मी एक सामान्य शेतकरी आहे, सांगलीतल्या एका लहानशा गावात राहतो. आमच्या घरा शेजारीच आहे. रात्री कधी कधी पाणी द्यायला, जनावरांची देखभाल करायला किंवा वीज गेली तर काही कामं करावी लागतात. परंतु, त्या दिवशी… त्या “विशिष्ट” दिवशी… मी एकटाच होतो. त्या रात्री वादळी पाऊस सुरु होता. विजांचा कडकडाट, ढगाचा गडगडाट आणि आभाळ फाटल्यासारखं भासत होतं. संध्याकाळीच विज गेली होती आणि माझं मोबाइलचं नेटवर्कही नव्हतं. त्यामुळे एकदम एकाकी वाटत होतं. लाईट नसल्यामुळे लवकरच जेवण आटोपले. आई आणि वडील लवकर झोपले. मी उगाच अंगणात बसून वाऱ्याचा गारवा अनुभवत होतो. रात्रीची शांतता आणि त्यात पावसाचा आवाज. वातावरण ही खूप गार झालं होतं. तितक्यात अचानक, जनावरांच्या गोठ्यातून एक विचित्र आवाज आला.

पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण आवाज परत आला… आणि ह्यावेळी तो अधिक स्पष्ट ऐकू आला. मी टॉर्च घ्यायला आत गेलो आणि बाहेर पडलो. पाऊस एकदम कमी झाला होता पण वारा मात्र घोंगावत होता. गोठ्याजवळ गेलो, पण आत सगळं शांत होतं. गायी, बैल शांत झोपले होते. पण एक गोष्ट विचित्र वाटली – शेळ्या मात्र खूप अस्वस्थ होत्या, जणू त्यांना काहीतरी दिसत होतं. त्या वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या. मी काही वेळ तिथेच थांबलो. बसायला एक बाक होता. त्यावर बसलो होतो. काही वेळाने त्या शेळ्या शांत झाल्या. वारा ही थांबला होता. मी उठून घराकडे जायला वळणार तितक्यात पाठीमागून जोरात पायांची धाव ऐकू आली. जणू कोणीतरी एका बाजूने दुसऱ्या बाजूला धावत गेलं असावं. वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. अंगावर भीती ने काटा आला. शेतीकडे जाणारा छोटा रस्ता अंधारात हरवलेला दिसत होता. टॉर्चची बॅटरी पण क्षीण व्हायला लागली होती. मी सहज म्हणून त्या वाटेवर टॉर्च फिरवली. 

तेव्हाच एका झाडामागून एक सावली डोकावत असल्याचं जाणवलं आणि ते भयाण दृष्य पाहून अंगावर सर्कन काटा आला. मी झटकन बॅटरीची दिशा बदलली आणि घराकडे वळवली. झपाझप पावलं टाकत घराकडे जायला निघालो. 1 मिनिटांचा रस्ता मला एक तासासारखा वाटत होता. कारण मी त्या वाटेवर एकटा नव्हतो. माझ्या मागे माझ्याच लयित कोणी तरी चालत होतं. मला भास होतोय का हे पाहायला मी अचानक थांबलो तसे ते जे काही होत ते ही थांबलं. मी पुन्हा चालायला सुरुवात केली तसे ते ही मागे मागे येऊ लागलं. पण प्रत्येक पावला सोबत ते माझ्या जवळ येत होतं. पायाखालची माती भिजलेली होती त्यामुळे चालताना असं वाटत होतं की जणू ओलसर, चिकट हात माझ्या पायाना धरत आहेत . मी थबकलो, डोळे बंद केले, मनाशी म्हटलं, “काही नाही, भीती आहे… मनाची भीती!” पण अचानक मला खूप थंडी जाणवू लागली अगदी गोठवून टाकणारी. माझ्या हातातली टॉर्च ही लुकलूकत बंद झाली आणि गडद अंधार पसरला.

