अनुभव – सागर कदम
ही गोष्ट सुमारे ३० वर्षांपूर्वी घडलेली आहे, आणि ती माझ्या स्वतःच्या काकासोबत घडली होती. तेव्हा त्यांचं वय फक्त २४ वर्षांचं होतं. आम्ही मूळचे डोंगरगावचे. गाव अगदी छोटं, जंगलान वेढलेलं. त्या काळात गावात फारशी सुविधा नव्हती. मोबाईल तर दूरच.. त्या काळी ते नव्हतेच..आणि रस्ते, दवाखाने, ट्रान्सपोर्ट – हे सगळं मिळणं म्हणजे नशिबाची गोष्ट होती. माझा काका फारच उत्साही होता. मित्रांबरोबर गावात फिरणं, जंगलात जाणं, झाडांवर चढणं त्याचा रोजचाच कार्यक्रम. एक दिवस जंगलात फिरताना तो एका उंच झाडावर चढला. आणि तोल जाऊन खूप उंची वरून खाली पडला. त्याच्या पाठीला जबर मार लागला. मित्रांनी कसंबसं त्याला गावात आणलं. गावच्या वैद्याला बोलावलं. वैद्यांनी एक नजर टाकली आणि लगेचच नकार दिला “ही केस माझ्या हातातली नाही… मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल,” ते म्हणाले.
घरात माणसांची आणि सगळ्यात जास्त – वेळेची अडचण. शेवटी ठरलं की काकाला भुसावळला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं. पण वाटचाल एकट्यानं करावी लागणार होती. डोंगरगाव स्टेशनवर त्याला गाडीत बसवलं. तिकडं भुसावळ स्टेशनवर त्याचा मामा त्याला घ्यायला येणार होता. जो त्याला पुढं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता. प्रवास रात्रीचा होता. काका गाडीत बसला आणि थकवा, वेदना यामुळे काही वेळातच डोळा लागला. ट्रेन मधल वातावरण दमट होतं. स्लीपर कोच. काही वेळ गेल्यावर अचानक त्याची झोपमोड झाली. त्याला वाटलं की स्टेशन चुकलं की काय…! तो घाबरून उठला, खिडकीबाहेर अंधार दिसत होता. तो उठून दरवाज्याजवळ येउन थांबला. जशी गाडी थांबली तसे पुढच्या स्टेशनवर उतरला. त्याला वाटल की आपलं स्टेशन गेलं आणि आता आपण चुकीच्या स्टेशनं वर उतरलो आहोत.
पण त्याला माहिती नव्हतं, पण तो प्रत्यक्षात भुसावळ स्टेशनवरच उतरला होता… फक्त ट्रेन उशिरा पोहोचल्यामुळे प्लॅटफॉर्म पूर्ण सामसूम झाला होता. लाईट्स नव्हते. शांतता इतकी होती की पावलांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. इतर कसलाही आवाज नाही… संपूर्ण परिसर निर्मनुष्य.. काकानं त्याच्या मामाला शोधायला सुरुवात केली. पण चालणं शक्य नव्हतं, कारण पाठ अजूनही दुखत होती. तरीही तो प्लॅटफॉर्मवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेला. शेवटी थकल्यावर, त्यानं ठरवलं की स्टेशनबाहेर जाऊन कुणाला तरी विचारावं… कदाचित हॉस्पिटल कुठं आहे हे सांगतील. स्टेशनच्या बाहेर आला… आणि समोर एक बाई उभी दिसली. ती अगदी नीटनेटकी होती. जुन्या पद्धतीचा पेहराव. मेकअप अगदी उठून दिसणारा – विशेषतः लाल चकचकीत ओठ.
काकाला वाटलं की ही देखील बहुतेक आपल्या ट्रेन मधूनच उतरलेली असावी, आणि कुणाची तरी वाट पाहत असावी. काकानं तिच्याजवळ जाऊन हॉस्पिटलचा रस्ता विचारायचं ठरवलं… तसे तो जवळ येत तिला काही विचारणार तितक्यात तिनं चालायला सुरुवात केली. काय झालं कोणास ठाऊक – काका तिच्या मागं चालायला लागला. ना ती काही बोलली… ना काका काही बोलला. चालणं सुरूच. त्याला अजिबात आठवत नव्हतं की आपली पाठ दुखतेय, चालणं अवघड होतय… वेदना जणू कुठंतरी नाहीशा झाल्या होत्या. फक्त तिच्या मागे चालत राहण्याची एक विचित्र ओढ निर्माण झाली होती. रस्ता बदलत गेला. स्ट्रीटलाईट्स मागे पडले… आता अंधार, मोकळी जागा, आणि शेवटी कच्चा मातीचा रस्ता. एक वेळ अशी आली, जेव्हा त्याला आठवतच नव्हतं की आपण किती वेळ चाललोय. अंग तापत चाललं होतं, डोकं जड झालं होतं. अखेर, समोर एका नदीचं पात्र आलं… तापी नदी..
तसे अचानक एका झटक्यात काका भानावर आला. तसे शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या. कारण तो जवळपास 4-5 किलोमीटर चालत आला होता. तो आजू बाजूचा परिसर पाहू लागला. तसे त्याच लक्ष समोर गेलं – ती बाई समोर उभी होती. नदीच्या पाण्याकडे पाहत… स्तब्ध.. काही क्षण तशीच उभी राहिली… आणि मग हळूहळू पाण्यात उतरली. ती थांबली नाही. एक पाऊल, दुसरं, तिसरं… आणि मग बघता बघता पाण्यात बुडून गेली. काकाच्या अंगावर भीतीने शहारा आला. तो तिथंच थिजून गेला. शरीर थरथरू लागलं. जड पावलांनी तो मागे वळला. पलिकडे थोड्या अंतरावर एक छोटंसं हनुमानाचं मंदिर होतं. काकानं तिथं धाव घेतली. मंदिरात जाऊन बसला. डोळ्यांसमोरचा प्रसंग काही केल्या मिटेना.
ताप अजून चढलेला. श्वास घ्यायला त्रास होतं होता. तेवढ्यात मंदिराच्या कोपऱ्यातून एक वयस्कर व्यक्ती आला, त्यानं पाण्याचा एक लोटा दिला. काहीतरी मंत्र पुटपुटलं… आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाला “सावध रहा, बाळा. ती इथे नदीकाठी घेऊन येते.. जे कुणी तिच्या मागं जातं… ते परत येत नाही.” त्यांचं ते वाक्य ऐकून काका सुन्न च झाला. त्याला काय बोलाव काहीच कळत नव्हतं. काकानं संपूर्ण रात्र तिथेच काढली. कारण तिच जागा त्याला सुरक्षित वाटत होती. सकाळी काही गावकरी नदीच्या दिशेने येताना दिसले. त्याने विनंती केली तसे ते त्याला हॉस्पिटलकडे घेऊन गेले. काकाचं नशीब बलवत्तर होतं… म्हणून तो वाचला.