अनुभव – तनय जामदार
अनुभव माझ्या आजोबांचा आहे आणि त्यांच्याच शब्दांत सांगू इच्छितो. माझं नाव परशुराम. आता वय ७५ आहे. पण हा अनुभव मला सुमारे २२ वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा मी ५३ वर्षांचा होतो. हा प्रसंग अजूनही माझ्या आठवणीत तसाच कोरला गेलेला आहे – धूसर नाही, अगदी ताजा… आणि अंगावर काटा आणणारा. तेव्हा मी आणि माझी बायको “करूळ” नावाच्या एका छोट्याशा गावी गेलो होतो, काही दिवसांसाठी. गाव निसर्गरम्य होतं – नदीच्या काठावर वसलेलं. एका संध्याकाळी आम्ही दोघं नदीवर फेरफटका मारायला गेलो. बायको जवळच कपडे धुत असलेल्या काही काकूंशी गप्पा मारण्यात गुंतलेली, आणि मी नदीच्या किनाऱ्यावर थोडा पुढे चालत गेलो. तेवढ्यात मला एक ओळखीचा चेहरा दिसला – माधव! माझा बालपणीचा जवळचा मित्र. कित्येक वर्षांनी त्याला पाहून मला खूप आनंद झाला. त्याचा तो हसतमुख चेहरा, तीच देहबोली. मी त्याला विचारलं, “अरे तू इकडे काय करतोस?”
तो हसून म्हणाला, “इथेच असतो मी आता.. आज रात्री किरवे खेकडे पकडायला चाललो आहे तू येणार आहेस का?”
मी सहज म्हणालो, “का नाही! रात्री जेवणानंतर जाऊ या.”
रात्री आम्ही दोघं निघालो. गावाच्या डोंगराळ भागातून नदीच्या दिशेने चालू लागलो. निळसर चंद्रप्रकाशात जंगलातलं वातावरण काहीसं भेसूर वाटत होतं, पण माधव बरोबर असल्याने फारसं लक्ष गेलं नाही. नदीकिनारी पोहोचलो. आम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली. आमच्या गप्पा सुरु होत्या. काही वेळ गेला. मग सहज मागे वळून पाहिलं – पण माधव कुठेच दिसत नव्हता! मी इकडेतिकडे पाहिलं, हाक मारली पण उत्तर नाही. तेवढ्यात माझं लक्ष टोपलीकडे गेलं – ती खेकड्यांनी भरलेली होती… पण खरं सांगतो, त्या खेकड्यांची हालचाल काहीतरी विचित्र होती… जणू ते फक्त मांसासाठी तडफडत होते, जिवंत असं काहीच वाटत नव्हतं. माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला. मी घाबरून तिथून पळ काढला. रस्त्यातही त्याच्या नावाने हाका मारत होतो, पण काहीच प्रतिसाद नाही. घरी परतलो. मनात भितीचं काहूर माजलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट माधवच घर गाठलं. त्याची आई दारातच होती. मी तिला कालच्या रात्रीचं सगळं सांगितलं. ते ऐकून ती थिजून गेली… तिचे डोळे पाणावले आणि म्हणाली:
“बाळा, माधव… तो १२ वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावला…”
ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग मला जो भेटला होता, मी ज्याच्या सोबत रात्री नदीवर होतो तो कोण होता.. सगळं काही स्वप्नवत वाटू लागलं. घडलेल्या प्रकारावर विश्वास बसत नव्हता. पण कालांतराने या गोष्टींवर माझा विश्वास बसला. आजही जेव्हा मी त्या घटनेचा विचार करतो, तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो.