रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबईहून निघताना मी गाडीच्या डिजिटल घड्याळाकडे पाहिलं होतं. मला कोल्हापूर गाठायचं होतं, आणि त्यासाठी कमीत कमी सहा-साडेसहा तास लागणार होते. नेहमीचा पुणे एक्स्प्रेस वे पकडायचा होता, पण अचानक मला एका शॉर्टकट रस्त्याची आठवण झाली. हा रस्ता मी अनेक वर्षांपूर्वी एका मित्राकडून ऐकला होता. माझ्या काही मित्रांनी सांगितलं होतं की, ब्रिटिश काळात हा मार्ग बांधला गेला होता, पण काही अनामिक कारणांमुळे तो दुर्दैवी ठरला. आता हा रस्ता जवळपास निर्जन असतो आणि फार कमी लोक तिथून जातात. मी नकाशा तपासला. हा रस्ता खरंच दुसऱ्या पेक्षा लहान वाटत होता म्हणजे लवकर पोहोचता येणार होत म्हणून मी ठरवलं “जाऊया, वेळ वाचेल.” गाडीला गिअर टाकत मी त्या रोडकडे वळला. पहिल्या काही किलोमीटरसाठी सगळं ठीक होतं.
रस्ता अरुंद होता, पण चांगल्या स्थितीत दिसत होता. आजूबाजूला उंचसावळे झाडांचे घनदाट जंगल होते. दिवसभर उन्हाने तापलेल्या जमिनीचा सुवास हवेत पसरला होता. सुरुवातीला मला बरं वाटत होतं. गाडीत हळू आवाजात संगीत सुरू होतं. पण जसजसे मी पुढे गेलो, तसतसं वातावरण बदलत गेलं. गाडीच्या हेडलाईटसमोर उभी राहणारी झाडं अधिकच गडद वाटू लागली. हवेत एक विचित्र गंध होता – माती ओलसर जाणवू लागली होती आणि त्या ओलसर मातीतून निघणारा एक कुबट वास, पण त्यासोबत अजून काही होतं… जणू काही काहीतरी कुजल्या सारखं. मी गाडीच्या विन्डो ची काच बंद केली आणि गियर वाढवला. पण अचानक, गाडीचा रेडिओ खर खर आवाज करत बंद पडला. स्क्रीन ब्लँक झाली, आणि काही क्षणांसाठी गाडीत पूर्ण शांतता पसरली. मी कपाळावर आलेला घाम पुसला. “तणाव घेतोयस, विनय,” मी स्वतःलाच बजावलं. पण तेवढ्यात, समोरच्या आरशात काहीतरी हलल्यासारखं दिसलं. मी थांबलो. हळूच मागे पाहिलं – गाडी पूर्ण रिकामी होती.
पण तो क्षण… तो दोन-तीन सेकंदांचा धसका पुरेसा होता. काही तरी विचित्र घडत होतं जे या आधी मला कधीच माझ्या गाडीत जाणवलं नव्हतं. मी गाडी पुन्हा सुरू केली. पण आता मला जाणवू लागलं की मी या प्रवासात एकटा नाही. मी गाडी पुढे घेतली, पण आता मी सावध झालो होतो. माझ्या मनात एक विचार घर करू लागला—हा रस्ता खरंच ‘नॉर्मल’ आहे का? काही वेळ सगळं पुन्हा शांत झालं होतं. गाडीच्या हेडलाईट्समधून त्या उंच झाडांच्या सावल्या लांबट, विकृत भासू लागल्या होत्या, जणू त्या जिवंत होऊन माझ्यावर डोकं वर काढून पाहत आहेत. मी स्वतःला समजावलं. “थोडा ताण आलाय, बस. हा रस्ता जुना आहे, म्हणून असं वाटतंय.” पण मग, काहीतरी बदललं. रस्त्याच्या कडेहून कसलासा आवाज येऊ लागला. तो आवाज नक्की कसला आहे हे ऐकण्यासाठी मी गाडीचा वेगळा कमी केला. तर जाणवलं बाजूच्या झाडी झूडू पातून माझ्या दिशेने काही तरी धावत येतंय. हे लक्षात येताच मी गाडीचा वेग वाढवला. पण आवाज थांबला नाही.
