July 15, 2020

पैंजण – २ अविस्मरणीय भयानक अनुभव | मराठी भयकथा

Reading Time: 3 minutes

अनुभव क्रमांक १ – गौरव सकपाळ

मी मालाड, मुंबई येथे वास्तव्यास आहे. ही घटना आहे २००७ सालच्या फेब्रुवारी महिन्यातली. आधीच मी नववी ला नापास झालो होतो आणि तीच गत पुन्हा होऊ नये म्हणून १० वी ला कसून अभ्यास करायचे ठरवले होते. दिवसा आमच्या चाळीत गोंगाट असायचा त्यामुळे रात्री जागरण करून पाठांतर करणे हा एकच उपाय होता. परेक्षेचे वेळापत्रक आले होते आणि पहिला पेपर मराठी. नेहमी प्रमाणे त्या रात्री ही मी जागून जमेल तितके पाठांतर करायचे मनाशी पक्के केले. जेवण आटोपून लवकरच अभ्यासाला बसलो. हळू हळू चाळीतली वर्दळ कमी झाली तसे वातावरण शांत होऊ लागले. माझे पाठांतर ही पटापट होत होते त्यामुळे मी न कंटाळता एका पाठोपाठ एक धडे वाचून काढत होतो. बराच वेळ उलटुन गेला. साधारण पावणे तीन झाले असावेत. लघवी साठी म्हणून मी बाथरूम कडे जायला उठलो. 

पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा प्रकाश खिडकीतून आत पसरला होता. त्यामुळे थोड्यावेळ मी खिडकी पाशी स्थिरावलो. मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसणार तितक्यात खिडकीबाहेरुन एक पांढरट आकृती वाऱ्याच्या वेगाने सर्रकन गेल्याचे जाणवले आणि काळजात धस्स झाले. माझे हृदय भीतीने धडधडू लागले. इतक्या रात्री चाळीत कोण जागे असेल असा विचार मनात डोकावून गेला. मी हिम्मत करून खिडकीबाहेर कोणी दिसतंय का हे पाहू लागलो. साधारण २-३ मिनिट तिथेच उभा राहिलो. पण नंतर भास झाला असेल असा विचार करून मागे वळलो आणि लहान बाळाच्या पायातल्या वाळा वाजल्याचा आवाज कानावर पडला. मला वाटले की कोणी उठले असेल म्हणून मी चाहूल घेऊ लागलो. पण हळू हळू त्या वाळाच्या आवाजाचे स्वरूप पैंजनात झाले तसे माझ्या अंगावर भीतीने शहारे उभे राहिले. मी प्रचंड घाबरलो. पुढच्या क्षणी कुणी तरी पैंजण घालून खिडकी कडे चालत येत असल्याचे जाणवले आणि मी घाबरून आत पळून आलो. 

धावतच येऊन पुस्तक बंद केलं आणि स्टडी लापं बंद न करताच अंथरुणात येऊन झोपलो. भीतीने चादर अंगावर घेतली आणि देवाचे नामस्मरण करू लागलो. नंतर कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळ आईच्या हाकेने जाग आली तसे उठलो आणि आईला रात्रीचा प्रकार सांगितला. आई माझी समजूत काढू लागली की जास्त जागरण केल्यामुळे तुला भास झाला असेल. पण मी वारंवार एकच रडगाण लावल होत. तेव्हा आई अचानक म्हणाली “ललिताबाई म्हणतात तिला.. आपल्या चाळीची मालकीण होती.. चाळिशी ओलांडण्याआधीच वारली. खूप जीव होता तिचा या चाळीत. काही लोकांना ती अजूनही दिसते म्हणे. तुला हे सगळे सांगायचे नव्हते पण तू हट्ट केलास म्हणून सांगितले. 

आईचे बोलणे ऐकून मी निशब्द झालो होतो. त्या भयानक अनुभवा मुळे ती रात्र मला कायमची लक्षात राहिली. 

अनुभव क्रमांक २ –

घटना आहे कणकवली तालुक्यातल्या आमरद गावची. हे गाव माझे आजोळ आहे. मी साधारण १३-१४ वर्षाचा असताना आम्ही सगळे मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या मामे – बहिणीच्या लग्नाला गावी गेलो होतो. लग्नाला बरेच दिवस बाकी होते. सुट्टी असल्यामुळे गावातले सगळे मित्र मिळून गावाच्या वेशीबाहेर क्रिकेट खेळायला गेलो. जंगलाचा भाग होता तो. आणि त्याला लागूनच एक जुनी पडकी विहीर होती. खरं सांगायचे तर काही वर्षांपूर्वी एका मुलीने त्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता. तेव्हापासून ती मुलगी विहिरीपाशी दिसते असे गावकरी म्हणायचे. 

