गेल्या वर्षी माझ्या आजोबांचं निधन झालं, आणि त्यांच्या तेराव्याला आम्ही सगळे कुटुंबीय आमच्या गावी गेलो होतो. आमचं गांव वेगळचं आहे. लोक जरा बोलायला कमीच तयार. एकमेकांकडे पाहणं टाळणं, आणि दिवसाच्या शेवटी लवकर दरवाजे बंद करणं, हे तिथं नित्याचंच आहे. आजोबांचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला आहे – मागे घनदाट झाडं आणि एक जुनी ओसाड हवेली. ती कधी काळी कोण्या राजाची हवेली होती. लहानपणी मी त्या वाड्यात अनेकदा खेळायला गेलो होतो, पण मला नेहमी वाटायचं की ती हवेली झपाटलेली आहे. कारण तिथं गेलं की मला विचित्र जाणीव व्हायची जस तिथं कोणी राहतंय. तिथं थोडंसं पुढे गेलं की एक बाभळीच्या झाडाजवळ जुनं तुटक दगडी कुंड आहे. घरातल्या आणि गावातल्या लोकांनी मला त्या काळी सांगितलं होतं की लहान मूल तिथं जात नाहीत.
त्या काळी गावातली काही लहान मूल तिथं जाऊन बेपत्ता झाली होती. ती गोष्ट आठवली आणि मी हसून दुर्लक्ष केलं होतं. आता काळ बदलला, जग बदललं. मी आता तिशी जवळ येउन पोहोचलो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी मी एकटाच निघालो. जुन्या आठवणी जाग्या करत. आणि मी नकळत त्या कुंडाजवळ पोहोचलो. झाडं जोरात हेलकावत होती, वाऱ्याचा आवाज वेगळाच वाटत होता. कुंड जवळ गेलो तेव्हा जाणवलं – तिथं थंडगार वारा आहे, म्हणून काही वेळ तिथंच थांबायचं ठरवलं. वाऱ्यामुळे पानांची सळसळ ऐकू येत होती. वातावरण छान वाटत होतं म्हणून मी काही फोटो ही क्लिक केले. तितक्यात खूप उग्र वास आला जो मला असह्य झाला. मी झटकन तिथून लांब झालो. तो वास काही तरी जळत असल्या सारखा होता. करपलेला. जणू जळक्या केसांसारखा.
कुंडाकडे पाहिलं… आणि माझ्या अंगावर काटा आला. कुंडाच्या काठावर केसांचा झुपका होता… जळका.. जसे तो नुकताच तिथे आणून ठेवला असावा. कारण मी जेव्हा इथे आलो तेव्हा तिथे असे काहीच नव्हते, वास ही नव्हता. मी मागे वळणार, इतक्यात माझ्या डोक्यावर कुणीतरी थंड हात ठेवला. अंग सुन्न झालं… मागे वळून पाहिलं… कुणीच नव्हतं. पण बांगड्यांचा आवाज कानात घुमला आणि एक वाक्य ऐकू आलं “तू परत आलास…”. मी इतका घाबरलो की त्या जागे पासून लांब जोरात धावत सुटलो. थेट घरी आलो. मी काही न सांगता गप्प बसून राहिलो होतो. पण आजीने माझा चेहरा पाहून ओळखलं. ती जवळ आली, आणि म्हणाली, “कुंडाजवळ गेला होतास ना? तिथं ‘ती’ अजून आहे…”
मी विचारलं, “कोण?”
तेव्हा आजीने ती गोष्ट सांगितली, जी कदाचित लहान असताना मला ती सांगू शकत नव्हती आणि गावात कुणी उघडपणे त्या बद्दल बोलत नव्हतं.
१८०० च्या सुमारास, गावात धनवटी नावाची बाई होती. तिला औषधं, जडीबुटी यांचं ज्ञान होतं, पण लोक तिच्यावर जळत होते. एकदा गावात साथ आली, आणि बरीच लोकं मरायला लागली. लोकांनी तिला दोष दिला आणि म्हणून लागले की “चेटकीण आहे ही”, “ती शाप देतेय आणि गावातली लोकं जातं आहेत”. सुरुवात तिच्यावर जळणाऱ्या काही लोकांनी केली पण नंतर संपूर्ण गाव तिच्या विरुद्ध झालं. एके रात्री तर सगळे गावकरी तिच्या जीवावर उठले. तिला घरातून बाहेर काढून, मारहाण करून त्या कुंडात टाकलं. पण मरताना तिने शपथ घेतली – “या गावात दर वर्षी मी एक जीव घेईन… आणि जो माझं अस्तित्व विसरेल, त्याचा शेवट मी करीन.” तेव्हापासून, दर वर्षी एखादी तरी व्यक्ती अनैसर्गिकरीत्या गायब होते… काहीच पुरावा न ठेवता.. कधी लहान मूल, कधी तरुण तरी कधी वृद्ध.. लहान मुलांना भुलवण सोपं म्हणून कदाचित.. मी आज्जीला म्हणालो “ अग आजी मग गावकरी काहीच करत का नाहीत या साठी. काही उपाय, पूजा वैगरे करायला हवी ना.. “ त्यावर ती म्हणाली की बरेच प्रयत्न झाले पण हा शाप अख्या गावावर आहे आणि त्यातून कोणी कधीच मुक्त होणार नाही. आजी चं ते वाक्य ऐकून मला माझं बालपण आठवलं. कधी कधी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी किती ही शुल्लक वाटत असल्या तरी मोठ्यांचं नेहमी ऐकावं. बहुतेक मी नशीब घेऊन जन्माला आलोय म्हणून तिच्या तावडीतून सुटलो नाही तर कदाचित मी सुद्धा कायमचा बेपत्ता झालो असतो.. त्या गावाला आज ही एक बळी लागतो…दर वर्षी..