उलट अजून स्पष्ट होऊ लागला. आता तो रस्त्यावरच ऐकू येत होता, गाडीच्या अगदी जवळून. आणि एका क्षणी तो अचानक थांबला. मी मनोमन सुखावलो. पण तितक्यात अचानक माझं लक्ष आरशात गेला आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. आरशात, मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं. “एक बाई” पिवळ सर साडीमध्ये, केस पूर्ण भिजलेले. तेच चेहऱ्यावर आल्यामुळे चेहरा झाकलेला. क्षणभर मी भीतीने गारठलो. हात स्टीयरिंगवर घट्ट धरले. माझे डोळे उघडे असूनही मला समजत नव्हतं – हे जे मी पाहतोय ते खरं आहे की माझा मेंदू माझ्या सोबत खेळ खेळतोय? मी एक नजर परत आरशात टाकली. आता मात्र तिथे कोणीच नव्हत. मी एक दीर्घ श्वास घेतला. पाय जड झाले होते, पण मी गाडी अजून वेगात पुढे घेतली. पण एक नवीन समस्या समोर उभी ठाकली. पाहता पाहता अवघ्या काही मिनिटांत रस्त्यावर अचानक धुकं दाटून आलं होतं. अनपेक्षित, गच्च धुकं. जणू कुठल्याशा अदृश्य ताकदीने ते तिथं तयार केलं असावं. हेडलाईट्स चालू असूनही, फक्त काही फुटांवरचं दिसत होतं.
मी आता खरंच घाबरलो होतो. हा रस्ता काहीतरी वेगळाच भासतोय. काहीतरी चूकतय. हाच तो क्षण होता, जिथे मला जाणवलं की हा प्रवास आता माझ्या हातात राहिलेला नाही. मला ऍक्सीलरेटर वरचा पाय काढायचा नव्हता. पण त्या दाट धुक्यात पुढचं काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे फक्त गडद धुक्याचा चकवा.
मला आता पक्कं कळलं होतं की मी एकटा नाही. पुन्हा गाडीच्या बाजूने कोणी तरी धावत असल्याचा आवाज येऊ लागला. मी कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला पाहत होतो. वेगात जाणाऱ्या माझ्या गाडीमुळे धुक बाजूला हटत होत आणि तितक्यात गाडीच्या पुढे रस्त्याच्या अगदी मधोमध कोणी तरी उभ दिसलं. अवघ्या एका क्षणासाठीचं दृश्य होतं, पण तो चेहरा… तो चेहरा पाहून माझ्या हाता-पायातली ताकद निघून गेली. चेहऱ्यावर पसरलेले ओले केस, पांढरे शुभ्र डोळे, जखमांनी भरलेला चेहरा, आणि एका विचित्र कोनात वाकलेला मानवी आकार.
मी जोरात ब्रेक दाबला. गाडी जोरात साईडला वळली आणि थेट एका जुन्या, पडक्या बोर्डाच्या समोर जाऊन थांबली. माझ्या छातीत धडधडू लागलं. गाडी रिव्हर्स घालायचा प्रयत्न केला, पण गाडी बंद पडली. माझ्या मागे, कसलीशी हालचाल जाणवू लागली. त्या मागच्या सीटवर. मी आरशात पाहिलं आणि माझा श्वास च थांबला. ती बाई पुन्हा बसली होती. पण या वेळेस तिचा चेहरा खाली झुकलेला. भीतीने माझ्या अंगात आता त्राण उरला नव्हता पण तरीही मी गाडी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. मागे बसलेली ती बाई आता हालचाल करू लागली. तिचे ओले, भिजलेले हात माझ्या दिशेने पुढे सरकत होते. तिचे कुजबुजणे आता मला माझ्या कानजावळ ऐकू येत होते “इथून कोणीच जात नाही… कोणीच नाही…” मी हिम्मत एकवटून आरशातून पाहिलं
तर ती बाई तिचा चेहरा वर करत होती माझ्या नजरेला नजर भिडवण्यासाठी. माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. त्या बाईच्या डोळ्यांत काहीतरी होतं… अस्वस्थ करणारं.