या क्षणाला वारा नव्हता होतं ते फक्त गोठलेलं वातावरण. आणि माझ्या कानात कोणी तरी पुटपुटल “तू परत येऊ नकोस..” तो आवाज एका पुरुषाचा होता. पण आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं. साहजिकच अंधार होता पण एव्हाना माझ्या डोळ्यांनी त्या अंधाराला आपलंस करून घेतलं होतं. पण तरीही मी आवाजाच्या दिशेने वळलो… आणि पहिल्यांदा तो दिसला. शेताच्या मधोमध उभा होता.. 8 फूट उंच.. त्या गडद अंधारात ही त्याचे डोळे चमकत होते. जे माझ्यावर स्थिरावले होते.  “कोण आहेस तू?” मी ओरडलो. पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. मी काही पावलं मागे सरकलो आणि धावत सुटलो. पण घाबरलो असल्यामुळे घराच्या वाटेने जाण्या ऐवजी मी दुसऱ्याच दिशेला गेलो. यापुढे जे घडणार होतं ते खूप भयानक आणि हृदय हादरवून टाकणार होतं. माझे पाय माझं शरीर जड होऊ लागलं होतं. जणू शेत स्वतः मला आत खेचत होतं. रस्ता हरवल्यागत भासू लागला. 

किती वेळ धावत होतो, माहीत नाही. पण नंतर घसा कोरडा पडला, शरीरातला त्राण संपला असे वाटले तसे एका झाडाखाली जाऊन जवळ जवळ कोसळलोच. दमछाक झाली होती. माझ्या सोबत काय घडतंय याचा विचार करत असतानाच अचानक वेगळाच वास येऊ लागला. एखाद जनावर मरून पडल्यावर कसा घाण वास येतो अगदी तसा. कुबट. तो वास मला असह्य होऊ लागला. तितक्यात माझं लक्ष वर गेलं आणि तिथला भयाण प्रकार पाहून माझी बोबडीच वळली. त्या झाडावर एक प्रेत लटकत होतं. गळफास लावून. प्रेत यासाठी म्हंटल कारण तो कुबट घाण वास याचाच होता. ते अक्षरशः सडलं होतं. पण तितक्यात ते हळू हळू वळू लागलं आणि ते किळसवाण भयानक दृष्य पाहून माझी शुद्ध हरपली. काही वेळ उलटला आणि माझ्या खांद्यावर एक स्पर्श जाणवला. मी दचकून जागा झालो. सकाळ झाली होती. माझे वडील मला शोधत आले होते.

म्हणजे मी रात्रीभर इथेच होतो? पण मग… ते प्रेत.. वडील मला घरी घेऊन आले. सगळा प्रकार सांगितल्यावर बाबा म्हणाले “ म्हाद्याचं भूत होतं ते.. तुला माहित नसेल मी तुझ्या वयाचा असताना त्याने त्या झाडाला लटकून जीव दिला होता. त्या काळी जंगलाचा भाग होता तो.. त्यात वस्ती तूरळक.. सगळ्यांना वाटल की तो घर सोडून निघून गेला. पण जवळपास महिन्या नंतर एका वाट सरू ला त्याच प्रेत त्या झाडाला लटकलेलं दिसल. तो पर्यंत ते सडून गेलं होतं. त्याने गावात उधारी करून ठेवली होती आणि सतत त्याला हिणवले जात होते. शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलले. गेल्या कित्येक वर्षात असा अनुभव कोणाला आला नव्हता. पण काल ची रात्र.. त्याच रात्री 45 वर्षांपूर्वी म्हाद्या ने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.. पण तो फक्त मला च का दिसला हे मात्र गूढ अजूनही उलगडलेलं नाही.. 

आजही त्या रात्रीचा विचार केला की झोप उडते. त्या नंतर मात्र मी पुन्हा रात्री शेतात कधीही एकटा गेलो नाही. 

Leave a Reply