अनुभव – रोहन

मी काम करत असलेलं हॉटेल शहराच्या गर्दीपासून थोडं बाजूला होतं. फार मोठं नाही, पण ३ मजली, जुनाट इमारत होती. बाहेरून बघायला अगदी साधं, पण आत एक वेगळंच वातावरण होतं. रिसेप्शन जवळच जुन्या लाकडी खुर्च्या, भिंतींवर पिवळसर झालेल्या पेंटचा थर, आणि कॉरिडॉरमध्ये नेहमी ओलसर गंध दरवळायचा. मी तिथे housekeeping staff म्हणून काम करायचो. सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत काम, आणि त्याबदल्यात फार मोठा पगार नाही. पण राहण्यासाठी हॉटेलमध्येच एक खोली मिळाली होती – तेवढंच समाधान. कारण बाहेरच्या शहरात भाड्याने खोली घेणं मला परवडणार नव्हतं. ती खोली दुसऱ्या मजल्यावर, मागच्या बाजूला होती.

इथे माझ्याबरोबर अजून चार जण राहत होते – संदीप जो किचन पाहायचा, फिरोज जो रूम सर्व्हिस चे काम करायचा, वामन सेक्युरिटी गार्ड आणि अजय माझ्या सोबत हाऊसकिपींग स्टाफ. आम्ही पाच जण, एकाच छोट्या खोलीत. दोन डबल बेड्स, एक फोल्डिंग बेड. भिंतींना ओलसर डाग, छताला पंखा जो नेहमी किरकिर आवाज करायचा. पण आमचं आयुष्य या खोलीतच सुरू व्हायचं आणि संपायचं. दिवसभर काम करून रात्री आम्ही सगळे दमून परत यायचो. मग कुणी गप्पा मारायचं, कुणी मोबाईलवर गेम खेळायचं, कुणी लगेच झोपायचं. या खोलीत कधीच शांतता नसायची – चार माणसं असली की नेहमी काहीतरी सुरू असायचं. 

एका दिवशी संध्याकाळी काम संपवून मी खोलीत आलो, तर बाकी सगळे बाहेर गेले होते. संदीप घरी गेला होता, अजय बाजारात, वामन ड्युटीवर, आणि फिरोज कुठेतरी मित्राकडे. त्या रात्री पहिल्यांदाच मी खोलीत पूर्णपणे एकटा होतो.

सुरुवातीला मला बरं वाटलं कारण होतं शांतता. मी पलंगावर पडून मोबाईलवर गाणी लावली. पण काही वेळात एक विचित्र जाणिव झाली. हॉटेलच्या कॉरिडॉरमध्येही नेहमी आवाज यायचा – पावलांचा, भांड्यांचा, दारं उघडण्याचा आणि बंद होण्याचा होण्याचा. पण त्या रात्री जणू सगळं थांबलं होतं. मी कान देऊन ऐकलं. आणि अचानक – हसण्याचा आवाज आला. तो आवाज अगदी हलका होता. एखाद्या लहान मुलाचं खळखळून हसणं. मी दचकून उठलो. खोलीत मी एकटाच होतो, हे मला माहित होतं. “कोण आहे” मी आवाज दिला.

पण कसलाही प्रतिसाद आला नाही. मी स्वतःलाच समजावलं – कदाचित कॉरिडॉरमधून आला असेल. मी पुन्हा पलंगावर बसलो. तेवढ्यात ठक… ठक… ठक… असा आवाज झाला. जणू एखादा बॉल जमिनीवर टप्पा खातोय. माझ्या अंगावर काटा आला. खोलीच्या कोपऱ्यात खरंच एक छोटा लाल बॉल पडलेला होता. तो आमच्या रूममध्ये कधी आला, कसा आला हे कळलं नाही. त्या क्षणी पुन्हा तोच हसण्याचा आवाज आला. खळखळून हसणं. एका लहान मुलाचं. मी घाबरलो होतो, पण धीर करून पलंगावरून उठलो. हळूच बॉल उचलला आणि खिडकीबाहेर फेकून दिला.