ते डोळे मानवी वाटतच नव्हते पांढरेशुभ्र, भेसूर, पण आत खोलवर एक गडद काळोख दडलेला होता. जणू त्या डोळ्यांत एक वेगळंच जग होतं. त्या क्षणी मला जाणवलं मी आपोआप तिच्याकडे खेचला जातोय.. माझा श्वास मंदावला. गाडीच्या सीटला चिकटून मी जागीच गोठलो. माझ्या शरीराचा भार हलका होत चालला होता. मेंदू सुन्न पडू लागला होता.. हळू हळू मी शुद्ध हरपत चाललो होतो.. “नाही… नाही!” क्षणातच मी स्वतःवर ताबा मिळवला आणि त्या नजरेतून स्वतःला अलगद सोडवलं. मी ताकद लावून गाडीचा दरवाजा उघडला आणि रस्त्यावर उतरलो. रस्त्यावर पाय ठेवताच मला जाणवलं… हा रस्ता आता आधीसारखा नाही. गाडी बरीच लांब भासत होती आणि ती जणू धुक्यात गडप होत होती. धुक्याने वेढली जात होती. मी घाबरून आजू बाजूला पाहू लागलो पण चौफेर धुक दाटल होतं. मी मागे वळून पाहिलं तर माझी गाडी गायब झाली होती.
आता समोर काही नव्हतं. एक काळोखात हरवलेला जंगलाचा रस्ता. जिथे माणसाचा थांगपत्ताच नव्हता. माझ्या श्वासाची लय बिघडली. कदाचित… मी हरवलोय. डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतानाच मला जाणवलं या जंगलात एक विचित्र शांतता आहे.. कसलाही आवाज कां येत नाहीये.? ना रात किड्यांचा, ना वाऱ्याचा, ना झाडांच्या सळसण्याचा.. जणू काही वेळच थांबली होती.. आता माझ्याकडे एकच पर्याय उरला होता – त्या जंगलातून वाट काढायची. त्याने एक पाऊल पुढे टाकलं. आणि तेवढ्यात, एका झाडामागून कोणी तरी वळून पाहिलं. मला माने पासून कमरेपर्यंत चा भाग च दिसत होता. मान कोनात वाकलेली होती. निर्विकार चेहरा. अंगावर चिंधड्या झालेली जुनी वस्त्रं होती, जणू ती काळाच्या ओघात कुजून गेलेली होती. भीती ने माझं रक्त गोठलं. मी मागे फिरून वेड्यासारख धावायला सुरुवात केली. पायांना जाणवत ही नव्हतं की ती त्या रस्त्यावर आहेत की अजून कुठे. वाट दिसेल तिथे मी पळू लागलो. आणि मग परिसरात एकच आवाज घुमला “तू इथून जाऊ शकत नाहीस…” मी घाबरून डोळे उघडले. पाहिलं तर मी गाडीतच होतो. तितक्यात समोरच्या आरश्यात लक्ष गेलं “ ती बाई माझ्याकडे पाहून कुतसित पणे हसत होती.. “
मी बाहेर नजर टाकली – गाडीच्या खिडक्यांबाहेर तेच जंगल होतं. म्हणजे मी अजूनही इथेच अडकलो आहे. माझ्या सोबत जे घडलं जे घडतंय हे खरंच आहे..?
“नाही…” मी स्वतःशीच बोललो “हे खरं असू शकत नाही!” हात गाडीच्या कीवर ठेवले आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गाडी सुरू झाली. पण समोरचा रस्ता फक्त धुक्याने भरलेला होता. जणू कोणताही मार्ग नव्हता.
तेवढ्यात ती बाई हळूहळू पुढे झुकली. तिचे भिजलेले केस चेहऱ्यासमोर आले, आणि तिचा हात हळूहळू पुढे सरकू लागला. तितक्यात मला अचानक एक गोष्ट आठवली. मी घाईघाईने एका हाताने खिशातून जुनी रुद्राक्षाची माळ काढली जी माझ्या आजोबांनी दिलेली. आणि एका झटक्यात ती बाईकडे फेकली. त्या माळेच्या स्पर्शाने ती बाई किंवा ते जे काही होतं ते अचानक गाडीतून अदृश्य झालं.. आणि वातावरणात एक भेसूर, वेदनादायक आणि किळसवाणा आवाज घुमला. मी संधी साधली आणि गाडीचा वेग वाढवला. गाडी झपाट्याने पुढे निघाली आणि काही वेळातच त्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आली. मी एका सामान्य रस्त्यावर आलो होतो. समोरचा बोर्ड स्पष्ट दिसत होता—”कोल्हापूर १२ किमी”. रस्ता मोकळा होता. सुर्याची कोवळी किरणं झाडांमधून चमकत होती. पहाट झाली होती. गाडी थांबवत मी थरथरतचं बाहेर आला. शरीर घामाने भिजलेलं, हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. मी मागे वळून पाहिलं तर मी ज्या रस्त्याने रात्रभर प्रवास केला होता जणू तो कधीच अस्तित्वात नव्हता.