अनुभव – मयूर म्हात्रे

प्रसंग माझ्या मित्रा सोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. तो त्या काळी एका सेकंड हॅण्ड बाईक च्या शोधत होता. काही ठिकाणी चौकशी केल्यावर त्याला चांगल्या स्थितीत असलेली एक बाईक मिळाली. डील ही चांगले झाले आणि कमी किमतीत ती बाईक त्याने विकत घेतली. त्यामुळे तो खूप खुश होता. नोकरी करत असल्यामुळे रोज बाईक ने ये जा करायचा. त्याची रोटेशनल शिफ्ट असायची. घरापासून कामाचे ठिकाण तसे बरेच लांब होते. येताना वाटेत जंगल पट्टी चा भाग लागायचा. आणि त्या भागात ये जा करण्यासाठी वाहने ही अगदीच कमी असायची. म्हणून च त्याने बाईक घेतली होती. एकदा तो नाईट शिफ्ट करून घरी परतत होता. पहाटे ची वेळ होती.

साधारण साडे चार ते पाच वाजत आले होते. त्याच दरम्यान तो जंगल पट्टीच्या रस्त्याला लागला. रस्ता निर्जन होता आणि एकही वाहन नजरेस पडत नव्हते. त्यामुळे बाईक ही वेगात होती. दोन्ही बाजूला गर्द झाडी. अचानक त्याला वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवू लागला. त्याला थोड आश्चर्य वाटल. पण कदाचित आजू बाजूला झाडे असल्यामुळे थंडावा जाणवत असेल असा विचार करून त्याने दुर्लक्ष केलं. त्या परिसरातून जात असताना त्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती उभी दिसले. जसं जशी गाडी जवळ येऊ लागली तसे त्याला स्पष्ट दिसू लागले की तो एक म्हातारा माणूस आहे. पांढरा कुर्ता आणि पांढर धोतर नेसलेला. त्याला जाणवले की तो म्हातारा माणूस खूप वेळा पासून त्याच्याकडेच एक टक बघतोय. त्याला काही समजेनासे झाले.

बाईक वेगात असल्याने तो पुढे निघून गेला आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण पहाटे ४.३० ला तो म्हातारा माणूस असा निर्जन ठिकाणी का उभा असेल, त्याची विचारपूस करून आपण लिफ्ट द्यायला हवी होती का.. असे अनेक विचार त्याच्या मनात घोळू लागले. काही अंतर पार केल्यावर त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. आपल्याला नक्की काय होतंय ते त्याला समजत नव्हत. त्याने बाईक रस्त्याकडे ला घेतली आणि काही वेळ तिथेच थांबला. पण काही कळते ना कळते तो अचानक स्वतःला कानफटात मारू लागला. त्याच्या हातांवर त्याचा ताबा नव्हता. अस नाही की त्याला काय होतंय ते कळत नव्हतं. आपणच आपल्याला मारून घेत आहोत ते त्याला कळत होत पण तो काहीच करू शकत नव्हता.

त्याला कळून चुकलं की आपल्या सोबत काही तर भयानक घडतंय. तो बराच वेळ स्वतःला मारत राहिला. काही वेळा नंतर जेव्हा स्वतःवर पूर्ण नियंत्रण मिळवलं तेव्हा तो कसा बसा तिथून निघाला आणि घरी आला. सकाळी त्याला खूप ताप भरला. आता तो भीतीमुळे की आणखी कशामुळे ते कळायला मार्ग नव्हता. त्याच्या आईला मात्र वेगळाच संशय आला म्हणून त्याच्या घरच्यांनी चौकशी केली. बाधा झाली असेल या संशयाने त्यांनी एका पुजाऱ्याला दाखवले. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की घरात एखादी नवीन वस्तू आणली आहे का.? त्यावर माझा मित्र म्हणाला की नाही, घरात असे काही आणले नाहीये , हो फक्त मी एक सेकंड हॅण्ड बाईक घेतली परवा. त्यावर तो पुजारी म्हणाला की लवकरात लवकर ती बाईक विकून टाका, नाही तर ज्याच्याकडून आणली आहे त्याला परत देऊन टाका. 

माझ्या मित्राला आणि त्याच्या घरच्यांना काही कळले नाही पण तरीही सांगितल्या प्रमाणे त्यांनी केले. आणि तसे करताना चौकशी केली तेव्हा कळले की त्या बाईक वरून एका म्हाताऱ्या माणसाचा जीव गेलाय, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात. ते पुन्हा पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांचे आभार मानले तेव्हा ते म्हणाले की अश्या गोष्टी सहसा होत नाहीत आणि झाल्याच तर कोणी वाचत नाही. ब्रम्ह मुहूर्ताची वेळ होती, काळ शुभ होता म्हणून त्या आत्म्याला जास्त काही करता आले नाही. नाही तर नक्कीच काही तरी अभद्र घडलं असत. 

Leave a Reply