पण जसं मी वळून परत पलंगावर बसलो, तसं कानावर आवाज आला – ठक… ठक… ठक… मी दचकून पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोर, खोलीच्या मध्यभागी तोच लाल बॉल पुन्हा टप्पे खात होता. या वेळेस मी पूर्णपणे गोठलो. भीती ने माझा श्वास रोखलं गेला. आवाज देऊन कुणाला बोलवायचं ठरवलं, पण गळ्यातून शब्दच फुटत नव्हते. तो बॉल टप्पे खात खात नंतर घरंगळत पलंगाखाली गेला. त्या रात्री मी एकही शब्द उच्चारला नाही. रात्रभर पंख्याचा किरकिर आवाज आणि माझ्या स्वतःच्या धडधडत्या हृदयाचा ठोका ऐकत बसलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे roommates आले. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. पण कुणीही विश्वास ठेवला नाही. संदीप हसत म्हणाला “तू एकटा राहिला म्हणून घाबरलास. भास झाले तुला. असे काही नाहीये इथे” पण मला माहीत होतं – तो बॉल, तो हसण्याचा आवाज हे सगळं खरं होतं. पहिल्या अनुभवाची रात्र माझ्यासाठी फार भयानक ठरली होती. पण मी मनात ठरवलं – कदाचित खरंच भास झाला असेल, थकव्यामुळे डोक्यात कल्पना आली असेल. सकाळी काम सुरू झालं की सगळं नॉर्मल वाटेल. पण हळूहळू, त्या खोलीत एकटं असताना मला नेहमी कुणीतरी अजून आहे असं वाटू लागलं. एका संध्याकाळी मी खोलीत परत आलो. बाकी सगळे अजून शिफ्टमध्ये होते.

मी दरवाजा लावून बूट काढत होतो, तेवढ्यात मागून हळुवार पावलांचा आवाज ऐकू आला. जणू एखादं मूल अनवाणी चालतंय. मी दचकून वळून पाहिलं. खोली रिकामी होती. पण तो आवाज थांबला नाही. अगदी स्पष्ट – पावलं टाइल्सवर घासल्या सारखी. मग अचानक थांबला. आणि त्याच वेळी – हलका हसण्याचा आवाज. या वेळेस मी थेट दार उघडून बाहेर पळालो. कॉरिडॉरमध्ये नेहमीसारकाहीच गडबड सुरू होतं – स्टाफ इकडे तिकडे धावत होता, पाहुण्यांचे आवाज येत होते. म्हणजे हे सगळं फक्त आमच्या खोलीतच घडत होतं. त्या रात्री मी सगळ्यांबरोबर होतो. आम्ही गप्पा मारत होतो. सगळं अगदी साधं, नेहमीसारखं वाटत होतं. पण जेव्हा मी झोपलो, तेव्हा पुन्हा तोच अनुभव आला.

स्वप्नात मी पाहिलं, आमच्या खोलीत एक लहान मुलगा उभा आहे. तो साधारण ६-७ वर्षांचा दिसत होता. केस विस्कटलेले, अंगात नवीन शर्ट आणि हाल्फ पॅन्ट. त्याच्या हातात तो लाल बॉल होता. तो हळूहळू हसत माझ्याकडे बघत होता.

