू असे कसे बोलू शकतोस.. आमचं बोलणं सुरु असताना आदित्य मात्र गप्प बसला होता. आम्ही विचारलं, “तू एवढा शांत का?”

त्याने हळूच उत्तर दिलं, “जेव्हा आपण त्या घरातून बाहेर निघत होतो, तेव्हा मला वाटलं, कोणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला.”

त्याच्या या एका वाक्यानं सगळ्यांना गार केलं. एकमेकांकडे न बघताच आम्ही रात्रीच्या जेवणासाठी खाली गेलो. 

जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या, आणि तितक्यात अचानक लाईट गेली. 

“अरे यार.. इथे गावात जरा पाऊस पडला की लाईट जाते वाटते” रोहित वैतागून म्हणाला.

मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही थोडावेळ गप्पा मारत बसलो. पण काही वेळातच समीर अस्वस्थ वाटायला लागला.

“कुणीतरी बाहेर आहे,” तो पुटपुटला. या आधी ही जंगलातून जाताना त्याला अशीच काही शी जाणीव झाली होती. म्हणून त्याच बोलणं आम्ही गांभीर्याने घेतले.. आम्ही ऐकून थोडे सावध झालो. मी खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस आणि वारा घोंगावत होता. झाडं जोरात हेलकावे घेत होती, पण त्यामध्ये मला एक अस्पष्ट सावली दिसली. ती हालचाल करत नव्हती, पण तरीही तिथं काही तरी असल्याच वाटत होतं.

तेवढ्यात विज चमकली आणि त्या प्रकाशात मला स्पष्ट दिसलं कोणीतरी तिथे उभं आहे. 

मी घाबरून जोरात मागे पडलो. “तिथे कोणी तरी आहे!”

आता सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. आम्ही गप्प बसून राहिलो. कारण कदाचित त्या घरातलं ते जे काही होतं आता ते आमच्या मागवर आलं होतं. काय कराव हे कळतं नव्हतं. सकाळी उठून गावकऱ्यांची मदत घायचे ठरवले. कारण आम्हाला या गोष्टीचा सोक्ष मोक्ष इथेच लावायचा होता आणि ते जे काही होतं ते आम्हाला आमच्या सोबत घरापर्यंत न्यायचं नव्हतं. 

सकाळी उठल्यावर आम्ही गावात विचारपूस केली. काही गावकऱ्यांनी जवळच्या देवळात जाऊन पुजाऱ्याला भेटण्याचा सल्ला दिला. ते पुजारी गावातले सर्वांत वयोवृद्ध होते आणि त्यांनी या गावातली अनेक रहस्यं पाहिली होती. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी आमच्या सोबत घडलेले सगळे प्रसंग अगदी शांतपणे ऐकले आणि मग डोळे मिटून काही मिनिट ध्यान लावून बसले. 

आम्ही सगळे खूप आशेने त्यांच्या कडे पाहत होतो. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, “तुम्ही त्या घरात गेलात, ते चुकलंच तुमचं. पूर्वी तिथे एक मोठा जमीनदार राहत होता. त्याच्या घरात अनेक अघोरी विधी होत असत. जास्त पैसा दौलत यावी म्हणून तो अघोरी विधी करायचा. मीच नाही तर गावकऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता की अश्या वाईट शक्तिच्या आहारी जाऊ नकोस कारण तिथून परतण शक्य नसतं. पण त्यानं कोणाचच ऐकलं नाही. त्या घरात राहणाऱ्या लोकांनी एका अमानवीय शक्तीशी करार केला होता. पण अश्या शक्तींना जर संतुष्ट केलं नाही तर त्या आपल्यावर उलटतात.. तेच झालं.. त्यांच्याकडून एक चूक झाली आणि संपूर्ण कुटुंब एका रात्री बेपत्ता झालं. गावातल कोणीही तिथे जात नाही पण तुम्ही गेलात आणि त्या वाईट शक्ती ला जागृत केलत. ती तुमच्या मागवर आहे आता.. तुमच्यापैकी एकाला तरी घेऊन जाईल ती.. “ 

त्यांचं बोलणं ऐकूण आम्ही स्तब्ध झालो. 

आता मात्र परिस्थिती गंभीर वाटू लागली. “आम्ही काय करू शकतो?” समीर ने धीर एकवटत विचारलं. 

त्यांनी सांगितलं, “त्याचं उत्तर तिथेच आहे – त्या घरात. पुन्हा जाऊन तुम्हाला माफी मागावी लागेल त्या शक्तिची.. तरच तुमची यातून सुटका होईल.. पण तुम्ही जर त्या शक्ती पासून दूर पळत राहिलात, हे गाव जरी सोडून गेलात तर मात्र तुमचं काही खरं नाही.. अश्या शक्तींना वेळेच आणि जागेचं बंधन नसत.. “

त्यांचं असं बोलणं ऐकूण माझ्या हृदयाची धड धड वाढली. बरं झालं आम्ही हे गांव सोडून गेलो नाही.. नाही तर अभद्र घडलं असत. आता त्या घरात पुन्हा जावं लागणार होतं पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. 

संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही पुन्हा त्या घराकडे निघालो. आजूबाजूचं वातावरण आधीपेक्षा जास्त भयानक वाटत होतं. पाऊस थांबला होता, पण हवेत एक विचित्र थंडावा होता. जो त्रास देणारा होता. 

घरासमोर पोहोचताच आम्हाला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. घर जणू आमच्याच येण्याची वाट पाहत होतं. आत गेल्यावर माझं लक्ष त्या भिंतीवर कोरलेल्या भयानक आकृत्याकडे गेलं. त्या आकृत्या आता जास्तचं स्पष्ट आणि गडद झाल्या होत्या. आम्ही सगळ्यांनी हात जोडले आणि माफी मागितली, या जागेत पुन्हा कधीच येणार नाही याची शाश्वती दिली. तिथून बाहेर पडलो आणि गावात आलो. त्या रात्री आम्हाला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे गाव सोडलं. आम्ही मात्र ठरवलं होतं… पुन्हा कधीही त्या जागेकडे परतायचं नाही.

पण आजही ते घर तसचं उभ आहे.. निश्चल, गूढ आणि भयाण..

Leave a Reply