आम्ही खेळत असताना एका मुलाने जोरात फटका मारल्यामुळे चेंडू त्या विहिरी जवळ गेला. गावातली मुलं विहिरी जवळ जायला तयार नव्हती पण मी म्हणालो की काही नाही होत आपण सगळे जाऊ. आम्ही त्या विहिरीजवळ आलो आणि चेंडू शोधू लागलो. मी विहिरीत डोकावून पाहिले तर पाणी तळाला लागले होते आणि पाण्यावर हिरवेगार शेवाळे साचले होते. भरपूर शोधून ही चेंडू काही आम्हाला सापडला नाही. निघताना मी त्या गावातल्या मुलांवर हसलो आणि म्हणालो “अरे आपण तर विहिरी जवळ आलो आणि आपल्याला काहीच झाले नाही”. त्यातले १-२ जण पुटपुटले “तुला आमच्यावर विश्वास नाहीये म्हणून तू हसतोय आता पण नंतर कळेल तुला”. मी ठीक आहे म्हणत एक दगड उचलला आणि विहिरीत भिरकावला आणि म्हणालो “तू जर खरंच असशील तर येशील”. गावातले सगळे मित्र माझ्याकडे कडे आश्चर्याने पाहत होते. मी पुन्हा हसायला लागलो आणि म्हणालो मी बोललो होतो ना काही नाही होत तुम्ही सगळे उगाच घाबरता. मैदानात थोडा वेळ घालवून संध्याकाळी आम्ही घरी पोहोचलो. 

लग्न घर असल्यामुळे जेवण उरकून झोपायला बराच उशीर झाला. आम्ही घराच्या आतल्या खोलीत झोपणार होतो. घराच्या मागच्या बाजूला एक मोठा दरवाजा होता ज्यातून त्या खोलीत येता येत असे. आणि त्याला लागूनच मोठ्या २ खिडक्या होत्या. मला रात्री २ च्या सुमारास कसल्या तरी आवाजाने अचानक जाग आली. मी कानोसा घेऊन तो आवाज ऐकत खिडकीपाशी आलो. तो पैजणांचा आवाज होता. असे वाटत होते की दाराबाहेर कोणीतरी पैंजण घालून फेऱ्या मारतेय. मी खिडकीतून हळूच बाहेर नजर फिरवली तशी एक काळपट आकृती उभी दिसली. मी दचकून मागे झालो आणि दुसऱ्या खिडकीपाशी येऊन पाहू लागलो पण ती त्या खिडकीच्या अगदी जवळ येऊन उभी होती. तिला पाहून भीतीने माझ्या शरीरातला त्राणच संपला. मी दबक्या पावलांनी मागे सरकत घरात आलो आणि आई ला हाका मारू लागलो. पण आजोबा उठले आणि दरवाजा उघडून बाहेर पाहू लागले. पण त्यांना बाहेर कोणीही दिसले नाही. तसे ते म्हणाले काय झाले झोप गपचुप उगाच आरडा ओरडा करू नकोस.

मी काहीही न बोलता पांघरुणात शांत पडून राहिलो. खूप घाबरल्या मुळे मला झोप लागत नव्हती. अर्धा तास उलटुन गेला असेल. मला पुन्हा पैंजण वाजाल्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र माझी वाचाच बंद झाली. मी डोळे घट्ट मिटून कानांवर हात ठेऊन झोपून राहिलो. पहाटे झोप कधी लागली कळले नाही. सकाळी जाग आली तेव्हा चर्चा चालू होती. मी एकटा नव्हतो ज्याने तो आवाज ऐकला होता. बाहेर कोण होत हे कदाचित मला कळलं होत पण मी त्या बद्दल कोणाला काहीच बोललो नाही. पण त्यानंतर मी त्या विहिरी जवळ फिरकलो सुद्धा नाही.

One thought on “पैंजण – २ अविस्मरणीय भयानक अनुभव | मराठी भयकथा

Leave a Reply to Sonali Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares