कोकण म्हंटल की मनात लगेच नारळाच्या बागा, आंब्याची झाड, हिरवागार निसर्ग आणि खाऱ्या वाऱ्याची उब अशी चित्रं उभी राहतात. पण त्या प्रवासानं मला या भूमीचा एक वेगळा, अनोळखी आणि भीषण चेहरा दाखवला. मी पत्रकार आहे. रहस्यं, गूढ परंपरा आणि लोककथांवर लिहायचं हे माझं वेडच झालं आहे. त्या दिवशी शाळेतल्या एका जुन्या मित्राबरोबर बोलताना एक नवीन गोष्ट कळली. मित्राचं म्हणणं होतं की त्याच्या गावा शेजारच्या एका भागात भूतांची यात्रा भरते. पहिल्यांदा ऐकून हसू आलं. अशी कोणती यात्रा असते का?
पण जसजसं मी शोध घेऊ लागलो, तसं या गोष्टीभोवतीचं धुकं अधिक दाट होत गेलं. नकाशावर गावाचा ठावठिकाणा नाही, इंटरनेटवर एकही नोंद नाही. काहीच समजेना. शेवटी ठरवलं की स्वतःच तिथं जाऊन पाहायचं. प्रवास सोपा नव्हता. बस फक्त त्या तालुक्यापर्यंत जायची. तिथून रिक्षा करून जवळच्या एका गावात. आणि त्यानंतर डोंगरात शिरणारा बारीक पायवाटीचा रस्ता धरावा लागतो. डोंगरातली हवा जड, आर्द्रतेनं भरलेली होती. झाडं इतकी उंच की सूर्यकिरण खाली पोहोचतच नव्हते. त्यामुळे दिवसाही वाट अंधारलेली वाटत होती. झाडांच्या बुंध्यांवर शेवाळं चढलेलं, पायवाटेवर कुजलेल्या पानांचा थर. पावलांखाली पानं आली की वेगळाच आवाज व्हायचा. त्यात पक्ष्यांचे अजब आवाज, कुठूनतरी येणारी पिंगळ्याची आरोळी, आणि दूरवरून ऐकू येणारा पाण्याच्या झऱ्यांचा आवाज. सगळं एकदम अपरिचित आणि अस्वस्थ करणारं. कधी कधी वाटायचं, माझ्या मागं कुणीतरी चालतंय. पण मागं वळून पाहिलं की फक्त रिकामा रस्ता.
संध्याकाळ होत आली तेव्हा गावाच्या टोकाला पोचलो. गांव खूप लहान. मोजकी 20-25 घर, लाल मातीच्या ओसरी, कौलारू छप्परं, दाराशी नारळाची झाडं.
मध्येच एक मोडकळीस आलेलं देऊळ आणि बाजूला एक पडक्या वाड्याचे भग्नावशेष. गावात शिरता क्षणी लोकांची नजर माझ्यावर खिळली.
कुणी उंबरठ्यावर बसून तंबाखू चघळत होतं, कुणी पोत्यातली नारळं मोजत होतं.
पण त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र संशय होता. जणू मी एखाद संकट घेऊन आलोय गावात. मला पाहताच कुणी उगाच घरात शिरलं, तर कोणी वाट बदलली.. एका व्यक्तीशी नजरा नजर झाली तर ती लगेच त्याने मान खाली घातली. मी एका दोघांशी सवांद साधायचा प्रयत्न केला पण सगळे टाळाटाळ करत आहेत हे कळायला मला वेळ लागला नाही. फक्त एक म्हातारा माझ्याकडे बघून हलकं हसला. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाहून वाटल की त्याला म्हणायचं आहे “इथे थांबू नकोस”. आणि हे मला अगदी प्रकर्षाने जाणवलं. बऱ्याच प्रयत्न नंतर एक व्यक्ती माझ्याशी नीट बोलला. राया नाव होतं त्याच. त्याला विचारून तिथेच राहण्याची सोय करून घेतली. त्याने ही माझी जास्त चौकशी न करता मला मदत केली. जे घर राहायला मिळालेलं त्याच छप्पर गळक्या कौलांचं होतं. आकाश दिसत होतं. वाऱ्यात खाऱ्या गंधाची उग्रता होती, जी समुद्राजवळ असल्याचं सांगत होती. मी पांघरूण घेऊन पडून राहिलो.
डोक्यात सतत एकच विचार – या गावात आलोय खरे पण ती यात्रा अनुभवायला मिळेल की हा सगळा खटाटोप वाया जाईल.. याच विचारात झोप कधी लागली तेही कळलं नाही. रात्री फारसा गाढ झोपलोच नाही. सकाळी तुटलेल्या कौलातून येणारा सूर्य प्रकाश थेट चेहऱ्यावर पडल्यामुळे जागं आली. आज जरा गावात फिरून त्या यात्रे बद्दल माहिती गोळा करावी असा बेत होता. अंघोळ वैगरे उरकून मी बाहेर पडलो. गाव नेहमीसारखंच शांत दिसत होतं. लहान मुलं खेळताना, स्त्रिया पाण्यासाठी विहिरीकडे जाताना, शेतातली माणसं काम करत असताना. पण जरा जवळ गेलं की त्यांच्या नजरा माझ्याकडे वळायच्या आणि पुन्हा पटकन दुसरीकडे. कुणीही स्वतःहून बोलायला, संवाद साधायला तयार नव्हतं.
मी चौकात उभा राहून गावाचं निरीक्षण करत होतो. एक म्हातारा झाडाखाली बसून विडी ओढत होता. मी जवळ गेलो, त्यांना विचारलं “काकां, इथे या गावात काही खास सण-उत्सव चालू आहे का?” तो फक्त माझ्याकडे पाहून हसला. काहीतरी बोलायचं होतं त्याला पण तो काहीच बोलला नाही. गावाभोवतीच्या पायवाटा पाहत मी एका जुन्या वाड्याजवळ आलो. भग्न झालेल्या खिडक्यांमधून अंधार आतमधून बाहेर बघत होता. तितक्यात अचानक कुणीतरी खिडकी सरकवली असं भासलं. मी थबकलो. क्षणभर काही दिसलं नाही. नंतर पुन्हा तोच काळोख. थोडं पुढे गेल्यावर एका लहानशा देवळासमोर आलो. तुटक्या मुर्त्या, मोडक्या घंटा, आणि तुळशीवृंदावनाभोवती राखेचे वर्तुळ. देवळाचं शिखर भग्न झालेलं, तरी हवेत मंद धुपासारखा वास तरंगत होता. पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. मला थोडं आश्चर्य वाटल कारण मंदिर अश्या अवस्थेत होतं.
मी फोटो काढायचा प्रयत्न केला, पण कॅमेराच्या स्क्रीनवर फक्त धूसर पांढुरकी पट्टी दिसत होती. दोन-तीनदा प्रयत्न करूनही काही जमेना. शेवटी वैतागून तिथून निघालो. गावात ज्या घरात वास्तव्यास होतो तिथल्या दारावर एक कागदाचा तुकडा अडकवलेला दिसला. त्यावर लिहिलं होतं “2 दिवस थांबावं लागेल, अमावस्येला दिसेल तुम्हाला.. “ माझ्या अंगावर काटा आला. मी आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. कोणीतरी तो कागद ठेऊन गेलं होतं. आणि त्या व्यक्तीने जणू माझ्या मनातलं ओळखलं होतं की मी इथे का आलोय. कारण अजून पर्यंत मी कोणाशीच नीट संवाद साधू शकलो नव्हतो. ज्या व्यक्तीने म्हणजे राया ने माझी राहायची सोय केली होती त्यालाच विचारायचे ठरवले. पण तो नेमका गावात नव्हता. त्याला शोधायचा प्रयत्न केला पण तो दिसला नाही. मग त्या कागदावर लिहिल्या प्रमाणे 2 दिवस वाट बघायचे ठरवले. तिथे गावात करण्यासारखे काही नव्हते म्हणून माझे लिखाणकाम करत बसायचो.
अमावस्याची रात्र जवळ येत होती. त्या रात्री खूप अस्वस्थ वाटत होतं. सतत घसा कोरडा पडत होता. आणि मग अचानक दूर कुठे तरी शंख फुंकल्याचा आवाज कानावर आला आणि त्याच सोबत ढोल ताशांचा.. आधी वाटले की मला भास होतोय पण नंतर हळू हळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला. पूर्ण गाव काळोखात बुडालं होतं. मी घराबाहेर आलो तर दारात राख पसरलेली दिसली. थोडं का होईना मी घाबरलो. कारण जेव्हा घरात आलो तेव्हा दारात काहीच नव्हतं मग ही राख.. पण मी हिम्मत करून घरात गेलो, माझा कॅमेरा आणि बॅग घेतली आणि बाहेर आलो. जसा बाहेर आलो तसे त्या राखेवर पावलांचे ठसे होते जे बाहेरच्या बाजूला जात होते. मी घराबाहेर पडलो आणि त्या पावलाच्या ठस्यांचा माग काढू लागलो. रात्र चांदण्यानं उजळली होती, पण गावातलं शांत वातावरण अधिक भयानक वाटत होतं. कुत्रेही भुंकत नव्हते, झाडांची पानंही हालत नव्हती. फक्त तो सतत वाढणारा नाद.
गावाच्या टोकाकडून एक पायवाट देवळाकडे जात होती. तोच रस्ता जुन्या वाड्याजवळून वळत होता. माझी पावलं तिकडे वळली. रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडं उंच उभी होती. त्यांच्या सावल्या चंद्रप्रकाशात वाकड्या-तिकड्या आकृत्यांसारख्या वाटत होत्या. वाऱ्याच्या झुळकीनं पानं सळसळली की जणू कुणीतरी कुजबुजतंय असं वाटे. जसा मी पुढं सरकलो, तसा आवाज मोठा होत गेला. ढोल-ताशांचा गडगडाटी आवाज, शंखांचा तीव्र नाद – सगळं अंगावर कोसळल्यासारखं वाटत होतं. हवा जड झाली होती, श्वास घ्यायलाही त्रास होत होता. अचानक रस्त्याच्या वळणावर समोरचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं… मशालीच्या उजेडात एक मिरवणूक पुढं चालली होती. मधोमध एक पालखी दिसत होती. पहिल्या क्षणी ते एखाद्या खऱ्या यात्रेसारखं वाटलं. पण नीट पाहताच माझं रक्त गोठलं.
पालखी उचलणारे देह – त्यांच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. डोळे नाहीत, नाक नाही, तोंड नाही. फक्त काळसर, गुळगुळीत पोकळ जागा. जणू जीवंत माणसं नव्हेत, तर मातीचे पुतळे चालत होते. मशालीचा उजेड त्यांच्या देहावर पडत होता, पण त्यांच्या सावल्या जमिनीवर उमटत नव्हत्या. मी पाय रोवून उभा राहिलो. कॅमेरा चालू केला, पण स्क्रीन.. त्यात काहीच दिसत नव्हतं. एकही दृश्य टिपलं जात नव्हतं. मी हा भयाण प्रसंग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पुन्हा समोर पाहिलं. त्यांची चाल एकदम समांतर, लयबद्ध. कुणाचं पाऊल चुकत नव्हतं. हवा राखेच्या वासाने भरली होती. अंगावर शहारे येत होते. अचानक त्यांच्यातून एक उंच सावली वेगळी झाली आणि माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यांत काळोख भरलेला होता. माझ्या छातीत धडधड वाढली. पण ती सावली काही बोलली नाही, फक्त हाताने पुढच्या पायवाटेकडे इशारा केला – जिथून यात्रा पुढे जात होती. क्षणभर माझं भान हरपेल असं वाटलं. पण मनात कुठेतरी जाणवलं – हे जे मी पाहतोय, ते या गावाचं खरं रहस्य आहे. मी थरथरत उभा होतो, आणि ती पालखी माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेली. माशाली हळूहळू अंधारात विरल्या. ढोल-शंख नाद ऐकू यायचे बंद झाले. पुन्हा काळोख, पुन्हा शांतता. जणू काही घडलंच नव्हतं.. ते गांव मात्र अजूनही गडद अंधारात होतं.
मी तिथंच कोसळून खाली बसलो. जे पाहिलं ते स्वप्न होतं की अजून काही.. हे मला आजही उलगडलेलं नाही..