मी जागा झालो – घामाने अंग भिजलं होतं. खोलीत अंधार होता, सगळे झोपले होते. पण माझ्या पलंगाच्या पायाशी तो लाल बॉल पडलेला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा सगळ्यांना सांगितलं. “मित्रांनो, काहीतरी बरोबर नाही या खोलीत. मला त्या मुलाचा भास होतोय. काल तर स्वप्नात पाहिलं आणि उठल्यावर बॉलही तिथे होता!” अजय हसला आणि म्हणाला “अरे, बॉल तर काल मी खेळत आणला. पोरकटपणा करतोस का काय!” संदीप आणि फिरोजही थट्टा करू लागले. वामन मात्र थोडा गंभीर झाला. तो शांतपणे म्हणाला, “असले प्रकार खरे असतात. पण सगळ्यांना नको सांगूस. लोक वेडं समजतील.” त्याच्या या वाक्याने मला अजूनच अस्वस्थ केलं. पुढच्या काही दिवसात नेमकं तेच होत राहिलं.

जेव्हा सगळे रूममध्ये असायचे, तेव्हा काहीच घडायचं नाही. पण मी एकटा असलो की… कधी टेबलावर ठेवलेलं पाणी आपोआप सांडायचं. कधी खिडकी लागून पडदा हलायचा.. तरी कधी दारावर थाप ऐकू यायची.. आणि सगळ्यात भयानक – तो बॉल. तो बॉल नेहमी माझ्या डोळ्यासमोर दिसायचा. मी लपवून ठेवला, तर दुसऱ्या ठिकाणी पडलेला मिळायचा. मी बाहेर फेकून द्यायचो, पण काही वेळाने पुन्हा खोलीत दिसायचा. त्या दिवसानंतर मी एकटा खोलीत राहणंच टाळू लागलो. कुणीतरी तरी सोबत असावं म्हणून वाट पाहायचो.

पण सगळ्यांना सांगितल्यावर ते हसत. “तू खूप horror stories बघतोस.”

“डोक्यात गेलंय तुझ्या.” पण मला माहीत होतं – हे काही माझ्या कल्पनेतलं नाही.

आता माझं मन शांत राहत नव्हतं. मला सत्य जाणून घ्यावंच लागणार होतं. मी जुन्या स्टाफशी बोललो. त्यांनी सांगितलेली गोष्ट थरकाप उडवणारी होती. बर्‍याच वर्षांपूर्वी त्या रूममध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. कारण कुणालाच कळलं नाही. तेव्हापासून अधूनमधून तिथे विचित्र प्रकार घडतात.

मला त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. तो बॉल, हसण्याचा आवाज, लागणारी त्याची चाहूल हे सगळं त्याचं होतं. मी धीर करून एका रात्री जाणीवपूर्वक एकटाच रूममध्ये राहिलो. अंधारात शांतपणे बसून होतो. आणि तेव्हाच पुन्हा सुरुवात झाली ठक… ठक… ठक… तो बॉल आपोआप जमिनीवर टप्पे घेऊ लागला.

पडदा अचानक हलला पण खिडकी घट्ट बंद होती. आणि कानाशी पुन्हा एकदा लहान मुलाचं खळखळून हसणं ऐकू आलं. या वेळेस मात्र मी पळालो नाही.

फक्त डोळे मिटून बसलो. आवाज काही क्षण चालले आणि मग अचानक थांबले.

त्या रात्रीनंतरही, जेव्हा जेव्हा मी एकटा असतो, तेव्हा असं काहीतरी जाणवतं.

कधी बॉल जागा बदलतो, कधी टेबलवर ठेवलं पाणी सांडलेलं दिसतं,

कधी पावलं टाईल्स वर घासण्याचे आवाज ऐकू येतात. पण काही कधी समोर दिसलं नाही. पण हो त्याच्या उपस्थितीची जाणीव मात्र तो आजही करून देतोय. 

माझे roommates अजूनही हसतात माझ्या गोष्टीवर. कारण त्यांना कधीच काही जाणवत नाही. पण मला मात्र ठाम विश्वास आहे त्या रूममध्ये अजूनही तो आहे. त्याच असणं मलाच कां जाणवत इतरांना का नाही ते मला माहित नाही. पण तो मला इजा करत नाही. फक्त… इथे आहे. कदाचित अडकून पडलाय कायमचा.. 

Leave a Reply