अनुभव – सुमित भोईर
हा जीवघेणा अनुभव मला एप्रिल २०२३ मध्ये आला होता. मी एका कुरिअर डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आम्ही तिथे ६ जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. प्रत्येकाला एक ठराविक एरिया दिलेला होता जिथे आम्ही आमचे कुरिअर्स पोहोचवायचो. मीही माझ्या एरियातले काम प्रामाणिक पणे करत होतो.. सामान्यतः मंगळवार ते शनिवारपर्यंत कुरिअर्स कमी असतात, पण रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी कुरिअर्सचा लोड जास्त असतो. म्हणजे, जे काम आम्ही सामान्य दिवसांत दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत संपवतो, तेच सोमवारी रात्री १०-११ वाजेपर्यंत चालतं. त्यामुळे सोमवारी खूप उशिरा पर्यंत काम कराव लागायचं. एके दिवशी आमच्यासोबत काम करणाऱ्या केतन नावाच्या मुलाने कंटाळून काम सोडायचं ठरवलं. तो या कामाला खूप वैतागला होता आणि गेले काही दिवस त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून आम्हाला ते स्पष्ट दिसलं होतं. शेवटी ताण इतका वाढला की त्याने ऑफिसमध्ये सांगून कायमचा जॉब सोडून दिला.
त्या दिवशी नेमका बुधवार होता म्हणून बरे झाले. पण तरीही आता त्याच्या डिलिव्हरी आम्हाला विभागून कराव्या लागणार होत्या. कारण त्याच्या जागी दुसरा डिलिव्हरी बॉय लगेच त्याच दिवशी मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून त्याचा एरिया आम्ही आमच्या ५ जणांमध्ये वाटून घेतला आणि आपापल्या कामाला लागलो. मी घाई करत आधी माझ्या एरिया मधल्या सगळ्या डिलिव्हरी पूर्ण केल्या आणि मग केतनच्या एरियाकडे निघालो. तिथे जवळपास ७-८ डिलिव्हरी कराच्या होत्या, त्यामुळे फार वेळ लागणार नव्हता. संध्याकाळचे ७:३० वाजून गेले होते. पहिल्या ३ बिल्डिंग्समध्ये मी डिलिव्हरी केली आणि चौथ्या बिल्डिंगकडे निघालो. पण जिथे डिलिव्हरी द्यायची होती, ती बिल्डिंग मला सापडत च नव्हती. गूगल मॅप्सवरही पाहिलं, पण काही फायदा झाला नाही. मग कंटाळून मी केतनला फोन लावला आणि विचारलं की ही बिल्डिंग नक्की कुठे आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पोहोचलो.
एव्हाना अंधार गडद झाला होता. ती बिल्डिंग बाकीच्या बिल्डिंग्स पेक्षा बऱ्याच आतल्या बाजूस होती. आजूबाजूला फक्त काही दुकाने होती, पण सगळी बंद होती. फक्त एक ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडं होतं. त्याच्या बाहेर लावलेल्या ट्यूबलाईट मूळे थोडासा प्रकाश होता. त्या बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं, तर कोणीही पाहून म्हणेल की ही भुताटकी ची बिल्डिंग आहे. करण तिथे साधा वॉचमन सुद्धा नव्हता. मी माझी बाईक साईडला पार्क करून पार्सल घेऊन आत निघालो. लिफ्टपर्यंत आलो. लिफ्टचं दार उघडलं आणि तसा एकदम जोरात घरघर करणारा आवाज आला. लिफ्ट जुनी वाटत होती आणि त्यात अगदी कमी वापरातली असावी. ६व्या मजल्यावर पार्सल द्यायचं होतं – ६०३ नंबरचा फ्लॅट. जशी लिफ्ट थांबली, मी बाहेर आलो. वातावरणात इतकी शांतता होती की मनात एक विचित्र भीतीची भावना निर्माण होतं होती.. ही शांतता पुढे जाऊन कोणतं रूप घेईल याची कल्पनाही करता येत नव्हती. मी त्या फ्लॅट जवळ आलो आणि बेल वाजवली. २०-३० सेकंद झाले असतील, पण कोणी दार उघडलं नाही.
मी पुन्हा एकदा बेल वाजवली. पण या वेळेस जे घडलं त्यानं माझं अंग शहारलं. दाराखालून एक भयानक आणि किळसवाणा आवाज येऊ लागला. आधी वाटलं – एखादा पाळीव कुत्रा असेल, पण अचानक माझ्या कानाजवळून एका मुलीचा आवाज आला – “घरात कोणीच नाही…” मी एकदम दचकून मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. मी तिथून पळ काढला. जिन्याने धावत उतरत होतो, तेवढ्यात त्या मुलीची एक जोरात किंकाळी ऐकू आली. मी न थांबता पायऱ्या उतरत राहिलो. नंतर लक्षात आलं की माझ्या मागे काहीतरी आहे – जे किंचाळत आहे आणि माझ्या मागे येत आहे. मी मनातल्या मनात गणपतीबाप्पाचं नाव घेत, घाईघाईने खाली आलो. तिथेच माझी बॅग ठेवली आणि थेट ऑफिसमध्ये पोहोचलो. उरलेली ३-४ पार्सल्स मी ऑफिसमध्ये रिटर्न केली. सरांनी आश्चर्य चकित होऊन विचारलं – “काय झालं? एवढा घाबरलेला का दिसतो आहेस?” कारण त्यांनी मला या आधी कधीच इतके अस्वस्थ आणि भयभीत पहिले नव्हते.
मी त्यांना संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यांनी मला घरी जाऊन विश्रांती घे, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सुट्टी घे, असंही सांगितलं. घरी जाताना माझे दोन्ही पाय फार दुखत होते – जणू गाडी चालवत असताना कोठेतरी कोसळेन की काय अशी अवस्था होती. घरी पोहोचलो – घर फार लांब नव्हतं – १५-२० मिनिटांत पोचलो आणि आई-बाबांना सर्व घटना सांगितली. तेही खूप घाबरले. त्या घटनेनंतर त्या बिल्डिंगमध्ये काय घडलं होतं, ती मुलगी कोण होती आणि तो आवाज कसला होता हे काहीही शोधून काढण्याचा विचारही केला नाही. आणि पुन्हा कधीही त्या बिल्डिंगच्या भागात फिराकलो ही नाही. नंतर मी पुन्हा कामावर गेलो, पण कुठेही गेलो तरी ती एकच भीती कायम मनात राहायची. म्हणूनच मी डिलिव्हरी बॉयचं काम सोडून तिथेच ऑफिसमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत आहे.